You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोमनाथ मंदिर : 6 टन सोन्याची लूट ते हजारो जणांची कत्तल; महमूदच्या हल्ल्यावेळी काय घडलं होतं?
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सोमनाथ मंदिरावर पहिलं आक्रमण 1 हजार वर्षांआधी जानेवारी 1026 मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यानंतरही अनेकदा हल्ले झाले आणि सोमनाथ मंदिराचा पुन्हा पुन्हा जिर्णोद्धार होत राहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरुन 'स्वाभिमान पर्व'ची घोषणा केली. याद्वारे या मंदिरासाठी प्राण गमावलेल्यांचं स्मरण केलं जाणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
या निमित्ताने बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेला लेख पुन्हा वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
20 वर्षं गजनीवर राज्य केल्यानंतर 997 मध्ये तिथला बादशाह सुबुक तिगीनचा मृत्यू झाला. त्यानंतर सुबुक तिगीनचा मुलगा महमूद गजनीच्या सिंहासनावर आरूढ झाला.
खरं तर तिगीनने महमूदला आपला वारस म्हणून निवडलं नव्हतं. धाकटा मुलगा इस्माइल हा आपला वारस व्हावा, अशी तिगीनची इच्छा होती.
असं असलं तरी, तिगीनच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी कोण होईल याचा निर्णय तलवारी आणि मनागटातील बळाच्या जोरावर झाला आणि बादशाहची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली.
ज्यावेळी तिगीनचा मृत्यू झाला त्यावेळी महमूद हा खुरासान या ठिकाणी होता. त्यावेळी त्याने भावाला पत्र लिहिले, 'जर माझ्यासाठी सिंहासन सोडलं, तर त्या बदल्यात मी तुझी बल्ख आणि खुरासान या प्रांताचा प्रशासक म्हणून नेमणूक करेल.'
पण इस्माइलने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर महमूदने आपल्या सैन्यासह भावाविरोधात गजनीवर हल्ला केला आणि इस्माइलचा युद्धात पराभव केला.
इस्माइलला अटक करण्यात आली आणि त्यानंतर महमूदने 27 व्या वर्षी गजनीचे सिंहासन सांभाळले.
भारतावर हल्ल्याचा उद्देश संपत्ती लुटणे
आपल्या 32 वर्षांच्या कारकीर्दीत महमूदने भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या.
अब्राहम इराली यांनी त्यांच्या 'द एज ऑफ रॉथ' या पुस्तकात म्हटलं, "भारतातील हिंदू मंदिरात खजिना भरलेला होता. त्यावर स्वारी करणे हे त्याच्या धार्मिक भावनेला पूरक ठरत होते, परंतु त्याचवेळी अलोट संपत्ती देखील त्याच्या पदरात पडत होती. इस्लामचा प्रचार करणे हा महमूदच्या हल्ल्यांचा कधीच उद्देश नव्हता."
प्रसिद्ध प्रवासी अल बरुनी लिहितात, "महमूदच्या हल्ल्यावेळी जेव्हा ज्या लोकांनी आपला जीव आणि संपत्ती वाचवण्यासाठी इस्लाम स्वीकारला, ते लोक महमूद परतल्यानंतर पुन्हा आपल्या आधीच्या धर्माचे पालन करू लागले. महमूदच्या भारतावरील स्वाऱ्यांचा धार्मिकदृष्ट्या अगदी हलकासा परिणाम झाला."
महमूदच्या सेनेतील हिंदू सैनिक
आपला उद्देश साध्य करण्यासाठी महमूदने धार्मिक प्रेरणेची बतावणी केली होती. त्याच वेळी आपल्या सैन्यात मोठ्या संख्येने हिंदू सैनिकांची भरती करण्यात त्याला कुठलीही अडचण वाटली नव्हती.
ही गोष्ट ऐकायला जरा आश्चर्यकारक वाटू शकते, पण वायव्य भारतात गजनवी सल्तनतची जी नाणी सापडली आहे त्यावर अरबी व्यतिरिक्त शारदा लिपीमध्ये लिहिलेले आढळले आहे.
पी. एल. गुप्ता त्यांच्या 'क्वाईन्स' या पुस्तकात लिहितात, "या नाण्यांवर सुल्तान या इस्लामिक पदवीसोबतच नंदी आणि श्रीसामंत देव या नावाचे उल्लेख देखील आढळतात."
अल उतबी 'तारीख-ए-यामिनी'मध्ये लिहितात की, महमूदने मध्य आशियात जे सैन्य पाठवले त्यात तुर्क, खिलजी, अफगाण यांच्याबरोबरच भारतीय देखील होते.
त्या सैन्याला शतकांपूर्वीचे मुस्लीम राज्य मुल्तान नष्ट करण्यात आणि तेथे मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या मुसलमानांचा नरसंहार करण्यात कुठलाही संकोच वाटला नाही.
त्याने केवळ त्यांच्या मशिदीच बाटवल्या नाहीत तर उलट त्यांच्याकडून दोन कोटी दिरहमची खंडणी देखील वसूल केली.
संपत्ती लुटण्याबरोबरच गुलामही बनवले
महमूदच्या सैनिकांचा रस लढाई जिंकण्यापेक्षा लूटमारीचं सामान घेऊन जाण्यात अधिक होता. कित्येकवेळा तर त्यांना भारतावर केलेल्या स्वारीतून इतकी संपत्ती मिळायची की त्याबद्दल त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
खजिना लुटण्याव्यतिरिक्त ते त्यांच्याबरोबर भारतीय पुरुष, महिला आणि मुलांना गुलाम बनवून बरोबर घेऊन जात असत.
फक्त स्वतःसाठी गुलाम म्हणून भारतातून लोकांना नेलं जात नसे, तर त्यांची गुलामांच्या व्यापाऱ्यांकडेही विक्री केली जात होती.
मंदिरामध्ये असलेल्या अमाप संपत्तीमुळे त्याकाळी तीर्थक्षेत्रांना लक्ष्य केले जात असे.
या लुटीतूनच गजनवीचे प्रशासन चालत असे आणि सैनिकांचे पगार वाटले जात.
नरसंहाराचे वर्णन किती योग्य?
महमूदच्या काळातील इतिहासकारांनी त्याचा गौरव करण्यासाठी भारतात केलेल्या लुटीचे वर्णन वाढवून चढवून सांगितल्याची प्रवृत्ती दिसून येते.
अब्राहम इराली लिहितात, "एका हल्ल्यात 15 हजार, दुसऱ्या हल्ल्यात 20 हजार आणि सोमनाथवरील हल्ल्यात 50 हजार लोकांना मारण्याबद्दल लिहिण्यात आले आहे. इतके सारे लोक फक्त तलवार आणि धनुष्य-बाणाच्या जोरावर काही तासांमध्ये मारले यावर विश्वास बसत नाही. यातील अतिशयोक्तीकडे दुर्लक्ष केले, तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की महमूदचे हल्ले भयंकर होते."
त्याने केवळ शत्रूंच्या सैनिकांनाच मारले नाही, तर मोठ्या प्रमाणात सामान्य लोकदेखील त्याच्या हल्ल्यांना बळी पडले.
केवळ लहान मुलं आणि महिलांना जिवंत सोडण्यात येत असे, ते देखील दरवेळी नाही. त्यांना देखील पुरुषांप्रमाणेच गुलाम बनवून गजनीला नेण्यात येत असे.
'भारतात राहण्याची इच्छा नव्हती'
उल्लेखनीय गोष्ट अशी की, इतक्या हल्ल्यांनंतर महमूदला भारतावर राज्य करण्याची इच्छा कधी झाली नाही.
तो मोठ्या भूभागावर राज्य करू शकला असता, परंतु त्याच्याकडे साम्राज्य निर्मितीसाठी लागणारा संयम नव्हता.
पंजाब आणि सिंध ज्यांना भारताचे प्रवेशद्वार म्हटले जात असे, या भागांव्यतिरिक्त त्याने भारताच्या इतर कोणत्याही भूभागावर नियंत्रण मिळवले नव्हते.
ब्रिटिश इतिहासकार वॉल्सली हेग त्यांच्या 'केंब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया'त लिहितात, "महमूदच्या साऱ्या भारतीय मोहिमा या डाकूंच्या हल्ल्याप्रमाणे होत्या. तो वादळासारखा आला, वेगवान लढाया लढल्या, मंदिरं नष्ट केली, मूर्ती फोडल्या, हजारोंना गुलाम बनवले, अमाप संपत्ती लुटली आणि गजनीला परत गेला. त्याची भारतात थांबण्याची इच्छा नव्हती. कदाचित इथलं उष्ण हवामान त्याचं कारण असू शकतं."
30 हजार घोडेस्वारांसह हल्ला
महमूदची सर्वांत मोठी आणि शेवटची भारत स्वारी ही सोमनाथ मंदिरावरच होती.
सोमनाथबद्दल अल बरुनींनी लिहिलंय, "सोमनाथ मंदिर पाषाणाचे बनलेले होते. याची निर्मिती महमूदच्या हल्ल्याच्या 100 वर्षं आधी झाली होती. हे मंदिर एखाद्या किल्ल्यासारखं होतं आणि तीन बाजूंना समुद्र होता."
रॉयल एशियाटिक सोसायटीत प्रसिद्ध झालेल्या 'सोमनाथ अँड द कॉन्क्वेस्ट बाय सुल्तान महमूद' या लेखात मोहम्मद नाजिम यांनी म्हटलं होतं, "सोमनाथ मंदिराचे छत पिरॅमिडच्या आकाराचे होते आणि त्याची उंची 13 मजली होती. त्याचा कळस सोन्याचा होता आणि तो दुरून चमकत असे. मंदिराचे तळ सागवानी लाकडाचे होते."
ऑक्टोबर 1024 मध्ये महमूद 30 हजार घोडेस्वार सैनिकांसह सोमनाथवर हल्ला करण्यासाठी निघाला.
प्रवासादरम्यान, लुटीच्या हव्यासापोटी अनेक जण त्याच्यासोबत सामील झाले. नोव्हेंबरमध्ये तो मुल्तानला पोहचला आणि राजस्थानचे वाळवंट पार करत गुजरातला पोहोचला.
या मोहिमेत त्याच्यासोबत शेकडो उंट होते. प्रवासादरम्यान लागणारे पाणी, खाण्यापिण्याच्या वस्तू या उंटांवर लादण्यात आलेल्या होत्या.
प्रत्येक सैनिकाजवळ हत्यारांव्यतिरिक्त काही दिवसांचा शिधा देखील होता.
लाखो भाविक घ्यायचे दरवर्षी सोमनाथचे दर्शन
जानेवारी 1025 मध्ये महमूद सोमनाथला पोहचला. त्याकाळातील प्रसिद्ध इतिहासकार जकरिया अल कजविनी लिहितात 'सोमनाथच्या मूर्तीला मंदिराच्या मध्यभागी ठेवण्यात आले होते.'
हिंदू धर्मात या मंदिराचे अतिशय मानाचे स्थान होते. चंद्रग्रहणावेळी लाखो हिंदू भाविक यात्रेसाठी येत असत. हे अतिशय संपन्न मंदिर होते. या ठिकाणी अनेक शतकांपासून खजिना जमा करण्यात आला होता.
या ठिकाणी 1200 किलोमीटर अंतरावरून पवित्र गंगा नदीचे पाणी आणले जात असे आणि त्यातून सोमनाथ मूर्तीला स्नान घातले जात असे.
"त्याकाळी सोमनाथ मंदीर येथे 1 हजार ब्राह्मण होते. मंदिराच्या मुख्य द्वारावर 500 युवती गीत गात असत आणि नृत्य करत असत," असे वर्णन कजविनींनी केले आहे.
सोमनाथवर हल्ला
महमूदच्या सैन्याने पहिल्यांदा बाणांनी शहरावर हल्ला केला.
त्यानंतर ते नगराच्या संरक्षक भिंतीवर दोऱ्यांच्या सहाय्याने चढले आणि शहरातील रस्त्यांवर उतरून त्यांनी हत्याकांड सुरू केले.
संध्याकाळपर्यंत हे हल्ले सुरू होते. त्यानंतर महमूदचं सैन्य जाणीवपूर्वक शहराबाहेर पडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा हल्ला सुरू केला. कजविनी लिहितात की, या लढाईत 50 हजाराहून अधिक स्थानिक लोक मारले गेले.
त्यानंतर महमूदने मंदिरात प्रवेश केला. पूर्ण मंदिर लाकडाच्या 56 स्तंभावर उभारण्यात आलेलं होतं.
"स्थापत्य कलेचे सर्वात मोठे आश्चर्य हेच होते की, मंदिरातली मुख्य मूर्ती कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत होती." महमूदने यावर आश्चर्य व्यक्त केलं.
गाभारा खोदला
अल बरुनींनी मंदिराचे वर्णन करताना म्हटलं, "मंदिराचा मुख्य देव शिव होता. जमिनीपासून 2 मीटर अंतराच्या उंचीवर पाषाणाचे शिवलिंग होते त्याच्या आजूबाजूला सोने आणि चांदीच्या काही मूर्ती होत्या."
जेव्हा महमूदने मूर्ती तोडली तेव्हा त्याला एक जागा दिसली. जी मौल्यवान रत्नांनी भरलेली होती. या हुंडीतील संपत्ती पाहून महमूद हैराण झाला.
40 मन वजनाच्या सोन्याच्या साखळीला एक महाघंटा मंदिरात लटकत होती ती साखळी त्याने तोडली.
दरवाजे, चौकटी आणि छताला असलेली चांदी त्याने काढली. एवढं करून त्याचं मन भरलं नाही आणि धन सापडेल या लालसेपोटी त्यांनी मंदिराचा गाभारा खोदून काढला.
भारतात प्रतिमा मलीन झाली
इतिहासकर सिराज यांनी तबाकत ए नासिरीत लिहिलं, "महमूदने सोमनाथच्या मूर्ती त्याच्यासोबत गजनीला नेल्या. तिथे त्या चार भागात वाटल्या. त्यातील एक भाग शुक्रवारी होणाऱ्या नमाजाच्या जागी लावण्यात आला. दुसरा भाग राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर लावला. तिसरा हिस्सा मक्का आणि चौथा हिस्सा मदिन्याला पाठवण्यात आला."
सोमनाथमधून महमूदने अंदाजे 6 टन (सुमारे 6 हजार किलो) सोने लुटले. त्याने सोमनाथमध्ये 15 दिवस घालवले आणि नंतर लुटलेल्या संपत्तीसह तो गजनीला परतला. कच्छ आणि सिंधच्या वाटेने परतताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
तो 1026 च्या वसंत ऋतूत गजनीत परतला. अल बरुनी लिहितात की, महमूदच्या हल्ल्यामुळे भारतात आर्थिक हलकल्लोळ माजला.
सुरुवातीच्या हल्ल्यांचा मुख्य उद्देश गुरांची लूट होता. नंतर शहरातील खजिना लुटने हा झाला. त्यानंतर पराजितांना युद्धकैदी बनवून नंतर गुलामांप्रमाणे विकले जात असे किंवा सैन्यात भरती केले जात असे.
महमूदनंतरही सोमनाथ मंदिर तोडले गेले
महमूदच्या आयुष्यातील शेवटची दोन वर्षं गंभीर आजाराला तोंड देण्यात गेली.
एप्रिल 1030 मध्ये 33 वर्षं राज्य केल्यानंतर 59 व्या वर्षी महमूदचा मृत्यू झाला.
15 व्या शतकातील इराणी इतिहासकार खोनदामीर यांच्यानुसार यकृताच्या आजाराने महमूदचा मृत्यू झाला.
महमूदच्या मृत्यूनंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा पहिला प्रयत्न चालुक्य वंशाचे राजे भीम प्रथम यांच्या नेतृत्वात झाला.
'सोमनाथ टेम्पल विटनेस टू टाइम अँड ट्रायंफ' या पुस्तकात स्वाती बिश्त लिहितात, नवं मंदिर राखेतून फीनिक्स पक्षासारखं उभं राहिलं. त्यात ज्योतिर्लिंगाची पुन्हा स्थापना करण्यात आली.
परंतु 12 व्या शतकात घुरी वंशाच्या मोहम्मद घुरीने पुन्हा एकदा मंदिराला भग्नावशेषात बदलले.
"गेल्या काही शतकांत सोमनाथ मंदिराला अनेकवेळा लक्ष्य बनवण्यात आले आणि पुन्हा नष्ट करण्यात आले. 12 व्या शतकांत सोलंकी वंशाचे राजे कुमारपाल यांनी मंदिराच्या पुनर्निर्माणाचा विडा पुन्हा उचलला. 18 व्या शतकात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांच्या देखरेखीत सोमनाथ मंदिराचे पुन्हा निर्माण करण्यात आले," असं बिश्त लिहितात.
स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराची मोहीम पुन्हा सुरू झाली.
भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि के. एम. मुन्शी यांच्या देखरेखीत मंदिराला आपले गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर 3 महिन्यांनी सरदार पटेल यांनी त्या ठिकाणचा दौराही केला.
तिथे भाषण देताना पटेल म्हणाले होते, "हल्लेखोरांनी या जागेचा केलेला अनादर भूतकाळातली गोष्ट झाली. आता वेळ आली आहे की, सोमनाथाचे जुने वैभव पुन्हा स्थापित व्हावे. हे केवळ पूजेचे मंदिर राहणार नाही, तर संस्कृती आणि आपल्या एकतेचे प्रतीक बनून ते आता पुन्हा उभारले जाईल."
परंतु पटेल हे मंदिर पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिले नाहीत. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
नेहरुंचा विरोध
पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी कन्हैयालाल मुन्शींनी सांभाळली.
11 मे 1951 ला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटनात सहभाग घेतला. पंतप्रधान नेहरुंनी दिलेल्या सल्ल्याकडे कानाडोळा करून ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नेहरुंनी राजेंद्र प्रसादांना केलेल्या विरोधाचे कारण सांगताना म्हटले की, एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रमुखाने स्वतःला धार्मिक पुनरुत्थानवादाशी जोडून घेणे योग्य नाही.
नेहरूच नाही, तर उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारताचे गवर्नर जनरल राहिलेले सी. राजगोपालाचारी यांनीही याचा विरोध केला.
2 मे 1951 ला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेहरू यांनी म्हटले, "तुम्ही सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाबाबत आलेल्या बातम्या वृत्तपत्रात वाचल्या असतील. आपल्याला ही गोष्ट लख्खपणे समजली पाहिजे की, हा काही सरकारी कार्यक्रम नाही. भारत सरकारचे या गोष्टीशी काहीही देणे-घेणे नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)