मुंबईजवळचं हजार वर्षांपूर्वीचं 'आम्रनाथ' मंदिर, काय आहे याचा इतिहास?

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. एवढं ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे मंदिर अनेक वर्षं दुर्लक्षितच आहे.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.

तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.

या मंदिराचं भारतीय इतिहासात किती महत्त्वाचं स्थान आहे, याची कल्पना आम्हाला मुंबईतील 'जय हिंद कॉलेज'च्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. कुमुद कानिटकर यांनी दिली. साधारण पंचाहत्तरीच्या डॉ. कानिटकर यांनी या मंदिरावर संशोधन करून 'अंबरनाथ शिवालय' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.

डॉ. कानिटकर यांना या मंदिरातील शिल्पांबाबत खडा न खडा माहिती आहे. या मंदिराचे विविध पैलू उलगडताना त्या सांगतात, "अंबरनाथशी माझी कुठेतरी नशिबाने गाठ पडली. ही साधारण 1995ची गोष्ट असेल. मी प्राध्यापिका होते. त्यावेळी कॉलेजला सुट्ट्या होत्या. पण माझ्या मुलीची B.A.ची परीक्षा जूनपर्यंत चालणार होती. त्यामुळे मला कुठेच जाता येत नव्हतं.

"त्यावेळी योगायोगाने रिझर्व्ह बँकेचं कॅलेंडर हे मंदिरांवर होतं आणि त्यामध्ये अंबरनाथचं मंदिरही होतं. मी ते पाहून लगेचच मुंबईतल्या Asiatic Societyमध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती गोळा केली."

'अंबरनाथ शिवालय' पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.

1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि 'Bombay branch of the Royal Asiatic Society'च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.

त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये "...हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले", असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव 'आम्रनाथ' असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.

डॉ. कानिटकर सांगतात, "अंबरनाथचे शिवमंदिर हे सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या, हे एका मध्य ठिकाणी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा त्यावर प्रभाव पडला आहे. त्या सगळ्या राजांचा यावर प्रभाव पडला आहे."

त्या सांगतात की, धारच्या भोज राजाच्या काळातील 'समरांगणसूत्रोध्दार' या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीज मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे. "काही लोक या मंदिराला हेमाडपंथी म्हणतात. पण हे चुकीचं आहे. भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू. हे असं एकच भूमिज मंदिर, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलेलं आहे."

पुरात्त्व विभागाची सुरुवात

भारतीय पुरात्त्व विभागाचा आणि अंबरनाथचा अगदी जवळचा संबंध आहे. कानिटकर आपल्या पुस्तकात याविषयी सांगतात -

ब्रिटिश अधिकारी सर कनिंगहम यांना इतिहासाची आवड होती. भारतभर फिरताना सर्वत्र विखुरलेल्या मोडकळीस आलेल्या वास्तूंचे अवशेष त्यांनी पाहिले होते. 1861मध्ये सर कनिंगहम यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे.

"भारताच्या ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रदेशातून, कोणत्याही प्रांतातून, हिंडताना प्राचीन वारशाबद्दलची उदासीनता जाणवते. अत्यंत रेखीव आणि कलात्मक असूनसुध्दा प्राचीन वास्तूंची, स्मारकांची हेळसांड खिन्न करणारी आहे. जागोजागी पुरातन भारतीय संस्कृतीचे सुंदर अवशेष अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात.

"'दुर्लक्षित' हा शब्द दुरुस्ती, डागडुजी, ह्याला उद्देशून नाही, इतक्या अवशेषांना दुरुस्त करणे, ही खर्चाच्या आणि परिश्रमाच्या दृष्टीने कोणत्याही सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यांची साधी नोंदसुध्दा नसावी, ही फार खेदाची बाब आहे.

"माझ्या मते सरकारकडून ह्या महत्त्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या कर्तव्याचं पालन अगदी कमी खर्चात करता येण्यासारखं आहे. सर्वत्र विखुरलेल्या या अवशेषांची पाहणी करून, शोध घेऊन, व्यवस्थित नोंद करून ठेवली तर भावी पिढ्यांना ती उद्बोधक ठरेल. एरवी पुढच्या पिढ्यांना स्वतःचा इतिहास समजणार कसा?"

जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल मेडोज टेलर, यांच्याकडून पत्रांद्वारे अशाच प्रकारचे अभिप्राय मिळाल्यानंतर एका विचारमंथनाअंती आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा पुरातत्त्व विभागाचं (ASI) बीज रोवलं गेलं.

पहिले नकाशे, फोटो आणि ठसे

1868 साली प्रथम भारताच्या चार दिशांकडील चार स्मारकं प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासायचं ठरलं. या सर्व्हेअंतर्गत फोटो, ड्रॉईंग्ज, नकाशे, मॉडेल्स आणि ठसे कशा तऱ्हेने घ्यावेत, याच्या सूचना बारीक तपशिलासह नोंदवण्यात आल्या.

डॉ. कानिटकर त्यांच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर सांगतात -

या चार स्मारकांपैकी पश्चिम भागातून निवडलं गेलं बॉम्बे प्रांतातलं अंबरनाथाचं मंदिर. सुदैवाने त्याच सुमारास म्हणजे 1853मध्ये मुंबई-कल्याण रेल्वे सुरू झाली आणि मुंबईतच 'स्कूल ऑफ आर्ट' होतं.

या कामासाठी सरकारकडून 13 हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं. आणि 18 नोव्हेंबर 1868 रोजी एक टीम अंबरनाथमध्ये दाखल झाली. यात स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक G. W. टेरी, एक हेड मोल्डर, एक ड्राफ्टमन आणि आठ विद्यार्थ्यांच्या समावेश होता.

त्यावेळी अंबरनाथची लोकसंख्या 300च्या आसपास होती. तब्बल वर्षभर काम करून 10,714 रुपये 3 आणे आणि 1 पै खर्च करून 24 आराखडे, 35 फोटो आणि 76 साचे अंबरनाथ मंदिराचे तयार करण्यात आले.

डॉ. कानिटकर म्हणतात, "आपल्याकडे एवढा अमूल्य ठेवा आहे मात्र तो आपण जपायला हवा. मंदिराच्या परिसरात काहीच करायला नको. आज अंबरनाथच्या शिवमंदिराच्या अगदी काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. तसंच येथील MIDCच्या प्रदूषणाचाही परिणाम या मंदिरातील दगडावर होतोय.

"हे मंदिर मोठं पर्यटनस्थळ व्हावं, असं आपण म्हणत जरी असलो, तरी तशा सोयीसुविधा आपण देत नाही आहोत. आजही मंदिराच्या आवारात तुम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. तसंच मंदिराबद्दलची खूप चुकीची माहिती पसरवली जाते. माझी अशी अपेक्षा आहे की मंदिर आवारात याबद्दल एखादी माहिती पुस्तिका वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना या मंदिराच्या इतिहासाबद्दलची खरी माहिती कळेल."

या मंदिराच्या परिसरात पवन शुक्ल यांचं संपूर्ण बालपण गेलं. त्यांच्या वडिलांनी 40 वर्षं या मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम पाहिलं. आता ही जबाबदारी ते पार पाडतात. ते सांगतात, "या मंदिरात दर श्रावण महिन्यात मोठा उत्सव असतो. तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे जत्रासुध्दा भरते. महाशिवरात्रीला तर अंदाजे दोन-अडीच लाख लोक येतात."

"या वास्तूला आता हजार पूर्ण होत आहेत. तरीही या वास्तूला डागडुजीची गरज आहे, असं मला वाटत नाही. या हजार वर्षात या मंदिराने तिन्ही ऋतू कित्येकवेळा पाहिले असतील. तरीही हे मंदिर अजूनही जसंच्या तसं आहे. या मंदिरावरील कोरीवकाम अत्यंत सुरेख आहे."

शुक्ला यांना वाटतं की "जी वास्तू जूनी आहे तिला जुनीच राहू दिलं तर ती चांगली दिसते. मात्र जर जुन्या वास्तूचं नूतनीकरण केलं तर तिचं ऐतिहासिक महत्त्व कमी होतं. ज्या पूर्वीच्या कलाकृती असतात, त्या तशा राहात नाहीत."

मुंबईच्याजवळ असूनही दुर्लक्षित

मंदिर परिसराजवळच 35 वर्षांपासून राहणारे आनंद तुळसंगकर यांनी या मंदिर परिसरात होणारे बदल जवळून पाहिले आहेत. ते सांगतात, "पूर्वी पेक्षा आता मंदिरात खूप बदल झाले आहेत. पूर्वी मंदिराच्या समोरील बाजूस काहीच नव्हतं. पण आता तिथे सुंदर बाग करण्यात आली आहे. तसंच येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसादही दिला जातो. पण हे बदल फार पूर्वीच व्हायला हवे होते, असं ते सांगतात.

"देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकंच हे मंदिर जुनं आहे. मात्र या मंदिराकडे प्रशासनाकडून पाहिजे तसं लक्ष दिलं गेलं नाही. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हे मंदिर दुर्लक्षितच राहिलं. आता मागील 4-5 वर्षांपासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं. जर हे स्थळ पूर्वीच पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं तर आजचं चित्र फार वेगळं असतं. आता रस्ते, मंदिरातील लाद्या ते बसवल्यामुळे भाविकांची सोय झाली आहे."

याच मंदिराच्या परिसरात आम्हाला KEM रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता नीलिमा क्षीरसागर भेटल्या. त्या 1960पासून मुंबईत राहात असलेल्या नीलिमा सांगतात, "आम्ही दोन दिवसापूर्वीच स्थानिक वृत्तपत्रात या मंदिराबद्दलची जाहिरात वाचली आणि मग आम्ही इथे आलो. आम्ही केवळ या मंदिराबद्दल ऐकून होतो, मात्र ते एवढं जुने आणि एवढं सुंदर असेल, याची कल्पनासुध्दा नव्हती.

"या मंदिराला मुंबईतील इतर वास्तूंप्रमाणे प्रसिध्दी मिळाली पाहिजे. सध्याच्या सुविधाही चांगल्या आहेत. मात्र त्या अजून चांगल्या करू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिक सुखसोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात," असं त्यांना वाटतं.

मागील तीन वर्षांपासून एका स्थानिक पक्षातर्फे महाशिवरात्री दरम्यान इथे आर्ट फेस्टिव्हल भरवला जातो आणि त्याच्या बऱ्याच प्रमाणात जाहिरातीही केल्या जातात. त्यामुळे या मंदिराबद्दल थोडी जनजागृती होऊ लागली आहे. परंतु जशी केवळ महाशिवरात्रीसाठी इथे स्वच्छता केली जाते, तशीच स्वच्छता नेहमी राहावी, अशीही अपेक्षा इथे येणारे पर्यटक आणि स्थानिक व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)