कपडे उतरवून 'ही' तरुणी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये का फिरत होती? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बीबीसीनं या गोष्टीची पुष्टी केली आहे की हा फोटो तेहरान आझाद युनिव्हिर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चच्या ब्लॉक 1 मधील आहे

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, बीबीसीनं या गोष्टीची पुष्टी केली आहे की हा फोटो तेहरान आझाद युनिव्हिर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चच्या ब्लॉक 1 मधील आहे
    • Author, रोझा असदी
    • Role, बीबीसी फारसी

शनिवारी (2 नोव्हेंबर) इराणची राजधानी असलेल्या तेहरान मधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चच्या परिसरात एक तरुणी अंतर्वस्त्रांमध्ये (अंडरवेअर) दिसली आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. या घटनेच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सोशल मीडियावर देखील या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर त्या तरुणीनं तिचे कपडे काढल्यासंदर्भात देखील बातम्या आल्या आहेत.

बीबीसीच्या डिजिटल टीमनं ही घटना घडली तिथून याची खात्री केली आहे. जिथे ही घटना घडली ते ठिकाण तेहरानच्या इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्च मधील ब्लॉक-1 मध्ये आहे.

बीबीसी न्यूजनुसार ही घटना शनिवारी, 2 नोव्हेंबरला घडली आहे.

आणखी काही फोटोंमध्ये ही तरुणी तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये विद्यापीठाच्या परिसरात निष्काळजीपणे फिरताना दिसते आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसतं आहे?

या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की एक तरुणी अंतर्वस्त्रांमध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पायऱ्यांशेजारी एका कठड्यावर बसली आहे.

विद्यापीठातील पुरुष आणि महिला सुरक्षा अधिकारी तिच्याशी बोलत आहेत. मात्र व्हिडिओत त्यांचं बोलणं ऐकू येत नाही.

बहुधा हा व्हिडिओ दूरून एखाद्या वर्गाच्या खिडकीतून बनवण्यात आला आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये ही तरुणी ब्लॉक-1 जवळ एका रस्त्यावर चालताना दिसते आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तिच्या हालचालींमधून हे स्पष्ट होतं की ती तिचे शॉर्ट्स काढते आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांवरून देखील या गोष्टीची खात्री झाली आहे.

थोड्या वेळानं काही पोलीस अधिकाऱ्यांसह एक कार घटनास्थळी पोहोचते.

त्यात असं दिसतं की काही पोलीस अधिकारी या कारमधून उतरतात आणि आक्रमकपणे त्या तरुणीला कारमध्ये बसवतात.

सोशल मीडियावर होणारे दावे

इराणच्या बाहेर अनेक प्रसार माध्यमं आणि सोशल मीडिया नेटवर्कवर प्रकाशित झालेल्या वृत्तांनी त्या तरुणीनं निषेध किंवा विरोध करण्यासाठी हा मार्ग अवलंबल्याचं म्हटलं आहे.

हिजाब परिधान करणं सक्तीचं केल्याबद्दल आणि विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी हे करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

सोशल मीडियार तरुणीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडियार तरुणीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत

'अमीर कबीर न्यूजलेटर' च्या टेलीग्राम चॅनलवर या घटनेशी निगडित अनेक वृत्तं प्रकाशित झाली आहेत.

'अमीर कबीर न्यूजलेटर'मध्ये म्हटलं आहे की 'मास्क न घातल्यामुळे त्या तरुणीला त्रास दिला गेला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचे कपडे फाडले. या गोष्टीला विरोध करण्यासाठी त्या तरुणीनं तिचे सर्व कपडे काढले.'

बीबीसीला उत्तर देताना अमीर कबीर वृत्तपत्रानं म्हटलं की त्यांनी एका जाणकार सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त प्रकाशित केलं आहे.

प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला काय सांगितलं?

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना या घटनेबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "ती तरुणी हातात मोबाईल फोन घेऊन अनेक वर्गांमध्ये शिरली आणि असं वाटत होतं की जणूकाही ती विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बनवते आहे."

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती विना परवानगी वर्गात शिरल्यामुळे रागावलेल्या प्राध्यापकांपैकी एकानं एका विद्यार्थ्याला ती नेमकं काय करते आहे हे विचारण्यासाठी पाठवलं.

घटनेच्या एका साक्षीदारानुसार, त्या विद्यार्थ्यानं तिला विचारताच ती तरुणी आरडा-ओरडा करू लागली.

एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं की ते जेव्हा क्लासरूम बाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या तरुणीनं तिचे कपडे काढले आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या साक्षीदारांनुसार, ती तरुणी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये "कोणतंही भांडण किंवा वाद झाला नव्हता."

मात्र या दोन्ही साक्षीदारांनी ती तरुणी वर्गामध्ये अचानक शिरल्यानंतरचीच घटना पाहिली आहे.

ते म्हणाले की ती तरुणी वर्गात येण्याआधी काय झालं होतं हे त्यांना माहित नाही.

तरुणी इमारतीबाहेर पडण्याआधी आणि तिनं कपडे काढण्याआधी काय घडलं होतं? हे त्यांनी पाहिलेलं नाही.

या तरुणीनं कपडे काढल्यानंतरच हे दोन्ही साक्षीदार तिथे पोहोचले होते.

या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीनं इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की "मी तुम्हाला वाचवायला आली आहे."

विद्यापीठातील विद्यार्थिनी वाटणाऱ्या एका युजरनं एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ही तरुणी म्हणाली, "मी तुम्हाला वाचवायला आली आहे."

विद्यापीठ आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिक्रिया

अमीर महजोब इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे संचालक आहेत. त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावरील एका पोस्टमध्ये ही तरुणी विद्यापीठातील विद्यार्थिनी असल्याचं म्हटलं आहे. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर तिचा कोणताही वाद झाल्याची बाब त्यांनी नाकारली आहे.

अमीर महजोब यांच्या मते, "चौकशीतून समोर आलं आहे की तरुणीनं तिची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे आपले सहविद्यार्थी आणि आपल्या शिक्षकांचा व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली होती. तिला असं न करण्यास देखील सांगितलं गेलं होतं."

विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी समज दिल्यानंतर देखील तिने हे सर्व केलं.

आयएसएनए सह इराणी प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवल्यानंतर या तरुणीला त्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आणि त्याचा विरोध करताना तिने स्वत:चे कपडे काढले.

या रस्त्यावर ती तरुणी फिरत असल्याचं दिसतं

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, या रस्त्यावर ती तरुणी फिरत असल्याचं दिसतं

विद्यापीठाचा संदर्भ देत प्रसारमाध्यमांमध्ये म्हटलं आहे की, "ही विद्यार्थिनी प्रचंड मानसिक तणावात असून मनोरुग्ण आहे. तिला एका मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे."

विद्यार्थिनीच्या तत्काळ सुटकेची मागणी

अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेनं या तरुणीच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

'एक्स'वरील एका ट्विटमध्ये अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलनं लिहिलं आहे की, "2 नोव्हेंबरला हिंसक पद्धतीनं अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनीची इराणी अधिकाऱ्यांनी तत्काळ आणि विनाअट सुटका केली पाहिजे."

"या विद्यार्थिनी बरोबर इस्लामिक आझाद विद्यापीठातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं हिजाब परिधान करण्यासाठी गैरवर्तवणूक केली आणि त्याला विरोध करताना या विद्यार्थिनीनं स्वत:चे कपडे काढले होते."

अ‍ॅमनेस्टी इराणनं एक्सवर लिहिलं आहे, "या दरम्यान अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार आणि इतर गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील सदस्यांना वकिलांची भेट घेता येईल याचीही खबरदारी घेतली पाहिजे.

अटकेत असताना तिला मारहाण करण्याच्या आणि लैंगिक हिंसाचार करण्याच्या आरोपांची स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे चौकशी झाली पाहिजे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

माई सातो यांनी ऑगस्टमध्ये इराणसाठी संयुक्त राष्ट्रसंघात मानवाधिकार परिषदेत एक विशेष दूत म्हणून काम सुरू केलं आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं आहे, "ही घटना आणि यावरील अधिकृत प्रतिक्रियांवर मी बारकाईनं लक्ष ठेवून आहे."

हिजाब सक्तीच्या विरोधात निषेध?

अर्थात या तरुणीनं जे केलं त्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती आणि दाव्यांमुळे या घटनेमागचं महत्त्वाचं कारण आम्हाला माहीत नाही. मात्र अनेक युजर्सनी उपलब्ध माहितीच्या आधारे या तरुणीबद्दल बोलण्यास सुरूवात केली आहे.

या तरुणीनं केलेलं कृत्य म्हणजे हिजाबची सक्ती करण्याच्या निर्णयाला केलेला विरोध आहे. विद्यापीठातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या आक्रमक वर्तनाला विरोध करण्यासाठी तिनं हे पाऊल उचललं आहे, असं अनेक युजर्सनं म्हटलं आहे.

असा दावा करणाऱ्यांमध्ये मरियम कियानार्थी या एका वकीलाचा देखील समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे, "ह्युमॅनिटीज विषयाच्या या विद्यार्थिनीचं हे बंड म्हणजे हिजाब परिधान करण्यासाठी विद्यार्थिनींवर कठोर आणि चुकीचा दबाव आणल्याचं चिन्ह आहे."

त्या म्हणाल्या की कोणतीही फी न घेता या तरुणीचा खटला लढण्यासाठी त्या तयार आहेत.

ज्या युजर्सना वाटतं की या तरुणीनं हिजाबसक्तीच्या विरोधात आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या

गैरवर्तवणुकीला विरोध करण्यासाठी कपडे काढले होते, ते तरुणीच्या या कृतीला "धाडसी" म्हणत आहेत.

हिजाबसक्ती?

फोटो स्रोत, Getty Images

काही जणांचा दावा आहे की या तरुणीनं हे कृत्य फक्त घाबरून आणि दबावात केलं आहे. हिजाबसक्ती विरोधात ठरवून करण्यात आलेला हा निषेध नाही.

मात्र इराणी सरकारच्या अनेक समर्थकांचं आणि "महिला, जीवन, स्वातंत्र्य" आंदोलनाच्या विरोधकांचं म्हणणं आहे की या तरुणीच्या या कृत्यामुळे "या आंदोलनातील निदर्शक नग्न होऊ इच्छितात" हा त्यांचा दावा योग्य ठरला आहे.

अनेक युजर्सचं म्हणणं आहे की ते या तरुणीची ओळख पटवत आहेत. जेणेकरून त्यांना तिच्याबद्दल माहिती देता येईल आणि सोशल मीडियावर तिला पाठिंबा देता येईल.

या युजर्सना वाटतं की विरोध करणाऱ्या किंवा निषेध करणाऱ्यांची ओळख समोर न आल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या बातम्या मागे पडतात आणि शेवटी ते हानिकारक ठरतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.