होर्डिंग लावण्यासाठी सरकारचे नियम काय सांगतात, अनधिकृत होर्डिंग कसे ओळखायचे?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईत 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आणि यात 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 75 पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे मुंबईतल्या मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यात आतापर्यंत तीन होर्डिंग कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण मुंबईतली ही घटना मृत्यूंची संख्या पाहता मोठी आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार, मुंबईत 40 बाय 40 चौरस फुटापर्यंतच होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. मात्र, घाटकोपर येथे पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आलेलं हे होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटाचं होतं.

परवानगी नसलेलं हे अधिक क्षमतेचं होर्डिंग लावण्यास कोणी परवानगी दिली आणि याला जबाबदार कोण? यावरून आता नवीन वादाला तोंड फुटलंय.

मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलंय की, होर्डिंगची परवानगी राज्य रेल्वे पोलिसांनी दिली होती. याच्याशी पालिकेचा संबंध नाही. तसंच, महानगरपालिकेकडे याबाबत यापूर्वी तक्रार केल्यानंतर पालिकेने रेल्वे पोलिसांना होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते, असंही पालिकेचं म्हणणं आहे.

पण मुंबईत ज्या ठिकाणी लोखंडी बांधकाम उभं करून ही मोठमोठी होर्डिंग्स उभी करण्यात आली आहेत, ती नियमात आहेत का?

सुरक्षितेसाठी काय या होर्डिंगना परवानगी देताना कोणते निकष लावले जातात?

मुंबईत असंख्य अनधिकृत होर्डिंग आहेत त्याला परवाना कसा मिळाला?

असे अनेक प्रश्न समोर उपस्थित होतात. तत्पूर्वी, आपण पाहू ही दुर्घटना नेमकी कशी घडली ?

दुर्घटना नेमकी कशी घडली ?

सोमवारी (13 मे) दुपारच्या सुमारास मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी चार वाजता धुळीचे लोट पसरले होते.

ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहत होते. यामध्ये घाटकोपर पूर्वमधल्या रमाबाई नगर परिसरात पेट्रोल पंपाच्या वर लावलेल्या जाहिरातीचे भलेमोठे होर्डिंग कोसळलं. यात 100 जण अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 43 लोक जखमी झाले आहेत.

मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार करण्यात आले काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर येथील दुर्घटना स्थळावर पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दुर्घटनेतील जखमींची भेटही घेतली.

वादळ आणि पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर दुपारीच अनेक ठिकाणी अंधार झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई बरोबरच ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी वादळासह पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर पणे, रायगड, पालघरमध्येही काही भागत वादळी वारे होते.

त्यांच्यावर मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. हे होर्डिंग अनधिकृत असून संबंधित जाहिरात कंपनी, रेल्वे प्राधिकरण आणि या अनधिकृत होर्डिंगकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई महानगर पालिका विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मुंबईत होर्डिंग लावण्याचे काय निकष आहेत?

मुंबईत एकूण अधिकृत 1025 होर्डिंग आहेत. यापैकी 179 होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत येतात. यात बरेचसे होर्डिंग हे अनधिकृतपणे लावले जातात.

मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेने होर्डिंगची उंची, एकूण आकार, दोन होर्डिंगमधलं अंतर आणि इतर आस्थापनांपासून असलेलं अंतर, या बाबींचे निकष ठरवून दिले आहेत.

2011 साली झालेल्या अनधिकृत होर्डींगस् बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर मुंबई महापालिकेने होर्डींगच्या परवानगीमध्ये काही बदल केले.

  • होर्डिंगची उंची ही जमिनीपासून जास्तीत जास्त 40 बाय 40 असायला हवी. त्यापैक्षा मोठ्या होर्डींगला रहिवासी जागेत परवानी दिली जाणार नाही.
  • टेरेस आणि छतांच्यावरच्या होर्डिंगला 60 बाय 20 ची परवानगी दिली जाऊ शकते. पण द्रुतगती मार्ग, हायवेवर 40 बाय 40 चे होर्डींग लावले जावेत. स्कायवॉक, पादचारी पूल या ठिकाणी 10 बाय 50 साईजचं होर्डिंग लावलं जावं.
  • जमिनीपासून 75 फूटापेक्षा जास्त उंचीच्या होर्डिंग अपवादात्मक परिस्थितीतच परवानगी दिली जाईल. 120 फूटापेक्षा जास्त उंचीच्या होर्डींगना परवानगी नसेल. त्या होर्डिंगची उंची जमिनीपासून मोजली जाईल.
  • मुंबईत ज्या जागेवर मोठे होर्डिंग्स लावायचे आहेत, त्या मालकाने मुंबई महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साईटवर जाऊन लावलेले होर्डिंग्स हे नियमानुसार आहेत की नाही, हे तपासणं आवश्यक आहे.
  • मुंबई महापालिकेच्या जागेवर जाहीरातींचे होर्डींग लावण्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण करावी लागेल. त्याआधी जाहीरातदाराकडे महापालिकाकडून परवाना प्राप्त असणं बंधनकारक आहे. महापालिका कोणत्याही एजन्सीला सर्व अटी व नियम पूर्ण करून जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत जाहीरात प्रसिध्द करण्याची परवानगी देऊ शकते.
  • कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा परस्पर सार्वजनिक जागेवर जाहीरातीसाठी निविदा काढू शकत किंवा परवानगी देऊ शकत नाही. त्यांना महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे.

हे मुंबई महापालिकेचे काही महत्त्वाचे निकष आहेत. पण ज्या होर्डिंगमुळे घाटकोपरमध्ये मृत्यू झाले ते मुंबई महापालिकेच्या निकषाच्या तिप्पट मोठं होतं.

नियम बनवले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे.

अॅड. उदय वारुंजकर यांनी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

ते सांगतात, “स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका किंवा सरकाकडून अनधिकृत होर्डींगबाबत काही निकष तयार करण्यात आले आहेत. पण कायदेशीर दृष्टीने त्यात काही पळवाटा दिसून आल्या आहेत. यासंदर्भात जे निर्णय घेण्यात आले आहेत किंवा नियम बनवण्यात आले आहेत पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये.

“न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने यासंदर्भात दखल घेतली असून मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष दिले आहे. पुढची न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.”

अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग कशी ओळखायची ?

ज्या होर्डिंगवर लायसन्स नंबर, एक्सपायरी डेट हे लिहिलेलं असते, ती सर्व अधिकृत होर्डिंग असतात. ज्यावर हे लिहिलेलं नाही, ती अनधिकृत होर्डिंग असतात.

तसंच, नागरिकांना मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर अनधिकृत होर्डिंगची तक्रार करता येते.

याआधीही होर्डिंगमुळे झाले मृत्यू?

जाहिरातबाजीच्या हव्यासापोटी ठिकठिकाणी होर्डिंग लावले जातात. महापालिकेच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने अनाधिकृत होर्डिंगची संख्या वाढत चालल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

मागच्या चार वर्षांत पुण्यात होर्डिंग कोसळून जीवितहानी झालेल्या तीन घटना घडल्या आहेत.

ऑक्टोबर 2018 मध्ये पुण्यातील जुना बाजारच्या गजबजलेल्या चौकात होर्डिंगची स्टीलची फ्रेम कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.

या होर्डिंगच्या फ्रेमखाली सहा ऑटो रिक्षा, दोन दुचाकी आणि एक कार अडकली होती.

  • 2018 मध्ये जुना बाजार जवळील होर्डिंग अपघतात 3 मृत्यू झाले होते. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती.
  • 17 एप्रिल 2023 मध्ये पिंपरी चिंचवड हद्दीतील किवळेमध्ये होर्डिंग पडून 5 जणांचा मृत्यू झाला होता. पिंपरी चिंचवड टाऊनशिपमध्ये लोखंडी होर्डिंग लोकांवर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी सांगितले होते. सर्व्हिस रोडवर सोसाट्याचा वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग कोसळल्याने हे मृत्यू झाले. या अपघातात दोघे जण जखमीही झाले होते.
  • 17 एप्रिल 2024 मध्ये वाघोली येथे साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग कोसळून 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर घाटकोपरमधली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.
  • 19 एप्रिल 2024 ला पुण्यातल्या साई सत्यम परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे पुणे नगर मार्गावर असलेलं होर्डिंग कोसळलं होतं. यात तीन ते चार गाड्याचं नुकसान झालं होतं.

या घटनांनतर पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अनधिकृत होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली. पण ती तात्पुरती असल्याचं काही लोकांचं म्हणणं होतं. पुण्यातल्या या घटनांनंतर मुंबईतही नैसर्गिक बदलामुळे जीवातहानी होऊ शकते, त्यासाठी मोठ्या होर्डींगची स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुंबई महापालिकेकडे केली होती.

ते सांगतात, “पुण्यातल्या घटनेनंतर मी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना खबरदारी म्हणून एक पत्र लिहिलं होतं. त्यात मुंबईतही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते त्यासाठी खबरदारी म्हणून मुंबईतील मोठ्या होर्डिंगच्या मालकांकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मागवून घ्या असं सांगितलं होतं. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं पण नंतर त्यावर कोणताही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर अशा घटना घडणारच. फक्त नोटीसा बजावून आपले हात मोकळे करून घेणं हे चुकीचं आहे.”