MPSC : 'मी चौथीपर्यंतच शिकू शकले, पण माझ्या मुलींना अधिकारी केलं'

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“आमच्या गावात आम्ही दोघी पहिल्याच अधिकारी आहोत. ताईची STI म्हणून आत्ताच निवड झालीय आणि माझी PSI म्हणून.”

पूजा तेजराव काळे सांगत होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यातलं ताजनापूर गाव. गावात शिरताच पूजा आणि कविता यांच्या अभिनंदनाचे बॅनर सगळीकडे लागलेले दिसतात.

ताजनापूर गावकऱ्यांसाठी या दोघींनी मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे, असं त्यावर लिहिलेलं आहे.

पूजा काळे आणि कविता काळे या दोघी सख्ख्या बहिणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

या परीक्षेत पूजाची PSIम्हणजेच पोलिस उपनिरीक्षक पदी, तर कविताची STI म्हणजेच राज्य कर निरीक्षक पदी निवड झालीय.

मुली लहान असतानाच वडिलांचं निधन

पूजा 6 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. मग आईनं अंगणवाडीत काम करुन तिला आणि तिच्या 3 भावंडांना शिकवलं.

पूजा सांगते, “माझे वडिल शेती करायचे. आम्हाला 1 एकर शेती होती. मी 3 वर्षांची असताना त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यानंतर ते 3 वर्षं आजारी होते. मी 6 वर्षांची असताना ते वारले.

“वडिल वारल्यानंतर आम्हा चौघांची जबाबदारी माझ्या आईवर आली. आईनं अंगणवाडीत काम करुन आम्हा चौघांना शिकवलं.”

पूजाचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. शेजारच्या बाजार सावंगी गावात माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 2019 मध्ये तिनं मुक्त विद्यापीठातून इतिहास या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं का ठरवलं, असं विचारल्यावर ती सांगते, “मी बारावीत असताना जवळपास माझ्या सर्वच मैत्रिणींची लग्न झालेली होती. पण मला असं वाटलं की, फक्त धुणे-भांडे करण्यासाठी माझा जन्म नाही झालेला. तर मी काहीतरी चांगलं करू शकते, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला.”

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पूजानं संभाजीनगर गाठलं. तिथं पूजा आणि कविता दोघेही सोबत राहू लागल्या.

पूजाला MPSC परीक्षेत तिला दोनदा अपयश आलं. तिसऱ्या प्रयत्नात मात्र तयारी करताना तिनं काही सुधारणा केल्या.

ती सांगते, “मी 2018-19 मध्ये पूर्व परीक्षेचे दोन अटेम्प्ट दिले होते. पण त्यात कमी मार्क्स असल्यामुळे माझं झालं नाही.”

सुधारणांविषयी ते पुढे सांगते, “आधी मी पेपर वगैरे जास्त सोडवले नव्हते. नंतर मी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जास्त सराव केला. याशिवाय मी मोबाईलचा वापर खूप कमी करत होते. मी ज्यावेळेस अभ्यास करायचे त्यावेळेस फक्त अभ्यासच करायचे. मोबाईल बघत नव्हते.

“माझं ध्येयच पीएसआय बनण्याचं होतं. त्यामुळे मी फक्त त्याच परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे मी बाकीच्या गोष्टींवर लक्ष नाही दिलं.”

यशाचं श्रेय आईला

पूजा तिच्या यशाचं श्रेय हे आई बिजूबाईंना देते.

ती म्हणते, “माझ्या यशात माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची जास्त काळजी असते. पण, माझ्या आईनं आमच्या लग्नाची काळजी नाही केली तर आम्हाला शिकवलं.

“आई नेहमी म्हणायची की तुम्ही शिका आणि स्वत:च्या पायावर उभं राहा, नाहीतर तुम्हाला माझ्यासारखं काम करावं लागेल.”

50 वर्षांच्या बिजूबाई चौथी पास आहेत. मागील 30 वर्षांपासून त्या गावातल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करत आहेत.

मुलींना का शिकवावसं वाटलं, यावर त्या सांगतात, “मला वाटायचं आपुण यांच्या हाताखाली काम करतो. पण माझ्या मुली चांगल्या शिकल्या पाहिजे. चांगल्या नोकरीला लागल्या पाहिजे. एवढीच इच्छा होती देवाजवळ.”

जुने दिवस आठवल्यावर बिजूबाईंच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागतं. शाळेतलं काम संपलं की त्या दुपारी स्वत:च्या शेतात काम करायच्या आणि दुसऱ्यांच्या शेतात मजुरीही करायच्या.

आजूबाजूच्या लोकांनी त्यांना अनेक सल्ले दिले. पण, मुलींना शिकवण्याच्या आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या.

बिजूबाई सांगतात, “ते सगळंच म्हणायचे. तू येडी आहे. तू मूलींना शिकवू राहिली. त्यांचे लग्न करुन टाक. त्यांना कुठवर शिकवती. नाही झालं तर काय करशील? शिकायला पैसे जाईल, मग त्यांच्या लग्नाला कुठून पैसे आणशील, कसे लग्न करशील? मी म्हणायचे जाऊ द्या जे होईल ते होईल. पण त्यांच्या पायावर उभ्या राहतील त्या.”

‘मीही अधिकारी होणार’

एमपीएससीची परीक्षा पास झाल्यासानंतर पूजा आणि कविता यांच्या सत्काराचा मोठा कार्यक्रम गावात ठेवण्यात आला.

याशिवाय गावातल्या ज्या शाळेत या दोघी जणी शिकल्या त्या शाळेतही त्यांचा सत्कार करण्यात आला. पण पूजा आणि कविता यांच्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणी खडतर परिस्थितीवर मात करून ज्यावेळेस अधिकारी होतात, त्यावेळी त्यांचं हे यश पुढच्या पीढीतल्या विद्यार्थिनींसाठी आत्मविश्वास देणारं ठरतं.

जयश्री सोनवणे ही इयत्ता सातवीची विद्यार्थिनी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते.

पूजा-कविता यांचं यश पाहून तिला काय वाटलं, या प्रश्नावर ती उत्तर देते, “त्यांचं यश पाहून मलाही वाटतं मी खूप अभ्यास करावा, त्यांच्यासारखं अधिकारी व्हावं. त्यांच्याहीपेक्षा मोठा अधिकारी होण्याचा मी प्रयत्न करीन. मी खूप अभ्यास करीन.”

पूजाचा भाऊ स्वप्नील काळे पुण्यात आयटी इंजिनियर आहे. आणि सर्वांत लहान बहिण सध्या पदवीचं शिक्षण घेत आहे.

पूजा आणि कविताच्या यशाचा प्रभाव मोठा असल्याचं गावात फिरताना दिसून येतं.

ज्यावेळेस ग्रामीण भागातील मुलगी अधिकारी होते, त्यावेळेस इतर पालक त्यांच्या मुलींना शिकवण्याचा विचार करतात. नाही MPSC तरी, निदान पदवीपर्यंत शिकवण्याचा नक्की विचार करतात, असं स्वप्नील सांगतो.

तर शाळेतील एक शिक्षक सांगत होते, आता आमच्याही शाळेतील मुली अधिकारी व्हायचं म्हणत आहेत. खूप शिकायचं म्हणत आहेत.

पण, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे?

पूजा सांगते, “मी जवळपास 5-6 वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत होते. मला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असणं. आणि माझ्या पाठीमागे माझं सासर आणि माझं माहेर दोन्हीही तितक्याच खंबीरपणे उभे होते. त्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकले.”

लग्नानंतर आयटी इंजिनियर असलेल्या पतीनं आणि सासू-सासऱ्यांनीही परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचंही पूजा सांगते.

मुली शिकल्या म्हणजे स्वत:च्या पायावर उभ्या राहतील आणि कोणत्याही प्रसंगाला स्वत:हून तोंड देऊ शकतील, असं बिजूबाईंना वाटतं. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी मुलींना शिकवायला असं हवं त्यांचं ठाम मत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)