फ्युचर गेमिंग : ईडीची कारवाई ते 1368 कोटींच्या इलेक्टोरल बाँडची खरेदी, कोण आहेत सँटियागो मार्टिन?

फोटो स्रोत, MARTINFOUNDATION.COM
- Author, राघवेंद्र राव आणि शादाब नझमी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 12 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेल्या निवडणूक रोख्यांशी संबंधित माहिती निवडणूक आयोगाने गुरुवारी (14 मार्च) संध्याकाळी आपल्या वेबसाईटवर सार्वजनिक केली.
या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2024 दरम्यान, या कंपनीने 1368 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले आहेत.
या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने याआधी कारवाई केली आहे.
फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसने ऑक्टोबर 2021 मध्ये 195 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी केले होते. तर जानेवारी 2022 मध्ये दोनदा 210 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले आहेत.
2024 च्या सुरुवातीलाच कंपनीने 63 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले.
फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस काय आहे?
फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी 30 डिसेंबर 1991 रोजी स्थापन करण्यात आली आहे.
या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आहे. पण ज्या पत्त्यावर खात्यांची पुस्तके आहेत, तो पत्ता कोलकातामधील आहे.
ही कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध नाही.
या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेड म्हणून ओळखली जायची.
या कंपनीची भारतातील लॉटरी उद्योगात दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त उलाढाल आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील लॉटरीला मान्यात असलेल्या राज्यांमध्ये डिलर्स आणि एजंट्सचं एक मोठं नेटवर्क विकसित केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1991 मध्ये स्थापना झाल्यापासून, वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या पारंपारिक पेपर लॉटरीच्या वितरणामध्ये फ्युचर गेमिंगची वेगाने वाढत होत आहे.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, स्पर्धात्मक बोली, आक्रमक मार्केटिंग आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये कार्यक्षम लॉटरी ऑपरेशन्स यामुळे या कंपनीची वाढ झाली.
तसंच ही फ्युचर गेमिंग एशिया पॅसिफिक लॉटरी असोसिएशन (एपीएलए) ची सदस्यही आहे आणि 2001पासून फ्युचर गेमिंग वर्ल्ड लॉटरी असोसिएशन (डब्ल्यूएलए) चे सदस्यत्व या कंपनीने घेतले आहे.
सँटियागो मार्टिन कोण आहे?
सँटियागो मार्टिन हे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आहेत. मार्टिन यांना 'लॉटरी किंग' असंही म्हणतात.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, मार्टिन यांनी वयाच्या 13 व्या वर्षी लॉटरी उद्योगात प्रवेश केला. गेल्या काही दशकांत भारतभर लॉटरी खरेदीदार आणि विक्रेत्यांचे एक विशाल नेटवर्क तयार केलं आहे.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, मार्टिनला अनेक वेळा देशातील सर्वाधिक आयकर भरणारा किताब मिळाला आहे.
मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, व्यवसाय जगतात येण्यापूर्वी मार्टिन यांनी म्यानमारच्या यंगून शहरात कामगार म्हणून करिअरची सुरुवात केली होती.
त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. त्यानंतर ते भारतात परत आले. 1988 मध्ये त्यांनी तामिळनाडूमध्ये लॉटरी व्यवसाय सुरू केला.
हळूहळू त्याचा विस्तार कर्नाटक आणि केरळमध्ये झाला.
फ्युचर गेमिंगवर ईडीची कारवाई
सक्तवसुली संचलनालयाने 11 आणि 12 मे 2023 रोजी मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार मार्टिन यांच्या चेन्नईमधील निवासी परिसर आणि फ्युचर गेमिंग सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या कोईम्बतूरमधील व्यवसाय परिसर याठिकाणी धाडी टाकल्या होत्या.
यामध्ये EDने 457 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
21 सप्टेंबर 2023 रोजी, EDने फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य 15 कंपन्यांविरुद्ध कोलकाता येथील विशेष PMLA न्यायालयात खटला दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कोलकाता पोलिसांनी यां कंपन्यांविरुद्ध आयपीसी आणि लॉटरी नियमन कायदा, 1998 च्या कलमांखाली एफआयआर दाखल केली होती. त्या आधारावर ईडीने तपास सुरू केला.

फोटो स्रोत, ANI
EDच्या तपासणीत मेसर्स फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने अनेक राज्य सरकारांशी करार केला आहे.
या कंपनीने लॉटरीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेवर कर न भरता अनेक राज्यांची फसवणूक केल्याचा EDने आरोप केला आहे.
याशिवाय या कंपनीवर बेकायदेशीरपणे न विकल्या गेलेल्या लॉटरी राखून ठेवणे, न विकल्या गेलेल्या लॉटरींवर बक्षिसांचा दावा करणे, विक्री न झालेली बक्षीस जिंकलेली तिकिटे विकल्याप्रमाणे दाखवण्यासाठी डेटामध्ये फेरफार करणे आणि त्यावर बक्षिसांचा दावा करणे या आरोपांचा समावेश आहे.
या सर्व गोष्टींमुळे कंपनीने लॉटरी नियमन कायद्याचे उल्लंघन केल्यांचं EDचं म्हणणं आहे.
तामिळनाडूतील कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने 9 मार्च रोजी सँटियागो मार्टिन यांचे जावई आधव अर्जुन आणि त्यांच्या मालमत्तेची देखील झडती घेतली होती.











