You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातील 'प्रेमाचं घर', जिथे पळून आलेल्या जोडप्यांना मिळतो आधार
- Author, सर्फराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी, सातारा
“पळून जाऊन विवाह केल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून सेफ हाऊसची आज गरज आहे. कदाचित सेफ हाऊस नसतं तर आमच्या बाबतीतही खुनासारख्या गोष्टी घडल्या असत्या. म्हणूनच लग्नानंतरचं पहिलं माहेर हे स्नेह आधार फाउंडेशनचे सेफ हाऊस आहे," आरती रोकडे सांगत होत्या.
साताऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्या आरती आणि गणेश रोकडे यांनी प्रेम विवाह केला. त्यांच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध होता. त्यावेळी साताऱ्यातलं 'सेफ हाऊस' हे खूप मोठा आधार देणारे होतं. आज त्यांना सव्वा दोन वर्षांचा मुलगा आहे आणि घरातला विरोधही काहीसा मावळलाय.
प्रेम विवाह करण्यासाठी पळून जाणाऱ्या जोडप्यांना सातारा जिल्ह्यातील हे सेफ हाऊस अनेक अर्थांनी आधार बनलं आहे. तरुण मुला-मुलींना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या राहण्या-खाण्यापासून सुरक्षेपर्यंतची सर्व काळजी सेफ हाऊसमध्ये घेतली जाते.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्नेह आधार फाउंडेशन या संस्थेकडून हे सेफ हाऊस गेल्या पाच वर्षांपासून चालवलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या पुढाकाराने हे 'सेफ हाऊस' उभं राहिलंय.
स्नेह आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर कणसे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “2019 मध्ये सेफ हाऊस सुरू झालं. अंनिसच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न लावून देण्याचं काम केलं.
हे सगळं करताना एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे लग्न लावून दिल्यानंतर या नव्या जोडप्यांसाठी अनेक आव्हानं असतात. आसरा कुठे घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो.”
“पळून जाऊन लग्न केल्यानंतर मुलगा असेल किंवा मुलगी, त्यांना त्यांच्या गावी जाणं अशक्य असतं. शिवाय प्रचंड रोषाला त्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे त्यांना काही दिवस मानसिक आधार देण्याबरोबर राहण्याची व्यवस्था करणं आवश्यक वाटलं,” असं कणसे यांनी सांगितलं.
“खरंतर शासनाकडून अशा जोडप्यांना संरक्षण मिळायला हवं. डॉ हमीद दाभोलकर यांच्याशी चर्चा करत असताना हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये काही ठिकाणी प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सुरक्षा गृह निर्माण करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर आपणही ‘सेफ हाऊस’ का निर्माण करू नये, असा विचार पुढे आला.”
2019 मध्ये कणसेंनी आपल्या घराजवळच खोल्या बांधल्या. येणाऱ्या जोडप्यांना आपल्या घरात सामावून घेतलं. ही जोडपी घरात आणि शेतात रमून काम करू लागली. आता पर्यंत सेफ हाऊसच्या माध्यमातून 15 जोडप्यांची सत्यशोधक पद्धतीने लग्न लावून देण्यात आली आहेत.
“घरातून पळाल्यानंतर इथे आल्यावर आम्ही दोघं जोडीदाराची विवेकवादी निवड करत आहेत का याची माहिती घेतो. त्यांचं समुपदेशन करतो. अल्पवयीन नाही तसंच ते खरंच एकत्र राहू इच्छितात का याची शहानिशा करतो. त्यासाठी शास्त्रीय चाचणी घेतो. आमच्या तज्ज्ञ टीमकडून त्यांची स्वतंत्रपणे मुलाखत घेतली जाते. त्यानंतरच त्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून रितसर नोंदणी करतो,” डॉ. हमीद दाभोलकर सांगतात.
गेल्या पाच वर्षात त्यांनी दोन जोडप्यांना परस्परांमध्ये मदभेद होते म्हणून लग्न न लावून देता समुपदेशन करुन परत पाठवले आहे.
'घरच्यांनी आता स्वीकारलं'
प्रेमाविवाहासाठी गावातून पळून गेलेले देगावचे गणेश आणि आरती रोकडे हे दाम्पत्य आता पुन्हा आपल्या गावी परतले आहेत.
गावात आनंदाने नांदत आहेत. दोघांच्या कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं आहे.
गणेश रोकडे हे गावात लाँड्रीचा व्यवसाय करतात, शिवाय ते गावाचे सरपंच देखील राहिले आहेत. गावातील तथाकथित उच्च जातीतील मुलीसोबत प्रेम जुळलं. मग त्यांनी गावातून पळून जाऊन विवाह करण्याचं ठरवलं.
अंनिसच्या माध्यमातून सेफ हाऊस मध्ये दाखल झाले. इथेच त्यांनी महात्मा फुलेच्या विचारांतून आलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. पुढे 20 दिवस ते सेफ हाऊस मध्ये राहिले होते.
बीबीसी मराठीशी बोलताना गणेश रोकडे म्हणाले, “2017 मध्ये थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाला. साथीदाराची निवड केली होती, आणि ती जाहीर करणंही गरजेचं होतं. पण गावाच्या पातळीवर जात व्यवस्थेचं असणारं प्राबल्य आणि त्याच बरोबर सरपंच पदाची सांभाळत असलेली जबाबदारी, याचं एक वेगळं दडपण होतं.
मी अंनिसचा कार्यकर्ता असल्याने याविषयी हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांच्याशी चर्चा केली.”
2019 मध्ये आम्ही दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
“आरती यांच्या घरातून लग्नाला विरोध होता. माझ्या घरी फारसा विरोध नसला तरी आंतरजातीय लग्न असल्याने घरच्यांना पसंत नव्हतं.”
“इथे आम्ही आलो त्यावेळी प्रचंड मानसिक दबाव होता. या ठिकाणी आम्हा दोघांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या ठिकाणी अगदी आमच्या घरच्यासारखं वातावरण राहिलं. इथे मी त्यांच्या शेताच्या कामात आणि व अन्य कामात देखील मदत करत राहिलो."
ते पुढे सांगतात की, "दरम्यान गावामध्ये आमच्या या लग्नाला प्रचंड विरोध झाला होता. अगदी गावात बैठका घेऊन आमच्या लग्नाचा निषेध नोंदवण्यात आला होता. सरपंच पदावर असल्याने माझ्या विरोधकांकडूनही याचं भांडवल बनवण्यात आलं. मग माझा लॉन्ड्रीचा व्यवसाय बंद पाडण्याचाही प्रयत्न झाला.
अगदी घरावर दगडफेकीचा प्रयत्नही झाला. नैराश्य यायचं, आपला निर्णय चुकला का आणि आपलं चुकीचं पाऊल पडलं का असे विचार देखील मनात येऊन गेले. पण सेफ हाऊसमध्ये मिळालेल्या आधारामुळे आम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम बनलो.”
त्यानंतर गावातली परिस्थिती काहीशी निवळल्यानंतर ते दीड महिन्यांनी पुन्हा गावी परतले.
'स्नेह आधार फाउंडेशन लग्नानंतरचं माहेर'
सेफ हाऊस बाबत आरती रोकडे सांगतात- “सेफ हाऊसचा आधार खूप महत्त्वाचा होता. कारण नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी अशावेळी फंदात पडत नाहीत. पोलिसांचीही भीती असते. लग्नानंतरचं हे पहिलं माहेर स्नेह आधार फाउंडेशन असं म्हणता येईल, हेच मला अगदी जवळचं आहे.”
डॉ. हमीद दाभोळकर सांगतात “येणाऱ्या काळात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन लग्न करणाऱ्यांची संख्या वाढणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. त्यामुळे या आणि अशाच आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुला-मुलींसाठी सेफ हाऊसची गरज अधिक वाढली आहे.”
ऑनर किलिंग सारख्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने 26 डिसेंबर 2023ला सुरक्षा गृह तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्येक्षतेखाली सुरक्षा कक्ष तयार केले जाणार आहेत.
'सैराट'सारख्या चित्रपटाने अशा प्रेमविवाह आणि ऑनर किलिंगला प्रकाशझोतात आणलं होतं. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाला होणाऱ्या विरोधातून टोकाचे हिंसक प्रकार घडू नयेत म्हणून सेफ हाऊससारखे पर्याय पुढे येत आहेत. जिल्ह्यात नव्याने तयार होणाऱ्या सुरक्षा गृहांना ते मार्गदर्शक ठरु शकतील.
सज्ञान विवाहच्छुक जोडप्यांचा स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क त्यामुळे संरक्षित होतोय.