शरद पवारांना 'त्या' शपथविधीबद्दल माहीत होतं असं सांगून फडणवीस काय साध्य करू पाहत आहेत?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'पहाटेचा शपथविधी' जागा झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मुंबईच्या राजभवनात झालेला शपथविधी तसा तीनच वर्षांपूर्वी झाला. पण तसं धक्कातंत्र त्यापूर्वी आणि नंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात क्वचितच पहायला मिळालं. त्यामुळे त्याचं कवित्व कधीही सरणार नाही.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या बंडानं मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. पण तसं होऊ शकतं अशी कुणकुण ब-याच काळापासून सुरू होती. त्यामुळं त्याचं महत्त्व कमी होत नाही, पण फडणवीस-पवारांच्या शपथविधीनं 23 नोव्हेंबर 2019 ची उजाडलेली सकाळ अनेकांसाठी जास्त धक्कादायक होती.

त्या पहाटेची अनेक गुपितं अद्याप गुलस्त्यात आहेत. ते अचानक घडलं होतं, त्याची पूर्वतयारी अगोदरच झाली होती, ते कोणाकोणाला माहित होतं? हे आणि असे अनेक प्रश्न अजूनही त्याच्या मुख्य करत्या-करवत्यांनी पूर्णपणे उत्तर देऊन सोडवले नाही आहेत. त्यामुळे हा शपथविधी फिरुन फिरुन धुमश्चक्रीत परत येत राहतो.

आता तो परत आला आहे आणि त्यानं एक वादळही सोबत आणलं आहे. त्याचं कारण आहे की या शपथविधीला शरद पवारांचा होकार होता असं म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीसांनी राजकीय धमाका केला आहे.

या शपथविधीमागची पवारांची भूमिका हा तेव्हापासूनच कायम कुतुहलाचा विषय राहिला आहे, पण स्वत: फडणवीसांच्या गौप्यस्फोटानं त्याला गंभीर वळण मिळालं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मुंबईच्या राजभवनात झालेला शपथविधी
फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मुंबईच्या राजभवनात झालेला शपथविधी

'फडणवीस असत्य बोलत आहेत' असं म्हणून शरद पवारांनी हा दावा झिडकारला आहे. पण सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीत, निवडणुकांच्या वाहू लागलेल्या वा-यांमध्ये हा दावा सहज दुर्लक्षिला जाणार नाही. त्यामुळेच तीन वर्षांनंतर तो जाहीरपणे करण्यात फडणवीसांनी कशाचं टायमिंग साधलं असाही प्रश्न चर्चेत आहेच.

देवेंद्र फडणवीस असं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांनी 'टिव्ही 9' ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की त्यांचा आणि अजित पवारांचा शपथविधी शरद पवारांच्याच सहमतीनं झाला होता आणि या सरकारचा प्रस्ताव 'राष्ट्रवादी'कडूनच आला होता.

"ज्यावेळी उद्धवजी हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत आहेत आणि ती चर्चा पुढे गेली आहे असं लक्षात आलं, तेव्हा आमच्याकडेही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्टेबल सरकार हवं आहे. आपण सरकार स्थापन करुया," असं फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते तेव्हा तुम्हालाही चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही त्यांच्याशी चर्चा केली. अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एका प्रकारचा विश्वासघातच आमच्या सोबत झाला," फडणवीस पुढे या मुलाखतीत म्हणाले.

पण शरद पवारांच्या संमतीनंच हे झालं होतं असं सांगतांना फडणवीस अजित पवारांना मात्र एका प्रकारची क्लिन चीट देतात. अजित पवारांचा हेतू आमच्या फसवणुकीचा नव्हता असं म्हणून रोख 'सिनियर' पवारांवरच ठेवतात. पण त्यापेक्षा अधिक या विषयावर या मुलाखतीत ते अधिक काही बोलले नाहीत.

"एक विधान मी करेन की, अजित पवारांनी आमच्यासोबत जी शपथ घेतली होती ती त्यांनी फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. त्यांनी ती प्रामाणिक भावनेतून घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय रणनीति बदलली, कसे ते तोंडघशी पडले, हे ते कधीतरी सांगतीलच," असं फडणवीस पुढे म्हणाले.

ही मुलाखत अगदी अलीकडची असली तरीही यपूर्वीही देवेंद्र फडणवीसांनी हे शरद पवारांच्या संमतीचं 'गुपित' बोलून दाखवलं होतं, हेही आता पुढे येतं आहे. 'एबीपी माझा'नं फडणवीस यांची 17 जानेवारी 2021 रोजीची एका कार्यक्रमातली अप्रकाशित मुलाखत आता प्रकाशित केली आहे. त्यात फडणवीस शरद पवारांशी बोलूनच सगळं अंतिम ठरलं होतं असं म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस

"शिवसेनेशी बोलण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो तेव्हा एका टप्प्यावर आम्हाला समजलं की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे. मग आम्हालाही वाटलं की आपल्याला पर्याय शोधला पाहिजे. कॉंग्रेससोबत तर आम्ही जाऊ शकत नव्हतो."

"आम्ही 'राष्ट्रवादी'सोबत चर्चा केली. तेव्हा प्रस्ताव 'राष्ट्रवादी'कडूनच आला होता. आमची चर्चाही पूर्ण झाली. सरकार कसं बनवायचं हेही ठरलं. कोणाला कोणतं मंत्रिमंडळ, कोणत्या जिल्ह्यांचं पालकमंत्रिमद या सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या," फडणवीस या जुन्या मुलाखतीत म्हणतात.

"हे अजित पवारांसोबत नाही तर शरद पवारांसोबत ठरलं. त्यांच्यासोबतच सगळं नक्की केलं गेलं. राष्ट्रपती शासन हटवा असं पत्र जे 'राष्ट्रवादी'तर्फे देण्यात आलं, त्याचा मसुदाही मीच लिहिला होता," असा गौप्यस्फोटही ते या मुलाखतीत करतात.

'फडणवीस असत्याचा आधार घेऊन बोलले'

देवेंद्र फडणवीसांचा हे विधान आलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सहाजिक शरद पवारांनाही त्यांची प्रतिक्रिया विचारली गेली. पवारांनी जराशा रागानंच त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

"मला वाटलं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते कधी अशी विधानं करतील असं मला कधी वाटलं नाही," इतकं मोजकंच पवार देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलले.

शरद पवार आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि अजित पवार

यापूर्वी स्वत: शरद पवार हेही उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर बोलले होते. भाजपाकडूनच त्यांना सरकार बनवण्याची ऑफर होती आणि नरेंद्र मोदींना भेटून त्यांनी ती नाकारली होती आणि अजित पवार असं करतील हे त्यांना माहित नव्हतं हे पवारांनी सातत्यानं सांगितलं आहे.

'राजकारणात संवाद आवश्यक असतो आणि अजित पवार फडणवीस काय म्हणाताहेत यासाठी त्यांच्याशी संवाद साधून आहेत हे मला माहित होतं. पण ते असा निर्णय घेऊन शपथविधीपर्यंत जातील असे मात्र वाटलं नव्हतं' असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले.

'अजित पवार फडणवीसांशी चर्चा करत असतांना आज लगेच शपथविधी करावा लागेल असं भाजपाकडून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी शपथ घेतली' असं पवार म्हणाले होते.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार

पण फडणवीसांच्या नव्या गौप्यस्फोटानं शरद पवारांनी अगोदर सांगितलेल्या त्यांच्या बाजूवरही उलटसुटल चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रश्नांना उत्तर अजून एक व्यक्ती देऊ शकते, ती म्हणजे अजित पवार. पण अजित पवारांनी आजतागायत 'त्या' घटनाक्रमाबद्दल बोलणं टाळलं आहे. त्यांचं उत्तर अद्यापही आलं नाही आहे.

काहीच दिवसांपूर्वी पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते अशा आशयाचं विधान 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं आणि गदारोळ उडाला होता. त्यावर पाटील यांना सारवासारव करावी लागली होती.

हे टायमिंग काय सांगतं?

शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती होतं किंवा नाही हा जरा महत्वाचा प्रश्न आहे तसाच आता फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाच्या राजकीय टायमिंगचाही आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट काही आखाडे बांधून केले जातात.

त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती, येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, वर्षभराच्या अंतरातल्या लोकसभेच्या निवडणुका आणि कधीही येऊ शकणा-या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर पवारांबद्दल असं विधान करुन फडणवीसांनी कशाचं टायमिंग साधलं आहे असंही विचारलं जातं आहे.

'महाविकास आघाडी'नं नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये तीन जागांवर यश मिळवलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आघाडी एकत्र लढते आहे.

सरकार गेल्यानंतरही आघाडीतल्या तीनही पक्षांनी एकत्र राहून, प्रसंगी एकमेकांमध्ये वाद घालूनही, भाजपासमोर राज्यात आव्हान निर्माण केलं आहे. या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत. त्यामुळे पवार यांना लक्ष्य करुन येणा-या निवडणुकांसाठी वातावरणनिर्मिती होते आहे का?

महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत.

राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्रातल्या या 2019 सालच्या सत्तानाट्यावर 'चेकमेट' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात 2018 पासून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या जवळीकीबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्यामुळे त्यांना या गौप्यस्फोटात नवं, धक्कादायक काही वाटत नाही. पण फडणवीसांनी ते प्रत्यक्ष सांगून सध्याच्या राजकारणातही काही चाल खेळल्याचं त्यांना वाटतं.

"मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी भाजपाला कसं फसवलं, त्यांचा आम्ही कसा बदला घेतला हे सगळं आता फडणवीसांचं बोलून झालं आहे. ब-याच काळापासून ते त्याविषयी बोलताहेत. पण त्यांनाही कल्पना आहे की शरद पवार हे आजही महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे प्लेयर आहेत. 2019 ला सुद्धा भाजपानं त्यांना टारगेट केलं होतं. 'पहिलवान' वगैरे अशी बरीच वक्तव्य झाली होती. आता निवडणुकांचं वारं पुन्हा सुरु झालं आहे आणि त्यासाठीच हे वातावरण तयार केलं जातं आहे," सूर्यवंशी म्हणतात.

"शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं तयार केलं जात आहे रणनीतिचा भाग म्हणून. अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर पुन्हा पक्ष आपल्याकडे वळवून आणि ठाकरेंचं सरकार बनवून पवारांनी एक विश्वासार्हता मिळवली. आता या गौप्यस्फोटानं त्याविषयी संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. जर कोणी नवे सहकारी महाविकास आघाडीमध्ये जाणार असतील तर त्यांच्या मनातही संशय तयार व्हावा असं हे राजकारण असू शकतं," सूर्यवंशी म्हणतात.

शरद पवार

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, शरद पवार

रणनीतिचा भाग म्हणून पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न तयार करणं असू शकतं असं राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकरांनाही वाटतं. त्यांच्या मते आता जेव्हा प्रकाश आंबेडकरांसारखे नवे सहकारी आघाडीमध्ये येण्याची शक्यता असतांना या संशयाचा त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो असं त्यांना वाटतं.

"नेमकं काय बोलणं झालं होतं दोघांमध्ये हे भाजपा आणि शरद पवारच सांगू शकतील. जे आता फडणवीस बोलले आहेत त्या आशयाचं ते पूर्वीच्या काही मुलाखतींमध्येही ते म्हणाले होते. पण आता सरकार आल्यावर जरा मोकळेपणानं बोलले आहेत, इतकंच. मला वाटतं की येणा-या लोकसभा निवडणुकींकडे पाहून त्यांनी हे विधान केलं आहे," नानिवडेकर म्हणतात.

"आजही शरद पवार महत्वाचे नेते आहे. त्यांच्यासमोर आणि त्यांच्या पक्षासमोरच भाजपाला विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात लढायचं आहे. त्यामुळे पवारांना भाजपाला लक्ष्य करावंच लागेल. शिवाय मला असंही वाटतं की महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याला आव्हान देण्याचा फडणवीस प्रयत्न करत आहेत. या दोन नेत्यांमध्ये मतदार आणि कार्यकर्त्यांचं ध्रुविकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा खुलाशांनी, गौप्यस्फोटांनी पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करता येऊ शकतात," नानिवडेकर पुढे म्हणतात.

या परिणामाचा 'राष्ट्रवादी' आणि शरद पवार कसा प्रतिवाद करतात की मोजकी प्रतिक्रियाच देऊन चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्न करतात हे बघायचं. पण फडणवीसांच्या वक्तव्यानं उडालेला धुरळा सध्याच्या काळात लवकर बसेल अशी चिन्हं नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)