You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार म्हणतात, 'अजित पवार आमचे नेते, असं मी म्हटलंच नाही'
अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हटलं नाहीय, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलंय.
शरद पवार म्हणाले, "अजित पवार आमचे नेते, असं मी म्हटलं नाही. सुप्रिया म्हणाली. सुप्रिया त्याची धाकटी बहीण आहे. याचा थेट राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही."
सरकारमध्ये सहभागी झालेले नेते आमचे नेते नाहीत, असंही शरद पवार म्हणाले.
तसंच, शरद पवार हे अजित पवारांना उद्देशून म्हणाले की, "पहाटेच्या शपथविधीनंतर संधी दिली होती. पण आता संधी द्यायची नसते आणि संधी मागायचीही नसते."
आधी पवार काय म्हणाले होते?
अजित पवार हे आमचेच नेते आहेत. पक्षात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, म्हणजे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा आहे. या सभेसाठी रवाना होण्याआधी बारामती येथे पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेली काही वक्तव्ये बुचकळ्यात पाडणारी होती.
विशेष म्हणजे, शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही काल (24 ऑगस्ट) अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. पाठोपाठ शरद पवारांनीही तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असं म्हटलं जातं. पण सुप्रिया सुळे यांनी फूट वगैरे काहीही नसल्याचं म्हटलं. तसंच अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे, याबाबत आपलं मत काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
याचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “हो ते (अजित पवार) आमचेच नेते आहेत. त्यात काही वाद नाही. पक्षात फूट कधी असते? जर देशपातळीवर एखादा गट वेगळा झाला तर त्याला फूट म्हटलं जातं. पण अशी स्थिती आमच्या पक्षात नाही.”
“काही लोकांनी पक्ष सोडला किंवा काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काहीही कारण नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे आमच्यासोबत येतील, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार त्यावर रागावले. यावेळी “काहीही फालतू प्रश्न विचारता का,” असा प्रतिप्रश्न पवारांनीच पत्रकाराला केला.
बीडमध्ये शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाकडूनही सभा घेण्यात येणार आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे. त्याबाबत चिंता वाटण्याचं काहीही कारण नाही. सगळे आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे येत आहेत. त्यापैकी कुणाची भूमिका योग्य हे लोकांना कळेल. त्यामुळे कुणीही आपली भूमिका मांडण्यासाठी पुढे येत असेल, तर मी त्यांचं स्वागत करतो.”
अजित पवारांचं नेतृत्त्व महाराष्ट्राला मान्य आहे - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, "राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारासाहेब अध्यक्ष आहेत. आता जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. लाखो मतदारांनी प्रेम पक्षावर दाखवलंय. लोकांची सेवा करण्याचं काम राष्ट्रवादीने केलंय. केंद्रात विरोधी पक्षात आणि महाराष्ट्रातही विरोधी पक्षात आहोत.
"राष्ट्रवादी पक्षातील 9 आमदार आणि 2 खासदार यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे, जो आमच्या विचारधारेला पटण्यासारखा नाहीय. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून पक्षानं स्पष्टीकरण मागवलंय. शिवाय, लोकसभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांना पत्र लिहून, पक्षापासून दूर गेलेल्यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे ठामपणे कळवले आहे."
त्याचसोबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "भाजपसोबत जाणं आमच्या पक्षाच्या विचारधारेत बसत नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलोय आणि हेच पहिल्या दिवसापासूनचं वास्तव आहे.
"अजित पवारांचं नेतृत्त्व महाराष्ट्राला मान्य आहे. सगळ्या पक्षात चांगले नेतृत्त्व असतात. आम्ही अटल बिहारी वाजपेयींचं नेतृत्त्व मान्य केलं आणि एन. डी. पाटलांचंही नेतृत्त्व मान्य केलं. चांगलं नेतृत्त्व लोकांना मान्यच असतं."
यावेळी सुप्रिया सुळेंनी एमईटीच्या सभेतील भाषणांबाबत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "एमईटीच्या सभेत अनेकजण पवारसाहेबांच्या विरोधात बोलले, त्याचं आम्हाला दु:ख आहे. ते आरोप वेदनादायी होते. त्यांचे आरोप पटणारे नव्हते."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)