You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'या' देशानं कुत्र्यांच्या मटणावर आणली बंदी, वाचा कारण
- Author, जीन मॅकेन्झी, जेक क्वान, हासू ली
- Role, बीबीसी न्यूज
दक्षिण कोरियाच्या संसदेने एक नवा कायदा पारित केला आहे. त्यानुसार, कुत्र्यांची कत्तल किंवा त्याच्या मांसाची विक्री बेकायदेशीर ठरणार आहे.
दक्षिण कोरियात कुत्र्याचं मांस खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ही प्रथा मोडीत काढण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला असून 2027 पर्यंत त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.
मात्र, नवीन कायद्यानुसार कुत्र्याचं मांस खाणं बेकायदेशीर ठरणार आहे.
गेल्या वर्षी गॅलपच्या सर्वेक्षणानुसार, वर्षभरात केवळ 8% लोकांनी कुत्र्याचं मांस खाल्लं होतं. 2015 मध्ये हेच प्रमाण 27% होतं.
सर्वेक्षणात सामील झालेल्या एक पंचमांश पेक्षा कमी लोकांनी सांगितलं की, ते मांसांच्या सेवनास समर्थन करतात.
ली चे-येन या 22 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितलं की, प्राण्यांच्या हक्कांसाठी ही बंदी आवश्यक होती. आज बऱ्याच लोकांकडे पाळीव प्राणी आहेत. अशा पाळीव प्राण्यांना कसं खायचं? ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.
नवीन कायदा कुत्र्यांच्या मांसाच्या व्यापारावर लक्ष केंद्रित करतो. कुत्र्यांची कत्तल केल्याबद्दल दोषी ठरलेल्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. तर मांसासाठी कुत्रे पाळण्यात आल्याचं किंवा कुत्र्याचं मांस विकल्याबद्दल दोषी आढळलेल्या लोकांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
कायदा लागू होण्यापूर्वी शेतकरी आणि हॉटेल मालकांना रोजगार आणि उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियामध्ये 2023 मध्ये कुत्र्याचं मांस खाऊ घालणारा सुमारे 1,600 हॉटेल्स होते. आता या सर्वांना त्यांचे व्यवसाय टप्प्याटप्प्याने त्यांच्या स्थानिक अधिकार्यांकडे सोपवावे लागतील.
कुत्र्याला उत्पन्नाचं साधन मानणाऱ्या शेतकरी, कसाई आणि हॉटेल मालकांना सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र नेमकी किती नुकसान भरपाई दिली जाईल याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
मंगळवारी सियोल मध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी अनेक वृद्ध लोक कुत्र्यांच्या मांसाचं स्टू खाताना दिसले. यातून पिढ्यानपिढ्या मांस खाणाऱ्या लोकांमधील विभाजन स्पष्टपणे दिसतं.
86 वर्षीय किम सेओन-हो बंदीमुळे निराश आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, "मध्ययुगापासून आम्ही हेच अन्न खात आलोय. आम्हाला आमचं पारंपारिक अन्न खाण्यापासून का रोखलं जातंय? जर तुम्ही कुत्र्याच्या मांसावर बंदी घालताय तर तुम्ही गोमांसावर देखील बंदी घालावी."
1980 च्या दशकातील सरकारने कुत्र्याच्या मांसावर बंदी घालण्याचे वचन दिले होते. पण ही बंदी आणण्यात ते अपयशी ठरले. सध्याचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल आणि फर्स्ट लेडी किम केओन हे प्राणी प्रेमी आहेत. त्यांच्याकडे सहा कुत्रे आहेत आणि किम यांनी कुत्रे खाण्याची प्रथा बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
शिवाय प्राणी हक्क गटाचे कार्यकर्ते बऱ्याच काळापासून बंदीसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी मंगळवारच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
कोरियातील ह्युमन सोसायटीच्या कार्यकारी संचालक जंग आह चाई यांनी सांगितलं की, या बंदीमुळे त्यांना आश्चर्य वाटलं आहे. ज्या लाखो कुत्र्यांनी आपला जीव गमावला त्यांच्यासाठी मला वाईट वाटतं आहे. पण मला आता आनंद होतोय की दक्षिण कोरिया आपल्या इतिहासातील हा दुःखद अध्याय बंद करून नव्या भविष्याचा स्वीकार करणार आहे."
कुत्र्याच्या मांसाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी बंदीच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, तरुण लोकांमध्ये कमी होत चाललेली लोकप्रियता पाहता, ही प्रथा नैसर्गिकरित्या नष्ट होऊ दिली पाहिजे. बरेच शेतकरी आणि हॉटेल फार जुने आहेत. त्यांच्या उद्योगावर थेट कुऱ्हाड चालवणं योग्य ठरणार नाही.
जू येओंग-बोंग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की ते या बंदीमुळे निराश झाले आहेत.
ते म्हणाले, "10 वर्षात, उद्योग नाहीसा झाला असता. आता आमच्याकडे आमची उपजीविका गमावण्याशिवाय पर्याय नाही. इथे लोकांना आवडेल ते खाण्याचं स्वातंत्र्य नाही. ही बंदी त्याचं उल्लंघन आहे."
कुत्र्याचं मांस शिजविणाऱ्या हॉटेलच्या मालकीण श्रीमती किम आज 60 वर्षांच्या आहेत. त्या म्हणाल्या की, या बंदीमुळे त्या निराश झाल्या आहेत. दक्षिण कोरियामध्ये पाळीव प्राणी असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ही बंदी आणल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
त्या म्हणतात, "आजकाल तरुण लोक लग्न करत नाहीत. ते पाळीव प्राण्यांनाच आपलं कुटुंब समजतात. पण ते तर अन्न आहे. आपण कुत्र्याचं सेवन केलं पाहिजे. त्यांना चांगल्या वातावरणात पाळून त्यांची कत्तल केली पाहिजे."
"चीन आणि व्हिएतनामसारख्या इतर देशांमध्ये देखील कुत्र्यांचं सेवन करतात, मग आमच्याच देशात बंदी का?
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.