You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्राणिसंग्रहालयात मृतदेह, वाघाच्या तोंडात बूट सापडल्यामुळे उघडकीस आली घटना
- Author, इहतशाम शमी
- Role, पत्रकार
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील प्राणिसंग्रहालयात वाघाच्या पिंजऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
इथं एका व्यक्तीचा मृतदेह वाघाच्या पिंजऱ्यात सापडला. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची त्याच्या बोटांचे ठसे आणि खिशातील कार्डाच्या मदतीने ओळख पटल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
बहावलपूरचे उपायुक्त झहीर अन्वर जप्पा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मृत व्यक्तीचं नाव बिलावल मुहम्मद जावेद असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या मते तो लाहोरचा रहिवासी होता आणि त्याच्याबद्दल लाहोरच्या तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.
'बिलावल अमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. व्यवस्थापनाने यापूर्वी म्हटलं होतं की मारला गेलेला तरुण प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाचा भाग नव्हता आणि त्याच्या शरीरावर पंजाच्या तसंच इंजेक्शनच्या खुणा आढळल्या होत्या.' अशी माहिती झहीर जप्पा यांनी दिली आहे.
'न्यायवैद्यक पथकाने शवविच्छेदनाचं काम पूर्ण केलं आहे, परंतु अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. पंजाबचे मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांच्या सूचनेवरून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.' असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर प्राणीसंग्रहालय अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलंय, त्यामुळे लांबून येणाऱ्या शाळांच्या सहली रद्द करण्यात आल्या आहेत.
'सुरक्षिततेत कुठेतरी त्रुटी होती'
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृत व्यक्तीची छायाचित्रे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन आणि नगर परिषदांमध्ये पाठवण्यात आलेली होती.
बहावलपूर पोलिसांचे प्रवक्ते मुहम्मद उमर सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दंडसंहितेसनुसार कलम 174 अंतर्गत तक्रार नोंदवली आहे आणि कोणतीही विनंती किंवा तक्रार आल्यास कायद्यानुसार खटला दाखल केला जाईल असं म्हटलंय.’
ते म्हणाले मृतदेह मिळावा यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांशी कोणताही संपर्क साधलेला नाही. मात्र, पोलीस व्यक्तीच्या कुटुंबियांशी संपर्क साधतील आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात देतील.
दुसरीकडे, दक्षिण पंजाबच्या वन्यजीव आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे महासंचालक डॉ. अन्सार चट्टा म्हणाले की, मृत व्यक्ती कुठून आली आणि ती प्राणीसंग्रहालयातील पिंज-याच्या आतमध्ये कशी गेली हे एक रहस्यच आहे. कुणीच त्यांचा आवाज किंवा किंकाळी ऐकली नाही.'
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महासंचालक म्हणाले की, ही व्यक्ती रात्रीच्या वेळी आली की पहाटे आली हे स्पष्ट झालेलं नाही, कारण आम्हाला हा मृतदेह सकाळी अकरा वाजल्यानंतर सापडला. वाघाच्या पिंजऱ्यात दोन स्वतंत्र खोल्या आहेत, एका खोलीत एक नर वाघ तर दुसऱ्या खोलीत एक मादी (वाघीण) आणि तिची दोन पिल्लं होती.’
ते म्हणाले की सहसा प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी काम करत असतात, कुणी प्राण्यांना खायला देतं तर कुणी पिंजऱ्याची स्वच्छता करतात. मात्र पिंजरे अतिशय उंच असल्याने या घटनेबद्दल कुणालाही काहीच कळलं नाही.'
महासंचालक म्हणाले की, प्राणिसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु आता आणखी कॅमेरे लावण्यात येतील आणि काही कॅमेरे हिंस्र प्राण्यांच्या पिंजऱ्यांवरही लावले जातील.
सुरक्षाव्यवस्था आधीपासूनच आहे पण काही ठिकाणी सुरक्षेत त्रुटी आहेत. त्या सुधारण्याचा आमचा प्रयत्न असेल.
वाघाच्या तोंडात बूट
बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जेव्हा प्राणिसंग्रहालयातील सफाई कर्मचारी वाघाचा पिंजरा आणि कुंपणाची स्वच्छता करण्यासाठी आले तेव्हा त्यांना वाघाच्या तोंडात बूट दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
कर्मचा-यांनी आरडाओरडा केल्यानंतर इतर अधिकारीही तिथे जमा झाले, जनावराने चावे घेतलेल्या एका माणसाचा मृतदेह त्यांना वाघाच्या पिंजऱ्यात दिसला.
उपायुक्त झहीर अन्वर जप्पा म्हणाले की, ज्यावेळी त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांची पंजाबच्या गृह सचिवांसोबत ऑनलाइन मीटिंग सुरू होती, त्यांनी ही बाब गृहसचिवांच्या निदर्शनास आणून दिली आणि मीटिंग अर्धवट सोडून प्राणीसंग्रहालयात जिथे गोंधळ माजला होता तिथे धाव घेतली.
त्यांच्या मते प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली मात्र घटनेमागचं कारण समोर येऊ शकलं नाही आणि आता असं दिसतंय की रात्रीच्या अंधारात पिंजऱ्यात उडी मारणाऱ्या मृत व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. अन्यथा, कोणतीही हुशार व्यक्ती असं पाऊल उचलूच शकणार नाही.'
उपायुक्तांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की त्यांनी परिस्थिती आणि घटनांचा बारकाईने अभ्यास केला आणि प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्यांच्या कामाची माहिती घेतली.
साधारणपणे सकाळी साडेअकरा वाजता प्राणिसंग्रहालयाची स्वच्छता केली जाते. वाघाच्या पिंजऱ्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या इनायत मसीह या कर्मचाऱ्याने वाघाच्या तोंडात बूट पाहिल्यानंतर आज अचानक ओरडायला सुरुवात केली.
त्याच्या म्हणण्यानुसार, तेथे असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनीही पिंजऱ्याच्या परिसराकडे धाव घेतली आणि त्यांनी आत जाऊन पाहिलं असता तिथे एक मानवी मृतदेह पडला होता, ज्यामुळे गोंधळ सुरू झाला. सुरुवातीला तो प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांमधील एक सदस्य असावा अशी शंका आली, पण सर्व कर्मचाऱ्यांची दोन-तीन वेळा मोजणी केल्यानंतर त्यांची बेरीज बरोबर येत होती.’
प्रशासनाचं म्हणणं आहे की, या व्यक्तीने रात्री कधीतरी पिंजऱ्यात उडी घेतली असावी आणि वाघाने त्याच्यावर हल्ला केला असावा आणि मृत व्यक्तीचे कपडेही रक्ताने माखलेले होते.
बहावलपूर पोलिसांचे प्रवक्ते मुहम्मद उमर यांनी बीबीसीला सांगितलं की, पोलिसांनी सुरक्षारक्षकांची चौकशी केली होती, त्यांना रात्री किंवा आज सकाळी कोणताही आवाज किंवा ओरडणं ऐकू आलं नाही असं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, 'या व्यक्तीला कोणीही येताना किंवा जाताना पाहिलं नाही आणि आमची अशी माहिती आहे की, ही घटना मंगळवार आणि बुधवारच्या मधल्या रात्रीत कधीतरी घडली आणि आज सकाळी साडेअकरा नंतर ती उघडकीस आली.'
ते म्हणाले, प्राणिसंग्रहालयाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून रात्रीच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी तपासल्या जातायत. प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांकडूनही घटनेचा तपशील मागवण्यात आलाय, सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर पोलिसांकडून आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)