IPS वाय. पूरन कुमार आत्महत्या: पत्नीनं तक्रारीत काय म्हटलंय? जातीभेदामुळे आत्महत्या?

फोटो स्रोत, Nayab Singh Saini/FB
- Author, सरबजीत सिंग धालीवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाबाबत अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एफआयआर नोंदवल्यावर 1 दिवसानंतर शुक्रवारी (10 ऑक्टोबर) वाय. पूरन कुमार यांच्या पत्नीनं पोलिसांना एक पत्र लिहून एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या 'अपुऱ्या माहिती'बद्दल प्रश्न उपस्थित केले.
त्यांनी त्यांच्या तक्रारीत "सर्व आरोपींची नावं योग्य प्रकारे नोंदवण्याची मागणी केली आहे."
या प्रकरणात हरियाणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे पोलीस अधिक्षक (एसपी) नरेंद्र बिजारनिया यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यांची एक एसआयटी समिती स्थापन केली आहे.
या समितीचे अध्यक्ष चंदीगडचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) पुष्पेंद्र कुमार आहेत.
मंगळवारी (7 ऑक्टोबर) वाय. पूरन कुमार यांचा मृतदेह चंदीगडमधील सेक्टर 11 मधील त्यांच्या निवासस्थानी सापडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वाय पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.
अमनीत पी कुमार यांनी चंदीगड पोलीस दलाच्या एसएसपी कंवरदीप कौर यांना पत्र लिहिलं आहे.
त्यात म्हटलं आहे की, एफआयआरमध्ये 'एससी/एसटी' कायद्याची जी कलमं लावण्यात आली आहेत, त्यात सुधारणा करण्यात यावी. या तक्रारीची एक प्रत बीबीसीकडे आहे.
आयएएस पत्नीच्या तक्रारीत काय म्हटलं आहे?
चंदीगड पोलिसांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी उशीरा, आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आणि एससी/एसटी कायद्याच्या काही कलमांअंतर्गत एक एफआयआर नोंदवला.
मृत वाय. पूरन कुमार यांच्या 'सुसाईड नोट'च्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पूरन कुमार यांच्या पत्नीनं तक्रार नोंदवली होती की, त्यांच्या पतीच्या कथित सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांचा उल्लेख आहे, त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी.
अमनीत पी कुमार यांनी बुधवारी (8 ऑक्टोबर) चंदीगड पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यांनी हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
वाय पूरन कुमार कोण होते?
वाय पूरन कुमार मूळचे आंध्र प्रदेशातील होते आणि ते इंजिनिअर होते.
ते हरियाणा कॅडरचे 2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अंबाला आणि कुरुक्षेत्रमध्ये एसपी म्हणून काम केलं.
त्यानंतर त्यांनी अंबाला आणि रोहतक रेंजमध्ये पोलीस महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम केलं.

फोटो स्रोत, Haryanapolice.gov.in
त्यांच्या पत्नी हरियाणामध्ये आयएएस अधिकारी आहेत. त्या परदेश सहकार्य विभागात आयुक्त आणि सचिव पदावर आहेत.
या घटनेच्या वेळी त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाबरोबर गेलेल्या होत्या.
या प्रकरणाबाबत हरियाणा सरकार गोंधळात
या प्रकरणावरून हरियाणा सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) जपानच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर चंदीगडमध्ये वाय पूरन कुमार यांच्या कुटंबाची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी वाय पूरन कुमार यांच्या आयएएस पत्नी अमनीत पी कुमार यांच्याशी चर्चा केली.
ही चर्चा जवळपास 1 तास चालली होती. त्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले होते.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) चंदीगडमध्ये एक पत्रकार परिषददेखील बोलावली होती. मात्र तीसुद्धा रद्द करण्यात आली.

फोटो स्रोत, Nayab Singh Saini/FB
दुसऱ्या बाजूला, प्रसारमाध्यमांमधून वारंवार उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी फक्त इतकंच म्हणाले, "वाय पूरन कुमार एक कार्यक्षम अधिकारी होते आणि मी यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही."
मुख्यमंत्री नायब सैनी यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी हरियाणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) शत्रुजीत सिंह कपूर यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं आणि या घटनेची माहिती घेतली होती.
दरम्यान, बीबीसीनं या प्रकरणासंदर्भात हरियाणाच्या पोलीस महासंचालकांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र संपर्क केल्यावर पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, पोलीस महासंचालक या प्रकरणाबाबत त्यांची बाजू मांडतील, तेव्हा माहिती दिली जाईल.
चंदीगड पोलिसांची प्रतिक्रिया
चंदीगड पोलीस म्हणाले, "सेक्टर 11 मधील पोलीस ठाण्यातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येबाबत तपास केला जातो आहे."
चंदीगड पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार घराच्या सीटीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, ज्या खोलीत ही घटना घडली, ती सील करण्यात आली आहे. तसंच सीएफएसएल टीमनं घरातून कथित सुसाईड नोटव्यतिरिक्त काही इलेक्ट्रॉनिक उपकरणंदेखील ताब्यात घेतली आहेत.
'जातीभेदानं त्रस्त आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनं संपूर्ण देशाला धक्का'
हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाबाबत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी दलितांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली.
प्रियंका गांधी म्हणाल्या, "जातीभेदानं त्रस्त होऊन हरियाणाचे आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमारजी यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. देशभरात दलितांच्या विरोधात ज्याप्रकारे अन्याय, अत्याचार आणि हिंसेच्या घटना घडत आहेत, ते भयावह आहे."
त्यांनी रायबरेलीमध्ये 'दलित तरुणाची हत्या' आणि भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याचाही उल्लेख केला.
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, "आधी रायबरेलीमध्ये हरिओम वाल्मीकी यांची हत्या, मग सरन्यायाधीशांचा अपमान आणि आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या, यातून सिद्ध होतं की, भाजपाची राजवट दलितांसाठी एक शाप आहे."
"कोणी सर्वसामान्य नागरिक असो की वरिष्ठ पदावरील अधिकारी, जर तो दलित समुदायातील असेल, तर त्याला अन्याय आणि अमानुषपणाला तोंड द्यावंच लागतं. वरिष्ठ पदावरील दलितांची ही अवस्था असेल, तर विचार करा, सर्वसामान्य दलित समुदाय कोणत्या अवस्थेत जगत असेल."

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी (7 ऑक्टोबर) आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार, चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत सापडले होते.
चंदीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर म्हणाल्या, "इथे एका आत्महत्येची नोंद झाली आहे आणि आम्हाला एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह वाय पूरन कुमार यांचा असल्याची ओळख पटवण्यात आली आहे."
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले वाय पूरन कुमार रोहतकमधील सुनारियामधील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये पोलीस महानिरीक्षक (आयजी) पदावर कार्यरत होते.
गुरुवारी (9 ऑक्टोबर) हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी वाय पूरन कुमार यांच्या पत्नी आणि आयएएस अधिकारी अमनीत कुमार यांची भेट घेतली होती.
या प्रकरणात अमनीत कुमार यांनी मुख्यमंत्री सैनी यांना एक तक्रार पत्रदेखील पाठलं होतं.
(आत्महत्या ही एक गंभीर स्वरुपाची मानसिक आणि सामजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल, तर भारत सरकारच्या, 1800 233 3330 या स्पाउस हेल्पलाइनवर मदत मागू शकता. शिवाय तणावासंदर्भात तुम्ही मित्र आणि नातेवाईकांशी देखील चर्चा केली पाहिजे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











