लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक, बाबा सिद्दीकी हत्येच्या कटातही आरोपी

फोटो स्रोत, NIA/ANI
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारताकडे प्रत्यर्पण करण्यात आलं. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला अटक केली आहे.
वृत्तसंस्था एनआयएने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, 2022 पासून फरार असलेला अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईच्या कट्टरतावादी सिंडिकेटशी संबंधित असून, या प्रकरणात अटक होणारा तो 19 वा आरोपी ठरला आहे.
एनआयएने मार्च 2023 मध्ये त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. 2020 ते 2023 दरम्यान देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये अनमोल लॉरेन्स बिश्नोई आणि घोषित दहशतवादी गोल्डी ब्रार यांना सक्रियपणे मदत करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
एनआयएने काय सांगितलं?
एनआयएने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "अनमोल अमेरिकेतून लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी दहशतवादी सिंडिकेट चालवत तो भारतात असलेल्या बिश्नोई गँगच्या सदस्यांना सूचना देत असे.
अनमोलने गँगच्या शूटर्सना आणि ग्राउंड ऑपरेटिव्ह्जना निवारा आणि लॉजिस्टिक मदत पुरवल्याचंही तपासात उघड झालं आहे. तसेच परदेशातूनच इतर गँगस्टरांच्या मदतीनं भारतात खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे.

फोटो स्रोत, NIA/ANI
अनमोल बिश्नोईचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणातही आरोपी म्हणून समोर आलं आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी मंगळवारी सांगितलं होतं की अनमोल बिश्नोईला 18 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे.
त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितलं होतं की, "माझं कुटुंब अमेरिकेत पीडित कुटुंब म्हणून नोंदणीकृत आहे. व्हिक्टिम नोटिफिकेशन सिस्टममुळे आम्हाला अनमोल बिश्नोईबाबत अपडेट्स मिळत राहतात. आज आम्हाला एक ईमेल आला, ज्यात म्हटलं आहे की 18 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या फेडरल सरकारने अनमोल बिश्नोईला देशातून हद्दपार केलं आहे."
गेल्या वर्षी अमेरिकेत केली होती अटक
झीशान सिद्दीकी म्हणाले, "माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्याला मुंबईत आणलं जावं आणि चौकशी करून अटक सुनिश्चित करण्यात यावी."
ते पुढे म्हणाले, "तो समाजासाठी धोका आहे. माझ्या वडिलांच्या हत्येत त्याचे नाव आले होते. सलमान खान प्रकरणातही त्याचे नाव वारंवार समोर येत आहे. अनमोल बिश्नोईला असे करण्यास कोणी सांगितलं, याबाबत आम्हाला जाणून घ्यायचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनमोल बिश्नोईला अमेरिकेत ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, त्याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं होतं की अनमोल बिश्नोईला भारतात परत आणणं हा कायदेशीर विषय आहे आणि त्याबाबत विहित प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल.
पीटीआयच्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या शोधात असलेल्या मुंबई पोलिसांना अमेरिकन पोलिसांनी तो अमेरिकेत असल्याचं सूचित केलं होते.
बनावट पासपोर्टचा वापर
अनमोल बिश्नोईवर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे आरोप आहेत. आणि मुंबई पोलीस त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणासह, अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारासह अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या अनमोल बिश्नोईला, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतलं.
ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या बांद्रा (ईस्ट) येथे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती.

फोटो स्रोत, ANI
इंडियन एक्सप्रेसने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अनमोल बिश्नोईला गेल्या गुरुवारी (13 नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आलं. आणि शुक्रवारी (14 नोव्हेंबर) एफबीआयने भारतीयय तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
एनआयए वेबसाइटनुसार, एजन्सी अनमोल बिश्नोईचा शोधात होते. वेबसाइटवर अनमोलची नोंद 'भानू' या नावानंही आहे. तो मूळचा पंजाबच्या फाजिल्का येथील रहिवाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, यावर्षी 15 मे रोजी 'भानू' नावाने बनवलेल्या बनावट पासपोर्टच्या आधारे अनमोल अमेरिकेत पळून गेला होता.
अनमोल बिश्नोईवरील आरोप
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन इमिग्रेशन विभागाला अनमोल बिश्नोईकडे असलेली प्रवासाची कागदपत्रे आणि एका कंपनीचे खोटे पत्रही आढळून आले. 25 वर्षीय अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई गँगचं संचालनदेखील करायचा. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्याप्रकरणी पोलीस अनमोलचा शोध घेत होते.
29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा येथे सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
भारतीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, 32 वर्षीय लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सुमारे 700 शूटर आहेत, ज्यापैकी बहुतेकजण लहान शहरातून आणि गावातून येतात.

फोटो स्रोत, Getty Images
लॉरेन्स बिश्नोईचा प्रभाव पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये असल्याचं मानलं जातं. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि धमकी यांसह अनेक आरोप आहेत.
सध्या त्याच्याविरुद्ध 22 खटले प्रलंबित असून 7 प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे.
विद्यालयीन राजकारणातील गटबाजीपासून सुरू झालेली लॉरेन्स बिश्नोईची गुन्हेगारी कारकीर्द आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग तस्करी आणि 'टार्गेट किलिंग'पर्यंत पोहोचली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिश्नोई गँग मोठा ड्रग्स नेटवर्कही चालवते आणि लॉरेन्स हा 'ए-श्रेणी'तील गँगस्टर मानला जातो.
पोलीस रेकॉर्डनुसार, लॉरेन्सला चार गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई गेल्या दीड वर्षांपासून अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात असतानाही त्याची टोळी सक्रिय असल्याचं सांगितलं जातं.
भारतीय तपास यंत्रणा होत्या अनमोलच्या मागावर
इंडियन एक्सप्रेसनुसार, यावर्षी 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोईचा सहभाग आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य विक्की गुप्ता यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप मिळाली असल्याचं न्यायालयात सांगितलं होतं.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीस मुंबई पोलिसांनी न्यायालयातील विशेष सुनावणीदरम्यान सांगितलं होतं की बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात अनमोल बिश्नोई याचा हात आहे का, याचा तपास करत असल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या विशेष सुनावणीत सांगितलं होतं.

फोटो स्रोत, ANI
इंडियन एक्सप्रेसनुसार, गेल्या महिन्यात पोलिसांनी न्यायालयाला कळवलं होतं की ते अनमोलच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू करत आहेत.
एनआयए वेबसाइटनुसार, 2022 मध्ये डेरा सच्चा सौदाचे अनुयायी प्रदीप कुमार यांची हत्येसह, राजस्थानच्या सीकर येथे झालेल्या राजू ठेहठ यांच्या हत्येप्रकरणातही अनमोलचा हात असल्याचं समोर आलं आहं.
याशिवाय सिद्धू मूसेवालाच्या हत्याप्रकरणातही एनआयएने अनमोल बिश्नोईला आरोपी ठरवलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











