प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक का, राहुल गांधींचा दिल्ली सरकारला सवाल

दिल्लीतील खराब हवा आणि प्रदूषण हा दिल्लीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. दिल्लीची हवा प्रदूषणामुळे खराब होत आहे, त्यासाठी सरकारने कारवाई करावी असे म्हणत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी दिल्ली सरकारवर टीका केली आहे.

'दिल्लीतील वाढतं प्रदूषण आणि खराब हवेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना गुन्हेगारांसारखी वागणूक का दिली जातेय,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी म्हणाले, "त्या ठिकाणी लोक स्वच्छ हवेची मागणी करत शांततापूर्ण पद्धतीने निदर्शन करत होते. पण या नागरिकांना गुन्हेगारांसारखं का वागवलं जात आहे?"

नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित निर्णायक पावले उचलली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले.

पर्यावरणवादी विमलेंदु झा यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी हे म्हटलं.

दरम्यान, रविवारी 9 नोव्हेंबररोजी दिल्लीतील खराब हवा आणि वाढत्या प्रदुषणावर सरकारने पावलं उचलावी, या मागणीठी इंडिया गेटवर मोठ्या संख्येने लोक जमले होते.

आंदोलकांनी हातात फलक घेतले होते आणि प्रदुषणाविरोधात सरकारनं पावलं उचलावी अशी मागणी करत घोषणाबाजी करत होते.

या आंदोलनात सर्व वयोगटातील पुरुष, महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासारखे काही विरोधी नेतेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, लोकांनी परवानगीशिवाय आंदोलन केल्याच्या आरोपाखाली आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं.

पर्यावरणवादी झा यांनी या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती की, "आंदोलकांची धरपकड करून त्यांना बसमध्ये डांबण्यात आलं." त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी दिल्ली सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

घटनाक्रम

दिल्लीत खराब हवेच्या विरोधात रविवारी (9 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता इंडिया गेटवर जमा व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार इंडिया गेटवर अनेक जण जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवलं आहे आणि अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

आंदोलकांनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या आणि स्वच्छ हवेसाठी सरकारनं कारवाई करण्याची मागणी केली.

आंदोलनामध्ये वेगवेगळ्या वयाचे पुरुष, महिला आणि अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज सारखे काही विरोधी पक्षाचे नेतेदेखील उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळेस दिल्ली पोलीस दलाचे इन्स्पेक्टर मनोज कुमार सिंह माईकवरून आंदोलकांना म्हणाले, "हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. इथे पाच किंवा त्याहून अधिक लोकांना जमण्याची परवानगी नाही."

ते म्हणाले, "आंदोलकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल."

आंदोलकांनी जंतर-मंतरला जावं, असं आवाहन पोलिसांनी केलं. पोलिसांचं म्हणणं आहे की आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतर हे ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे.

अर्थात, आंदोलक इंडिया गेटजवळच ठिय्या देऊन बसले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेकजणांना ताब्यात घेतलं आणि तिथून हटवलं.

दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची अतिशय खराब गुणवत्ता याच्या विरोधात इंडिया गेटवर होणाऱ्या आंदोलनाबाबत पोलिसांनी आवाहन केलं आहे की सर्व लोकांना कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून जंतर-मंतरवर आंदोलन करावं.

पोलीस उपायुक्त (डीसीपी) देवेश कुमार प्रसारमाध्यमांना म्हणाले, "इंडिया गेट ही आंदोलन करण्याची जागा नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतर हे ठिकाण निवडण्यात आलं आहे. इंडिया गेटवर कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याची परवानगी नाही."

ते पुढे म्हणाले, "इथे लोक येतात आणि ते त्यांच्या कुटुंबासह आनंदानं वेळ घालवतात. आपण याला आंदोलनाचं ठिकाण बनवू शकत नाही. त्यामुळेच सर्वांना सांगण्यात येत आहे की तुम्ही मार्गदर्शक तत्त्वांचं आणि नियमांचं पालन करावं."

"एक अर्ज देऊन आणि प्रक्रियेचं पालन करून जंतर-मंतरवर आंदोलन करता येतं. तिथे आंदोलन करण्याची परवानगी आम्हीदेखील देतो."

पोलिसांनी हे आदेश दिल्या नंतर देखील आंदोलकांनी जागा सोडली नाही. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना उचलून ताब्यात घेतले.

या आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)