दिवाळीच्या उत्सवात हवेची गुणवत्ता घसरली, फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलं; काय काळजी घ्यावी?

मुंबईत अगदी दोन दिवसांपूर्वी हवा बऱ्यापैकी स्वच्छ होती. पण दिवाळी सुरू झाल्यावर शहराच्या अनेक भागांमध्ये हवेचा दर्जा खालावला आहे.

विशेषतः बीकेसी, कुलाबा, देवनार, अंधेरी परिसरात वायूप्रदूषणाचं प्रमाण जास्त वाढलं आहे. दादर परिसरातही सकाळी दाट धुरकं जमा झालं होतं.

तज्ज्ञांच्या मते, या प्रदूषणामागे काही मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे हवामानाची स्थिती आणि दुसरं म्हणजे बांधकाम तसंच औद्योगिक प्रदूषण, त्यात सध्या फटाक्यांची भर पडली आहे.

दरवर्षी मान्सूननं माघार घेतल्यावर वाऱ्यांचा वेगही कमी होतो. परिणामी मुंबई परिसरात जमा होणारे पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे घातक प्रदूषकं आणि धूलिकण शहरातच साठून राहते. सध्या रात्री तापमानही कमी होतंय, ज्यामुळे सकाळी धुकं पडतं आणि त्यात हे धूलिकण अडकून राहतात.

शहरात आधीच धूळ जमा होत असताना, नेमकं याच कालावधीत मोठ्या प्रमाणात धूर ओकणारे फटाके फोडल्यानं प्रदूषणात भर पडते आहे, असं हवेचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात.

सध्या मुंबईतली हवा संवेदनशील लोकांना म्हणजे श्वसनाचा आजार असलेल्या लोकांना त्रास होईल अशी आहे.

अ‍ॅलर्जी, अस्थमा किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी घराबाहेर पडताना मास्क लावावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वायू प्रदूषण म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याखेनुसार, वातावरणात नैसर्गिक हवेत जेव्हा कोणतेही रासायनिक, जैविक किंवा भौतिक रेणूंचा समावेश होतो आणि त्यामुळे वातावरणात, हवेत बदल होतात तेव्हा त्याला प्रदूषण म्हणले जाते.

हे प्रदूषण मोजलं जातं ते या पीएम कणांमुळे.

पीएम म्हणजे पार्टिकल्स इन मायक्रोग्रॅम पर क्युबिक मिटर. म्हणजे एका क्युबीक मीटर मध्ये 10 मायक्रॅान आणि 2.5 मायक्रॅान व्यासाचे कण ( मायक्रोस्कोपीक पार्टिकल्स) किती प्रमाणात आहेत यावरुन प्रदूषणाची पातळी ठरते.

हेच पीएम पार्टिकल्स जर श्वसनावाटे आपल्या शरिरात गेले तर आपल्या आरोग्यावर दुरगामी परिणाम घडवतात.

मुंबई, दिल्लीसारखी शहरं का गुदमरतायत?

वायू प्रदूषणाबद्दल बोलताना तुम्ही AQI, PM2.5, PM 10 असे शब्द ऐकले असतील. या बाराखडीचा अर्थ काय ते आधी समजून घेऊ.

एखाद्या ठिकाणची हवा प्रदूषित आहे की शुद्ध हे सांगण्यासाठी तिचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) तपासला जातो. एखाद्या ठिकाणचा एक्यूआय जेवढा जास्त, तेवढीच तिथली हवा जास्त प्रदूषित.

एक्यूआयचे सहा टप्पे केलेत. जर हा आकडा 0 ते 50 इतका असेल तर हवा चांगली आहे, असं म्हणता येईल.

एक्यूआय 51 ते 100 असेल तर हवेची गुणवत्ता 'समाधानकारक' असल्याचं मानलं जातं.

हा आकडा 100 ते 200 मध्ये असेल तर हवा मध्यम प्रदूषित मानली जाते, 200 ते 300 असेल तर खराब, 300 ते 400 असेल अत्यंत खराब आणि 400 ते 500 असेल तर गंभीर परिस्थिती असल्याचं सांगितलं जातं.

एखाद्या शहरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'खराब ते गंभीर' या श्रेणीत असेल तर संसर्ग झालेल्या लोकांमध्ये विकृती आणि मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं अशी माहिती सरकारच्या या आदेशात देण्यात आलेली आहे.

सध्याचे आकडे पाहिले तर मुंबईतील परिस्थिती मध्यम प्रदूषित असून ती वेगाने खराब होत आहे आणि दिल्लीतली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं दिसतंय.

एकूणच काय तर देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या शहरांमध्ये राहणारे लोक अत्यंत प्रदूषित वातावरणात राहत आहेत हे स्पष्ट झालंय.

हवेतले कोणते घटक प्रदूषण करतात?

हवेत PM2.5 आणि PM 10 अशी दोन प्रमुख प्रदूषकं असतात. या कणांच्या आकारावरून त्यांना नावं मिळाली.

अडीच मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना PM2.5 म्हणतात तर 2.5 ते 10 मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना PM10 असं म्हणतात.

विशेष म्हणजे, हे कण उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे ते अगदी सहज तुमच्या नाकातून किंवा घशामधून तुमच्या शरीरात जातात.

त्यांच्यामुळे दमा, हृदयविकार, ब्राँकायटिस आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात.

यासोबतच नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, कार्बन, सल्फर डायऑक्साईड हे घटक देखील वायू प्रदूषणात भर टाकत असतात.

आरोग्यावर काय परिणाम होतो?

दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळं हवेतील कार्बन मोनोक्साइड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साइड इत्यादींचं हवेतलं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं.

गरोदर स्त्रिया, लहान मुलं आणि अस्थमाचे रुग्ण यांना या काळात सर्वाधिक त्रास होतो, असं अनेक संशोधनात आढळून आलं आहे.

हवेतील सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर्स (SPM) यांची पातळी वाढल्यामुळे घसा, नाक आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्धवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो.

ज्या लोकांना हृदयरोग, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थचे विकार असतात, तसेच सर्दी, खोकला, आणि ॲलर्जी असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो.

फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखी एक मोठा धोका आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण नैसर्गिक स्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला 60 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल्स इतकी मर्यादा आखून दिलेली असते.

फटाक्यामुळे ही मर्यादा 140 डेसिबल्सपर्यंत जाते. 85 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजामुळं ऐकायला त्रास होतो. आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता, तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

प्रदूषणापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय

  • हवेची गुणवत्ता वाईट असेल तर बाहेर जाणं टाळा.
  • सकाळी आणि संध्याकाळी घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा.
  • लाकूड, कोळसा आणि इतर बायोमास जाळू नये. वीज, गॅस अशी स्वच्छ इंधनं वापरा. फटाके फोडणं टाळा.
  • सिगारेट, बिडीसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा.
  • बंद आवारात डासांच्या कॉईल आणि अगरबत्ती जाळणं टाळावं.
  • ज्यांना दम लागणं, चक्कर येणं, खोकला, छातीत दुखणं अशी लक्षणं दिसत असतील त्यांनी लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.

लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

फुफ्फुसाचे तीव्र आजार, हृदय वाहिन्यांशी संबंधित समस्या इत्यादी आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.

एक्यूआय पातळी खराब असेल तर कोणतंही कष्टाचं काम करू नये. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं.

शक्य असल्यास एन-95 किंवा एन-99 मास्क वापरावा. प्रदूषणात कमी वेळ बाहेर जाणार असाल तर हे मास्क तुम्हाला उपयोगी ठरू शकतात.

कागदी मास्क, रुमाल, स्कार्फ आणि कापड प्रभावी नाहीयेत. शक्य असेल तर एअर प्युरिफायरचा वापर करावा.

त्यासोबत दिलेल्या निर्देशांचं पालन करून प्युरिफायरचे फिल्टर आणि इतर भाग बदलले पाहिजेत. ओझोनचं उत्सर्जन करणारे एअर प्युरिफायर वापरणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे घरगुती प्रदूषणात वाढ होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)