माइक टायसन : 19 वर्षांनी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला, पण 27 वर्षांच्या युट्युबरकडून पराभव

फोटो स्रोत, Getty Images
- Author, काल सजद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, टेक्सास
माइक टायसन हे नाव बॉक्सिंगच्या दुनियेत सतत चर्चिलं जाणारं नाव आहे. वयाच्या विशीतच जगज्जेता बॉक्सर झालेल्या माइक टायसननं बॉक्सिंगच्या विश्वात त्याचा मोठा ठसा उमवटला आहे.
आपल्या तुफानी खेळासाठी प्रसिद्ध असलेला टायसन त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कृत्यांमुळे तो अधोगतीला लागला. मात्र आजही टायसनबद्दलचं कुतुहल कमी होत नाही.
आता पुन्हा एकदा टायसन चर्चेत आला आहे तो एका जगावेगळ्या बॉक्सिंग सामन्यामुळे. जेक पॉल या तरुण बॉक्सरशी वयाच्या साठीत असलेल्या टायसन एक बॉक्सिंग सामना खेळला.
प्रचंड रकमेचं बक्षीस असलेल्या या सामन्याविषयी...
जेक पॉल यानं जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनचा पराभव केला आहे. जेक हा आधी युट्युबर होता आणि नंतर तो बॉक्सर झाला आहे. दोन वेळच्या हेवीवेट चॅम्पियन असलेल्या आणि जगविख्यात बॉक्सर असलेल्या माइक टायसनचा हा पराभव अत्यंत धक्कादायक आहे.
टेक्सासमध्ये हा सामना पाहणाऱ्या 70,000 चाहत्यांच्या वाट्याला माइक टायसन च्या पराभवामुळे निराशा आली आहे. या पराभवामुळे माइक टायसनच्या यशस्वी बॉक्सिंग कारकीर्दीवर कायमचा डाग लागला आहे. नेटफ्लिक्सवर देखील लाखो दर्शक हा वादग्रस्त सामना पाहत होते.
अर्थात हा सामना होत असताना माइक टायसनचं वय 58 वर्षे होतं तर जेक पॉल 27 वर्षांचा आहे. या बॉक्सिंग सामन्याच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गेली 19 वर्षे माइक टायसननं कोणताही व्यावसायिक सामना खेळलेला नाही.
तरी देखील बॉक्सिंगच्या यशस्वी करियरची सावली मात्र माइक टायसनबरोबर होती. त्याचा जगज्जेतेपदाचा वारसा त्याच्या बरोबर होता.
तर दुसऱ्या बाजूला जेक पॉल हा बॉक्सिंगमध्ये तसा नवशिक्याच आहे. मात्र त्याची जमेची बाजू म्हणजे तो तरुण आहे आणि सामन्यात चांगलाच चपळ होता. त्यामुळे त्याने टायसनसमोर मोठं आव्हान उभं केलं. या सामन्यात लढतीच्या आठ फेऱ्या झाल्या.
प्रत्येक फेरी दोन मिनिटांची होती. सामन्यात जेकनं माइक टायसनवर अचूक ठोशांनी जोरदार हल्ला चढवला. तसंच टायसन चे ठोसे देखील चुकवले.


त्या तुलनेत वय झालेल्या टायसनच्या हालचाली मात्र मंद, सुस्त होत्या. टायसन थकलेलाही वाटत होता. सामना सुरू होण्याआधी माइक टायसनचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलं. मात्र, जसजसा हा सामना संपत आला तसतशी प्रेक्षकांच्या वाट्याला निराशाच आली.
कारण प्रेक्षकांना वाटलं होतं त्याप्रमाणे लढत काही फारशी चुरशीची झाली नाही किंवा टायसनच्या बॉक्सिंगची जादू तशी काही दिसली नाही.
सामन्याच्या पंचांनी सामन्याचा निकाल जाहीर करण्यापूर्वीच काही चाहते तिथून निघून गेले होते. हा सामना जेकनं 80-72, 79-73 आणि 79-73 असा जिंकला.
माइक टायसनच्या 57 लढतींमध्ये हा सातवा पराभव होता. सामना हरल्यानंतर माइकनं पॉलचा भाऊ लोगान याला बोलावून तो पुन्हा लढू शकतो असं सांगितलं.
या लढतीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याचप्रमाणे हे दोघेही बॉक्सर ती बाब किती गांभीर्यानं घेतील हा मुद्दा देखील होता. मात्र टायसन म्हणाला की तो "लढण्यासाठी आला आहे".

या बातम्याही वाचा:

दोन्ही बॉक्सर्सनी टेक्सास कमिशनच्या अटी-नियमांप्रमाणे अतिरिक्त पॅडिंग असलेले बॉक्सिंग ग्लोव्हज घातले होते. या सामन्याला व्यावसायिक लढत म्हणून मंजूरी देण्यात आली होती. मात्र लढतीनंतर हा निर्णय अतिशय हास्यास्पद वाटत होता.
दोन्ही बॉक्सर्सनी हलके बॉक्सिंग ग्लोव्हज घातले असते तरीही काही फरक पडला नसता. दोन्ही बॉक्सर्सनी मारलेला एकही पंच नॉकआउट च्या जवळपास देखील आला नव्हता.
संपूर्ण सामन्यात टायसननं फक्त 18 ठोसे मारले. तर पॉलनं मात्र 78 ठोसे लगावले.
बॉक्सिंगमध्ये येण्यापूर्वी प्रँक व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करून आणि सोशल मीडियावर 7 कोटी फॉलोअर्स मिळवून पॉल सेलिब्रिटी बनला.

फोटो स्रोत, Getty Images
टायसनला हरवून पॉलनं त्याची 11 वी लढत जिंकली. त्याधी गेल्या वर्षी तो टॉमी फ्युरीकडून पराभूत झाला होता. या लढतीनंतर पॉलनं सॉल 'कॅनेलो' अल्वारेझ या मेक्सिकन सुपरस्टारशी लढण्याची त्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली.
अल्वारेझ हा मेक्सिकन बॉक्सर असून त्याने अनेक जागतिक चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
"त्याला पैसे कमवायचे आहेत आणि त्याला माहिती आहे की पैसा कुठे आहे," असं पॉल म्हणाला.
एका म्हातारा जगज्जेता विरुद्ध एक नवशिक्या बॉक्सर
पश्चातबुद्धी ही एक अद्भूत गोष्ट आहे. मात्र परिणाम आश्चर्यकारक नाही. सामन्याच्या या निकालामुळं ज्या टीकाकारांना वाटलं होतं की, यातून बॉक्सिंगची खिल्ली उडवली जाईल त्यांना अधिक धीर येईल.
टायसन म्हणाला की, 2005 मध्ये केवीन मॅकब्राईडबरोबरचा सामना हरल्यापासून तो बॉक्सिंगपासून दूर गेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पॉलविरुद्धच्या या सामन्यात सुरूवातीपासूनच ही गोष्ट स्पष्ट होती की टायसन आता त्याच्या वयाच्या साठीत आहे. त्यामुळं त्याच्याकडे थोडी ताकद होती मात्र जोरदार सामना लढण्याइतपत स्टॅमिना नव्हता.
या सामन्याबाबत सर्वसाधारण भावना अशी होती की, जर टायसनला हा सामना जिंकायचा असेल तर त्याला लवकरात लवकर पॉलला नॉकआउट करावं लागेल. शिवाय टायसन त्याच्या नॉकआउट ठोशांसाठी प्रसिद्ध आहे.
सामन्यात सुरुवातीला टायसननं उजव्या हातानं ठोसा लगावला तरी पॉलनं टायसनला अचूकपणे ठोसे लगावण्यास सुरूवात केली. तिसऱ्या फेरीत त्याच्या डाव्या हातानं टायसनला जोरदार ठोसा लगावला.
या सामन्यात पॉलनं जगातील सर्वात महागडी शॉर्ट्स घातली होती. सामना पुढे सरकत गेल्यावर पॉलनं त्याच्यापेक्षा 31 वर्षांनी वयस्कर असणाऱ्या टायसनवर ठोशांचा मारा करण्यास सुरूवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
उजव्या पायाच्या गुडघ्याला आधार देण्यासाठी टायसननं तिथं काळ्या रंगाचा पट्टा किंवा नी कॅप बांधली होती. काही वेळा टायसन त्याच्या डोक्याची वेगानं हालचाल करून पॉलचे ठोसे चुकवत होता.
पाचव्या फेरीत त्यानं ताकदीनं मारलेला हूक किंवा ठोसा किमान एक फूट दुरून गेला. त्याच्या वयाचा त्याच्या कामगिरीवर, ठोसे मारण्यावर किती परिणाम होत होता ते त्यातून दिसून आलं.
सातव्या फेरीत पॉलच्या डावाचा एक ठोसा (हूक) टायसनच्या जबड्यावर बसल्यानं टायसनची अवस्था आणखी बिकट झाली. या वेळेपर्यंत बहुतांश चाहते सामन्याची अंतिम घंटा ऐकण्यासाठी उत्सुक दिसत होते.
अपेक्षाभंग करणारा तरीही रंगतदार सामना
टायसन विरुद्ध पॉलच्या या बॉक्सिंग सामन्याचं प्रक्षेपण नेटफ्लिक्सच्या जगभरातील 28.3 कोटी सबस्क्राईबरना पाहायला मिळालं. हा सामना कदाचित अपेक्षाभंग करणारा ठरला असेल तरी प्रत्यक्ष सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक शो ठेवण्यात आला होता.
या सामन्यातून पॉलनं 3 कोटी पौंडांची (जवळपास 320 कोटी रुपये) तर टायसननं त्याच्या निम्म्या रकमेइतकी कमाई केली. अर्थात इतक्या प्रचंड रकमेच्या या सामन्यासाठी खर्च करताना हात आखडता घेण्यात आला नाही.
सामना सुरू होण्याआधी पॉलला बॉक्सिंग रिंगमध्ये एका खास तयार केलेल्या हिरव्या रंगाच्या कारमधून नेण्यात आलं. तेव्हा फिल कॉलिन्सच्या इन द एअर टूनाईट हे गाणं वाजत होतं. त्याचा भाऊ लोगान पॉल त्याच्या शेजारी बसला होता.
लोगान पॉल हा एक डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीगीर आणि सोशल मीडिया स्टार आहे.
कारच्या मागच्या सीटवर एक कबूतर होतं. सामना होणार असल्याच्या आठवड्यात ते त्यानं टायसनला भेट दिलं होतं. टायसनला कबुतरं प्रचंड आवडतात त्याच्या घरी खूप कबुतरं आहेत.
स्टेडिअम आणि परिसरात असलेल्या चाहत्यांनी टायसनसाठी प्रचंड जल्लोष केला. स्टेडियम डल्लास काऊबॉय एनएफएल टीमचं केंद्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टायसन, त्याचा ट्रेडमार्क किंवा खास ओळख असलेल्या काळ्या रंगाच्या कपड्यात होता. आठवडाभर त्याचा जसा कडक लूक होता तसाच ठेवत तो बॉक्सिंग रिंगमध्ये गेला.
या सामन्याची चाहत्यांमध्ये इतकी उत्कंठा होती आणि तो पाहण्यास चाहते इतके उत्सुक होते की निव्वळ तिकिट विक्री मधूनच 1.41 कोटी पौंडांची कमाई करण्यात आली. यात एका व्हीआयपी ग्रुप पॅकेजचाही समावेश होता.
त्यात रिंगच्या शेजारीच एक सीट देण्यात आली होती आणि दोन्ही बॉक्सर्सबरोबर फोटो देखील काढता येणार होते. त्या पॅकेजची किंमत 16 लाख पौंड होती.
या सामन्याला अनेक स्टार आणि दिग्गजांची उपस्थिती होती. लेनॉक्स लुईस, इव्हँडर होलीफिल्ड, रॉय जोन्स ज्युनियर आणि आंद्रे वार्ड सारखे दिग्गज बॉक्सर्स टीव्हीच्या प्रसारणात सहभागी होते.
तर कोब्रा काई सारख्या नेटफ्लिक्सवरील शोचे स्टार रिंग जवळून सामना पाहत होते. त्यांच्याबरोबर एनबीएचे दिग्गज शाकील ओनील होते.
टायसन यापूर्वी बॉक्सिंग सामना केव्हा खेळला?
टायसनला हरवल्यानंतर आपण मेक्सिसन सुपरस्टार अल्वारेझला हरवू शकतो हा पॉलचा दावा हास्यास्पद वाटतो. माइक टायसन तीन दशकांहून अधिक काळापूर्वी बॉक्सिंग करिअरच्या शिखरावर होता.
आता टायसन वयाच्या साठीमध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला अल्वारेझनं अनेक जगज्जेतेपदं जिंकली आहेत.
टायसनसाठी हा सामना महत्त्वाचा होता. कारण या सामन्यातून मिळणारी प्रसिद्धी इतकी प्रचंड होती की त्यापासून दूर राहणं कठीण होतं. त्याचबरोबर या सामन्यासाठी टायसनला जे कोट्यवधी रुपये मिळणार होते तेही तितकेच महत्त्वाचे होते.

फोटो स्रोत, Getty Images
माइक टायसनचं आयुष्य त्यांच्या बॉक्सिंगप्रमाणेच प्रचंड वादळी ठरलं आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच माइक टायसननं वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशीप जिंकली होती. त्यानंतर त्याने असंख्य सामने जिंकले.
मात्र, 1992 मध्ये बलात्काराच्या एका प्रकरणात त्याला सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. त्यानंतर तीन वर्षांनी त्याला जामीन मिळाला होता.
अर्थात हा सामना खेळण्यामागचा टायसनचा हेतू काहीही असो, त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि इतर माजी जगज्जेत्यांना बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यापासून परावृत्त करण्यासाठी, त्यांची पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याची इच्छा संपली असेल अशी आशा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











