माइक टायसन: बलात्कारातील दोषी, ड्रग अॅडिक्ट, कानाचा चावा घेणारा आणि 2000 कोटी उधळणारा 'चॅम्पियन'

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

'मी 12 वर्षांचा होतो तेव्हा बालसुधारगृहातून माझ्या आईला फोन केला आणि इथं गांजा मिळत नाही म्हणून बोंबा मारू लागलो. माझ्या आईने शक्य तेवढं सारं काही केलं आणि मला गांजा पाठवला.'

सर्वांत तरुण हेवीवेट चॅंपियन अशी ओळख निर्माण झालेल्या माइक टायसनच्या आत्मचरित्रातील या ओळी आहेत. एका चोरीच्या गुन्ह्यात माइक टायसन बालसुधारगृहात होता. त्यावेळी त्याने आपल्या आईकडे ही मागणी केली होती.

नुकताच एक बातमी वाचली. ज्यात मालावी या देशाने असं म्हटलं की माइक टायसनला आमच्या देशाचा गांजाचा ब्रॅंड अँबेसिडर बनवण्याची आमची इच्छा आहे. त्यांना खरंच माइक टायसनपेक्षा कुणी एखादा चांगला सेलिब्रिटी या कामासाठी मिळणार नाही असं मला वाटतं.

अंमली पदार्थांच्या सेवनाबद्दल माइक टायसनने कधी लपवून ठेवले नाही. पण 12 वर्षांचा असताना एक मुलगा आपल्या आईला विनंती करत आहे की आई मला गांजा हवा आहे.

हा अनेकांसाठी सांस्कृतिक धक्का असू शकतो. पण माइक टायसन अमेरिकीतील ब्रुकलिन या उपनगरात वाढला आहे त्या ब्राउन्सविले भागात टीनएजर्सनी अंमली पदार्थांचे सेवन करणे ही गोष्ट सामान्य होती.

ज्यांना माइक टायसन या नावाची ओळख आहे त्यांना हे देखील ठाऊक असतं की माइक टायसनने वयाच्या 21 व्या वर्षी वर्ल्ड हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली आहे. म्हणजे अंमली पदार्थांते सेवन करणारा, छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा माइक टायसन अवघ्या 8-9 वर्षांत वर्ल्ड चॅम्पियन कसा बनला.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

विजय देवराकोंडा या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारसोबत टायसनचा 'लायगर' नावाचा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज (21 जुलै) प्रदर्शित झाला आहे. काही तासांत या ट्रेलरला मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. टायसनची या चित्रपटांत महत्त्वाची भूमिका असावी, असं ट्रेलर पाहून तरी वाटत आहे.

भारतीयांसाठी माइक टायसन हे नाव काही नवीन नाही. काही वर्षांपूर्वी अनुराग कश्यपचा बॉक्सिंगवर आधारित 'मुक्काबाज' हा चित्रपट आला होता. त्यात प्रमुख पात्र म्हणतो की हम युपी के माइक टायसन है.

म्हणजेच टायसन इतका तर प्रसिद्ध नक्कीच आहे की त्या खेळात ओळख निर्माण करू इच्छिणारे लोक त्याला आपला आदर्श मानतात.

आपल्या कारकीर्दीत पैसा आणि प्रसिद्धिचे सर्वोच्च शिखर गाठलेला माइक टायसन बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळला आणि तीन वर्षं तुरुंगात राहिला.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली आणि त्याने पुन्हा सारे वैभव मिळवले मग तो कर्जबाजारी झाला आणि पुन्हा त्याने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. माइक टायसनच्या आयुष्यातले हे अप्स अॅंड डाउन काही कमी होत नाहीत.

माइक टायसन हा भारतात तयार होणाऱ्या चित्रपटात काम करतोय पण त्याचे आयुष्यच एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी रंजक नाही. एखाद्या चांगल्या चित्रपटात प्रमुख पात्राच्या वाट्याला केवळ सुखच किंवा दुःख नसते तर त्याचे मिश्रण असते.

कधी तो परिस्थितीवर मात करतो तर कधी परिस्थिती त्याच्या वरचढ ठरते. मैत्री, विश्वासघात, प्रेम, प्रेमभंग अशा नाट्ये चित्रपटात दिसतात. अगदी चित्रपटाचा कथेला शोभेल अशाच चढ-उतारांनी माइक टायसनचे आयुष्य भरले आहे.

चोरी, दरोडे आणि मारामारी

माइक टायसन ब्राउन्सविले या कृष्णवर्णियांच्या वस्तीत राहत असे. खऱ्या वडिलांना आपण पाहिलेच नाही असं तो सांगतो. टायसन दोन वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्यांच्या कुटुंबीयांना सोडून गेले होते. माइक टायसनची आई लोरा टायसननेच माइक आणि इतर दोन मुलांचा सांभाळ केला.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2018 मध्ये माइक टायसन मुंबईत आला होता. तेव्हा त्याने महानगर पालिकेच्या शाळेला भेट दिली होती.

त्यांना देखील स्थिर नोकरी नव्हती. त्यामुळे नेहमीच त्यांना पैशाची अडचण भासत असे. अनेकदा त्याला उपाशी पोटी राहावं लागलं तर कित्येक वेळा तो बेघरांसाठी चर्चकडून लागत असलेल्या शिबिरात जाऊन जेवण घेऊन येत असे.

ते लोक विचारत की तुझ्या घरी किती लोक आहेत तेव्हा छोटा माइक त्यांना सांगत असे की 9 लोक आहेत. तितके जेवण घेऊन तो घरी येत असे.

आपलं झाल्यावर इतरांना तो देत असे आणि असं दाखवत असे की जणू की त्यानेच हे विकत आणलंय. पुढे मित्रांसोबत राहून तो चोऱ्या करायला लागला. काही जण बंदुकीच्या धाकावर देखील लुटपाट करत असत. त्या मुलांपैकी बहुतेकांना अंमली पदार्थांचे व्यसन असे.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

13 व्या वर्षापर्यंत तो अनेक वेळा बालसुधारगृहात जाऊन आला होता. त्या ठिकाणी तसेच बाहेर आल्यावर जी मुलं त्याला धाक दाखवत असत त्यांना विरोध करण्यासाठी त्याने स्वतःची एक वेगळी शैली आत्मसात केली होती.

त्याच्या या द्वाड स्वभावामुळे त्याला विशेष शाळेत टाकण्यात आले होते. या ठिकाणी मुलांना सुधारण्याचे काम केले जायचे. तिथे बॉब स्टिवर्ट नावाच्या समुपदेशकांशी त्याची ओळख झाली त्यांना बॉक्सिंगची आवड होती.

माइक टायसनने त्यांना सराव करताना पाहिले होते. आणि आपल्याला देखील बॉक्सिंग शिकवावी अशी विनंती त्याने केली.

जर कुणी आपल्यावर बळाचा वापर केला तर त्याविरोधात हे कामाला येईल असा विचार माइक टायसनने केला होता. त्यामुळेच तो बॉक्सिंगकडे वळला. टायसनला बॉक्सिंगमध्ये गती होती. त्याने पटकन अनेक गोष्टी आत्मसात केल्या. तेव्हा स्टिवर्ट यांना वाटलं की याला आपण जे काही शिकवू शकत होतो ते तर शिकवले आहे आता याला एखाद्या व्यावसायिक ट्रेनरची गरज आहे.

माइक टायसन आणि त्याला घडवणारे प्रशिक्षक

माइक टायसन आणि कस डीएमेटो यांची एकमेकांशी भेट झाली आणि दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. कस डीएमेटोने केवळ त्याला प्रशिक्षणच नाही तर पालकत्व देखील दिले. तो त्यांच्याकडे राहत असे. आणि माइक टायसनमुळे कस यांना पुन्हा एक चॅंपियन घडवण्याचे उद्दिष्ट मिळाले.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

कस डीएमेटो हे जिम आणि बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र चालवत असत. त्यांनी फ्लॉएड पॅटरसन आणि होजे टोरेस हे दोन चॅंपियन्स आधी दिले होते.

पॅटरसन निवृत्त झाल्यानंतर डीएमेटो यांच्याकडे शिष्याने काही चमकदार कामगिरी केलेली नव्हती. त्यामुळे ते असा एक मुलगा शोधत होते जो चॅंपियन बनू शकेल.

स्टिवर्टने माइक टायसनची आणि डीएमेटो यांची ओळख करून दिली. डीएमेटोंनी टायसनला रिंगमध्ये जाण्यास सांगितले. त्यांच्याच एका शिष्याबरोबर माइक टायसनची मॅच झाली. अवघे सहा मिनिट झाल्यानंतर कस यांनी टायसनचा खेळ थांबवला.

टायसनला वाटलं यांना आवडला नसेल आपला खेळ म्हणूनच थांबवला पण ते त्याला म्हणाले की तू एकेदिवशी चॅंपियन होणार आहेस. त्यानंतर त्यांनी स्टिवर्टजवळ टायसनची भरपूर स्तुती केली.

टायसन

फोटो स्रोत, Getty Images

टायसनला वाटले की हा माणूस नक्कीच आपला गैरफायदा घेणार. नाहीतर कोण कशाला कुणाची स्तुती फुकट करंल. पण तसं काही घडलं नाही याचं समाधान आहे असं टायसन आपल्या आत्मचरित्रात सांगतो.

माइक टायसन त्यांच्याकडे राहू लागला. शाळा आटोपल्यावर पुन्हा तो कस यांच्या घरी जात असे. तिथेच राहत असे. एकीकडे शाळा तर दुसरीकडे जिम, प्रशिक्षण असा टायसनचा दिनक्रम असे.

'म्हण मी नंबर वन आहे..'

कस हे अत्यंत कडक शिस्तीचे होते. दिवसभर काय करायचं काय नाही याबाबत ते फार काटेकोर होते पण विचारदेखील काय करायचा हे सुद्धा ते माइक टायसनला सांगायचे.

'मी जगातला नंबर एकचा खेळाडू होईल. मला हरवणे अशक्य आहे,' हे वाक्य कस माइककडून अक्षरशः घोकून घेत असत. जेव्हा एकट्यात असशील तेव्हा हेच वाक्य डोक्यात घोळायला हवं असं त्यांनी माइक टायसनला बजावून ठेवलं होतं.

माइक टायसन आणि रॉबिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माइक टायसन आणि पहिली पत्नी रॉबिन. नंतर तिच्यासोबत घटस्फोट झाला.

अलेक्झांडर, नेपोलियन अशा योद्धांच्या कथा देखील ते त्याला सांगत. रिंगमध्ये गेल्यावर प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करणे हेच एकमेव ध्येय असावे याचीच आठवण ते त्याला सातत्याने करून देत.

त्याच बरोबर नित्शे, टॉलस्टॉय, झेन यांचे तत्त्वज्ञान देखील ते माइक टायसनला सांगत.

आई गेली आणि माइक पुन्हा ब्राउन्सविलेमध्ये

बॉक्सिंग हा पूर्णपणे मन आणि बुद्धीचा खेळ आहे. ज्याचे मन नियंत्रणात राहील तोच रिंगमध्ये जिंकू शकतो असं ते त्याला सांगायचे. बॉक्सिंग हा केवळ खेळ नाही तर ते मनोरंजन देखील आहे.

दर्शक फक्त कोण हरतो कोण जिंकतो हेच पाहण्यासाठी पैसे खर्च करत नाहीत तर त्यांना मनोरंजन देखील हवे असते. त्यामुळे तुझा खेळ देखणा व्हावा, स्वतःची शैली विकसित करावी असं ते त्याला सांगत.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

त्यातून माइक टायसनचा खेळ आक्रमक बनला. चपळाई आणि शक्तीचा संगम करून त्याने स्वतःची शैली निर्माण केली. जेव्हा टायसन यशस्वी खेळाडू झाला तेव्हा, तो पॉइंट्सने न जिंकता जास्तीत जास्त स्पर्धा नॉक आउटने जिंकत असे. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडत असे.

माइक टायसनची प्रगती होत असतानाच त्याच्या आईची तब्येत ढासळू लागली. त्याच्या आईला कॅन्सर झाला होता. तो त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला. त्याच्या आईचे डोळे खोल गेले होते, त्वचा हाडांना चिकटलेली होती. ते पाहून टायसनला धक्का बसला.

त्यावेळी तो 16 वर्षांचा होता. त्याला हेच कळत नव्हतं की आता पुढे आईचं काय होणार आणि आपलं काय होणार. हे सर्व सुरू असतानाच त्याच्या आईचं निधन झालं.

त्याचं सर्व गोष्टीवरचं मनच उडून गेलं. कस डीएमेटोंचं घर सोडून तो पुन्हा ब्राउन्सविलेमध्ये आला. आपल्या मित्रांबरोबर राहू लागला. इतके दिवस तो चोऱ्यामाऱ्यांपासून दूर होता पण त्याकडे तो पुन्हा वळला.

'त्याच्यासोबत कदाचित मी पण मेलो असतो'

आईचे जाण्याने त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती ऐनकेन प्रकारे भरून काढण्याचा तो प्रयत्न करत होता. एकेदिवशी त्याने आपल्या मित्राला कस डीएमेटो आणि त्याच्या कुटुंबासोबतचे काही फोटो दाखवले.

त्या मित्राने टायसनला विचारले हे तर गोरे लोक दिसत आहेत. तुला ते तुझ्यासोबत ठेवतात म्हणजे तुझा वापर ते गुलामासारखा तर करुन घेत नाही ना.

तेव्हा टायसनने उत्तर दिले, "नाही, उलट ते तर मला पोटच्या पोरासारखं वागवतात. माझं बरंवाईट करायचं कुणाला वाटलं तर त्या माणसाला जिवंत सोडणार नाही." त्याचे हे बोलणं ऐकून त्याचा मित्र म्हणाला की "भावा, तू तिकडं परत जा. इथं राहू नकोस ही जागा तुझ्यासाठी नाही. उद्याचा विचार कर आणि पुन्हा इकडे फिरकू नको."

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

त्याचं बोलणं ऐकून माइक टायसन पुन्हा त्याच्या प्रशिक्षकाच्या घरी पोहचला.

काही दिवसांनंतर टायसनला कळलं की एका घरफोडीवेळी त्याच्या मित्रावर हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, त्याचा सल्ला आपण ऐकला नसता तर कदाचित त्याच्यासोबत आपल्याला देखील हे जग सोडावं लागलं असतं असं टायसनला वाटलं.

'तू चॅंपियन आहेस हे लक्षात ठेव'

टायसनने आपलं लक्ष्य पुन्हा खेळावर केंद्रित केलं. एकानंतर एक स्पर्धा तो जिंकू लागला. त्याला आधी ऑलिम्पिकमध्ये खेळावयाचं आणि मग त्याला व्यावसायिक बॉक्सिंगपटू बनवायचं असा त्याच्या प्रशिक्षकांचा विचार होता. पण टायसन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.

'जे लोक तुला कमी लेखतात त्यांची तर तुझ्याकडे बोट दाखवण्याची पण लायकी नाही. तू काही साध्य करू शकतोस या जगाला दाखवून दे तू चॅम्पियन आहेस,' असं त्याचे प्रशिक्षक त्याला नेहमी सांगत.

आणि तो खरंच हेवीवेट चॅम्पियन बनला. पण त्याचं हे यश पाहण्यासाठी कस डीएमेटो जिवंत राहिले नाहीत. 1985 मध्ये त्यांचं निमोनियाने निधन झालं. त्याच्या निधनाच्या दोन वर्षानंतर टायसन हेवीवेट चॅम्पियन बनला.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माइक टायसन आणि त्याची पत्नी किकी

एकीकडे माइक टायसनने त्याच्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर होता त्याच वेळी त्याच्या हायस्पीडने जाणाऱ्या करिअरला ब्रेक लागणारी गोष्ट घडली.

बलात्काराचा दोष सिद्ध आणि तुरुंगाची वारी

1991 मध्ये त्याच्यावर डेसिरी वॉशिंग्टन नावाच्या तरुणीवर माइक टायसनने बलात्कार केला होता. बलात्कारावेळी डेसिरीचं वय 18 वर्षं होतं. इंडियाना पोलीस भागातील हॉटेलमध्ये माइक टायसनने डेसिरीला बोलवलं.

डेसिरीने नुकतीच रोड आयलॅंड मिस ब्लॅक पिजंट ही सौंदर्यस्पर्धा जिंकली होती. आणि ती इंडियाना पोलीसमध्ये मिस ब्लॅक अमेरिका या स्पर्धेसाठी आली होती.

एका कार्यक्रमादरम्यान दोघांची ओळख झाली आणि टायसनबरोबर ती त्याच्या हॉटेलवर गेली होती. टायसनने त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. तो म्हणतो जे झालं ते परस्परसंमतीने घडलं. या आरोपानंतर अमेरिका आणि जगभरातील माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती. पण हे कोर्टात त्याचं म्हणणं टिकलं नाही आणि तो बलात्काराचा दोषी ठरला.

टायसन

फोटो स्रोत, Getty Images

निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले की इंडियाना पोलीसचे कायदे एकदम स्पष्ट आहेत आणि कायद्यामध्ये आरोपी व पीडित यांच्यात ओळख आहे की नाही याबाबतचा उल्लेख नाही.

माइक टायसनला 10 वर्षांची शिक्षा झाली. त्यापैकी चार वर्षांची शिक्षा माफ करण्यात आली. टायसन तीन वर्षं तुरुंगात राहिला. त्यानंतर तो पॅरोलवर बाहेर आला आणि परत या प्रकरणात तुरुंगात गेला नाही. दुसऱ्या प्रकरणात गेला.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

टायसनने या प्रकरणावर बरीच सफाई देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या आत्मचरित्रात तो म्हणतो की मी ना कुणावर रेप केला ना कुणावर रेप करण्याचा कधी प्रयत्न केला. व्यक्तिशः मला डेसिरीसोबत जे झालं त्याबद्दल दुःख वाटतं. पण तिला दुखावण्याचा माझा विचार नव्हता आणि तिला इजा होईल असं मी काही केलं देखील नाही. मला खात्री आहे की तिला हे माहीत आहे.

या घटनेमुळे जबर धक्का पोहोचल्याचे डेसिरी सांगते. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीमधून तिने वारंवार हेच सांगितलं, की माइक टायसनने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिने आत्मविश्वास गमावला आणि मनस्ताप सहन करावा लागला.

माइक टायसनची पहिली पत्नी रॉबिनने देखील त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. अनेक वेळा तो बेकायदा कृत्ये करण्यासाठी चर्चेत आला आहे.

इवांडर हॉलिफिल्डचा 'कान खाल्ला'

एखादा माणूस प्रचंड बडबड करत असेल तर तो कान खातो किंवा कान चावतो असा वाक्प्रचार आहे. पण माइक टायसनने हा वाक्प्रचार अक्षरशः जगला आहे. जून 1997 मध्ये इव्हांडर हॉलिफिल्ड आणि टायसन यांच्यात एक मोठा सामना झाला होता.

या सामन्यासाठी प्रायोजकांनी पाण्यासारखा पैसा ओतला आणि कमावला देखील. देशोधडीला फक्त सट्टेबाज लागले असतील. कारण या सामन्यात कुणी जिंकलं नाही, हरलं नाही, ड्रॉ देखील झाला नाही. पण हॉलिफिल्डच्या कानाचा चावा टायसनने घेतल्यानंतर हा सामना थांबवावा लागला होता.

टायसन

फोटो स्रोत, Getty Images

माइक टायसन तुरुंगातून परत आल्यानंतर त्याच्या मॅनेजरने ओळीने अनेक मॅचेस लावल्या. त्या मॅचेससाठी टीव्ही चॅनेल्स आणि प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. व्यावसायिकदृष्ट्या जरी टायसनला नफा होत असला तरी अनेक कारणांमुळे तो स्थिर नसायचा. तुरुंगवास, ड्रग्सचे सेवन, कौटुंबिक कलह इत्यादी गोष्टींचा तणाव त्याच्यावर दिसायचा.

होलिफिल्डविरोधातल्या मॅचमध्ये ते सर्व बाहेर निघालं. या सामन्याला कुणी बॉक्सिंगमधला काळा दिवस म्हटलं तर कुणी आणखी काय.

माइक टायसन आणि होलिफिल्डचा सामना सुरू होता तेव्हा टायसन नेहमीप्रमाणे सफाईने खेळत नव्हता. त्याचे ठोसे चुकत होते आणि होलिफिल्डचे बरोबर पडत होते.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

शेवटी टायसनने त्याच्या कानाचा चावा घेतला. होलिफिल्ड अक्षरशः उड्या मारू लागला. कुणालाच काही कळलं नाही काय घडलं. थोडा वेळ होलिफिल्डने विश्रांती घेतली आणि पुन्हा खेळ सुरू केला.

त्यानंतर मात्र होलिफिल्डला वेदना असह्य होऊ लागल्या आणि खेळ थांबवला गेला. तो चावा इतका तीव्र होता की होलिफिल्डच्या कानाचा एक इंचाचा तुकडा पडला. तो ऑपरेशन करुन जोडण्याचा प्रयत्न झाला पण तो जोडला गेला नाही.

माइक टायसन दिवाळखोर झाला

माइक टायसनने 2003 मध्ये दिवाळखोरी घोषित केली. त्यावेळी त्याच्यावर 38 मिलियन डॉलर्सचे कर्ज होते असं म्हटलं जातं. त्या आधी त्याने 300 मिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 2000 कोटी रुपये कमावून खर्च देखील केले होते.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

2000 कोटी रुपये कमावणे एक तर साधी गोष्ट नाही पण त्यानंतर ते खर्चून तो दिवाळखोर बनला. माइक टायसनच्या दिवाळखोरीवर इंटरनेटवर प्रचंड साहित्य सापडेल. तज्ज्ञ सांगतात की पैसा कसा खर्च करू नये याचं उत्तम उदाहरण माइट टायसन आहे.

दागिने, हिऱ्याच्या घड्याळी, फेरारी चालवत येत नसताना देखील विकत घेणं आणि चालवून अपघातामध्ये सापडणं, दोन घटस्फोट आणि त्यातून आलेला आर्थिक तणाव, वाघ पाळण्याची हौस, वेश्या आणि कोकेनची सवय या सर्व गोष्टी टायसनच्या आयुष्यात घडल्या.

त्यामुळे तो 2003 ला दिवाळखोर बनला आणि त्याच्यावर प्रचंड कर्ज देखील झाले. त्याची संपत्ती डोळ्यादेखत लिलावात विकली गेली.

पुन्हा कमबॅक

2003 ला दिवाळखोरी घोषित केल्यानंतर त्याने हळुहळू पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. पण आधी सारखी गंमत त्या कामात राहिली नाही. आधी तो फाइट करणार म्हटलं की प्रायोजक 30 मिलियन डॉलर्स घेऊन उभे असायचे पण आता प्रायोजकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

छोट्या मोठ्या फाइट्स त्याला मिळू लागल्या होत्या. त्यातून खर्च भागू लागला. पण ड्रग्सची सवय मात्र सुटता सुटत नव्हती. माइक टायसन 2007 मध्ये त्याला ड्रग्स बाळगण्याच्या गुन्ह्यात पुन्हा तुरुंगात जावे लागले. तसेच 360 तासांची समाजसेवा करण्याचे त्याला सांगण्यात आले होते.

2009 मध्ये तो 'हॅंगओव्हर' या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याने स्वतःचीच भूमिका निभावली आहे. हा रोल लोकांना इतका आवडला की त्याला टीव्ही शोज आणि चित्रपटांसाठी पुन्हा ऑफर येऊ लागल्या.

दोन पुस्तकांची रॉयल्टी, डॉक्युमेंटरीचे हक्क, मर्चंडाइज, पॉडकास्ट, युट्युब चॅनेल अशा वेगवेगळ्या गोष्टीतून त्याने पुन्हा पैसा कमवायला सुरुवात केली. कधी त्याचे प्रयत्न यशस्वी होतात तर कधी नाही.

पण त्याची लढाई विविध स्तरावर सुरुच राहते. कधी रिंगमध्ये, कधी रिंगबाहेर, कधी कायद्याशी, कधी त्याच्या एजंट्शी तर बहुतेकवेळा स्वतःशीच. पण माइक टायसन हा तरी माइक टायसनच राहतो.

माइक टायसन

फोटो स्रोत, Getty Images

माइक टायसनच्या फोटोकडे पाहिलं तर एक गोष्ट नेहमी लक्ष वेधून घेते. तो म्हणजे त्याचा टॅटू. आफ्रिकेतील मावरी जमातीचा तो टॅटू आहे आणि तो योद्ध्यांच्या चेहऱ्यावर काढला जातो.

'मी देखील एक योद्धा आहे. त्याची मला आणि इतरांना आठवण राहावी म्हणूनच तर मी हा टॅटू काढला आहे,' असं माइक टायसन त्या फोटोतून आपल्याला सांगतो असाच भास मला कधीकधी होतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)