वयासोबत बदलणाऱ्या आपल्या शरीराच्या गंधाचा अर्थ काय असतो? जाणून घ्या

    • Author, नवेलिया वॅले
    • Role, बीबीसी न्यूज

समजा तुम्हाला तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचं वय किती, हे सांगायचं असेल आणि ते ही त्याच्या शरीराच्या गंधावरून, तर ते जमेल का? तुम्हाला असं चॅलेंज मिळाल्यास तुमच्या वास ओळखण्याच्या क्षमतेचा वापर करून व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधणं शक्य आहे का?

हे विचित्र जरी वाटत असलं तरी शरीराच्या वासावरुन व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधता येतो. पण कसं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याबाबतच या लेखातून जाणून घेऊयात.

प्रत्येक माणसाच्या शरीराला एक विशिष्ट गंध असतो. काही लोकांच्या शरीराचा गंध अतिशय सौम्य असतो तर काहींना तीव्र वास असतो.

आता तुम्हाला शेजारी बसलेल्या व्यक्तीचं वय त्याच्या शरीरातील वासावरुन ओळखायचं असल्यास ते कसं करता येईल?

आपल्या शरीरातून येणारा गंध नेहमी एकसारखा राहत नाही, तर आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तो बदलत जातो.

या बदलातून आपल्या दैनंदिन सवयी आणि जीवनासोबतच सामाजिक- विकासात्मक प्रवृत्तींबाबतही माहिती मिळते.

हा बदल केवळ आपल्या दैनंदिन जीवनाविषयीच सांगत नाही, तर सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींबाबतचाही मागोवा घेत जातो.

लहान बाळांच्या शरीराचा वास काय सांगतो?

बालपणात आपल्या शरीराचा वास साधारणतः घामाच्या ग्रंथी कमी सक्रिय असल्यामुळे आणि त्वचेच्या मायक्रोबायोममुळे सौम्य असतो.

तरीदेखील, माता-पिता त्या गंधाला चांगल्या प्रकारे ओळखू शकतात, जो इतरांच्या मुलांच्या तुलनेत त्यांच्या स्वतःच्या मुलांमधून येतो.

हा वास माता-पित्यांच्या मनात सुखद आणि ओळखीचा भावनिक जिव्हाळा निर्माण करतो आणि बाळासोबत आनंद आणि प्रेमळ भावना जागृत करतो. तसेच पालकांमधील तणाव कमी करण्यास मदत करतो.

मात्र, पोस्टपार्टम (प्रसवोत्तर) डिप्रेशनमधून जाणाऱ्या मातांना त्यांच्या बाळांमधून येणाऱ्या या विशिष्ट वासाची ओळख पटवणं सहसा कठीण जातं.

व्यावहारिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास असं लक्षात येतं की, लहान मुलांच्या शरीराचा वास इतका प्रभावी असतो की तो माता-पित्यांना त्यांच्या भावी पिढीसाठी कष्ट करण्यास प्रेरित करतो.

तारुण्याचा टप्पा आणि त्यानुसार बदलणारा गंध

तारुण्यात पदार्पण करताना शरीरातील हार्मोन्समुळे बरेच बदल घडून येतात.

हार्मोन्समुळे शरीरात घाम निर्माण करणाऱ्या एक्राइन ग्रंथी आणि त्वचेतील महत्त्वाच्या सेबेशियस ग्रंथी सक्रिय होतात.

घाम निर्माण करणाऱ्या जास्तीत जास्त ग्रंथी पाणी आणि मीठ बाहेर टाकतात, तर एपोक्राइन ग्रंथी (काखेतील केसांशी संबंधित) प्रथिनं आणि इतर चरबीयुक्त तत्व घामाच्या रुपात बाहेर टाकतात.

यातील प्रत्येक ग्रंथी माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गंध निर्माण करतात.

आपल्या शरीरात असलेले लिपिड आणि सीबम यांसारखे घटक याच ग्रंथींमधून बाहेर पडतात.

मात्र, बॅक्टेरियांच्या संपर्कात आल्यानंतर आपला वास दुर्गंधात बदलतो. त्यामुळे काही तरुणांच्या शरीरातील घाम त्यांच्या नैसर्गिक गंधासोबत मिसळून दुर्गंध निर्माण करतो.

तारुण्य ही शारीरिक बदलांची प्रक्रिया आहे. पौगंडावस्थेला साधारणपणे वयात येणे असेही म्हटले जाते.

जसजशी मुलं मोठी होऊ लागतात तसं मुलांच्या शरीरातील गंध बदलू लागतो आणि मुलांचा पौगंडावस्थेतून तारुण्यात प्रवेश झाल्यानंतर गंधाद्वारे आपल्या मुलांना ओळखण्याची क्षमता आई-वडीलांमध्ये कमी होऊ लागते.

शरीरातील गंध बदल काय सांगतो?

किशोरवयात सिबेसियस ग्रंथींमधून होणारा स्राव अधिक असतो. मात्र, तारुण्यातून पुढील टप्प्यात प्रेवेश करताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील एक विशिष्ट दुर्गंध टिकून राहतो.

ही दुर्गंधी आहार, ताण, हार्मोन्स किंवा त्वचेतील मायक्रोबायोमसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण, आयुष्यभर बदलणाऱ्या गंधामुळे आपल्या शरीरातील बदल ओळखता येत नसेल तर त्याचा फायदा काय?

खरंतर माणसाच्या शरीरातील गंध त्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. विशेषतः अशा परिस्थितीत जिथे अंधार, गोंगाट किंवा अन्य कारणांमुळे एखाद्याला पाहणे किंवा ऐकणे कठीण असते.

इतर जीवांप्रमाणेच, माणसाच्या शरीराचा वास जोडीदार निवडण्यात, नातेसंबंध ओळखण्यात किंवा लैंगिक मतभेदांमध्ये मदत करतो.

वाढत्या वयाबरोबर शरीराची दुर्गंधी वाढते का?

वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेतील लवचिकता आणि कोलॅजनच्या कमतरतेमुळे घाम आणि सिबेसियस ग्रंथींची सक्रियता कमी होत जाते.

या कमतरतेमुळे वृद्ध व्यक्तींना शरीराचं तापमान कायम ठेवणं कठीण होत जातं.

सिबेसियस ग्रंथींच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, जसजसं वय वाढत जातं तसतसा या ग्रंथीतून स्त्राव कमी होत जातो. तसेच, त्यांच्या रचनेतही बदल घडून येतो. यामुळे अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स, जसं की व्हिटॅमिन ई किंवा स्क्वॅलिन, यांचं प्रमाण कमी होतं.

त्वचेतील अँटीऑक्सिडंट कमी झाल्यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया वाढते, ज्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या शरीरात विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण होतो. या वासाला जपानी भाषेत 'केरिशो' म्हणतात.

40 वर्षांनंतर त्वचेत काही फॅटी ऍसिड्स, जसे की ओमेगा 7 आणि पल्माइटोलिक ऍसिड, यांची कार्यप्रक्रिया बदलते, यामुळे शरीराचा गंधही बदलतो.

काहींसाठी हा गंध नकोसा वाटत असला तरी, बऱ्याच लोकांसाठी हा गंध आजी-आजोबा आणि आई-वडिलांच्या गोड आठवणींशी जुळलेला असतो. बालपणी जशी लहान मुलांची काळजी घेतली जाते, तसेच वृद्धापकाळातही काळजी घेताना विशिष्ट गंध उपयोगी ठरत असतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.