'नागरिकांना मारणं थांबवाल का?'; अलास्का शिखर परिषदेत पुतिन आणि ट्रम्प यांच्यात 3 तास नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Reuters
- Author, न्यूजरूम
- Role, बीबीसी रशियन सर्व्हिस
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 2021 नंतर पहिल्यांदा अलास्कामध्ये भेट झाली. 2019 नंतर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची ती पहिली भेट होती.
या भेटीतील मुख्य विषय युक्रेन युद्धावर शांततामय तोडगा काढणं हा होता. ट्रम्प यांनी धावपट्टीवर अंथरलेल्या रेड कार्पेटवर पुतिन यांचं स्वागत केलं. या दोन्ही राष्ट्राध्यक्षांमधील चर्चा 2 तास आणि 45 मिनिटं चालली.
पुतिन यांचं आगमन होण्याच्या काही वेळ आधीच ट्रम्प अँकोरेज या अलस्कातील शहरात पोहोचले. मात्र ते त्यांच्या विमानातच थांबले होते. मग आधी ट्रम्प आणि त्यानंतर पुतिन विमानाच्या पायऱ्या उतरले. ते दोघेही एकमेकांकडे गेले आणि त्यांनी हस्तांदोलन केलं.
अमेरिकेनं या भेटीला 'लिसनिंग एक्सरसाइज' असं म्हटलं. ट्रम्प म्हणाले की पहिल्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या लक्षात येईल की, पुतिन यांच्याबरोबरची चर्चा चांगली होईल की नाही.
जर ही शिखर परिषद यशस्वी झाली, तर रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची खासगी भेट आयोजित करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे.
पत्रकारांनी पुतिन यांना ओरडून विचारलं की, "राष्ट्राध्यक्ष पुतिन, तुम्ही शस्त्रसंधीला तयार व्हाल का?" तसंच ते "नागरिकांना मारणं थांबवतील का?" मात्र पुतिन यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत आणि ते ट्रम्प यांच्या कारमध्ये बसले.
या दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये सुरू झालेली बैठक स्थानिक वेळेनुसार 11:32 वाजता झाली. ही चर्चा 2 तास आणि 45 मिनिटं चालली.
या बैठकीचं स्वरुप 3x3 असं होतं. म्हणजेच या बैठकीत पुतिन यांच्याबरोबर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि परराष्ट्र धोरण सहाय्यक युरी उशाकोव्ह होते. तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांच्याबरोबर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ होते.
अलास्काला जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे पत्रकार ब्रेट बेयर यांना मुलाखत दिली. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की, पुतिन यांच्याबरोबरच्या भेटीतून त्यांच्या काय अपेक्षा आहेत.

फोटो स्रोत, Reuters
ट्रम्प म्हणाले की, ते युक्रेनसाठी वाटाघाटी करणार नाहीत किंवा करार करणार नाहीत. मात्र ते पुतिन यांच्याबरोबरच्या दुसऱ्या बैठकीसाठी पार्श्वभूमी तयार करू इच्छितात. त्या बैठकीला युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की उपस्थित राहणार आहेत.
"दुसरी बैठक अधिक महत्त्वाची असेल. युक्रेनसाठी वाटाघाटी करणं हे माझं काम नाही. मात्र त्यांना काय हवं आहे, याची मला कल्पना आहे," असं ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी, या वाटाघाटी अपयशी ठरतील आणि ते पुतिन यांना पुन्हा भेटणार नाहीत, याची शक्यताही ट्रम्प यांनी नाकारली नाही.
युक्रेन युद्धासंदर्भात अँकोरेजमध्ये पुतिन आणि ट्रम्प यांची जी भेट झाली, ते चित्र युक्रेन आणि त्यांची युरोपियन मित्रराष्ट्र युद्धाची सुरुवात झाल्यापासून टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं बीबीसी रशियन सेवेच्या प्रतिनिधी एलिझावेटा फोघ्त यांनी नमूद केलं.
अँकोरेजमध्ये पुतिन यांचं अमेरिकेच्या लष्करी तळावर रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आलं, ट्रम्प यांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्व हस्तांदोलन केलं, टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं आणि अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कारमधून अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर पुतिन यांना नेण्यात आलं. युक्रेनवरील वाटाघाटींआधीच या सर्व गोष्टी म्हणजे पुतिन यांच्यासाठी मोठं यश आहे.
येत्या काही तासांमध्ये तज्ज्ञ आणि पत्रकार, या पहिल्या भेटीतील प्रत्येक पैलूचं विश्लेषण करतील यात शंका नाही. मग त्यात दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या देहबोलीपासून ते त्यांच्यातील संक्षिप्त वाक्यांच्या देवाणघेवाणीपर्यंतच्या अनेक बाबी असतील.
मात्र या सुरुवातीच्याच दृश्यांमधून हे आधीच स्पष्ट झालं आहे की, ट्रम्प आणि पुतिन एकमेकांशी खूपच मैत्रीपूर्ण वागत आहेत.
बीबीसी रशियन सेवेनं अलास्का शिखर परिषदेचं रिअल टाइमवर वार्तांकन केलं. यात एलिझावेटा फोघ्त यांच्या वार्तांकनाचाही समावेश आहे.
त्यांनी खासगीत भेटण्यास नकार दिला
ही शिखर परिषद अलास्कातील अँकोरेजमधील अमेरिकेच्या एलमेंडॉर्फ-रिचर्डसन लष्करी तळावर झाली. अलास्कामधील हा अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे.
सुरुवातीला अशी अपेक्षा होती की, पत्रकारांचं स्वागत केल्यानंतर, पुतिन आणि ट्रम्प यांचीच फक्त एकमेकांशी चर्चा होईल. तिथे फक्त दुभाषी असतील.
मात्र बैठक सुरू होण्याच्या थोडाच वेळ आधी अमेरिकेनं जाहीर केलं की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफदेखील राष्ट्राध्यक्षांबरोबर सुरुवातीपासूनच या बैठकीला उपस्थित असतील.
त्यानंतर अशी घोषणा करण्यात आली की, या टप्प्याला पुतिन यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह आणि त्यांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह उपस्थित असतील.
मग एकत्रित भोजनावेळी शिष्टमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली.

फोटो स्रोत, EPA
रशियाच्या शिष्टमंडळात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सहकारी युरी उशाकोव्ह, परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह, संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह, अर्थमंत्री अँटोन सिलुआनोव्ह आणि पुतिन यांचे विशेष प्रतिनिधी किरिल दिमित्रीव्ह असणार होते.
मात्र शेवटी भोजन रद्द करण्यात आलं. ठराविक मुद्द्यांवर वाटाघाटी झाल्यानंतर, पुतिन आणि ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर निवेदनं दिली. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाहीत आणि वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत निघून गेले.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स हे या शिखर परिषदेत सहभागी होतील असं वृत्त रशियातील प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र ते अलास्काला अजिबात आले नाहीत.
दोन्ही बाजूंच्या अपेक्षा
या वाटाघाटी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या शिष्टमंडळांना 7 तासांहून कमी वेळ मिळणार होता.
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सांगितलं होतं की, पहिल्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या हे लक्षात येईल की ते आणि पुतिन यांच्यातील 'बैठक चांगली' होईल की नाही. जर अमेरिकेच्या अध्यक्षांना वाटलं की बैठक चांगली होणार नाही, तर ही बैठक 'खूप लवकर' संपेल.
ट्रम्प यांनी स्वत:देखील अंदाज लावला होता की, रशियाच्या अध्यक्षांबरोबरची चर्चा अयशस्वी होण्याची शक्यता 25 टक्के आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी असाही दावा केला होता की, जर अलास्कामधील बैठकीतून शांततेच्या दिशेनं वाटचाल झाली नाही, तर रशियाला 'खूप गंभीर स्वरुपाच्या आर्थिक परिणामांना' सामोर जावं लागेल.
अँकोरेजला जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर 3 उद्गारवाचक चिन्हांसह दोन शब्द पोस्ट केले होते. ते म्हणजे, "खूप काही पणाला लागलं आहे!!!"
"खरोखरच बरंच काही पणाला लागलं आहे," असं वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं. अलास्का शिखर परिषदेमुळे "प्रामाणिक शांततेसाठीचा खरा मार्ग आणि त्रिपक्षीय स्वरुपात नेत्यांमध्ये ठोस चर्चा होण्याची शक्यता निर्माण होईल," अशी आशा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Reuters
राष्ट्राध्यक्षांसाठीच्या विमानातून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्यांवर भाष्य केलं.
"पुतिन यांना वाटतं की यामुळे वाटाघाटींसाठी त्यांची बाजू मजबूत होते आणि मला वाटतं की ते त्यांना दुखावतं," असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याचं रॉयटर्सनं उद्धृत केलं आहे.
तर दुसऱ्या बाजूला रशियाकडून या शिखर परिषदेकडून असलेल्या अपेक्षांबद्दल फारसं बोललं गेलं नाही.
"आम्ही आधीपासूनच काही नियोजन करत नाही आहोत. आम्हाला माहीत आहे की यासंदर्भात आमचे काही युक्तिवाद आहेत, स्पष्ट आणि समजण्यायोग्य भूमिका आहे. आम्ही तेच मांडू," असं सेर्गेई लावरोव्ह म्हणाले.
"एक अतिशय महत्त्वाची बैठक. अर्थातच, संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बैठक. संवाद सुरू राहणं महत्त्वाचं आहे. ही चर्चा खूप सकारात्मक होईल अशी आम्हाला आशा आहे. रशियाबद्दल खूपच चुकीची माहिती पसरलेली आहे. रशियाची भूमिका थेट, स्पष्टपणे अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे," असं किरिल दिमित्रीव्ह म्हणाले.
उशाकोव्ह म्हणाले, "युक्रेनमधील संकट सोडवण्याव्यतिरिक्त" दोन्ही बाजू शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी "व्यापक गोष्टी तसंच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील सध्याच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील."
"युक्रेन युद्धाची मूळ कारणं दूर करणं", विशेषकरून युक्रेनचा समावेश नाटोमध्ये करण्यावर बंदी घालणं, ही रशियाची आतापर्यंतची भूमिका आहे.
लावरोव्ह यांच्या मते, "स्टीव्ह विटकॉफ (ट्रम्प यांचे विशेष दूत) यांच्या रशियातील भेटींच्या वेळेस आधीच बरंच काही करण्यात आलं आहे." स्टिव्ह विटकॉफ यांनी रशियाला पाचवेळा भेट दिल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून अलास्का शिखर परिषद झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपण्याच्या 2 दिवस आधी, ट्रम्प यांचे विशेष दूत 6 ऑगस्टला पुतिन यांना भेटले होते.
युक्रेनवर चर्चा तेही युक्रेनशिवाय?
डोनाल्ड ट्रम्प अलास्का शिखर परिषदेला एक 'चाचणी' म्हणतात. जर ती यशस्वी ठरली, तर युक्रेन युद्ध संपवण्यासाठी 'करार' करण्याबद्दल चर्चा करण्यासाठी पुतिन आणि झेलेन्स्की प्रत्यक्ष भेटतील.
व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिवानं शिखर परिषद म्हणजे 'ऐकण्याचा सराव' असल्याचं म्हटलं.
अर्थात, जरी या शिखर परिषेदत युक्रेनचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसला, तरी परिषदेतील मुख्य मुद्दा युक्रेन युद्धावर तोडगा काढणं हाच होता.
"अलास्का शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी एक पहिला निष्कर्ष काढता येतो. तो म्हणजे, राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी तयार केलेला आणि नंतर वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचलेला जुना फॉर्म्युला, की 'युक्रेनच्या उपस्थितीशिवाय युक्रेनबद्दल चर्चा नाही', हा बाजूला सारता येईल," असं बीबीसीचे प्रतिनिधी स्व्यातोस्लाव्ह खोमेन्को यांनी जोर देत सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट होण्यापूर्वी युक्रेनची बाजू ऐकली जावी यासाठी, झेलेन्स्की आणि त्यांच्या युरोपियन मित्रराष्ट्रांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी मंगळवार, 13 ऑगस्टला ट्रम्प यांच्याबरोबर ऑनलाइन शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं.
"युक्रेनमध्ये शांतता निर्माण होण्याबद्दल आशा आहे," असं या बैठकीच्या फलश्रुतीबद्दल भाष्य करताना म्हटलं होतं. तर ट्रम्प यांनी या ऑनलाइन शिखर परिषदेला 10 पैकी 10 गुण दिले होते.
ट्रम्प यांनी युरोपियन नेते आणि झेलेन्स्की यांना आश्वासन दिल्याचं वृत्त आहे. ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं आहे की पुतिन यांच्याबरोबर युक्रेनच्या भूप्रदेशाबाबत सूट देण्यावर चर्चा करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
मात्र अँकोरेजला जात असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की ते युक्रेनच्या भूप्रदेशावर या बैठकीत चर्चा करतील, मात्र त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे युक्रेनवर सोडलं जाईल.
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा आवेगी स्वभाव आणि सतत बदलती भूमिका लक्षात घेतल्यास त्यांच्याबाबत कोणीही कधीही खात्री बाळगू शकत नाही.
* रशियन अधिकाऱ्यांनी एलिझावेटा फोघ्त यांचं नाव 'परदेशी एजंटां'च्या यादीत समाविष्ट केलं आहे. बीबीसीनं या निर्णयाला स्पष्टपणे आक्षेप घेतला आहे आणि त्याला न्यायालयात आव्हान देत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











