You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळेला उशीर, 100 उठाबशांची शिक्षा आणि उपचारादरम्यान मृत्यू; वसईतील चिमुकलीबरोबर नेमकं काय घडलं?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वसईतील एका 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनं चर्चेला उधाण आलं आहे. शाळेत 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तब्येत बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
शाळेतील शिक्षिकेने शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.
शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीची तब्येत अचानक बिघडली होती.
शनिवारी (15 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या शिक्षेनंतरच मुलीची तब्येत बिघडली आणि त्यामुळंच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिची आई शीला गौड यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
मृत्यू झालेली मुलगी वसई पूर्वमधील सातीवलीच्या कुवरा पाडा परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होती.
या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.
8 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी काही विद्यार्थी शाळेत उशिरा आले होते. त्यात या विद्यार्थिनीचाही समावेश होता.
विद्यार्थी उशिरा आले म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यातील काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या.
त्यानंतर शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
त्यानंतर तिला दुसऱ्या एका रुग्णालयातही हलवण्यात आलं. मात्र, तिची प्रकृती आणखी खालावल्याने तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.
उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्री अकराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
पोलीस काय म्हणाले?
वसईतील वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "8 नोव्हेंबर रोजी या शाळेचे काही विद्यार्थी शाळेत उशिरा पोहचले. त्यामध्ये ही विद्यार्थिनीही होती. सगळे जवळपास 50 विद्यार्थी होते. शिक्षकांनी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढायला लावल्या, अशी मुलीच्या पालकांची तक्रार आहे."
"संबंधित विद्यार्थिनी घरी गेल्यावर तिचे पाय दुखत होते. तिला तिकडेच दवाखान्यात दाखल करण्यात आलं. यानंतर 10 तारखेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पालकांची तक्रार आहे की, उठाबशा काढायला लावल्यानेच मुलीचा मृत्यू झाला. आम्ही याबाबत शाळेची चौकशी करत आहोत," असं पोलिसांनी सांगितलं.
तूर्तास वालीव पोलिसांनी या प्रकरणी ADR (accidental death report) दाखल केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
तसंच वैद्यकीय रिपोर्टमध्ये विद्यार्थिनीचा हिमोग्लोबीन चार म्हणजेच अत्यंत कमी होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
चौकशीसाठी समिती स्थापन
पालघरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांच्याशी बीबीसी मराठीने या प्रकरणी संवाद साधला.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी शाळेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहिती दिली.
"विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा करणं चुकीचं आहे. हे शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे. मुलांना अशी शिक्षा करता येत नाही. पालकांचं म्हणणं आहे की, उठाबशा काढायला लावल्याने मृत्यू झालेला आहे. मृत्यूचं कारण मी स्पष्ट करू शकत नाही. परंतु शाळेची चौकशी आम्ही सुरू केली आहे," असं त्यांनी म्हटलं.
शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी शाळेवर कारवाई करणार असून शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवरही तात्काळ कारवाई करणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
प्राथमिक चौकशीत काय स्पष्ट झालं?
शिक्षण विभागाच्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, 8 नोव्हेंबर रोजी शाळेत उशिरा आल्याने काही विद्यार्थ्यांना उठा बशा काढण्याची शिक्षा या शाळेच्या शिक्षिकेने केली होती.
यातल्या एका मुलीला बुधवारी (12 नोव्हेंबर) पालकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी मुलीचा मृत्यू झाला.
मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे.
या शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला असून अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची बाजू मिळाल्यावर आम्ही ती इथे अपडेट करू.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)