You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फासेपारधी समाजातील योगेश पवार यांनी अर्थशास्त्र विषयात सेट पास कशी केली?
अमरावती जिल्ह्यातील शिवरा गावातील फासेपारधी बेड्यावर राहणारा योगेश पवार हा अर्थशास्त्र विषयात 'सेट' परीक्षा पास झाल्यानंतर चर्चेत आला. वस्तीतीलच नाही तर फासेपारधी समाजातील सेट पास करणारा हा पहिला तरुण असल्याने संपूर्ण समाजाला आनंद झाला आहे. 'जरी मला अपयश आलं, तरीही मी हार मानली नाही,' असं तो सांगतो. फासेपारधी समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. पण योगेशने पारंपरिक मार्ग नाकारत स्वतःचा आणि समाजाचा आत्मविश्वास वाढवला आहे.
योगेशच्या बालपणी घरात व्यसनाधीन वातावरण होतं, वडिलांचं शिक्षणही अपुरं आणि परिस्थितीमुळे तोसुद्धा चुकीच्या वाटेवर जाईल अशी भीती होती. अशा वेळी गावात आलेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे संचालक मतीन भोसले यांनी त्याचं आयुष्य पालटलं. भोसले यांनी रेल्वे स्टेशनवर, सिग्नलवर भटकणाऱ्या मुलांना आश्रमात आणून शिक्षणाची नवी दिशा दिली. योगेश सुरुवातीला शिक्षणापासून दूर होता, पण मतीन सरांच्या मार्गदर्शनाखाली तो दहावीमध्ये 85 टक्के गुण मिळवून टॉपर ठरला.
मतीन भोसले आणि हेमलकसाच्या डॉ. प्रकाश आमटे यांच्यामुळे योगेशने पुढे एम.ए. अर्थशास्त्र पूर्ण केलं आणि सेट परीक्षेत यश मिळवलं. योगेश सांगतो 'मतीन सरांनी मला स्वअभ्यास करण्यासाठी प्रेरीत केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मला विचारांची दिशा दिली. आता योगेश वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयात अध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. योगेश यांचा प्रवास समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायक ठरतोय.
- रिपोर्ट- नितेश राऊत
- शूट- शार्दुल गोळे
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)