एम. एस. शिंदे : 3 लाख फुटांच्या फुटेजमधून साडे तीन तासांचा 'शोले' घडवणारा मराठी एडिटर

फोटो स्रोत, Tarangan Youtube/Sippy Films
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
1976 सालचे फिल्मफेअर पुरस्कार. त्यावर्षी सर्वाधिक 10 नॉमिनेशन्स होती रमेश सिप्पींच्या शोले सिनेमाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (रमेश सिप्पी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (संजीव कुमार), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (अमजद खान) यासह सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट कथा या कॅटेगिरीमध्येही शोलेला नॉमिनेशन्स होते.
'शोले'नं यातले बहुतेक पुरस्कार मिळवले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा...त्यावर्षी शोलेला मिळाला होता केवळ एक फिल्मफेअर पुरस्कार. आता तुम्ही विचार कराल हा फिल्मफेअर संजीव कुमार, अमजद खान, सलिम-जावेद यांना मिळाला असेल तरीही तुम्ही चूक आहात.
'शोले'ला मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार होता-सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा. आणि तो एका मराठी व्यक्तीला मिळाला होता...ज्यांचं नाव होतं माधव शिंदे. जे एम. एस. शिंदे म्हणून ओळखले जायचे.

सीन- ठाकूरचे (संजीव कुमार) दोन्ही हात बांधले आहेत आणि गब्बर म्हणतो- ये हात मुझे दे ठाकूर...गब्बरच्या हातातल्या तलवारी खाली येतात आणि
कट टू
सीन – हवेच्या झोतानं ठाकूरच्या खांद्यावरची शाल उडून पडते आणि दिसतात ठाकूरचे कापले गेलेले हात.
दुसरा प्रसंग- गब्बर ठाकूरच्या कुटुंबाला मारतो. सगळ्यांना मारलं आहे, असं त्याला वाटत असतानाच घरातून लहान मुलगा धावत येतो. गब्बर हळूहळू त्याच्यासमोर येतो....मध्ये झोपाळा...गब्बर मुलाकडे पाहत बंदूक ताणतो, चाप ओढतो
कट टू
सीन- धुरात लपेटलेली रेल्वेची चाकं दिसतात आणि डब्यातून ठाकूर उतरतो.

'शोले'मधले हे दोन प्रसंग...थेट हिंसाचार न दाखवताही त्याचा परिणाम प्रेक्षकांवर ठसवणारे. आपल्याला ही कमाल कॅमेऱ्याची, दिग्दर्शकाची वाटत असली तरी ती कॅमेऱ्याइतकीच कात्रीचीही आहे...एडिटर किंवा संकलकाच्या कात्रीची.
प्रेक्षकांसाठी सिनेमातले कलाकार महत्त्वाचे असतात. त्यांना दिग्दर्शकाचं कौतुक वाटत. पण त्यापलीकडे जाऊन सिनेमाच्या तांत्रिक गोष्टींकडे ते फारसं लक्ष देत नाहीत. पण अनेक उत्तम दिग्दर्शक म्हणतात की, सिनेमा दोन टेबलवर घडतो...एक रायटिंग टेबलवर आणि दुसरा एडिटिंग टेबलवर...
शोले याचं उत्तम उदाहरण आहे. सलीम-जावेद यांच्या लेखणीतून शोले रायटिंग टेबलवर कसा घडला याचे अनेक किस्से आहेत. पण एडिटिंग टेबलवर काय झालं होतं?
असं म्हणतात की, रमेश सिप्पींनी जवळपास तीन लाख फूटांचं फुटेज शूट केलं होतं. ते 18 हजार फुटांवर आणण्याचं काम कौशल्याचं होतं आणि ते करणारे हात होते एम एस शिंदे यांचे.
प्रभात फिल्म कंपनीमधून सुरूवात
15 ऑगस्ट 2025 रोजी शोले सिनेमाला 50 वर्षं पूर्ण झाली. त्यावेळी अनेकांनी या सिनेमाच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला, शोले कसा घडला याचे किस्से पुन्हा आठवले गेले. हे आठवताना या जवळपास साडे तीन तासांच्या सिनेमाला आकार देणाऱ्या एम. एस. शिंदे यांचीही आठवण ठेवायला हवी.
एम. एस. शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरूवात प्रभात फिल्म कंपनीतून झाली. खरंतर ते त्यांच्या शिक्षणासाठी गावावरून त्यांच्या मामाकडे पुण्यात आले होते. पण त्यांच्या मामाच्या निधनानंतर त्यांना शिक्षण थांबवणे भाग पडलं आणि ते प्रभात फिल्म कंपनीत कामाला लागले. त्यावेळी त्यांचं वय तेरा-चौदा वर्षांचं होतं.
एकदा कंपनीच्या बागेत ते खेळत असताना व्ही. शांताराम तिथे फेरफटका मारायला आले होते. त्यांनी त्यांची चौकशी केली, काय करतोस विचारलं. त्यांनी म्हटलं की, काही खास नाही. तेव्हा ते म्हणाले की, हे असं चालणार नाही. काहीतरी टेक्निकल लाइन घे.
पण शिंदेंना टेक्निकल क्षेत्रातलं काहीच माहीत नव्हतं. त्यांनी व्ही. शांताराम यांनाच विचारलं की, काय करू. तेव्हा शांताराम बापूंनी त्यांना प्रभात कंपनीचे चीफ एडिटर ए. आर. शेख यांच्याकडे पाठवलं. तिथे त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केलं.

फोटो स्रोत, FTII
तारांगण या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या खास मुलाखतीत एम. एस शिंदे यांनी या आठवणी सांगितल्या.
प्रभात कंपनी बंद पडेपर्यंत शिंदे तिथे काम करत होते. प्रभात फिल्म कंपनी बंद पडल्यावर त्यांनी काही दिवस कामाशिवाय काढले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध पार्श्वगायक सुधीर फडकेंनी एका चित्रपटासाठी त्यांना बोलावलं.
ते 'वंशाचा दिवा' नावाच्या सिनेमाची निर्मिती करत होते. तो त्यांचा एडिटर म्हणून पहिला सिनेमा. सिनेमा पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी या सिनेमाचं एडिटिंग उत्तम झाल्याची पोचपावती दिली होती.
दोन मराठी चित्रपट केल्यानंतर एम. एस. शिंदे मुंबईला आले. खोचीकर नावाच्या निर्मात्याने त्यांनी कामासाठी विचारलं. हिंदी सिनेमात त्यांनी कामाला सुरूवात केली. काही चित्रपटांमध्ये सहायक म्हणून काम सुरू केलं.
सिप्पी फिल्मसोबत सुरूवात
सिप्पी फिल्म्संमध्ये जोशी नावाचे एडिटर होते, त्यांच्यासोबत शिंदेंनी कामाला सुरूवात केली.
पण त्यांची आणि रमेश सिप्पींची जोडी जमली ती 'अंदाज' या सिनेमापासून. 'अंदाज' रमेश सिप्पींचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, शिंदे हे सिप्पी फिल्म्समध्येच एडिटर म्हणून काम करायचे. 1971 साली रिलीज झालेल्या 'अंदाज' सिनेमापासून शिंदे आणि सिप्पी यांची जोडी जमली. त्यानंतर त्यांनी सीता और गीता, शोले, शान, शक्ती, सागरसारखे सिनेमे केले, पण 'शोले' त्यांच्यासाठी खास ठरला.

फोटो स्रोत, SHOLAY
रमेश सिप्पी 'शोले'साठी कलाकार, तंत्रज्ञांची जमवाजमव करत होते. शिंदे हे सिप्पी फिल्म्समध्येच कामाला असल्यामुळे शोलेचं एडिटिंग त्यांच्याकडेच येणार हे उघड होतं.
शिंदे प्रत्येकवेळी सिनेमाची स्क्रिप्ट ऐकायचेच असं नाही. पण शोलेची कथा त्यांनी ऐकली होती. ती ऐकल्यावर शिंदेंनी म्हटलं होतं की, हात नसलेला ठाकूर गब्बरला पायांनी मारतोय हे चालेल का?
'शोले'चा मूळ शेवट आणि ठाकूरचं ढसाढसा रडणं
ठाकूर गब्बरला खिळे लावलेल्या बुटांनी मारणार असतो, पण पोलिस त्यांना अडवतात आणि गब्बरला अटक करतात, असा 'शोले'चा शेवट आहे.
पण ठाकूर गब्बरला बुटांनीच मारतो असा सिनेमाचा मूळ शेवट होता. सेन्सॉरने या दृश्याला आक्षेप घेतला आणि ते काढावं लागलं.

फोटो स्रोत, PENGUIN
या मूळ शेवटाची एक आठवण शिंदेंनी सांगितली होती.
"ठाकूर गब्बरला मारतो, मग खडकावर बसतो आणि रडायला लागतो ओक्साबोक्शी असा सीन होता. पण सलीम-जावेद यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी मलाही विचारलं की, तुमचं काय मत आहे? मी म्हटलं की, मला रडायचा सीन असायला हवा वाटतो. त्यांनी विचारलं का? मी म्हटलं की, तो सीन इमोशनली चांगला वाटतोय. मी त्यांना 'व्हिवा जपाटा' (Viva Zapata) या सिनेमाचं. यामध्ये मार्लन ब्रँडोचा भाऊ मारला जातो. तो त्या वाळवंटात येतो. सुन्नपणे पाहतो आणि मग घोड्यावरून उतरून रडतो. ठाकूर रडतो, तो सीन पण असाच स्पर्शून जाणारा होता. पण सलीम-जावेद आणि रमेश सिप्पी यांच्यात आपसात ठरलं आणि तो रडण्याचा सीन काढला.
कितने आदमी थे...ऐंशी फुटांचं शूटिंग आणि दीड मिनिटाचा प्रसंग
'शोले'मधले अनेक ॲक्शन दृश्यं होती, पाठलागाचे, घोडेस्वारीचे प्रसंग होते. हे सर्व एकत्र घेऊन संकलन करणं हे खरंच किती अवघड काम असेल याची कल्पना येते.
पण स्वतः शिंदे यांना या दृश्यांपेक्षाही अवघड वाटलेलं दृश्य होतं गब्बरच्या अड्ड्यावरचं..
कितने आदमी थे या फेमस डायलॉगनंतर जो प्रसंग घडतो, तो त्यांना एडिटिंगच्या दृष्टीने आव्हानात्मक वाटल्याचं त्यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
या गब्बरच्या तीन साथीदारांना वाटतं की, गब्बरच्या गोळीपासून ते वाचले आहेत. गब्बर हसतो…कालिया आणि इतर दोघांना वातावरणातला तणाव निवळाल्यासारखं वाटतं, आधी हळूहळू आणि मग मोठ्याने ते हसायला लागतात. त्यानंतर सगळेच डाकू हसतात. त्या हसण्याच्या आवाजातच गब्बर गोळी चालवतो आणि मग शांतता.

फोटो स्रोत, SIPPY FILMS
एम. एस. शिंदे यांना या सीनबद्दल सांगितलं होतं की, या दृश्यातच एक ऑर्डर आहे सिक्वेन्सची. एक पहिल्यांदा एक हसतो, मग पुढचा थोडा, मग तिसरा. त्यांच्या हसण्याला लय आहे, जी वाढत जाते. त्याचा ऱ्हिदम, टेम्पो आणि परिणाम राहायला हवा. ती कटिंग तशीच व्हायला हवी होती.
हे ऐंशी फुटांचं शूटिंग कापून दीड मिनिटाच्या दृश्यात बसवल्याचं त्यांनी सांगितलं.
रेल्वेच्या 'त्या' सीनवर ॲक्शन कोऑर्डिनेटरची प्रतिक्रिया
'शोले'मध्ये रेल्वेचा एक सिक्वेन्स आहे. यामध्ये संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र आहेत. घोड्यावरून येणारे डाकू आहेत.
शोलेमधील ॲक्शन सिक्वेन्सेस हे ब्रिटीश स्टन्ट कोओर्डिनेटर जिम यांनी केले होते. शोलेच्या शूटिंगच्या दरम्यान ते लंडनला येऊन-जाऊन असायचे.
रेल्वेतला ॲक्शन सीन शूट केल्यावर त्यांनी शिंदे यांना म्हटलं होतं की, मी पाहतोच तू आता हा कसा कट करतोस ते. पण जेव्हा त्यांनी तो पाहिला तेव्हा म्हटलं की, तू खूपच भारी काम केलं आहेस.

फोटो स्रोत, SIPPY FILMS
ट्रेनचा सिक्वेन्स तीन-चार ठिकाणी घडतो. इंजिन ड्रायव्हरचं केबिन, मधला भाग, गार्डचं केबिन आणि बाहेरचे घोडे. सतत action शिफ्ट होताना दिसते. त्यामुळे हा सगळा सीन एडिट करणं कौशल्याचं काम होतं. शिंदे यांनी ते पार पाडलं होतं.
दिलीप ठाकूर यांनी सांगितलं की, शिंदेंनी सिप्पी फिल्म्स व्यतिरिक्त इतर ठिकाणीही काम केलं होतं. त्यांनी एम. एस. शिंदे म्हटलं की, शोले हेच समीकरण राहिलं.
त्यांनी जवळपास 100 सिनेमांचं एडिटिंग केलं. ब्रह्मचारी, सोहनी-महिवाल, रझिया सुलतान, चमत्कार या सिनेमांचंही एडिटिंग केलं. शाहरुख खानचा 'जमाना-दिवाना' हा त्यांचा एडिटर म्हणून शेवटचा सिनेमा.
160 स्क्वेअर फुटांच्या खोलीत अखेरचे दिवस
बॉलिवूडमध्ये 35 वर्षे काम करून, अनेक हिट सिनेमे करूनही त्यांचं वैयक्तिक आय़ुष्य मात्र हालाखीतच गेलं. ते आधी परेल इथे राहात होते. त्यांची राहती बिल्डिंग कोसळल्यानंतर त्यांना त्यांचे अखेरचे दिवस आजारपणात धारावीमध्ये 160 स्क्वेअर फुटांच्या खोलीत घालवावे लागले. त्यांची मुलगी अचला त्यांच्यासोबत राहात होत्या.
आजारपणातील उपचारासाठी फिल्म एडिटर्स असोसिएशन कडून अवघ्या पाच हजार रुपयांचा चेक मिळाल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
आजारपण आणि बॉलिवूडपासून तुटलेपण यातच 28 सप्टेंबर 2012 ला त्यांचं निधन झालं.
अलिगढ- शाहीदसारख्या सिनेमांचा लेखक अपूर्व असरानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एडिटर म्हणून केली होती. 'सत्या' सिनेमाचं एडिटिंग वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी केलं होतं.
त्यांनी एक आठवण सांगितली होती, 'सत्या'च्या एडिटिंगच्या आधी दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी त्यांना 'शोले' पाहायला सांगितला होता. कोणत्या क्षणी काय घडेल, कधी बंदुकीतून गोळी सुटेल याचा अंदाजही येऊ नये अशा पद्धतीने सिक्वेन्सेस एडिट करण्यासाठी 'शोले' पाहावा अशी राम गोपाल वर्माची इच्छा होती.
आपण एक भव्य सिनेमा करतोय याची शोलेच्या टीमला, शिंदेंना जाणीव होती. पण आपण इतिहास घडवतोय हे कदाचित त्यांनाही माहीत नव्हतं. त्यांनी जे घडवलं ते पुढच्या पिढ्यांसाठीही किती महत्त्वाचं होतं, हे अपूर्व असरानींच्या उदाहरणातून स्पष्ट होतंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











