अभिनेत्री दीपिका कक्कडला लिव्हर कॅन्सर; हा आजार कशामुळे होतो, लक्षणं काय?

दीपिका कक्कड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनुरीत भारद्वाज
    • Role, बीबीसीसाठी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडला स्टेज 2 मॅलिग्नंट लिव्हर ट्यूमरचं म्हणजेच लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. दीपिकाचे पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांनी ही माहिती दिली.

दीपिका कक्कडनेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या तब्येतीबाबतची माहिती दिली. यावेळी तिनं गेल्या काही आठवड्यांपासून ती ज्या कठीण प्रसंगातून गेली आहे, त्याबद्दल सांगितलं.

दीपिकाने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, "गेले काही आठवडे आमच्यासाठी खूप कठीण होते. पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना झाल्यामुळे रुग्णालयात जाणं, नंतर टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळणं आणि त्यानंतर स्टेज 2 कॅन्सर असल्याचं समजणं, हा आमच्यासाठी सर्वांत कठीण काळ होता."

"मी पूर्ण धैर्याने आणि सकारात्मकतेने याला सामोरे जाते आहे. इन्शाअल्लाह, आम्ही यातून बाहेर पडू. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. तुमचं प्रेम व प्रार्थना मला ताकद देत आहेत. दुआओं में याद रखना!"

दीपिका कक्कड ही भारतीय टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध आणि चर्चित चेहरा आहे. 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. ती जे. पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटातही दिसली होती. तिने 'बिग बॉस'चा सीझन 12 जिंकला होता.

दीपिकाला झालेला यकृताचा कॅन्सर काय आहे? त्याची लक्षणं काय आहेत आणि तो किती धोकादायक असतो? समजून घेऊयात.

लिव्हर कॅन्सर काय असतो?

लिव्हर म्हणजे यकृत हा मानवी शरीरातील सर्वांत गुंतागुंतीचा अवयव आहे. यकृत 500 पेक्षा जास्त शारीरिक क्रियांसाठी जबाबदार असतं. यकृताच्या कार्यांमध्ये चरबी आणि प्रथिनांचं पचन, विषारी घटकांचं निर्मूलन, पित्त तयार करणं आणि रक्ताचा दाटपणा नियंत्रित करणं यांचा समावेश होतो.

कॅन्सरमुळे लिव्हरच्या या कार्यात अडथळा येतो.

प्राथमिक किंवा प्रायमरी लिव्हर कॅन्सर हा धोकादायक ट्यूमर आहे. तो यकृतातच तयार होतो. ऑस्ट्रेलिया कॅन्सर कौन्सिलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक लिव्हर कॅन्सरचे काही प्रकार आहेत.

लिव्हर

फोटो स्रोत, Getty Images

प्राथमिक लिव्हर कॅन्सरचे प्रकार:

  • हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) किंवा हेपेटोमा : हा प्राथमिक लिव्हर कॅन्सरचा सर्वाधिक निदान होणारा प्रकार आहे. तो यकृताच्या मुख्य पेशींमध्ये (हेपॅटोसायट्स) सुरू होतो.
  • कोलांजिओकार्सिनोमा किंवा पित्त वाहिनीचा कॅन्सर : पित्त वाहिन्यांच्या (ज्या यकृताला आतडे आणि पित्ताशयाशी जोडतात) पेशींमधून सुरू होतो.
  • एंजिओसारकोमा: लिव्हर कॅन्सरचा हा प्रकार रक्त वाहिन्यांमध्ये होतो. तो लिव्हर कॅन्सरचा एक दुर्मिळ प्रकार आहे. तो मुख्यत्वे 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये होतो. हा रक्तवाहिन्यांमधील एक दुर्मिळ प्रकार.

सेकंडरी लिव्हर कॅन्सर: शरीराच्या इतर भागांमधून सुरुवात होते आणि त्यानंतर यकृतापर्यंत पसरतो.

ऑस्ट्रेलिया कॅन्सर कौन्सिलच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये 3 हजार 208 लोकांना सेकंडरी लिव्हर कॅन्सरचे निदान झालं होतं आणि त्यांचं सरासरी वय हे 69 वर्ष होतं.

लिव्हर कॅन्सरची लक्षणं

साधारणपणे लिव्हर कॅन्सरची लक्षणं अस्पष्ट असतात. कॅन्सर पुढच्या (अॅडव्हान्स्ड) टप्प्यावर पोहोचेपर्यंत ही लक्षणं नेमकी दिसून येत नाहीत.

लिव्हर कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार खाली नमूद केलेली लक्षणं लिव्हर कॅन्सरची असू शकतात.

लक्षणे:

  • बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला कडक गाठ
  • पोटाच्या वरच्या बाजूला वेदना
  • पोटामध्ये सूज
  • डाव्या खांद्याच्या मागे वेदना
  • पिवळसर त्वचा (त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसणे)
  • लगेचच दुखापत होणे किंवा रक्तस्राव
  • थकवा, उलटी
  • भूक न लागणे किंवा थोडंसं खाल्लं तरी पोट भरलेलं वाटणे
  • कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे
  • फिकट किंवा रंगहीन मल, गडद रंगाचे मूत्र
  • ताप

लिव्हर कॅन्सरची कारणं

कॅन्सर कौन्सिलच्या वेबसाइटनुसार, हेपेटायटिस बी किंवा सीच्या विषाणूंचा दीर्घकालीन संसर्ग लिव्हर कॅन्सरचे कारण ठरू शकतात.

या कारणांमुळे वाढू शकतो लिव्हर कॅन्सरचा धोका

फॅटी लिव्हर किंवा आनुवंशिक आजार- ज्यामध्ये हेमोक्रोमॅटोसिस किंवा अल्फा 1- अँटीट्रिप्सिनची कमतरता यांचा समावेश आहे.

  • हेपेटायटीस बी किंवा सीचा दीर्घकालीन संसर्ग
  • टाइप टू डायबिटीस
  • मद्यपान
  • धूम्रपान
  • लठ्ठपणा
  • विषारी रसायनांचा संपर्क

लिव्हर कॅन्सरपासून बचाव कसा करावा?

कॅन्सर टाळण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे, ज्या कॅन्सर होण्यापासून वाचवतात. कोणतीही गोष्ट कॅन्सरची शक्यता वाढवते तिला 'रिस्क फॅक्टर' म्हणतात. जी गोष्ट कॅन्सरची शक्यता कमी करते तिला 'कॅन्सर प्रोटेक्टिव्ह फॅक्टर' म्हणतात.

कॅन्सर टाळण्यासाठी धोका वाढवणाऱ्या घटकांपासून दूर राहणे आणि कर्करोग प्रतिबंधक घटक वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लिव्हर कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

कॅन्सरपासून बचावासाठी या मार्गांचा अवलंब करता येऊ शकतो-

हेपेटायटिस बी पासून संरक्षणासाठी लस घेणे- नवजात बाळांना ही लस दिल्यास त्यांच्यात यकृताच्या कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, प्रौढांमध्ये लसीकरणामुळे धोका कमी होतो की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही.

जुनाट (क्रोनिक) हेपेटायटिस बीच्या संसर्गावर इलाज करणं- क्रोनिक हेपेटायटिस बी संसर्ग असलेल्या लोकांसाठी उपलब्ध पर्यायांमध्ये इंटरफेरॉन आणि न्यूक्लिओस (टी)आयडी अ‍ॅनालॉग थेरपी यांचा समावेश होतो. या उपचारांमुळे यकृताच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

एफ्लाटॉक्सिन बी 1 कमी करणं - एफ्लाटॉक्सिन बी1 चं जास्त प्रमाण असलेल्या अन्नपदार्थांऐवजी कमी एफ्लाटॉक्सिन बी1 असलेले अन्नपदार्थ सेवन केल्यास कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

लिव्हर कॅन्सरवरील उपचार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार यकृताचा कॅन्सर झालेल्या लोकांसाठी अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. काही उपचार हे सध्या प्रचलित आहेत, तर काही उपचारांची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

1. मॉनिटरिंग

तपासणीदरम्यान आढळलेल्या एका सेंटीमीटरपेक्षा लहान जखमांची नियमितपणे देखरेख केली जाते. दर 3 महिन्यांनी फॉलोअप आवश्यक असतो. या काळात कोणताही उपचार केला जात नाही, फक्त रुग्णांच्या परिस्थितीत काही बदल झाला आहे का, म्हणजेच तब्येतीत काही चढ-उतार आहेत का हे पाहिले जाते. बदल दिसले तरच उपचार सुरू केले जातात.

2. शस्त्रक्रिया

आंशिक शस्त्रक्रियेमध्ये, लिव्हरच्या ज्या भागात कॅन्सर आढळतो, तेवढाच भाग काढून टाकला जातो. कारण लिव्हर शरीराचा असा अवयव आहे, जो पुन्हा वाढू शकतो आणि आपलं कार्य सुरू ठेवू शकतो.

3. लिव्हर ट्रान्सप्लान्ट

यकृत प्रत्यारोपणामध्ये संपूर्ण लिव्हर काढून टाकले जाते आणि दान केलेलं निरोगी लिव्हर शरीरात बसवले जाते. जेव्हा कॅन्सर फक्त यकृतापुरता मर्यादित असतो, तेव्हाच हे शक्य असते. शिवाय दुसऱ्या व्यक्तीचे लिव्हर मिळवणेही सोपे नसते.

4. एब्लेशन थेरपी

एब्लेशन थेरपीमध्ये कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकला जातो किंवा नष्ट केला जातो. लिव्हर कॅन्सरसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एब्लेशन थेरपींचा उपयोग केला जातो.

5. एम्बोलिजेशन थेरपी

ही थेरपी अशा रुग्णांसाठी वापरली जाते जे काही कारणांमुळे ट्युमरसाठीची शस्त्रक्रिया किंवा एब्लेशन थेरपी करू शकत नाहीत आणि ज्यांचा ट्युमर लिव्हरच्या बाहेर पसरलेला नाही. या थेरपीमध्ये ट्युमरकडे जाणारा रक्तप्रवाह थांबवणे किंवा कमी करण्याचा समावेश असतो. जेव्हा ट्युमरला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत, तेव्हा त्याची वाढण्याची क्षमता कमी होते.

लिव्हर

फोटो स्रोत, Getty Images

6. टार्गेटेड थेरपी

टार्गेटेड थेरपी हा उपचाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये विशिष्ट कॅन्सर पेशींना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी औषधे किंवा इतर पदार्थांचा वापर केला जातो."

7. इम्यूनोथेरपी

इम्यूनोथेरपी हा एक असा उपचार आहे ज्यामध्ये कॅन्सरशी लढण्यासाठी व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या पदार्थांचा वापर केला जातो.

8. रेडिएशन थेरपी

"रेडिएशन थेरपीत शरीरातील कॅन्सरग्रस्त भागावर उच्च ऊर्जा असलेल्या किरणांचा उत्सर्ग केला जातो. ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते. मात्र, लिव्हर कॅन्सरवरील उपचार किती यशस्वी होईल हे मुख्यतः कॅन्सर कोणत्या टप्प्यावर आहे आणि तो शरीरातील कोणकोणत्या अवयवांपर्यंत पसरलेला आहे यावर अवलंबून असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)