लेप्टोस्पायरोसिस : भगवंत मान यांना झालेला हा आजार नेमका काय आहे? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) उपचार करण्यात आले. भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस (leptospirosis) झाल्याचं निदान झालं. प्राणी, माती आणि दूषित पाण्याद्वारे हा आजार होतो.

भगवंत मान यांना झालेल्या या आजाराची सध्या चर्चा आहे.

लेप्टोस्पायरोसिस हा आजार कशामुळं होतो, त्याची लक्षणं कोणती आणि तो टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे हे सविस्तर जाणून घेऊया.

संक्रमित प्राणी, माती आणि पाण्याद्वारे प्रामुख्यानं या आजाराचा संसर्ग होतो.

हा आजार ज्या विषाणूमुळं होतो ते विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लघवीत आढळतात. उंदीर, गाय, डुक्कर आणि कुत्रे यासारख्या प्राण्यांमध्ये हा संसर्ग आढळून येतो.

संसर्ग झालेल्या प्राण्याच्या लघवीमुळे माती किंवा पाणी दूषित होतं आणि त्यातून या आजाराचे विषाणू तोंड, डोळे किंवा शरीरावरील जखमा याद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात.

त्याशिवाय संसर्ग झालेल्या प्राण्याचं मांस किंवा रक्त याच्याशी संपर्क आल्यास किंवा त्याच्या सान्निध्यात आल्यावरही हा आजार होऊ शकतो.

मात्र, पाळीव प्राण्यांमुळं लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता दुर्मिळ असते.

दरम्यान, भगवंत मान यांची प्रकृती सध्या सध्या स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत आहे. रविवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला.

लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?

यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) वेबसाईटनुसार लेप्टोस्पायरोसिस हा आजार लेप्टोस्पायरा (Leptospira) या विषाणूमुळं होतो. याचा संसर्ग माणसांमध्ये आणि विविध प्राण्यांमध्ये होऊ शकतो.

लेप्टोस्पायरोसिसवर जर उपचार झाले नाही, तर त्यामुळं रुग्णाचं मूत्रपिंडाची (kidney)हानी होऊ शकते.

याशिवाय पाठीच्या कण्यात किंवा मणक्यांमध्ये सूज, मेंदूचं संरक्षण करणाऱ्या आवरणाला इन्फ्लेमेशन होणं (meningitis), यकृताची हानी आणि श्वास घेण्यात अडचण येणं यासारख्या गोष्टींमुळं रुग्णाचा मृत्यू देखिल होऊ शकतो.

दरवर्षी जगभरात लेप्टोस्पायरोसिसचे जवळपास 10 लाख रुग्ण आढळतात आणि साधारण 60 हजार रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू होतो.

माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये देखील या आजाराचा संसर्ग होतो. दूषित लघवी किंवा शरीरातील द्रव्ये, दूषित माती आणि पाणी यामुळे प्राण्यांना याचा संसर्ग होतो.

हा रोग संसर्ग झालेले प्राणी, माती आणि पाण्यातून पसरतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हा रोग संसर्ग झालेले प्राणी, माती आणि पाण्यातून पसरतो.
ग्राफिक्स
ग्राफिक्स

प्राण्यांमध्ये या आजाराची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. तर काही प्राण्यांमध्ये या आजाराचा संसर्ग झाल्यानंतरही अजिबात लक्षणं दिसत नाहीत.

संसर्ग झालेल्या प्राण्याच्या लघवीमुळं दूषित झालेलं पाणी, पावसाळ्यात रस्ते आणि विहिरींद्वारे माणसाच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असतो.

डॉ. रवी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्समध्ये व्हायरोलॉजीचे प्राध्यापक आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "लेप्टोस्पायरोसिसचा विषाणू उंदरांमध्ये आढळतो. पुराच्या पाण्यात अनेकदा उंदरांचा मृत्यू होतो. त्यानंतर त्या पाण्याद्वारे या आजाराचा संसर्ग माणसापर्यंत पोहोचतो. प्राणी आणि माणसांना विषाणूमुळे होणारा हा आजार आहे."

गुजरातच्या आरोग्य विभागानुसार, गाई, गुरंढोरं, शेळ्या यांची साफसफाई करताना आणि विशेषकरून त्यांच्या मलमूत्राद्वारे या आजाराचा माणसांना संसर्ग होतो. याशिवाय डोळे, नाक आणि तोंडाद्वारे या आजाराचा संसर्ग मानवी शरिरात होतो.

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)या ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या वेबसाईट नुसार बहुतांश लोकांमध्ये एकतर या आजाराची अजिबात लक्षणं दिसत नाहीत किंवा किरकोळ ताप आल्यासारखा दिसतो. तर काही लोकं गंभीर आजारी पडू शकतात.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, European Centre for Disease Prevention and Control

लेप्टोस्पायरोसिसमध्ये साधारणपणे पुढील लक्षणं दिसतात.

  • खूप जास्त ताप
  • डोकेदुखी
  • मांडीचे दुखणे
  • पोटदुखी
  • आजारी वाटणे
  • डायरिया किंवा अतिसार
  • डोळ्याच्या पांढऱ्या भागात लालसरपणा येणे
  • त्वचा पिवळी पडणं किंवा डोळ्यारा पांढरा भाग पिवळा पडणं (काळ्या, सावळ्या रंगाच्या त्वचेमध्ये ही लक्षणं लक्षात येणं अवघड असतं) (कावीळ)
  • भूक न लागणे
  • दु:खी किंवा निराश वाटणे
  • लघवीच्या मार्गात अडथळा येणे
  • पायाचा घोटा, गुडघा, हाताचं कोपर यासारख्या सांध्यांमध्ये सूज येणे
  • छातीत दुखणे
  • दम लागणे

जर ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

लेप्टोस्पायरोसिसचा आजार आणि उपचार

लेप्टोस्पायरोसिसची वाढ आणि त्यावरील उपचार

यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)नुसार यातील बहुतांश लक्षणं दुसऱ्या आजाराची असू शकतात.

लेप्टोस्पायरोसिसच्या विषाणूची लागण झाल्यानंतर या आजारात वाढ होण्यासाठी सर्वसाधारणपणे 2-30 दिवसांचा कालावधी लागतो. या आजाराची वाढ दोन टप्प्यात होते.

पहिल्या टप्प्यात रुग्णाला ताप येणं, थंडी वाजणं, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या होणं किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवतात. रुग्णाला काही काळ बरं वाटू शकतं, मात्र तो पुन्हा आजारी पडतो.

लेप्टोस्पायरोसिस बॅक्टेरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लेप्टोस्पायरोसिस बॅक्टेरिया

तर काही जणांच्या बाबतीत या आजाराचा दुसरा टप्पा अधिक घातक ठरू शकतो. या टप्प्यात मूत्रपिंड आणि यकृत निकामी होऊ शकतं किंवा मेनिंजायटीसची समस्या उद्भव शकते.

या आजारावर उपचार शक्य आहेत. उपचार करताना अँटिबायोटिक्स दिले जाऊ शकतात. बहुतांश रुग्ण यातून काही दिवसांत किंवा काही आठवड्यात बरे होतात.

ओषधोपचारामुळं बरं वाटू लागलं तरी रुग्णानं अँटिबायोटिक्सचा कोर्स पूर्ण केला पाहिजे.

जर लक्षणं गंभीर स्वरुपाची असतील तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचीही गरज भासू शकते.

आजारापासून बचाव कसा कराल?

पाण्यात खेळण्यामुळं किंवा तुमचा प्राण्यांशी संपर्क येत असेल किंवा तुम्ही मांसाच्या व्यवसायात असाल तर हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

पावसाच्या किंवा पुराच्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू आढळतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पावसाच्या किंवा पुराच्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू आढळतात

ब्रिटनच्या एनएचएसनुसार, लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पुढील गोष्टींची खबरदारी घेता येऊ शकते -

  • प्राण्यांशी आणि प्राणीजन्य उत्पादनांशी संपर्क आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा.
  • जखमा शक्य तितक्या स्वच्छ करा
  • जखमा किंवा शरीराला कुठे कापलेलं असल्यास ते पाण्यापासून दूर ठेवा
  • कामाच्या निमित्ताने पाणी किंवा ससंर्गजन्य गोष्टींशी संबंध येत असेल तर त्यापासून बचाव करणारे कपडे वापरा.
  • दूषित पाण्याच्या संपर्कात आलो आहोत असं तुम्हाला वाटलं तर लगेचच आंघोळ करा
  • पाळीव कुत्र्याला लेप्टोस्पायरोसिसची लस दिली असल्याची खातरजमा करून घ्या.
  • माणसांसाठी या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही
  • ज्या पाणी किंवा मातीमध्ये प्राण्यांची लघवी मिसळलेली असेल अशा पाण्याशी संपर्क टाळा
  • उघड्या हातांनी मृत प्राण्यांना स्पर्श करू नका
  • नद्या, कालवे किंवा तलावातील पाणी पिऊ नका. पाणी पिण्यापूर्वी ते उकळून घ्या किंवा त्याचे निर्जंतुकीकरण करून घ्या

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.