माणसाचं मांस खाणारा बॅक्टेरिया पुराच्या पाण्यामुळे मुलाच्या शरीरात? पण जखम नसताना बॅक्टेरिया शरीरात गेला कसा?

माणसाचं मांस खाणारा बॅक्टेरिया पुराच्या पाण्यामुळे मुलाच्या शरीरात? पण जखम नसताना बॅक्टेरिया शरीरात गेला कसा?

फोटो स्रोत, UGC

    • Author, गारिकपती उमाकांत
    • Role, बीबीसी तेलगूसाठी

नोट : या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या बेजवाडा परिसरात मोठा पूर आला होता. या परिसरात राहणारे लोक अजूनही या पुराच्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत.

हजारो घरं आणि शेकडो वस्त्यांना बुडवणारं पुराचं पाणी आता ओसरू लागलं आणि पण अजूनही पुरामुळे साचलेला चिखल तसाच आहे.

दिवसा ऊन पडत असलं तरी रात्रीच्या वेळी पुन्हा पाऊस होतो आणि काहीकेल्या इथला चिखल कमी होत नाहीये. यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे.

या अस्वच्छतेमुळे या भागात रोगराई पसरली असून, लोकांना वेगवेगळ्या रोगांची लागण झाली आहे. बेजवाडा शहर आणि परिसरात ताप आणि संसर्गाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पुराच्या पाण्यामुळे या मुलाला पाय गमवावा लागला का?

या महिन्याच्या सुरुवातीला विजयवाडा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे एनटीआर जिल्ह्यातल्या जग्गैयापेट हे शहर पूर्णपणे बुडालं होतं.

मांस खाणाऱ्या एका जिवाणूने जगैयापेटमध्ये राहणाऱ्या एका 12वर्षीय मुलाचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. शरीराला कुठलीही जखम नसताना हा बॅक्टेरिया या मुलाच्या शरीरात कसा गेला? याचे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटत आहे.

या मुलाच्या शरीरात E.coli आणि Klebsiella चे जंतू शिरल्याचे आढळून आले.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, या मुलाच्या शरीरात E.coli आणि Klebsiella चे जंतू शिरल्याचे आढळून आले.

सातवीत शिकणाऱ्या भवदीपच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं. हे पाणी ओसरेपर्यंत भवदीप त्याच्या कुटुंबियांसोबत घरातच थांबला होता. घरातील वस्तू भिजू नयेत यासाठी तो त्याच्या आई-वडिलांना मदत करत होता.

या मुलाचे वडील नागराजू यांनी बीबीसीला सांगितलं की, "पूर ओसरल्यानंतर माझ्या मुलाला ताप आणि सर्दी झाली. त्यामुळे मी इथल्या स्थानिक दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी व्हायरल असू शकतं हे सांगितलं आणि त्याला काही अँटिबायोटिक्स आणि इंजेक्शन दिलं. पण त्याची तब्येत सुधारली नाही म्हणून आम्ही काही तपासण्या केल्या तर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं कळलं. पण अचानक त्याच्या दोन्ही पायांच्या जांघेपासून तळव्यापर्यंत सूज आली. माझ्या मुलाची लघवी थांबली, त्यामुळे मग मी त्याला घेऊन सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये गेलो."

वडील नागराजू
फोटो कॅप्शन, वडील नागराजू म्हणाले की, त्यांच्या मुलाला पुरापूर्वी कोणतीही समस्या नव्हती

तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर भवदीपला विजयवाडाच्या अंकुर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

तिथे त्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, भवदीपला 'नेक्रोटायझिंग फॅसिटायटिस' या दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे.

मांस खाणारा जीवाणू

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नेक्रोटायझिंग फॅसिटायटिस या आजराचं दुसरं नाव 'मांस खाणारा आजार' असं आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की ज्या जीवाणूमुळे हा आजार झाला आहे, त्या जीवाणूने भवदीपच्या शरीरात प्रवेश करून त्याचे स्नायू खाल्ले.

या आजाराचं निदान झाल्यामुळे, हा संसर्ग शरीरात पसरू नये म्हणून डॉक्टरांनी लगेच प्रयत्न सुरु केले. 17 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया करून भवदीपचा उजवा पाय मांडीपर्यंत काढून टाकला. तसेच डाव्या पायातील गुडघ्याखालच्या 30 टक्के उती या जीवाणूने खाल्ल्याचं आढळून आलं.

साधारणपणे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हा आजार जडतो. मात्र कसलीही जखम नसताना या धोकादायक जिवाणूच्या भवदीपच्या शरीरात कसा प्रवेश केला? हे अजूनही न सुटलेलं कोडंच आहे. भवदीपवर उपचार करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी आणि डॉ. वरुण यांनी बीबीसीला सांगितलं की, सांडपाण्याच्या संपर्कात आल्यामुळे भवदीपला या जिवाणूचा संसर्ग झालेला असू शकतो.

भवदीपचे वडील नागराजू म्हणाले की पूर येण्यापूर्वी त्यांच्या मुलाला कसलाही त्रास नव्हता. मात्र पुराच्या पाण्यात भिजल्यामुळेच तो आजारी पडल्याचं नागराजू सांगतात.

या मुलाच्या शरीराच्या कुजलेल्या भागाचे नमुने तपासण्यात आले. त्यात असं आढळून आलं की, त्याच्या शरीरात ई.कोली (E.coli) आणि क्लेबसीएला (Klebsiella) या जंतूंचा संसर्ग झाला होता.

डॉक्टर रवी आणि वरुण कुमार म्हणाले की, "हे जंतू धोकादायक असतात. यांच्यामुळेच पाय सुजतात."

डॉक्टर म्हणाले की, "पुराच्या पाण्यात सांडपाणी मिसळतं. त्यामुळे अशा पाण्यात मोठ्या प्रमाणात जिवाणू असतात. त्यामुळेच असे जीवाणू शरीरात जाऊ शकतात. दुसऱ्या बाजूला भवदीपला ताप आल्यानंतर त्याला अँटिबायोटिक्स आणि स्टिरॉइड्सचं इंजेक्शन देण्यात आलं. असं करणं धोकादायक ठरू शकतं."

मुख्यमंत्री मदत निधीतून भवदीपच्या उपचारांसाठी 10 लाखांचा निधी मिळाला असल्याची माहिती भवदीपच्या वडिलांनी बीबीसीला दिली.

ते म्हणाले की भवदीपला पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन महिने लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आणि यादरम्यान ते उपचाराचा खर्च भागवण्यासाठी देणगीदारांकडून मदत मागत आहेत.

डॉ. हरिहरन
फोटो कॅप्शन, डॉ. हरिहरन

विजयवाड्यात तापाचे रुग्ण वाढत आहेत

विजयवाडा नर्सिंग होम आणि पॉलीक्लिनिकचे डॉक्टर हरिहरन यांनी बीबीसीला सांगितले की, विजयवाडा शहरात तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

"विजयवाड्यात, अभूतपूर्व पूर आणि अतिवृष्टीमुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साहजिकच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तापाचे रुग्ण वाढतात. पण यावेळी विषाणूजन्य तापाच्या बळींची संख्या वाढली आहे," असं डॉ. हरिहरन म्हणाले.

लोकांनी, विशेषतः पूरग्रस्त भागातील लोकांनी काळजी घ्यावी. पुराच्या पाण्यात भिजण्याबद्दल ते म्हणाले की जरी सौम्य ताप आला तरीदेखील त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

दक्षता आवश्यक आहे

डॉ. ज्योतिर्मयी
फोटो कॅप्शन, डॉ. ज्योतिर्मयी

विजयवाडा शासकीय रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्योतिर्मयी यांनी पुराच्या पाण्यात चालताना आणि पूर ओसरल्यानंतरही लोकांनी कोणती खबरदारी बाळगली पाहिजे हे सांगितलं आहे.

  • मधुमेहाचे रुग्ण, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले, किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेले, लहान मुले, वृद्ध आणि लहान मुले ज्यांना पूर आणि पावसाळ्यात उच्च जोखमीचे रुग्ण मानले जाते त्यांनी काळजी घ्यावी.
  • पाण्यात भिजणार नाही याची काळजी घ्या आणि सांडपाण्याची जास्त काळजी घ्या.
  • फक्त उकळलेले आणि थंड केलेले पाणी प्या. स्वच्छ गरम अन्न खावे.
  • डॉक्टरांनी वेळोवेळी शिफारस केलेली औषधे घ्या.
  • संसर्गजन्य रोग टाळावे.
  • डासांपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी
ग्राफिक

फोटो स्रोत, NATIONAL HEALTH AUTHORITY

वैद्यकीय शिबिरांमुळे धोका टळला

डॉ. ज्योतिर्मयी म्हणाल्या की, "पूर ओसरल्यानंतर तापाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते, असे वाटल्याने आम्ही सरकारी रुग्णालयात खाटा तयार केल्या, मात्र, सरकारने वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आणि औषधांचे वाटप केले, त्यामुळे सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली नाही."

जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. सुहासिनी यांनी बीबीसीला सांगितलं की, या महिन्याच्या 2 ते 23 तारखेपर्यंत विजयवाडा शहरासह एनटीआर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात 2 लाख 699 लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना वैद्यकीय मदत आणि औषधे देण्यात आली.

एकूण 253 वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.