Faeces : विष्ठेमध्ये काय असतं? विष्ठेचं निरीक्षण करणं का आवश्यक आहे?

फोटो स्रोत, Getty Images
अरे.... शी... हा कसला विषय? शौच, शी, विष्ठा असे शब्दही उच्चारले तरी एक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यांच्यावर विचार मांडताना विनोबा भावे यांनी 'प्रभाते मलदर्शनम'चा संदेश दिला होता. त्यामुळे विष्ठा ही आपल्या शरीरातून बाहेर पडणारी एक त्याज्य गोष्ट एवढीच मर्यादीत नाही. तर विष्ठा आपली प्रकृती, आपलं जीवन यांचा आरसाच असते. त्यामुळे कितीही किळस वाटली तरी विष्ठेवरती विचार करावाच लागणार.
विष्ठेमध्ये काय असतं?
- विष्ठेमध्ये पचलेल्या अन्नातील टाकाऊ पदार्थ असतात.
- विष्ठेमध्ये पाणी, तंतुमय पदार्थ, पित्त आणि जीवाणू असतात.
- आपल्या पचन व्यवस्थेत अनेक प्रकारचे जीवाणू राहातात त्यातील काही तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात.

फोटो स्रोत, Getty Images
पचन व्यवस्थेत अन्नाचं लहान भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील लहान रेणू रक्ताच्या दिशेने जातात. हे रेणू शरीराला आवश्यक असणारे पोषण घटक वाहून घेऊन जातात.
पचन झालेल्या तसेच ज्यातून पोषक घटक शोषून घेतले आहेत अशा अन्नातील टाकाऊ भाग म्हणजे विष्ठा. विष्ठेला शास्त्रीय भाषेत faeces म्हटलं जातं.
तंतुमय पदार्थ (फायबर)
तंतुमय पदार्थ वनस्पतींमधून मिळतात. त्यांचं पचनव्यवस्थेत विभाजन होत नाहीत. ते अन्नाला वजन देतात आणि पचनव्यवस्थेत अन्न पुढे सरकण्यास मदत करतात.
पित्त
पित्त यकृतात तयार होतं. ते पिवळसर हिरव्या रंगाचं द्रवरुप असतं. मेद म्हणजे फॅट्सचे लहान लहान तुकडे करण्याचं काम करते तसंच तेलाच्या मोठ्या थेंबांचं लहान थेबांमध्ये विभाजन करण्याचं काम करतं.
बॅक्टेरिया
तुमच्या पोटामध्ये हजारो प्रकारचे बॅक्टेरिया (जीवाणू) राहात असतात. काही जीवाणू सर्वच लोकांच्या पोटात आढळतात. पण काही प्रजाती ठराविक लोकांमध्येच आढळतात. त्यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियासारखे बॅक्टेरिया दुसऱ्यांच्या पोटात असतीलच असे नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक प्रकारचे बॅक्टेरिया तुम्हाला निरोगी ठेवण्यात मदत करत असतात.
- आतड्यातले बॅक्टेरिया फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थांवर जगतात. मोठ्या आतड्याच्या आतील अस्तराचं पोषण करणारे पदार्थ हे बॅक्टेरिया तयार करतात.
- काही बॅक्टेरिया जीवनसत्वं तयार करतात.
- काही बॅक्टेरिया तुमच्या प्रतिकारशक्तीला मदत करतात आणि रोग दूर ठेवतात.
- आतड्यातील सर्वच बॅक्टेरिया उपयोगी असतात असे नाही. काही बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. काही बॅक्टेरियांमुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो.
तुमची विष्ठा तुमच्याबद्दल काय सांगते?
तुमच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसेच आजाराचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या विष्ठेचा आकार, रंग, वास, त्याचा पोत यांचा विचार करतात.
- सामान्य प्रकारची विष्ठा ही मऊ, सॉसेजसारखी असते. किंवा सॉसेजसारख्या दंडाकृती विष्ठेवर भेगा असू शकतात.
- सुटी सुटी किंवा कठीण खडे असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात असा अर्थ होतो.
- अगदी मुलायम किंवा द्रवरुप शी असेल तर तुम्हाला डायरिया असण्याची तसेच कसला तरी संसर्ग झाला असण्याची शक्यता असते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








