फिजिओथेरेपी म्हणजे नेमकं काय? कोणत्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती जास्त परिणामकारक ठरते?

फोटो स्रोत, Getty Images
‘फिजिओथेरेपी’ हा शब्द अनेकांसाठी नवीन नसला तरी कोड्यात टाकणारा आहे. फिजिओथेरेपी म्हणजे एखादा व्यायाम किंवा मसाजसारखा काहीतरी प्रकार असावा असा अनेकांचा समज असतो. मात्र, फिजिओथेरेपी या उपचार पद्धतीत अनेक विविध प्रकारच्या गोष्टी असतात.
शारीरिक दुखापतीने ग्रासलेल्या व्यक्तीला औषधींसह योग्य व्यायामाद्वारे बरं करणारी फिजिओथेरेपी म्हणजे नक्की काय? हे उपचार नेमके कसे केले जातात? त्याची योग्य पद्धत काय, जाणून घेऊयात.
याबाबत जाणून घेण्यासाठी बीबीसी तमिळने चेन्नईच्या ओमंतुरार या सरकारी रुग्णालयात कार्यरत फिजिओथेरपिस्ट एशिल्वनन यांच्याशी चर्चा केली.
फिजिओथेरेपी म्हणजे काय?
या प्रश्नाचे उत्तर देताना एशिल्वनन म्हणाले की, “सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास फिजिओथेरेपी ही एखाद्या दुखापतीला किंवा आजारामुळं हालचाल न करू शकणाऱ्या लोकांच्या सांध्याची समस्या दूर करून स्नायू मोकळे करण्यास मदत करते.”
“अपघात, दुखापत किंवा शारीरिक हालचाल मंदावलेल्या लोकांना औषध पूर्णपणे बरं करू शकत नाही. त्यासाठी फिजिओथेरपी ही सहायक उपचारपद्धत म्हणून उपयोगी ठरते,” असं एशिल्वनन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
औषधांच्या दीर्घकाळ सेवनानं अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यात मूत्रपिंडाच्या समस्या, जठराची सूज, आतड्यांसंबंधी आणि पोटात अल्सर होऊ शकतात आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर, औषधं कमी किंवा बंद केल्यानंतर डॉक्टर फिजिओथेरपीचा सल्ला देतात.
फिजिओथेरेपीच्या पद्धती कोणत्या?
फिजिओथेरपी उपचारांची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत, असं एशिल्वनन सांगतात.
- हालचाली पूर्ववत होणे – अपघात किंवा इतर आजारामुळे शारीरिक दुखापत झालेल्या लोकांच्या हालचालींना व्यायामाच्या साह्याने चालना देणे.
- वेदनेपासून आराम – शरिरातील वेदना कमी करून स्नायुंना आराम पोहोचवणे.

फोटो स्रोत, Getty Images
फिजिओथेरेपी उपचार पद्धतीचे दोन प्रकार आहेत.
1. व्यायाम – ज्यांना हालचाल करता येत नाही अशा व्यक्तींसाठी व्यायामाद्वारे हालचाली पूर्ववत करणे.
याचेही तीन प्रकार असल्याचे एशिल्वनन सांगतात
- स्वत: व्यायाम करणे - रुग्ण स्वत: फिजिओथेरपिस्टने शिकवलेले व्यायाम करतात.
- सहायकाच्या मदतीने - यात फिजिओथेरपिस्ट जे स्वतः व्यायाम करू शकत नाहीत अशा रुग्णांना मदत करतात.
- फिजिओथेरपीचे साहित्य वापरून - या पद्धतीत रुग्णाच्या हात आणि पायांना वजन आणि स्प्रिंग्सच्या मदतीने विशिष्ट पद्धतीने ताण देऊन त्याद्वारे हालचाल करवून घेतली जाते. यात 'थेराबँड' नावाचा एक कडक रबरबँड जो भिंतीला किंवा एखाद्या ठळक भागाशी जोडला असतो, त्याच्या मदतीने हात आणि पायांवर उपचार केला जातो.
इलेक्ट्रोथेरेपी
2. इलेक्ट्रोथेरेपी – शरिरातील तीव्र वेदना किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
अशा प्रकारचे उपचार पाठ, मान, खांदे किंवा संधिवातात होणाऱ्या तीव्र वेदनांसाठी केले जातात.
या पद्धतीत इलेक्ट्रिक यंत्रांचा वापर करून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, असं एशिल्वनन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
फिजिओथेरपीचे फायदे कोणते?
गंभीर अपघातामुळं किंवा दीर्घकालीन आजार, स्ट्रोक यामुळं कधीकधी हालचाली मंदावत असतात. तसंच त्यांना दैनंदिन कामांसाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागते. अशावेळी रुग्णांना पूर्ववत होण्यासाठी फिजिओथेरपीचा फायदा होतो असं, एशिल्वनन यांनी सांगितलं.
अशा समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना अनेक दिवस अंथरुणाला खिळून राहावं लागतं. त्यामुळं त्यांचे स्नायू कमकुवत होत असतात. ते स्नायू पुन्हा मजबूत होण्यासाठी फिजिओथेरपीची मदत होते.
फिजिओथेरपीच्या माध्यमातून अशा रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण पुन्हा पूर्ववत होऊ शकतात, असंही ते म्हणाले.


एशिल्वनन यांनी या उपचार पद्धतीसाठी नेमका किती काळ लागतो याबाबतही माहिती दिली. हाड फ्रॅक्चर झालेलं असेल आणि हात किंवा पाय व्यवस्थितपणे हलवता येत नसेल, तर नियमितपणे फिजिओथेरपी घेऊन जवळपास 1-2 महिन्यांत सहज सामान्यपणे हालचाल सुरू करता येते.
डोक्यावर आघात झाला असेल आणि मेंदूला दुखापत झालेली असेल किंवा पाठिच्या कण्याला दुखापत झाली असेल किंवा त्यामुळं हात-पाय व्यवस्थित हलवता येत नसतील तर फिजिओथेरपीद्वारे त्यावर उपचारासाठी 3 महिन्यांपर्यंतचा वेळ लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
पण हे सर्व रुग्ण किती नियमितपणे व्यायाम करत आहे, यावर अवलंबून असतं असंही त्यांनी सांगतिलं. "अनेकदा रुग्णांमध्ये संयम राहत नाही त्यामुळं ते इतर औषधांच्या आणि उपचार पद्धतींच्या पर्यायाकडं वळतात. अशावेळी फिजिओथेरपी फायदेशीर ठरत नाही," असं त्यांनी म्हटलं.
शस्त्रक्रियेनंतर काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून फिजिओथेरपीचा सल्ला दिल्ला जातो.
जवळपास गेल्या 20 वर्षांमध्ये मानदुखी आणि पाठदुखी अशा समस्यांसाठी फिजिओथेरपीकडं वळणाऱ्यांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. आयटी कंपन्यांसारखं बैठं काम असलेल्या नोकऱ्यांची संख्या वाढल्याचं कारण त्यामागं असू शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











