जगभरात कुठंकुठं देवराया आहेत? हवामान बदलाच्या परिणामांपासून त्या आपल्याला वाचवू शकतील का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भीमाशंकरकडे घाटाघाटातून जाणारा रस्ता आम्हाला तेरूंगणच्या देवराईकडे नेतो. जंगल अधिक दाट होत जातं.

नेमकं सांगता येत नाही, पण पहिल्या काही क्षणात जाणवतं की, इथपर्यंत आलेल्या जंगलामध्ये आणि ज्याच्या सीमेवर उभे आहोत त्या वनराजीमध्ये काही फरक आहे.

तो जंगलाच्या गंधाचा आहे, रंगाचा आहे, डोळ्यांना दिसणाऱ्या घनगर्द दाटीचा आहे, कशाचा आहे?

हे या परिसरातल्या इतर जंगलांसारखं जंगल नाही, हे लगेच ध्यानात येतं. मोठे, पिळदार, कित्येक पावसाळे रिचवून त्या खोडांवर उभं असलेलं शेवाळं, जमिनीचा थांगपत्ता न लागावा एवढा पानांचे पायाखाली रचले गेलेले थर.

इतर जंगलांमध्ये जाल तेव्हा माणसाचा वावर वस्त्यांसारखा नसला, तरीही जाणवतो. जंगलवाटांवरून, काही खुणांवरून. मात्र, माणसाच्या वावराची जाणीव नसावीच इतकी अत्यल्प.

कारण या राखलेल्या, जपलेल्या देवराया आहेत. वाढत्या वयासोबत आलेलं गूढ, अद्भुत असं काही त्यांच्यामध्ये आहे.

तेरुंगणची ही देवराई एकटी नाही. सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेल्या हजारों देवरायांपैकी ती एक आहे.

माणसाच्या आणि निर्सगाच्या या पृथ्वीवर एकत्र होत गेलेल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतल्या एका अनोख्या नात्याच्या त्या वारसा आहेत.

केवळ नैसर्गिक नाही तर सांस्कृतिक वारसा आहेत. हजारो वर्षांमध्ये माणसाच्या स्वत:बद्दलच्या कल्पना, अस्तित्वाबद्दलच्या धारणा, श्रद्धा जशा विकसित होत गेल्या, त्यांच्या कथा या कालौघात तयार झालेल्या वेगवगळ्या दैवतांमधून समजते.

इथं अशाच लोकदैवतांभोवती देवराया राखल्या गेल्या वा या रानांमध्ये दैवतं स्थापन झाली. त्यांच्या कथा तयार झाल्या आणि परंपरा म्हणून पुढे चालू राहिल्या.

साऱ्या जगभरच्या निर्सगाच्या आधारानं उत्क्रांत होत गेलेल्या समाजांमध्ये अशा देवराया आहेत.

या इतिहासातून चालत आलेल्या वारशातूनच आता वर्तमानातली आणि भविष्यासाठीची काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही होतो आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ देवरायांमधल्या जैवविविधतेचा अभ्यास तर जगभर करत आहेतच.

पण हवामान बदलाच्या परिणामांच्या या काळात जेव्हा मानव आणि निसर्गाच्या सहअस्तित्वासमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत, तेव्हा देवराया काही उत्तर देऊ शकतात का, हेही शोधलं जातं आहे.

देवराया काय आहेत? ही परंपरा कशी सुरू झाली?

या नावातच सामावलेला अर्थ सोपा आहे. 'देवराई' म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं, ठेवलेलं जंगल. अनेक प्रदेशांत आणि समाजात ही परंपरा काही शतकांपासून आजही सुरू आहे. त्यामागे श्रद्धेचा भाग आहेच, पण ज्या निसर्गावर आपण अवलंबून आहोत त्याचं जतन करण्याचा मानसही यामागे आहे असं अभ्यासक मानतात.

त्यामुळे विविध देवतांच्या नावानं राखलेल्या या जंगलांना तेच पावित्र्य आहे, जे सश्रद्ध व्यक्तींमध्ये देवतांच्या पूजनाला आहे. या देवरायांमध्ये असलेल्या झाडांना जपलं जातं. ती तोडू नयेत, त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये आणि तसं काहीही झालं तर कोप अथवा शिक्षा होईल अशी भीतीही अनुस्यूत असते.

"देवराई संकल्पनेमध्ये दैवत्व आहे, खूप घनदाट वृक्षराजी आहे. त्याचबरोबर तुम्ही तिथे कसे वागता याचे विधिनिषेध आहेत. तिथून काही न्यायचं नाही. तिथून काही उचलायचं नाही. तिथलं काही कापायचं नाही. शिकार करायची नाही. असे नियम तुम्हाला दिसतात. आणि ही एका माणसाची भावना नाही, तर समूहमन निर्माण होताना दिसतं. हे एका पिढीतच नाही, तर अनेक पिढ्यांमध्ये परावर्तित होताना दिसतं," डॉ दातार पुढे सांगतात.

तेरुंगणच्या देवराईत आमच्यासोबत आलेले तिथले एक गावकरी विश्वनाथ वायळ म्हणाले, "ही देवराई काही आम्ही तयार केली नाही, ती पूर्वीपासूनच आहे. या जंगलातलं, या देवराईतलं काही पण न्यायचं नाही. झाड, सरपण, वेली असलं काहीच न्यायचं नाही. ही गारबीची वेल आहे. ती पण न्यायची नाही."

जगातल्या अनेक देशांमध्ये जरी ही संकल्पना असली तरीही तिची सुरुवात नेमकी कधीपासून झाली त्या काळाचं भाकित करणं अवघड आहे, असं अभ्यासक म्हणतात.

इंग्लंडमध्ये 'द ओपन युनिव्हर्सिटी' इथे 'पर्यावरण आणि समज' या विषयावर संशोधन आणि अध्यापन करणाऱ्या डॉ. शोनिल भागवत यांनी जगभरातील देवरायांचा अभ्यास केला आहे.

त्यांच्या मते जवळपास निओलिथिक (नवपाषाण युग) काळात शेतीची क्रांती झाली असं म्हटलं जातं तेव्हाच्या देवरायांजवळ त्या काळाचे पुरातत्वीय पुरावे युरोप आणि भारताच्या काही भागांमध्ये मिळाले आहेत.

"तेव्हाच्या मानवाला असं कळलं की, आपण जर एखादं जंगल संरक्षित केलं तर आपल्याला अनेक पर्यावरणीय सेवा (इको सिस्टिम सर्व्हिसेस) मिळू शकतात. उदाहरणार्थ पाण्याचे स्त्रोत किंवा परागीभवन. तेव्हापासून त्यानं अशी जंगलं राखायला सुरुवात केली असावी. पण नेमकं कधी झालं याचा आकडा सांगता येत नाही. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी सुरुवात आहे," डॉ भागवत सांगतात.

'देवराई'संपन्न महाराष्ट्र

महाराष्ट्र हा देवरायांनी समृद्ध प्रांत आहे. विशेषत: सह्याद्रीचा जो सगळा पश्चिम घाट जंगलराजीचा भाग आहे, तिथं काही शतकांपासून उभ्या असलेल्या देवराया आहेत.

शिवकालानंतरच्या काही देवरायांचे कागदोपत्री पुरावे मिळतात आणि ब्रिटिश काळापासून अधिक नेमकेपणानं त्यांचं रेकॉर्ड ठेवलेलं आढळतं.

महाराष्ट्रातल्या देवराया मोजण्याचा महत्वाचा प्रयत्न 1999 मध्ये 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी' तर्फे झाला होता. तेव्हा मोजल्या गेलेल्या महाराष्ट्रातल्या देवराया 2808 इतक्या होत्या. त्यानंतरही अभ्यासक अजून देवरायांची नोंद करत आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषत्वानं कोकणात, स्थानिक परंपरांद्वारे देवराया राखल्या जात होत्याच. पण 1960-70 च्या दशकांमध्ये या देवरायांचा पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू झाला.

पर्यावरणाच्या संवर्धनात समाजाचं (कम्युनिटी) एवढं समसरलेलं असणं हा मुख्य भाग होता. भारतातल्या या अभ्यासाला महाराष्ट्रातून सुरुवात झाली. त्याचे मुख्य होते डॉ माधव गाडगीळ आणि डॉ व्ही. डी वर्तक.

देवरायांचा केवळ श्रद्धा आणि परंपरा यांच्याशीच संबंध नसून त्यामागे पर्यावरणाचं संवर्धन आणि त्यात समाज, गावरहाटीचा सहभाग हा महत्वाचा भाग आहे हे गाडगीळ आणि वर्तकांनी सांगितलं.

"हे सगळं कागदावर उतरवण्याचं काम गाडगीळ आणि वर्तकांनी केलं. त्यांनी जेव्हा या देवराया मॅप केल्या तेव्हा त्यांना समजलं की, त्यांचे अनेक प्रकारचे उपयोग आहेत. ही औषधी वनस्पतींची आश्रयस्थानं आहेत. इथे मोठमोठे वृक्ष वाढतात. त्यांत प्राणी आहेत. त्या प्राण्यांचं ब्रिडींग पूर्ण झाल्यावर ते बाहेर पडतात तेव्हा त्यांची शिकार करता येते. देवराईत त्यांना मारता येत नाही."

"पाण्याच्या स्रोतांचा उगम इथे आहे. आपल्याकडच्या सह्याद्रीतल्या नद्या पाहिल्या तर बहुतांशांचे उगम हे देवराईत आहेत. ज्याला आपण सध्या 'इको सिस्टिम सर्व्हिसेस' अशी संज्ञा वापरतो, तशा प्रकारच्या पर्यावरणीय सेवा या देवराया देतात, हे गाडगीळ आणि वर्तकांनी पहिल्यांदा दाखवून दिलं," डॉ मंदार दातार सांगतात.

डॉ दातार हे पुण्याच्या 'आघारकर संशोधन संस्थे'त काम करतात. देवरायांच्या विविध अंगांचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा भाग आहे.

महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यात, विशेषत्वानं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक देवराया आहेत. लोकदेवता, त्याला जोडलेल्या लोककथा आणि त्यातून चालू राहिलेल्या परंपरा कोकणात रुजल्या आहेत आणि त्या गावगाड्याचा भाग आहे.

उदाहरणार्थ आजही तिथल्या देवरायांमधल्या देवतांना आजही गावातल्या काही निर्णयांसाठी कौल लावण्याची परंपरा आहे.

"कोकणातल्या देवरायांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला नवलाई दिसेल, जुगाई दिसेल, वाघजाई दिसेल, अशा मातृदेवता दिसतील. मुख्य देवता या मातृदेवता होत्या कारण निसर्ग, पृथ्वी ही मातृदेवता असं समजलं जातं.

"त्यानंतर सोंबा, केदारलिंग हे त्यांचे गण होते. शंकराचं स्वरुप म्हणून तेही तिथे आले. काही ठिकाणी गावात एखादी बाई सती गेली आहे तर तिच्या नावानं पण देवराई केली आहे. किंवा एखादा मनुष्य वाघाशी लढतांना धारातीर्थी पडला असेल तर त्याच्या नावानंही देवराया आहेत," डॉ अर्चना गोडबोले सांगतात.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्या आणि त्यांची AERF संस्था कोकणसह महाराष्ट्रातल्या देवरायांवर काम करत आहे.

देवरायांमधली लोकदैवतं हाही अभ्यासकांच्या संशोधनाचा विषय आहे.

"इथे मुख्यत: लोकदेवता असतात. त्या तुमच्या परिसराच्या राखण करणाऱ्या देवता असतात. तुमच्या काही मागण्या पूर्ण करणाऱ्या देवता असतात. तुम्हाला संरक्षण देणाऱ्या तुमच्याच परिसरातल्या या देवता असतात. मग कधीकधी तुमच्याच समाजातला एखादा वीर असतो, त्यालाच देवत्व दिलं जातं. त्यांच्या नावानेच एक जंगल राखलं जातं," डॉ सायली दातार सांगतात.

देशभरातली आणि जगभरातली देवरायांची परंपरा

देवराया अथवा देवांच्या नावानं पवित्र म्हणून जंगल राखणं जाणं ही परंपरा महाराष्ट्रासोबत देशातल्या इतर अनेक राज्यांमध्ये आहे. इथं जसं त्याला 'देवराई' म्हणतात, तसं इतर राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. पण भारतभरात एकजीव झालेली ही संकल्पना दिसते.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या दक्षिणेकडच्या राज्यात देवराया विपुल संख्येनं आहेत. ईशान्येच्या राज्यांपासून ते काश्मीरपर्यंत हिमालयाच्या प्रदेशात मोठ्या संख्येनं देवांच्या नावानं राखलेली वनं आहेत.

डॉ.शंकरराव मुदादला या संशोधकानं एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या देवरायांसंदर्भातल्या एका पेपरमध्ये एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये 5000 पेक्षा अधिक देवराया असल्याचं म्हटलं आहे जिथं त्यांना 'देवभूमी' असं म्हटलं जातं.

"मेघालय, सिक्किम, हिमाचलमध्ये देवराया आहेत. उत्तराखंडमध्येही आहेत. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात तर आहेतच. ओरिसा, मध्येप्रदेश झारखंड या सगळ्या ठिकाणी देवराया आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये त्यांना सरना म्हणतात."

"तामिळनाडूमध्ये कोविलकाडू म्हणतात. कर्नाटकमध्ये कान किंवा देवराकाडू म्हणतात. पंजाब आणि नागालैंड सोडल्यास आसाममध्ये देवराया आहेत. अरुणाचलमध्ये आहेत. जम्मू काश्मीरमध्ये ज्याला 'परियों का बाग' म्हणतात अशा देवराया आहेत," डॉ अर्चना गोडबोले सांगतात.

इतर अनेक देशांमध्ये शतकानुशतकांपासून जंगलांच्या आधारानं जगत आलेल्या समाजांमध्ये ही संकल्पना आहे.

"आफ्रिकेमध्ये केनिया देशात 'काया' नावाची जंगलं असतात. त्या 'काया'सुद्धा देवरायांसारख्याच आहेत. पण तिथे देवरायांमध्ये देव आणि जंगल असं नाही आहे. तिथल्या ज्या दुर्गम भागातल्या 'काया' आहेत तिथे सगळ्यांना जायला परवानगी नाही. आदिवासी समुहाचे जे प्रमुख होते त्यांनाच तिथे जायला परवानगी होती," डॉ गोडबोले त्याबद्दल सांगतात.

"त्याचबरोबर जपानसारख्या शहरीकरण झालेल्या देशामध्ये 'शिंटो श्राईन्स' नावाच्या देवराया आहेत. त्यामुळे जगभर देवराया आहेत. काही अगदी छोट्या असतात. चार-पाच झाडं किंवा झाडांचं छोटं बेट. त्याचं दुसरं टोक म्हणजे अगदी 70-80 हेक्टरच्या देवरायाही पहायला मिळतात," डॉ भागवत सांगतात.

देवराया, जैवविविधता आणि हवामान बदल

देवराई या संकल्पनेचं सांस्कृतिक महत्व हा एक भाग असला तरीही आधुनिक विज्ञानाच्या काळात त्यांचा अभ्यास जगभर पर्यावरणशास्त्रज्ञ करत आहेत. त्यातलं पहिलं मुख्य कारण म्हणजे जैवविविधता.

मानवी हस्तक्षेपाशिवाय ही जंगलं कित्येक शतकांपासून राखून ठेवली असल्यानं अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती ज्या कालौघात नष्ट झाल्या आहेत अथवा नाहिशा होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्या देवरायांमध्ये टिकून आहेत.

या घनदाट जंगलांमध्ये अशा प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे सुरक्षित अधिवास सापडतात जे प्रदेशनिष्ठ आहेत आणि दुर्मिळ आहेत. उदाहरणार्थ, भीमाशंकर इथल्या देवरायांमध्ये शेकरु मोठ्या संख्येनं आहेत. कोकणातल्या काही देवरायांमध्ये 'ग्रेट इंडियन हॉर्नबिल' म्हणजे धनेश या पक्षाचा अधिवास निर्माण झालेला पहायला मिळतो.

"देवराई परिसंस्था ही सेल्फ सस्टेन्ड आहे. 2-4 हजार वर्षांपूर्वी आसपास काय स्वरुपाचं जंगल होतं हे समजायचं असेल तर त्याचा रेफरन्स पॉईंट म्हणून देवराईकडे बघता येईल. पूर्वी आसपास जी झाडं होती ती आता फक्त देवराईमध्ये शिल्लक राहिली आहेत," डॉ मंदार दातार सांगतात.

"आम्ही सह्याद्रीतल्या खाद्य वनस्पतींचा, म्हणजे वाईल्ड एडिबल प्लांट्स, अभ्यास केला तेव्हा समजलं की त्यातल्या अनेक वनस्पती या देवरायांमधल्या आहेत. अशी समाजानं जपलेली, गावानं जपलेली परिसंस्था देवराई आहे. स्थानिक लोकांच्या शहाणिवेतून हे आलं आहे," डॉ दातार पुढे सांगतात.

इथे देवरायांसंदर्भातला आधुनिक काळात अभ्यासाचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. 'कम्युनिटी बेस्ड कॉन्झर्व्हेशन'. लोकसहभागातून निसर्गसंवर्धन.

जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलाचे होणारे विपरित परिणाम या आव्हानांनी पृथ्वीवरच्या मानवाला वेढलं आहे, तेव्हा कोणत्याही सरकारी धोरणापेक्षा लोकसहभागाला अधिक महत्व दिलं जातं आहे.

अशा वेळेस लोकसहभागाची देवराई ही अनेक वर्षांपासून चालत आलेली संकल्पना संशोधक आणि धोरणं आखणाऱ्यांना अतिमहत्वाची वाटते आहे. कारण देवराईत दैवतांइतकाच लोकसहभाग अथवा समाज एकजीव झाला आहे.

"देवराया या संवर्धनाच्या आजवर गुपित राहिलेल्या जादूगार आहेत. या लोकसहभागातून संवर्धनाच्या प्रयत्नांतूनच उत्तराखंडच्या देवरायांमध्ये स्वच्छ पाण्याचे स्त्रोत आहेत. अभ्यास असं सांगतो की WHO ची पिण्याच्या पाण्यासाठी जी मानकं आहेत, त्यानुसार या देवरायांमधल्या पाण्याची गुणवत्ता आहे," आरुषी वाधवा त्यांच्या IUCN च्या वेबसाईटवर प्रकाशित लेखामध्ये लिहितात.

यासाठीच जेव्हा जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल वास्तव असतांना, त्यांच्याशी दोन हात करण्याच्या उपायांमध्ये देवराई ही संकल्पना महत्वाची ठरते आहे.

"हवामान बदलावर मात करण्यासाठी जगभरात असा विचार सुरू आहे की, आपल्याला जंगल वाढवायला पाहिजे. ते करायचं असेल तर संरक्षित वनांशिवाय इतर संवर्धनाच्या उपायांवर भर दिला जातो आहे. त्या OECM (other effective area-based conservation measures) मध्ये देवरायांचं महत्व खूप आहे."

"IUCN (International Union for Conservation of Nature) सारख्या संघटनांनी असं लक्ष्य ठरवलं आहे की आपण 2030 सालापर्यंत जगभरातला 30 टक्के जमिनीचा भाग वाचवायचा. पण संरक्षित वनांचं क्षेत्र जे आहे ते जेमतेम 12 टक्के आहे. ही जी 12 आणि 30 टक्क्यातली तफावत आहे ती कशी भरायची? तर त्यामध्ये देवरायांचा खूप प्रभाव पडेल असं दिसतं आहे," डॉ शोनिल भागवत सांगतात.

देवरायांच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि उपाय

हेही वास्तव आहे की, देवराया हा महत्वाचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा असला तरीही त्याला धोके निर्माण झाले आहे. देवरायांचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि संवर्धक गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही दशकांमध्ये अनेक देवराया नष्ट झाल्याची उदहारणं आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. मुख्यत्वे कोणत्या विकासप्रकल्पांमध्ये, धरणांच्या पाण्यामध्ये देवराया गेल्या. शेतीचं क्षेत्र वाढत गेल्यानं तसं झालं.

"आज मोठमोठ्या प्रमाणात रस्ते, विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा, सगळीकडे झाल्या आहेत. शेतीव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणं झाल्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली. ही मानवकेंद्रित विकासकामं झाली. त्यामुळे देवरायांचे मोठ्या प्रमाणात तुकडे पडले दिसतात आणि मुख्य जंगलांपासून त्या तुटल्या आहेत," डॉ सचिन पुणेकर सांगतात.

त्यांच्या 'बायोस्फिअर' या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षं ते महाराष्ट्रातल्या देवरायांच्या माहितीचं संकलन करत आहेत.

अलिकडेच, म्हणजे 18 डिसेंबर 2024 रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या एका आदेशामुळे देवराया संवर्धकांच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या आहेत.

राजस्थानातल्या देवरायांबद्दलच्या, ज्यांना तिथे 'ओरण' म्हटलं जातं, एका याचिकेदरम्यान आदेश देतांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राजस्थानसह केंद्र सरकारला अशा देवरायांच्या मापनाचे आणि 'वन संरक्षण कायद्या'नुसार नोंदणी करण्याचे आदेश दिले होते.

देवरायाबद्दल सरकारी पातळीवर नेमकं धोरण नसतांना दुसऱ्या बाजूला त्यांच्या संवर्धनासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. डॉ अर्चना गोडबोले आणि त्यांची 'AERF' ही संस्था गेल्या तीन दशकांपासून कोकण आणि पश्चिम घाटांमध्ये हे काम करते आहे.

त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की जर नव्या पिढीला यात जोडून ठेवायचं असेल तर या पुराण-अधिवासांना धक्का न पोहोचता गावांसाठी काही आर्थिक मॉडेल तयार करणे. देवरायांमधल्या औषधी वनस्पतींची मुबलकता हे वैशिष्ट्य आहे.

त्या औषधी वनस्पती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित करून विकल्या जातात आणि त्यातून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होतो. इथला हिरडा आणि बेहडा यांच्यासाठी करारानंतर मोठं उत्पन्न गावपातळीवर संवर्धनासाठी मिळालं आहे.

"जवळपास आमच्या 24 ते 25 देवराया या सर्टिफाईड आहेत. जिथं बेहड्याचे महावृक्ष आहेत. तिथे हॉर्नबिलची घरटी आहेत. त्या बेहड्यांमुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळतो. शिवाय आमच्या प्रक्रिया केंद्रांवर 45 महिलांना रोजगार मिळतो. इथे भीमाशंकर भागातही आमचं प्रक्रिया केंद्र आहे जिथं लोकांना रोजगार मिळतो," अर्चना सांगतात.

त्यांच्यासोबत भीमाशंकरच्या कोंढवळमध्ये एका प्रक्रिया केंद्रालाही आम्ही भेट देतो. इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन 'श्रीपाद आदिवासी वनोपज उत्पादक संघ' स्थापन केला आहे आणि त्याद्वारे मुख्यत्वे हिरड्याचं उत्पन्न गोळा केलं जातं. हिरड्याचा ठराविक काळच असल्यानं वर्षातले काहीच महिने ते उत्पन्न घेता येतं.

"मागच्या 13 वर्षांत सुरुवातीला आम्ही हिरडा-बेहडा इंग्लंडच्या 'पक्का हर्बस्'ला विकला होता. त्यानंतर 'बनियन बोटॅनिकल ' सारख्या संस्थांनाही विकला होता. एका सिझनमध्ये एका केंद्रातून 15 ते 20 लाख उत्पन्न मिळतं. शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होतो. आर्थिक फायदा तर होतोच, पण 'फेअरवाईल्ड सर्टिफिकेशन'मुळे लोकांना जो काही माल निर्यात केला जाईल त्याच्या 10-15 टक्के प्रिमियमही या लोकांना मिळतो जो त्यांनी गावासाठी खर्च करायचा असतो," या प्रकल्पासाठी 'AERF' चे संयोजक असलेले अभिषेक नांगरे सांगतात.

काळाच्या ओघात महत्व वाढत गेलेल्या आणि तरीही अस्तित्वाची लढाईही लढणाऱ्या या अद्भुत जागतिक नैसर्गिक वारशाचं जतन या किंवा अन्य कोणत्याही मार्गानं होणं आवश्यक बनलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)