You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोप फ्रान्सिस यांना झालेला आजार नेमका काय आहे? याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?
पोप फ्रान्सिस (88 वर्षे) यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यात श्वसनाची समस्या उद्भवल्यानंतर त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणीनंतर न्यूमोनियाचं निदान केलं आहे. तसंच, त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला असून त्यासाठी विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोप फ्रान्सिस यांना बायलॅटेरल न्यूमोनिया असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
हा बायलॅटरल न्यूमोनिया म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो? जाणून घेऊया.
बायलॅटेरल न्यूमोनिया म्हणजे काय?
न्यूमोनिया हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो आपल्या फुफ्फुसांशी संबंधित असून तो एक किंवा दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो. संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये असलेल्या एअर सॅक्स (हवेची लहान पिशवी) मध्ये सूज निर्माण होते.
जेव्हा ही सूज वाढते, तेव्हा एअर सॅक्समध्ये द्रव साचते, त्यामुळं रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येते. याशिवाय, खोकला, ताप, थंडी वाजणे, अंगदुखी आणि अशक्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात.
न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकतो. हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेद्वारे हवेत पसरलेल्या सूक्ष्म थेंबांमुळे (ड्रॉपलेट्स) पसरू शकतो. एखाद्या संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यासही तो शरीरात प्रवेश करू शकतो.
हा संसर्ग एका फुफ्फुसाऐवजी दोन्ही फुफ्फुसांमध्ये पसरतो, तेव्हा त्याला 'बायलॅटेरल न्यूमोनिया' म्हणतात. मात्र, सिडनी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, 'बायलॅटेरल न्यूमोनिया गंभीर असेलच असे नाही.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीच्या अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात न्यूमोनियाचे 34.4 कोटी प्रकरणं नोंदवली गेली आणि 21 लाख लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच वर्षांखालील 5,02,000 मुलांचाही समावेश होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, 2021 मध्ये लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स (खालील श्वसन मार्गांमध्ये होणारा संसर्ग) हे त्या वर्षी मृत्यू होण्याचे पाचवे सर्वात मोठे कारण होते.
तर, इस्केमिक हार्ट डिसीज, कोविड-19, स्ट्रोक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसीजमुळे अधिक मृत्यू नोंदवले गेले.
याचा सर्वाधिक धोका कोणाला?
शारीरिक तपासणीनंतर, रुग्णाला न्यूमोनिया झाल्याची शंका असल्यास डॉक्टर त्याची पुष्टी करण्यासाठी आणि ते कशामुळे होत आहे हे शोधण्यासाठी रक्त तपासणी करण्यास सांगू शकतात.
अमेरिकेतील मायो क्लिनिक यासंदर्भात म्हणते की, प्रत्येकवेळी न्यूमोनियाचं निदान होईलच असे नाही.
संसर्ग कुठे आहे आणि त्याचा स्त्रोत काय आहे हे शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे आणि थुंकीची (कफ) तपासणी करण्याची शिफारस केली जाते.
रक्तातील ऑक्सिजन पातळीही ऑक्सीमीटरच्या मदतीने मोजली जाते, कारण न्यूमोनिया फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवण्यापासून रोखतो.
न्यूमोनिया गंभीरही ठरू शकतो, परंतु पोप यांच्यासारख्या वयाच्या व्यक्तीमध्ये याचा धोका आणखी जास्त असतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, न्यूमोनिया कोणालाही होऊ शकतो, पण वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा धोका जास्त असतो.
65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, दोन वर्षांखालील मुलं, फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेले लोक किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना या आजार होण्याची जास्त शक्यता असते.
पोप फ्रान्सिस आधीपासून श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. तरुणपणी त्यांना 'प्लुरिसी' नावाचा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या एका फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा धोका आणखी वाढला आहे.
पोप यांना याआधी 14 फेब्रुवारी रोजी ब्रॉन्कायटिसच्या उपचार आणि तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना याची लक्षणं दिसत होती आणि त्यामुळे अलीकडील कार्यक्रमांमध्ये त्यांनी स्वतःच्या भाषणांसाठी इतर अधिकाऱ्यांना नियुक्त केले होते.
न्यूमोनियावरील उपचार
न्यूमोनियाच्या उपचारासाठी, बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात किंवा विषाणूजन्य संसर्ग दूर करण्यासाठी अँटीव्हायरल औषधं दिली जातात.
संसर्ग अनेक प्रकारच्या जीवाणूंमुळे (बॅक्टेरिया) झाला असेल, तर रुग्णाला ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स दिली जातात.
त्यातल्या त्यात विषाणूजन्य न्यूमोनियावर उपचार करणे अधिक आव्हानात्मक आहे. कारण उपलब्ध अँटीव्हायरल औषधे फारशी प्रभावी किंवा विशिष्ट आजारासाठीची नसतात.
रुग्णालयात न्यूमोनियाच्या उपचारादरम्यान रुग्णांना फ्लुइड आणि ऑक्सिजन दिलं जातं.
संसर्ग बॅक्टेरियामुळे झाला असेल, तर अँटीबायोटिक्स दिली जातात. परंतु जर तो विषाणूमुळे पसरला असेल, तर उपचार अधिक कठीण होऊ शकतात. कारण व्हायरल न्यूमोनियासाठी कोणतीही विशिष्ट औषधं उपलब्ध नाहीत.
रुग्णालयात, फुफ्फुसांमध्ये साचलेले द्रव काढून टाकण्यासाठी रुग्णांना ऑक्सिजन, द्रवपदार्थ आणि कधीकधी फिजिओथेरपीही दिली जाते.
व्हॅटिकनच्या मते, पोप फ्रान्सिस यांना 'पॉलीमायक्रोबियल' संसर्ग झाला आहे. हा संसर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्यामुळे होतो.
त्यामुळे त्यांचा उपचार अधिक जटील असून त्यांना अँटीबायोटिक्स तसेच सूज कमी करणारी औषधं दिली जात आहेत. सध्या, त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.