You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझी दोन्ही पोरं खेळायला गेली ती परतलीच नाहीत, सकाळी टाकीत सापडली'
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
“माझी मुलं मला कोणी परत देईल का आता?”
सोनू वाघरींना आपल्या मुलांची आठवण येते, तेव्हा अश्रू अनावर होतात. त्यांनी आधी दोन कोवळी मुलं गमावली, पाठोपाठ त्यांचं घरही तोडण्यात आलं.
सोनू त्यांचे पती मनोज वाघरी आणि तीन मुलांसह मुंबईत वडाळा पुलाच्या फुटपाथवर झोपडपट्टीत राहायच्या. हा पूल पश्चिमेला जिथे उतरतो, त्या भागात पुलालगत महापालिकेचं महर्षि कर्वे उद्यान आहे.
या उद्यानातल्या टाकीत पडून सोनू यांच्या दोन मुलांचा 17 मार्च 2024 रोजी मृत्यू झाला होता. पाच वर्षांचा अंकुश आणि चार वर्षांचा अर्जुन वस्तीलगतच खेळत होते, तेव्हा ही दुर्घटना घडली.
त्याची स्वतःहून दखल घेत उच्च न्यायालयानं महापालिकेला नोटीस पाठवली. पण त्यानंतर महापालिकेनं 3 एप्रिलला या कुटुंबाच्या झोपडीसह पूर्ण वस्ती तोडण्याची कारवाई केली.
त्यामुळे इथल्या लोकांमध्ये जास्त नाराजी आहे.
नेमकं काय घडलं?
मनोज वाघरी यांची आत्या कनू काविटीया याच वस्तीत राहतात. त्या दिवशी याविषयी त्या माहिती देतात.
रविवार होता, त्यामुळे वस्तीतली मुलं शाळेत गेली नव्हती. एका माणसानं येऊन सगळ्यांना इडल्या वाटल्या, त्यामुळे मुलं खूश होती.
कनू सांगतात, “इथे बसूनच त्यांनी इडल्या खाल्ल्या. मग इडलीवाल्यामागे पळत सगळी मुलं पुढे गेली आणि तिथेच खेळत होती. मुलांची आई कामात होती. थोड्या वेळानं एकानं येऊन सांगितलं की तुमच्याकडची दोन मुलं कुठे गेली दिसत नाहीत. त्यांना मंदिरात आरती करायला यायचं होतं.”
दोघं कुठेच नाहीत हे लक्षात आल्यावर शोध सुरू झाला.
सोनू सांगतात, “आम्ही सगळीकडे गेलो, इकडे तिकडे शोधलं पण माझी मुलं कुठेच सापडली नाही. पोलिसात चौकीवर गेलो.”
मुलांना कुणी पळवून नेलं नाही ना म्हणून तपास सुरू झाला. रस्त्यावर समोरच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली.
“एक बडे साहेब आले. मग कॅमेऱ्यात पाहिलं. माझी मुलं बागेकडे जाताना दिसली. तेव्हा तिकडे जाऊन शोधाशोध केली. रात्रीच्या अंधारातही पाच सहाजणांनी तिथे जाऊन पाहिलं पण कुठे सापडले नाही.”
वस्तीलगत उद्यानाच्या भागात टाकी आहे. मोबाईलच्या प्रकाशात मनोज यांनी त्या टाकीतही डोकावून पाहिलं. पण काहीच दिसलं नाही.
“आम्ही रात्रभर असेच बसलो होतो. मी रडत होते. माझी मुलं कुठे असतील, त्यांनी काय खाल्लं असेल? सकाळी सहानंतर माझ्या नवऱ्यानं पुन्हा जाऊन पाहिलं. त्यांनी टाकीत एक काठी टाकून पाणी हलवलं. तेव्हा माझा मोठा मुलगा दिसला. माझा अंकुश.. मग माझा धाकटा अर्जुन, माझा ‘पापाली’.. ”
हुंदके देत सोनू सांगतात.
महापालिकेवर हलगर्जीपणाचा आरोप
या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि तपास सुरू आहे.
दुर्घटना घडल्यानंतर आता उद्यानाच्या कंपाऊंडची उंची वाढवली आहे आणि टाकीवरही झाकणं लावली आहेत. हे आधी केलं असतं, तर दोन जीव गेले नसते असं आसपास राहणारे प्रेम सांगतात.
“ही टाकी ताडपत्रीनं फक्त झाकली होती. त्याला झाकण लावलं नव्हतं. टाकीचा फारसा वापरही होत नव्हता, मग तिच्यात पाणी का भरून ठेवलं होतं?”
काही आठवडे आधीच वडाळा सिटिझन्स फोरमनं या उद्यानाच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केला होता असंही समोर आलं आहे.
उद्यानाची भिंत कमी उंचीची असल्यानं कुणीही कधीही आत जाऊ शकतं, इथे रात्रीचे लाईट्सही नसतात असं त्यांचं म्हणणं होतं.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याविषयी विचारल्यावर निधीची कमतरता असल्याचं त्यांनी सांगितलं असं वडाळा सिटिझन्स फोरमनं म्हटलं आहे.
तर महापालिका अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की एका कंत्राटदाराकडे उद्यान सांभाळायची जबाबदारी दिली होती आणि घडल्या प्रकारासाठी कोण जबाबदार आहे याची चौकशी होते आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं काय म्हटलं?
मुंबई उच्च न्ययालयानं या घटनेचं माध्यमांतलं वृत्त वाचून स्वतःहून दखल घेतली आणि महापालिकेला नोटीस बजावली.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने महापालिकेला प्रश्न विचारले आहेत की, मुंबईत मानवी जीवनाची किंमत काय आहे? अर्थसंकल्पीय मर्यादा किंवा निधीची कमतरता हे नागरी कामांदरम्यान किमान सुरक्षा उपलब्ध करण्यातील अपयशाचे कारण असू शकते का?
रेल्वे किंवा महापालिकेच्या आखत्यारीतील बेस्ट बस सुविधेत दुर्घटनांनंतर नुकसान भरपाई दिली जाते, याचा उल्लेख करत न्यायालयानं म्हटलं आहे की महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघात किंवा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास महापालिकेची कोणतीही जबाबदारी असू शकत नाही हे अनाकलनीय आहे.’
झोपड्यांवर कारवाई
हे प्रकरण न्यायालयात असतानाच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथल्या झोपड्यांवरच कारवाई केली.
कनू सांगतात, “लगेच येऊन त्या लोकांनी झोपडे तोडले, इथे आम्ही मंदिर केलेलं ते पण तोडलं. सगळ्या झोपडपट्टीची वाट लावली. लवकर लवकर भिंत बांधली आणि लवकर लवकर टंकीवर ढक्कन लावून पण दिला.
“मोठ्या मोठ्या बिल्डिंगवाल्याची पोरं पण गार्डनमध्ये खेळायला येतात. गार्डनच्या बाजूलाच टंकी आहे. मोठ्या माणसांचे पोर गेले असते तर काय झाला असता? त्यांची वरपर्यंत पोहोच असते, आम्ही काय करणार?”
या कारवाईचा तक्रारीशी संबंध नसल्याचां महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं आहे.
पण महापालिकेविरुद्ध तक्रार केल्यामुळे आपल्या झोपड्या पाडल्या, असं तिथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. ही झोपडपट्टी वीस वर्षांपासून इथेच आहे आणि त्यातले काहीजण तीस-चाळीस वर्षांपासून वडाळ्यात राहात आहेत असंही ते सांगतात.
आता उच्च न्यायालयानं मुंबईला हाही प्रश्न विचारला आहे की, कारवाई करणं आधीच ठरलं होतं का आणि त्याची नोटीस दिली होती का?
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे, “हे लोक बेकायदेशीपणे इथे राहात होते का यानं फरक पडत नाही. माणसाचा जीव जातो, हा आमच्यासाठी चिंतेचा मुद्दा आहे.”
आता संबंधित अधिकाऱ्यांवर लवकर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
अंकुश-अर्जुनची आत्या-आजी कनू सांगतात, “काही नाही मागत का आम्हाला बंगला द्या, गाडी द्या. आमची पोर तर नाही आणू शकत. पण हक्क द्यायला पाहिजे, इन्साफ द्यायला पाहिजे. बस एवढं बोलते मी.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)