मुलीला गाडीनं धडक दिली, उपचारासाठी पैसे गोळा करण्याची वेळ

बिहारच्या शिव नंदन पाल (वय 47 वर्षे) हल्ली नोएडामध्ये पैसे गोळा करत आहेत, जेणेकरून त्यांच्या मुलीवर उपचार केले जाऊ शकतील.

शेतात मजुरी करणाऱ्या शिव नंदन यांनी कर्ज घेऊन स्वीटी कुमारी (वय 22 वर्षे) आपल्या एकुलत्या एका मुलीला बी-टेकचं शिक्षण दिलं. त्यांना आशा होती की, मुलगी इंजनिअर होईल आणि आपल्या घराची स्थिती सुधारेल.

मात्र, सात दिवसांपूर्वी (31 डिसेंबर) शिव नंदन पाल यांच्या या आशावादावर पाणी फेरलं गेलं.

“31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता स्वीटीच्या मित्राचा फोन आला की, स्वीटीची तब्येत बिघडलीय आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. आम्ही ट्रेन पकडून इथं आलो. इथे आलो तर माझी मुलगी...,” एवढं बोलून शिव नंद पाल यांचा आवाज जड झाला आणि डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.

स्वीटी ग्रेटर नोएडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बी-टेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेत होती. 31 डिसेंबरच्या रात्री नऊ वाजता बाजारातून सामान घेऊन दोन मैत्रिणींसोबत घरी परतत होती, तेव्हा एका सँट्रो कारनं तिघांनाही मागून धडक दिली.

या अपघातानंतर घटनास्थळावर उपस्थित लोकांनी तिघांनाही दिल्लीजवळील ग्रेटर नोएडाच्या कैलाश हॉस्पिटलला नेलं. स्वीटीची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली होती. तर स्वीटीच्या इतर दोन मैत्रिणी, अरुणाचल प्रदेशच्या करसोनी डोंग (वय 21 वर्षे) आणि मणिपूरच्या अंगानबा (वय 21 वर्षे) यांना किरकोळ दुखापत झाली होती.

करसोनी डोंग सांगते, “आम्ही किराणा सामान घेऊन घरी परतत होतो. रस्त्याच्या अगदी कडेनं चाललो होतो. त्यावेळी अचानक ही दुर्घटना घडली.”

दुर्घटनेनंतर पोलीस जसे वागले, त्यामुळे करसोनी नाराज आहे. ती म्हणते, “एवढे दिवस झाले, तरी पोलीस शोधू शकले नाहीत की, त्या सँट्रो कारमध्ये कोण होते. आम्ही विचारलं की, ते सांगतात, तपास सुरू आहे.”

पोलिसांच्या हाती धागेदोरे का लागत नाहीत?

या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झालीय? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 पोलीस ठाण्याचे प्रभारी अंजनी कुमार सिंह यांच्याशी बातचीत केली.

अंजनी कुमार यांनी सांगितलं की, “ज्या मार्गावर ही दुर्घटना घडली, तिथं सीसीटीव्ही लावलेला नव्हता. अर्धा किलोमीटर पुढे-मागे कुठलाच कॅमेरा नाहीये. चौकातही कॅमेरा नाहीये. त्यामुळे मदत मिळत नाहीये. जर ही दुर्घटना दिवसा झाली असती, तर लोकांशी बोलता आलं असतं. मात्र, ही घटना रात्रीची असल्यानं आतापर्यंत काहीच हाती लागलं नाही.”

स्वीटीसोबत दुर्घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. भारतात रस्त्यांवर सर्वाधिक अपघात संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडतात.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये जवळपास 4 लाख 12 हजार रस्ते अपघात झाले, ज्यात 20.7 टक्के (85,179) अपघात संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेत.

‘FIR नोंदवतानाही अडचणी’

पोलीस स्टेशन प्रभारी अंजनी कुमार म्हणतात की, “या रस्त्यावर कॅमेरा लावण्यासाठी ग्रेटर नोएडा अथॉरिटीला गेल्या दोन वर्षांपासून कितीतरी पत्रं लिहिली. मात्र, त्यावर त्यांनी पुढे काहीच केलं नाही.”

अंजनी कुमार यांच्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात एक पाऊलही पुढे टाकलं नाहीय. सध्यातरी पोलिसांकडे केवळ एवढीच माहिती आहे की, धडक देणारी कार पांढऱ्या रंगाची सँट्रो कार होती.

पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे स्वीटीच्या कॉलेजचे मित्रही नाराज आहेत. ते आरोप करतायेत की, “सर्वात आधी FIR सुद्धा नोंदवून घेतला जात नव्हता आणि नंतर पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की, हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये कारवाईच्या नावे फार काही करता येत नाही.”

भारतात 2021 साली रस्ते अपघातात जवळपास 14 टक्के (57,415) प्रकरणं हिट अँड रनची होती. या प्रकरणांमध्ये 25 हजार 938 लोकांचा मृत्यू झाला आणि 45 हजार 355 लोक जखमी झाले.

तज्ज्ञांच्या मते, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू मागून बसलेल्या धडकेनं झाली आहेत.

पैसे गोळा करून उपचार करत आहे कुटुंब

या प्रकरणात पोलिसांचा तपास जरी रेंगाळत चालला असला, तरी दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे स्वीटीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर म्हणतायेत.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, जवळपास पाच दिवस कोमात राहिल्यानंतर स्वीटी आता शुद्धीत येऊ लागलीय. मात्र, अजूनही तिला पूर्णपणे शुद्ध आलेली नाहीय.

या पाच दिवसात स्वीटीच्या डोक्यावर झालेल्या दुखापतीवर दोन सर्जरी झाल्या. तिच्या दोन्ही पायातही फ्रॅक्चर आहे, ज्यावर आता उपचार सुरू आहेत.

कैलाश हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर डिपार्टमेंटचे प्रमुख आर. के. सिसोदिया म्हणतात की, “स्वीटीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. मात्र, हे निश्चित नाहीय की, उपचार किती लांबत जाईल. स्वीटीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झालीय. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र, पुढचे काही दिवस महत्त्वाचे असतील.”

स्वीटीच्या उपचारावर गेल्या पाच दिवसात पाच लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. उपचार जेवढा लांबत जाईल, तेवढा खर्च वाढत जाईल. स्वीटीचं कुटुंब या उपचारखर्चामुळेही काळजीत आहे.

स्वीटीचे वडील शिव नंदन पाल शेतमजूर आहेत आणि एवढी बचतही नाही की, स्वीटीच्या उपचारावर खर्च केला जाऊ शकेल. अशावेळी स्वीटीचे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी पैसे गोळा करत आहेत.

ANI च्या माहितीनुसार, नोएडाचे डीसीपी अभिषेक वर्मा यांनी सांगितलं की, “31 डिसेंबरला स्वीटी कुमारी नावाची विद्यार्थिनी रस्ते अपघातात जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरू आहेत. नोएडा पोलीस आयुक्तालयाकडून सर्व पोलिसांचा एक दिवसाचा पगार, जो एकूण 10 लाख रूपये आहे, तो स्वीटीच्या उपचारासाठी दिला जाईल.”