You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य एल-1 : जेव्हा नासाच्या यानानं तळपत्या सूर्याला स्पर्श केला
चंद्रयान-3 च्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशन 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे.
इस्रोने Xवर पोस्ट करून सांगितलं आहे की, 'आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यासासाठीची पहिली अंतराळ मोहीम असेल. हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या मालिकेत असणाऱ्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती असणाऱ्या परिघात पाठवलं जाईल, जे पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
हे यान सात पेलोड्स घेऊन जाईल जे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वांत बाहेरील थराचा अभ्यास करेल.'
आतापर्यंत फक्त अमेरिकेची अंतराळ संस्था म्हणजेच नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांनी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आणि संयुक्त अशा अंतराळ मोहिमा पाठवल्या आहेत.
नासाने सूर्याच्या अभ्यासासाठी आत्तापर्यंत SOHO (सोलर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा), पार्कर सोलर प्रोब आणि IRIS (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ) या तीन मुख्य मोहिमा पाठवल्या आहेत.
याशिवाय, NASA ने S , Wind , Hinode, Solar Dynamics Observatory आणि STEREO यासह इतरही अनेक सूर्य मोहिमा पाठवल्या आहेत .
SOHO मोहीम नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे प्रक्षेपित केली होती.
पार्कर सोलर प्रोब चार वर्षांपासून सूर्याच्या पृष्ठभागाच्या सर्वांत जवळ परिभ्रमण करत आहे.
IRIS (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ) सूर्याच्या पृष्ठभागाचे हाय रिझोल्यूशन असणारे फोटो घेत आहे.
नासाचं पार्कर सोलर प्रोब हे आतापर्यंतच्या सूर्याच्या अभ्यासातील सर्वात मोठं मैलाचा दगड ठरलं आहे, जे सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचणारं एकमेव अंतराळयान आहे.
सूर्याशी संबंधित काही खास मोहिमा आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
नासाची पार्कर सोलर प्रोब
14 डिसेंबर 2021 नासाने जाहीर केलं की पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या वरच्या थरामधून म्हणजेच कोरोना मधून गेला होता.
या अंतराळ यानाने सूर्याच्या कणांचा अभ्यास केला आणि चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भातली माहिती पाठवली होती.
सूर्याच्या एवढं जवळ जाणारे हे पहिलेच अंतराळयान असल्याचा दावा नासाने केला आहे.
पार्कर सोलर प्रोबची रचनाच अशा प्रकारे केली गेली आहे की हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 6.5 लाख किलोमीटरच्या त्रिज्येत जाऊ शकतं जेणेकरून ते सूर्याचा ऊर्जा प्रवाह आणि 'सौर वादळं' (सौर प्रवाह) यांचा शोध लावू शकेल.
यासोबतच सूर्याच्या कोरोना थराजवळ जाऊन अभ्यास करणं हे या यानाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
हेलिओफिजिक्सच्या मध्यवर्ती प्रश्नाचं उत्तर शोधणे हा त्याचा उद्देश आहे: सतत बदलणार्या अंतराळाच्या परिस्थितीत सूर्य सूर्यमालेचं कसं नियंत्रण करतो या प्रश्नाचं उत्तर या यानाला शोधायचं आहे.
नासाच्या म्हणण्यानुसार, पार्कर सोलर प्रोब हे यान 2018 मध्ये अंतराळात सोडण्यात आलं आणि त्यानंतर केवळ तीन वर्षांनी त्या यानाने त्याचं उद्दिष्ट साध्य केलं होतं.
नासाचं असं म्हणणं आहे की यानाने 28 एप्रिल 2021 रोजी त्याचे आठवे फ्लायबाय (सूर्याजवळचे उड्डाण) केलं आणि याचदरम्यान हे यान कोरोना थरातही जाऊन आलं होतं.
या मोहिमेमध्ये मिळालेल्या डेटावरून असं दिसून येतं की सौर वाऱ्यातील कर्ण आकार, ज्यांना स्विचबॅक असं म्हणतात, ते अपवादाने तयार होणारे आकार नसून अगदी सामान्य आहेत.
अनेक दशकांपासून, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की हे आयताकृती आकार केवळ सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशातच तयार होत होते पण या यानाने पाठवलेल्या माहितीमुळे हे आकार नेमके कुठून येतात? असा प्रश्न निर्माण झालाय.
नासा मुख्यालयातील पार्कर मोहिमेच्या प्रमुख जोसेफ स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार, "आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पार्कर सोलर प्रोबला सूर्याच्या इतक्या जवळ नेण्यात आणि ते परत आणण्यात यश आलं हे अतिशय रोमांचक आहे."
ते म्हणाले की, "येणाऱ्या काळात हे यान सूर्याच्या आणखीन जवळ जाईल तेंव्हा नेमकी काय माहिती पाठवू शकेल याची आम्ही वाट बघत आहोत."
शास्त्रज्ञांना आशा आहे की ही नवीन माहिती शास्त्रज्ञांना सूर्याच्या त्या भागाचा अभ्यास करण्यास मदत करेल जो भाग कोरोनाच्या अतिउष्णतेसाठी जबाबदार आहे आणि ज्या भागातून सौर वारा सुपरसॉनिक वेगाने फेकला जातो.
यांसारख्या अभ्यासातून अंतराळातील अतिशय कठीण वातावरणाला समजून घेण्यात आणि त्याविषयीचा भविष्यातील अंदाज लावण्यात मदत होऊ शकते. या वातावरणातील बदलांचा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवर आणि दूरसंचार यंत्रणेवर परिणाम होत असतो.
युरोपियन अंतराळ संस्थेचा सोलर ऑर्बिटर
युरोपियन स्पेस एजन्सीने नासाच्या मदतीने हे सोलार ऑर्बिटर तयार केलं आहे. त्याचा उद्देश हेलिओफिजिक्सचा सविस्तर अभ्यास करणं हा आहे.
9 फेब्रुवारी 2020 रोजी या यानाचं अंतराळ प्रक्षेपण करण्यात आलं आणि आता पुढची सात वर्षं हे यान काम करणार आहे.
सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक तृतीयांश अंतर कापून हा सोलर ऑर्बिटर 30 मार्च 2022 सूर्याच्या जवळ गेला आणि त्याने एक व्हीडिओ बनवला. हा व्हीडिओ युरोपीय अंतराळ संस्थेने प्रकाशित केला आहे.
या संस्थेने असं सांगितलं आहे की हा व्हीडिओ सूर्याच्या दक्षिण ध्रुवाजवळचा आहे.
हे यान साधारणपणे सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या एक चतुर्थांश अंतरावर फिरत असतं.
हे फोटो सूर्याच्या दक्षिण ध्रुवावरून एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट इमेजर (EUI) ही लेन्स वापरून 17 नॅनोमीटरच्या वेव्हलेन्थवरून घेण्यात आले आहेत, अशी माहिती युरोपीय स्पेस एजन्सीने दिली आहे.
युरोपिय अंतराळ संस्थेच्यामते, सूर्याच्या ध्रुवावर अनेक वैज्ञानिक रहस्यं दडलेली असू शकतात.
सूर्यापासून निर्माण होणारी चुंबकीय क्षेत्रं अगदी थोड्या काळासाठी एक अत्यंत तीव्र प्रभावक्षेत्र निर्माण करतात आणि सूर्याच्या ध्रुवांमध्ये अशी क्षेत्र अल्पावधीतच नाहीशी होतात.
यामुळे ही चुंबकीय क्षेत्रं बंद होतात आणि ऊर्जेचे कण बाहेर निघू शकत नाहीत.
मात्र यामधून अतिशय शक्तिशाली अतिनील किरणं उत्सर्जित होतात आणि या किरणांची नोंद घेण्यासाठी या यानाला विशेष पद्धतीने डिजाईन करण्यात आलेलं आहे.
हा सौर ऑर्बिटर 2025 मध्ये शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून त्याची कक्षा थोडीशी झुकवेल जेणेकरून या अंतराळ यानाची उपकरणं सूर्याच्या ध्रुवांचा सविस्तर अभ्यास करू शकतील.
हे यान सूर्याची तीव्र उष्णता सहन करण्यास सक्षम आहे.
यामुळं सूर्याच्या आतल्या भागांचा अभ्यास करून माणसाच्या सूर्याबद्दलच्या ज्ञानात भर टाकली जाऊ शकेल. तसंच पृथ्वीवर जीवन ज्या घटकांमुळे शक्य झालं आहे अशा सूर्यावरल्या घटकांचा अभ्यास करता येऊ शकेल याचसाठी ही मोहीम आखण्यात आलेली आहे.
युरोपियन अंतराळ संस्थेचं असं म्हणणं आहे की हा पहिला उपग्रह आहे जो सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशांचे अगदी जवळून फोटो घेऊ शकेल.
सोलर ऑर्बिटर सौर वादळ निर्मितीच्या प्रक्रियेचा बारकाईने अभ्यासही करू शकेल.
सूर्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी
नासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सूर्य हा आपल्या सौरमालेच्या मध्यभागी असलेला एक हायड्रोजन आणि हेलियमचा चमकणारा तारा आहे आणि सूर्याचं वय सुमारे 4.5 अब्ज वर्षं इतकं आहे.
आपल्या सौरमालेतील हा सगळ्यांत मोठा तारा आहे आणि सूर्य पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किलोमीटर लांब आहे.
पृथ्वीच्या आकारापेक्षा 13 लाख पट सूर्याचा आकार मोठा आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच संपूर्ण सौरमालेतील ग्रह त्याच्याभोवती परिभ्रमण करत आहेत.
असंही म्हणता येऊ शकेल की सूर्याभोवती फिरणाऱ्या मोठ्यात मोठ्या ग्रहांपासून ते अंतराळ यानाच्या कचऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला सूर्याच्या कक्षेत ठेवण्याचं काम हे सूर्याचं गुरुत्वाकर्षण करत असतं.
सूर्याच्या केंद्रस्थानी सूर्य सगळ्यांत जास्त तापलेला असतो, तेथील तापमान सुमारे दीड कोटी अंश सेल्सिअस इतकं असतं.
सूर्यापासून चार्ज झालेले कण मोठ्या वेगाने अंतराळात सोडले जातात, यामुळे संपूर्ण सौरमालेच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो.
सूर्यापासून निघणारा प्रकाश 15 कोटी किलोमीटर लांब असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी आठ मिनिटं लागतात.
सूर्याचा पृष्ठभाग पृथ्वीसारखा घन नसल्यामुळे हा हायड्रोजन आणि हेलियमच्या घनरूप वायूंचा गोळा आहे. त्यामुळे त्याचा वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो.
सूर्य हा प्लाझ्मा नावाच्या अत्यंत गरम आणि चार्ज झालेल्या कणांच्या वायूपासून बनलेला आहे.
हा प्लाझ्मा पृथ्वीवरील 25 दिवसांमध्ये सूर्याच्या भूमध्य रेषेभोवती एक चक्कर मारतो, आणि ध्रुवांभोवती एक वर्तुळ पूर्ण करण्यास 36 दिवस लागतात.
सूर्याभोवती फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोना अशी आवरणं असतात. या आवरणांमध्ये होणाऱ्या अणुस्फोटांमुळे निघणारे कण पृथ्वीवर पोहोचतात.
सूर्याभोवती धुळीची अनेक वर्तुळं आहेत, ज्यांना सोलर डस्ट रिंग्स म्हणतात, ज्यावरून असा अंदाज लावला जातो की 4.6 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला तयार झाली तेव्हा सूर्याभोवती वायूची एक चकती असावी.
सूर्यावर होणाऱ्या अणुस्फोटांमुळं वायू बाहेर फेकला जातो. यामुळेच सूर्य एका बिंदूमध्ये सामावून राहू शकत नाही.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)