You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रयान-3 : प्रज्ञान रोव्हर नेमकं कसं काम करेल? 5 मुलभूत प्रश्नांची उत्तरं
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान-3 यशस्वीपणे उतरलं आहे. अंतराळ क्षेत्रात भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून यासोबतच या मोहिमेची तिन्ही उद्दिष्टे आता पूर्ण झाली आहेत.
चंद्रावर पोहोचल्याबद्दल जगातील अनेक देशांनी भारताचं अभिनंदन केलंय.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचं अभिनंदन करतांना म्हटलं की,"चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती दाखवतं."
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनीही इस्रोचे अभिनंदन केलं आहे.
हा क्षण भारतासाठी खूपच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे. ते म्हणाले की, "चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचणं ही इस्रोने केलेली अत्यंत मोठी कामगिरी आहे. इस्रोचे अध्यक्ष श्री. सोमनाथ यांच्यासह तरुण शास्त्रज्ञांचा जल्लोष मी पाहत आहे. अशी स्वप्नं बघणारी तरुण पिढीच जग बदलू शकते. शुभेच्छा."
चंद्रयानाने यशस्वी लँडिंग केलेलं असलं तरी आता जगाच्या नजरा त्या यानातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या प्रज्ञान रोव्हर या सहाचाकी गाडीवर असणार आहेत.
हा रोव्हर नेमकं कस काम करेल? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सापडतील? असे काही प्रश्न आम्ही शिव नाडर विद्यापीठातील प्राध्यापक आकाश सिन्हा यांना विचारले. स्पेस, रोबोटिक्स, एआय यांसारख्या क्षेत्रांचा आकाश सिन्हा यांचा अभ्यास आहे.
1. चंद्रावर उतरलेलं हे रोव्हर आता काय करेल?
प्रत्येक मानवरहित अंतराळ मोहिमेचे निष्कर्ष हे रोव्हर किंवा रोबोट यांच्याकडूनच येत असतात.
चंद्रयान-3 मिशन आता पूर्ण झालंय, भारत चंद्रावर पोहोचलाय. आता पुढे काय होणार?
तर आता रोव्हरचं खरं काम सुरु होतंय.
चंद्रावरील नमुने गोळा करून, चंद्रावर फिरून आणि पृथ्वीवर माहिती पाठवण्यासाठी हा रोव्हर अतिशय हुशारीने तयार करण्यात आला आहे.
2. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर नेमका कसा फिरेल?
हा रोव्हर ड्रायव्हर नसलेल्या एखाद्या कारसारखा आहे. त्यामुळं आता चंद्रावर फिरण्याची जबाबदारी त्याच्यावरच असणार आहे.
चंद्रावर फिरत असताना समोर एखादा खड्डा आहे की नाही? दगड आहे की नाही? रस्त्यात आलेला तो अडथळा तो रोव्हर ओलांडू शकेल की नाही या सगळ्याचा निर्णय या रोव्हरमध्ये लावण्यात आलेल्या स्वयंचलित यंत्रणेला स्वतःचा स्वतःच घ्यायचा आहे.
हे असे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी, रोव्हरवर दोन स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. याच कॅमेऱ्यांच्या मदतीने हा रोव्हर समोर आलेल्या अडथळ्यांचे थ्रीडी प्रारूप बनवून, चंद्रावर फिरतो.
3. रोव्हर नेमक्या कोणत्या गोष्टींचा शोध घेईल?
चंद्रावर पाणी शोधण्याचं काम हे सगळ्यांत मोठं काम असणार आहे. यासोबतच काही दुर्मिळ गोष्टीही सापडू शकतात. युरेनियम, सोने किंवा कोणत्याही प्रकारचा दुर्मिळ धातू येथे सापडू शकतो.
अणुइंधन बनवण्यासाठी आवश्यक असणारं हेलियम-3 सापडण्याचीही शक्यता आहे.
ही सगळी कामं करण्यासाठी या रोव्हरमध्ये विशेष सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत.
4. रोव्हर पृथ्वीसोबत कसा संपर्क करेल?
पृथ्वीवर होणाऱ्या संपर्कासाठी इस्रोने यावेळी विशेष काळजी घेतली आहे.
रोव्हर, प्रपोर्शन आणि लॅन्डर या सगळ्यांवर मिळून एकूण दहा अँटीना लावण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हा रोव्हर चंद्रयान-3 सोबत तर संपर्क साधूच शकतो.
यासोबतच हा रोव्हर चंद्रयान-2 सोबतही संपर्क साधू शकतो. एवढंच नाही तर चंद्रावर उतरलेलं लॅन्डरदेखील या दोन्ही चंद्रयानांसोबत संपर्क करू शकतं.
पृथ्वीवरील इस्रोच्या स्थानकाशीही ते रोव्हर थेट संपर्क साधू शकतं.
संपर्क साधण्याचे असे अनेक मार्ग असल्यामुळे संवाद तुटण्याची शक्यता खूपच कमी केली गेली आहे.
5. रोव्हरसोबत भारतीय तिरंगाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेला आहे का?
भारताने 2008 सालीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज रोवला होता. 2008 मध्ये चांद्रयान-1 ने इम्पॅक्ट प्रोब प्रक्षेपित केला होता, जो जवळजवळ दक्षिण ध्रुवावर धडकला होता.
त्यात एक स्पेक्ट्रोमीटर देखील लावण्यात आला होता आणि याच स्पेक्ट्रोमीटरने या भागात पाण्याचे कण असल्याची पुष्टी केली होती.
तसेच तो प्रोब भारताच्या तिरंग्याचालाही तिथे सोबत घेऊन गेलेला होता. यावेळी रोव्हरने तिरंगा सोबत नेलेला नसला तरी एक विशेष तयारी मात्र केली गेलीय.
रोव्हरच्या दोन्ही चाकांमध्ये एक शिक्का बसवण्यात आलेला आहे. या शिक्क्यावर एका बाजूला भारताचं राष्ट्रचिन्ह तर दुसऱ्या बाजूला इस्रोचा लोगो लावण्यात आलेला आहे.
सगळ्यांत भारी गोष्ट चंद्रावर हवा नसल्यामुळे हे शिक्के कधीही पुसले जाणार नाहीत.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.