दक्षिण कोरियातील महिला का म्हणत आहेत, 'मला आई नाही व्हायचं'

    • Author, जीन मॅकेन्झी
    • Role, सेऊल वार्ताहर

सेऊल शहराच्या बाहेर एका अपार्टमेंटमध्ये येजिन एकटी आणि मजेत जीवन जगतेय. मंगळवारी पावसाळ्यातील एका दुपारी ती आपल्या मैत्रिणींसाठी दुपारच्या जेवणाची तयारी करतेय.

सर्वजण जेवत असताना त्यांच्यापैकी एकजण तिच्या फोनमधून डायनासोरसच्या कार्टुनचं एक मीम शोधून काढते. डायनासोरस म्हणतो, "सावध राहा”.

"आमच्यासारखं स्वतःला नामशेष होऊ देऊ नका."

सर्व महिला हसतात.

"हे गमतीदार आहे, परंतु खूप उपरोधिक आहे, कारण आम्हाला माहीत आहे की मानवजात नामशेष होण्यासाठी आम्ही स्वतःच कारणीभूत ठरू शकतो," असं टीव्ही निर्मात्या असलेल्या 30 वर्षीय येजिन म्हणतात.

ती किंवा तिची कोणतीही मैत्रीण मुलं जन्माला घालण्याचा विचार करत नाहीये. या महिला आता अशा समूहाचा भाग झाल्या आहेत ज्यांना स्वतःहून आपल्याला बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जगात सर्वांत कमी जन्मदर दक्षिण कोरियामध्ये आहे आणि वर्षानुवर्षे आश्चर्यकारकपणे हा जन्मदर घसरतच आहे.

बुधवारी (28 जानेवारी) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तो 2023 मध्ये आणखी 8 टक्क्यांवरून घसरून 0.72 वर आलाय.

एका महिलेलेनं तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म द्यायला हवा याच्याशी या आकडेवारीचा संबंध आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी ही संख्या 2.1 असायला हवी.

हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास 2100 पर्यंत कोरियाची लोकसंख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे.

'राष्ट्रीय आणीबाणी'

जागतिक स्तरावर विकसित देशांमध्ये जन्मदर कमी होताना दिसत आहे, परंतु दक्षिण कोरियासारखी टोकाची परिस्थिती कोणत्याही देशात नाही. त्याचे गंभीर अंदाज बांधले जात आहेत.

50 वर्षांच्या कालावधीत काम करणारी लोकसंख्या निम्म्यावर येईल, देशात अनिवार्य असलेल्या लष्करी सेवेत सामील होण्यासाठी पात्र असलेल्यांची संख्या 58% ने कमी होईल आणि जवळपास निम्मी लोकसंख्या 65 पेक्षा जास्त वयाची असेल.

देशाची अर्थव्यवस्था, निवृत्ती वेतन खर्च आणि सुरक्षिततेसाठी ही परिस्थिती इतकी बिकट आहे की राजकारण्यांनी "राष्ट्रीय आणीबाणी" घोषित केली आहे.

जवळपास 20 वर्षांपासून एकामागोमाग आलेल्या सर्व सरकारांनी या समस्येवर एकूण 379.8 ट्रिलियन दक्षिण कोरियन वॉन इतके पैसे खर्च केले आहेत.

ज्या जोडप्यांना मुलं आहेत त्यांना महिन्याला हाती रोख रक्कम देण्यापासून ते अनुदानित घरं आणि मोफत टॅक्सीच्या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.

शिवाय विवाहितांसाठी रुग्णालयाची बिलं आणि अगदी आयव्हीएफ उपचारांचाही यामध्ये समावेश आहे.

मात्र अशा आर्थिक सुविधासुद्धा कामाला आल्या नाहीत, त्यामुळे राजकारण्यांना अधिक "सर्जनशील" उपायांचा विचार करावा लागतोय, उदा. दक्षिण पूर्व आशियातून आयांना भाड्याने आणणं आणि त्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणं आणि पुरुषांना 30 वर्षांच्या आधी तीन मुलं असल्यास त्यांना लष्करी सेवेत सेवा करण्यापासून सूट देणं.

राज्यकर्ते आणि धोरणनिर्माते हे तरुणांचं आणि विशेषतः महिलांचं ऐकूनच घेत नाहीत असा एक सूर उमटतो. यात काही आश्चर्य नाही.

म्हणूनच गेलं वर्षभर आम्ही देशभर फिरलो, महिलांशी संवाद साधून त्यांना स्वत:ला मूल का होऊ द्यायचं नाहीए या निर्णयामागील कारणं समजून घेतली.

आपल्या विशीत असताना येजिनने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. सामाजिक नियमांच्या विरोधात उचललेलं हे एक मोठं पाऊल मानलं जातं. एकट्यानं आयुष्य जगणं हा दक्षिण कोरियात एक तात्पुरता टप्पा समजला जातो.

त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तिने लग्न न करण्याचा आणि मुलंही जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला.

"कोरियामध्ये घरातील कामं आणि मुलांची काळजी या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटून घेईल अशी व्यक्ती डेट करायला सापडणं अतिशय कठीण गोष्ट आहे," येजिन सांगते.

"आणि ज्या स्त्रिया एकल माता आहेत त्यांना योग्य वागणूक देखील दिली जात नाही."

2022 साली दक्षिण कोरियामध्ये विवाहबाह्य संबंधांतून जन्माला येणाऱ्या बाळांची संख्या फक्त 2% होती.

सतत काम, काम आणि पुन्हा काम

त्याऐवजी येजिनने तिच्या टीव्हीमधील कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. तिचं म्हणणं आहे की, कामाच्या व्यापामुळे तिला मूल वाढवण्यासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही. कोरियामध्ये कामाचे तास खूप जास्त आहेत.

येजिन एक 9-6 नोकरी (9-5 या कोरियन कामाच्या वेळेनुसार) करते परंतु तिचं म्हणणं आहे की तिला काम संपवून कार्यालयातून बाहेर पडायला रात्रीचे 8 वाजतात आणि त्याव्यतिरिक्त कधीकधी ओव्हरटाइमसुद्धा असतो. कामावरून घरी आल्यावर तिला फक्त घर स्वच्छ करायला किंवा झोपायच्या आधी व्यायाम करण्यापुरताच वेळ मिळतो.

"मला माझं काम आवडतं, त्यामुळे मला खूप समाधान मिळतं,” असं ती म्हणते. "परंतु कोरियामध्ये काम करणं कठीण आहे, तुम्ही कामाच्या निरंतन चक्रात अडकून जाता.”

येजिन म्हणते की कामात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि कौशल्यं विकसित करण्यासाठी दबाव असतो, त्यामुळे घरी गेल्यावर अभ्यास किंवा सराव करावा लागतो.

"कोरियन लोकांची अशी मानसिकता आहे की जर तुम्ही सतत स्वत: मध्ये सुधारणा घडवून आणली नाही तर तुम्ही स्पर्धेमध्ये मागे फेकले जाल आणि तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल. या भीतीमुळे तुम्ही आयुष्यात दुप्पट मेहनत करू लागता.

"सोमवारी कामावर जाण्यासाठी पुरेशी उर्जा मिळावी म्हणून कधीकधी आठवड्याच्या शेवटी सुट्टीच्या दिवशी जाऊन मी आयव्ही ड्रीप (सलाइन) घेते," ही गोष्ट ती इतक्या सहजपणे सांगते की, जणूकाही तिच्यासाठी ही सुट्टीच्या दिवशीची एक नियमित बाब आहे.

मी ज्या महिलांसोबत बोलले त्या सर्वांमध्ये एक भीती सामायिक होती आणि ती म्हणजे, जर त्यांनी मूल होण्यासाठी काम करणं बंद केलं तर त्या कदाचित पुन्हा काम करू शकणार नाहीत.

ती म्हणते, "कंपन्यांकडून एक छुपा दबाव कायम असतो की जेव्हा आम्हाला मुलं होतील तेव्हा आम्ही आमची नोकरी सोडली पाहिजे." तिची बहीण आणि तिच्या दोन आवडत्या वृत्त निवेदकांसोबत तिने हे घडताना पाहिलंय.

'कुटुंब आणि करिअर दोन्हीतून एक निवडावं लागतं'

एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेनं सांगितलं की, तिने असे लोक पाहिले आहेत ज्यांना नोकरी सोडण्यासाठी भाग पाडलं गेलंय किंवा प्रसूती रजा घेतल्यानंतर पदोन्नती दिली गेली नाही.

या गोष्टींमुळे आपल्याला कधीही मूल होऊ द्यायचं नाही याबाबत त्यांना खात्री पटली आहे.

पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांच्या मुलाच्या वयाच्या पहिल्या आठ वर्षांत एक वर्षाच्या रजेचा हक्क आहे. परंतु 2022 मध्ये 70% नव मातांच्या तुलनेत फक्त 7% नववडिलांनी त्यांच्या रजेचा पूर्णपणे वापर केला.

कोरियन स्त्रिया या OECD देशांमधील सर्वांत उच्च शिक्षित महिला आहेत, आणि तरीही देशात पुरूष आणि स्त्रियांच्या वेतनात खूप मोठी तफावत आहे आणि पुरुषांच्या तुलनेत सरासरीपेक्षा बेरोजगार महिलांचं प्रमाण जास्त आहे.

संशोधकांचं म्हणणं आहे की यावरून हे सिद्ध होतं की त्यांना व्यावसायिक स्पर्धेतून बाजूला सारलं जातंय - म्हणजेच एकतर नोकरी करा किंवा कुटुंब सांभाळा. बहुतांश महिला करिअरची निवड करताना दिसतात.

स्टेला शिन ही एक शिक्षिका आहे. लहान मुलांना ती इंग्रजी शिकवते. आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहत ती सांगते की ही 'मुलं किती गोड आहेत ना?' ती 39 वर्षांची आहे पण तिला स्वतःचं मूल नाही.

तिचं लग्न होऊन सहा वर्षं झाली आहेत, आणि तिला आणि तिचा नवरा, दोघांनाही एक मूल हवं होतं पण ते कामात इतके गुंतले होते की मूल कधी व्हावं याबाबत त्यांनी काहीच विचार केला नाही आणि त्यात हे सहा वर्षं निघून गेले.

मूल होऊ देण्याचा निर्णय अतिशय गुंतागुंतीचा असल्याचं तिच्या लक्षात आलं आहे.

"मुलांची पहिली दोन वर्षे पूर्णवेळ काळजी घेण्यासाठी आईला आपलं काम सोडावं लागतं आणि या गोष्टीचं मला खूप नैराश्य येतं,” असं ती म्हणाली. "मला माझं करिअर आवडतं. स्वतःची काळजी घेणं, आवडत्या गोष्टी करणं यात माझा वेळ चांगला जातो."

मोकळ्या वेळेत ती के-पॉपच्या डान्स क्लासला देखील जाते.

मूल झाल्यानंतर काही महिला दोन ते तीन वर्षांसाठी रजा घेतात. महिलांनी किमान रजा घेण्याचा दबाव देखील त्यांच्यावर असतो. बाळ झाल्यानंतर त्यांच्याकडून हीच अपेक्षा ठेवली जाते.

जेव्हा मी स्टेलाला विचारलं की तू आणि तुझे पती मिळून तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ शकत नाहीत का?

तेव्हा स्टेला माझ्याकडे दुर्लक्ष करत दुसरीकडे पाहू लागली.

ती म्हणाली, "जेव्हा मी त्याला ताटं घासायला सांगते तेव्हा तो ते काम व्यवस्थित करत नाही. मग तो इतक्या मोठ्या गोष्टीची जबाबदारी नीट पार पाडेल याबद्दल मला शंकाच वाटते."

याबरोबरच आणखी एक समस्या आहे ते म्हणजे घराच्या वाढत्या किमती. नोकरी, कुटुंब आणि करिअर अशी तारेवरची कसरत एखाद्याने करायची असं जरी ठरवलं तरी घर घेणं हे आवाक्याबाहेर झालं आहे. लहान मूल वाढवायचं असेल तर आधी चांगलं घर हवं असा विचार अनेक जण करतात त्यामुळे ही देखील एक समस्या बनली आहे असं तिला वाटतं.

अर्ध्याहून अधिक लोकसंख्या राजधानी सेऊलमध्ये किंवा त्याच्या आसपास राहते. बहुतेक संधी तिथेच असल्याने त्यामुळे अपार्टमेंट आणि साधनसंपत्तीवर प्रचंड ताण पडतो. स्टेला आणि तिचा नवरा हळूहळू राजधानीपासून दूर, शेजारच्या प्रांतात राहायला गेले आहेत आणि अजूनही त्यांना स्वतःची जागा विकत घेता आलेली नाही.

सेऊलचा जन्मदर 0.55 टक्क्यांवर घसरला आहे, जो देशातील सर्वांत कमी जन्मदर आहे.

शिवाय खासगी शिक्षणाचा खर्च आहे. परवडणारी घरं ही जागतिक समस्या असली तरी, याच गोष्टीमुळे कोरिया खरोखरच इतरांपेक्षा वेगळं आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून मुलांना गणित आणि इंग्रजीपासून ते संगीत आणि तायक्वांदोच्या अनेक महागड्या अतिरिक्त शिकवण्यांना पाठवलं जातं.

ही संस्कृती इतकी रूजलेली आहे की यासाठी मुलाची निवड न झाल्यास मुलाला अयशस्वी मानलं जातं आणि अति-स्पर्धात्मक कोरियामध्ये ही एक अतर्क्य बाब आहे. यामुळे दक्षिण कोरिया हा मुलाच्या संगोपनाच्या बाबतीत जगातील सर्वात महागडा देश बनला आहे.

2022 च्या अभ्यासात असं आढळून आलंय की, फक्त 2% पालकांनी खासगी शिकवणीसाठी पैसे दिले नाहीत, तर 94% लोकांनी सांगितलं की हा आर्थिक भार असह्य होतो.

एका क्रॅम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेली स्टेला हे ओझं खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. तिला दिसतंय की, पालक दर महिन्याला 700 पौंड (890 डॉलर) पर्यंत खर्च करतात, ज्यापैकी अनेकांना हा खर्च परवडत नाही.

"पण या वर्गांत घातलं नाही तर मुलं मागे पडतात," असं ती म्हणाली. "जेव्हा मी मुलांच्या आसपास असते, तेव्हा आपल्यालाही एक मूल असायला हवं असं वाटतं, परंतु मूल असल्यानंतर काय होतं याची देखील मला नीट कल्पना आली आहे."

खासगी शिकवणीच्या या पद्धतीने काही लोकांना एका दुष्टचक्रात ढकलले आहे.

"मिंजी" ला तिचा अनुभव सांगायचा होता, पण सार्वजनिकरित्या नाही. आपल्याला मूल नकोय, हे तिला तिच्या पालकांना कळू द्यायचं नाहीए. "त्यांना खूप धक्का बसेल आणि ते निराश होतील," असं ती म्हणाली. बुसान या किनारपट्टीच्या शहरात ती तिच्या पतीसोबत राहते.

तिचं बालपण आणि वयाची विशी खूप त्रासदायक होती, असं की सांगते.

"मी माझे संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवलंय," असं ती म्हणाली - प्रथम एका चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी, नंतर नागरी सेवांच्या परीक्षेसाठी आणि त्यानंतर 28 व्या वर्षी पहिली नोकरी मिळवण्यासाठी.

तिने खरंतर कलाकार होण्याचं स्वप्न पाहिलेलं पण तिची बालपणीची वर्ष रात्री उशिरापर्यंत वर्गात, गणितं सोडवण्यात गेली जे तिला अजिबात आवडायचं नाही आणि ज्यामध्ये तिला कुठलीही गती नव्हती.

"मला माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर फक्त एक सामान्य जीवन जगण्यासाठी अविरतपणे स्पर्धा करावी लागली आहे,” असं ती म्हणाली. "हे सर्व खूप थकवणारं आहे."

आता वयाच्या 32 व्या वर्षी मिन्जीला थोडं मोकळं झाल्यासारखं वाटतंय आणि आता ती आयुष्याचा आनंद घेतेय. तिला प्रवासाची आवड आहे आणि ती पोहायला शिकतेय.

पण ती असा विचार करते की आपण जे अतिशय वाईट स्पर्धात्मक आयुष्य जगतो त्याच अनुभवातून आपल्या मुलानेही जावं असं तिला वाटत नाही.

"कोरिया ही अशी जागा नाही जिथे मुलं आनंदाने राहू शकतात," या निष्कर्षाप्रत ती येऊन पोहोचली आहे. तिच्या नवऱ्याला एक मूल हवंय, आणि ते सतत त्याबद्दल भांडत असतात, पण त्याला तिची इच्छा मान्य आहे. ती कबूल करते की अधूनमधून ती संभ्रमात पडते, पण नंतर तिला जाणीव होते की हे का होऊ शकत नाही.

निराशाजनक सामाजिक समस्या

डेजॉन शहरातील जंग्यिओन चुन याला "एकल-पालक विवाह" म्हणते. तिच्या सात वर्षांच्या मुलीला आणि चार वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी परत आणल्यानंतर, तिचा नवरा कामावरून परत येईपर्यंत ती घराजवळच्या खेळाच्या मैदानात जाते. तो क्वचितच झोपण्याच्या वेळेपर्यत घरी पोहोचतो.

“मुलं जन्माला घालणं हा इतका मोठा निर्णय ठरू शकेल असं मला वाटलंही नव्हतं, मला वाटलं की मी काम संपवून लवकर परत येऊ शकेन,” असं ती म्हणाली.

परंतु लवकरच सामाजिक आणि आर्थिक ताण वाढायला लागले आणि आपल्या एकटीवरच पालकत्वाची जबाबदारी येऊन पडली आहे, याचं तिला आश्चर्य वाटू लागलं. ट्रेड युनियनमध्ये असलेले तिचे पती तिला मुलांच्या संगोपनात किंवा घरकामात कोणतीच मदत करत नाहीत.

"मला अतिशय राग यायचा,” असं ती म्हणाली. "मी सुशिक्षित आहे आणि स्त्रिया समान असल्याची शिकवण मला मिळालेय, त्यामुळे मी हे स्वीकारू शकले नाही."

ही गोष्ट सर्व समस्यांच्या केंद्रस्थानी आहे.

गेल्या 50 वर्षांत कोरियाची अर्थव्यवस्था वेगाने विकासित झालेय, महिलांना उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढवल्या जातायत, परंतु पत्नी आणि आईच्या भूमिकेत त्याप्रमाणे बदल झाले नाहीत.

जंग्यिओन हताश होऊन इतर मातांचं निरीक्षण करू लागले. “मला असं दिसतं, अरे, मुलांना वाढवणारी माझी मैत्रीणही माझ्याप्रमाणेच उदास आहे आणि ओळखीतली आणखी एक मैत्रीणदेखील उदासच आहे, अरे, ही तर एक सामाजिक समस्या आहे."

तिने तिचे अनुभव डूडल करून ते ऑनलाइन पोस्ट करायला सुरुवात केली.

“माझ्याकडून असंख्य गोष्टी सांगितल्या जात होत्या, असं ती म्हणाली. देशभरातील अनेक स्त्रियांची परिस्थिती तिच्यासारखीच असल्याने तिचं कार्टुन प्रचंड यशस्वी झालं आणि जंग्यिओन आता तीन कॉमिक पुस्तकांची लेखिका आहे.

'आता मी रागाची आणि पश्चातापाची अवस्था पार केली आहे', असं ती म्हणते.

"मुलांचं संगोपन करण्यासाठी नक्की काय गरजेचं आहे आणि मातांनी किती गोष्टी करण्याची अपेक्षा आहे याबद्दल मला अधिक माहिती आधीच मिळायला हवी होती, असं मला वाटतं.”

"स्त्रियांना आता मुलं नाहीये याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात या सर्व गोष्टींबद्दल बोलण्याची हिम्मत आहे."

पण जंग्यिओन आनंदी नाही, ती म्हणते की, स्त्रियांना ज्या दु:खद परिस्थितीत ढकललं जातंय, त्यामुळे त्यांना मातृत्वाचं सुख ख-या अर्थाने अनुभवता येत नाहीये.

पण एजन्सीत नोकरी मिळाल्याबद्दल मिंजी समाधानी आहे. “आमची पहिली पिढी आहे, ज्यांना ही निवड करण्याची संधी मिळाली आहे. याआधी असं ठरलेलंच होतं की, मुलं व्हायलाच हवीत. आणि आम्हाला निवडीचं स्वातंत्र्य असल्याने ती न होऊ देण्याचा निर्णय आम्ही घेतला.”

'मला जर शक्य असतं तर मी 10 मुलांना जन्म दिला असता'

येजिनच्या अपार्टमेंटमध्ये दुपारच्या जेवणानंतर, तिच्या मैत्रिणी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवत आहेत.

कोरियातील जीवनाला कंटाळून येजिनने न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतलाय. एके दिवशी पहाटे तिच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला की इथे राहण्याची तिच्यावर कुणीच सक्ती करत नाहीए.

लैंगिक समानतेच्या बाबतीत कोणते देश अग्रस्थानी आहेत याबाबत तिने संशोधन केलं आणि न्यूझीलंडचं नाव ठळकपणे समोर आलं. "हा असा देश आहे जिथे पुरुष आणि स्त्रियांना समान वेतन दिलं जातं.” हे अविश्वसनीय आहे आणि म्हणूनच मी तिथे जातेय,” असं ती म्हणाली.

मी येजिन आणि तिच्या मित्रांना विचारलं की, अशी कोणती एखादी गोष्ट आहे, जी तुमचे विचार बदलू शकेल.

मिनसंगच्या उत्तराने मी आश्चर्यचकित झाले. "मला मुलांना जन्म द्यायला आवडेल. मला जर शक्य झालं तर मी 10 मुलांना जन्म देईन," यावर मी विचारलं, मग कोणती गोष्ट तुला यापासून अडवतेय? यावर 27 वर्षांच्या त्या मुलीने मला सांगितलं की ती बायसेक्युअल आहे आणि तिची जोडीदार समलिंगी आहे.

दक्षिण कोरियामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता नाही आणि सामान्यपणे अविवाहित महिलांना गर्भधारणेसाठी इतर कुणाही शुक्राणू दात्यांचा वापर करण्याची परवानगी नाही.

"एक दिवस ही परिस्थिती बदलेल, अशी आशा आहे, आणि मी माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करू शकेन आणि मला मुलं होऊ शकतील,” असं ती म्हणते.

कोरियाच्या लोकसंख्येची विदारक परिस्थिती पाहता ज्या महिलांना मुलं हवी आहेत त्यांना आई होण्याची परवानगी नाही, या शोकांतिकेकडे तिच्या मैत्रिणीने लक्ष वेढलं.

परंतु राजकारणी हळूहळू संकटाची खोली आणि जटिलता स्वीकारत असल्याचं दिसतंय.

या महिन्यात, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी कबूल केलं की, समस्येतून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न “अपुरे पडले" आणि दक्षिण कोरियात “खूप मोठ्या प्रमाणात आणि विनाकारण स्पर्धात्मक" वातावरण आहे.

ते म्हणाले की, कमी जन्मदराकडे त्यांचं सरकार आता "संरचनात्मक समस्या" म्हणून बघेल. - तरीही याचं धोरणात कसं रूपांतर होईल हे बघावं लागेल.

या महिन्याच्या सुरुवातीला, मी न्यूझीलंडमधील येजिनशी संपर्क साधला, गेल्या तीन महिन्यांपासून ती तिथे राहतेय.

ती तिच्या नवीन आयुष्याबद्दल आणि मित्रांबद्दल आणि पबच्या किचनमधील नोकरीबद्दल भरभरून बोलत होती. ती म्हणाली, “माझ्या कामाचं आणि रोजच्या जगण्याचं संतुलन कैक पटीने सुधारलंय. आता ती आठवड्याच्या मधल्या कोणत्याही वारी मित्रांना भेटायला जाऊ शकते.

"मला कामाच्या ठिकाणी खूप आदर दिल्यासारखं वाटतं आणि आणि लोकं तुमच्याबद्दल खूप तर्कवितर्क लावतात,” असं ती म्हणते.

“यामुळे मला घरी परत जाण्याची इच्छा होत नाही."