You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं डोळे वटारले तरी उत्तर कोरियाच्या 'पापण्या' जगभरात कशा विकल्या जात आहेत?
अमेरिकेसोबतचे ताणले गेलेले संबंध आणि आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करत असलेला उत्तर कोरिया आता एका नव्या कारणानं चर्चेत आहे.
इथं बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम पापण्या (नकली पापण्या) आणि विग (नकली केस) जगभरातील दुकानांमध्ये विकल्या जात आहेत. पण त्यांना ‘मेड इन नॉर्थ कोरिया’ असा टॅग लागलेला नसून ‘मेड इन चायना’ असा टॅग लागलेला आहे.
या व्यवसायामुळे उत्तर कोरियाची निर्यात वाढली असून त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या बातमीनुसार, उत्तर कोरियामध्ये बनवल्या जाणाऱ्या बनावट पापण्यांचे प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग शेजारील चीनमध्ये केले जात आहे. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.
बातमीत असंही म्हटलंय की, या व्यवसायाच्या माध्यमातून किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाचे सरकार स्वतःवर लादलेल्या निर्बंधांना मागे सारत देशासाठी आवश्यक परकीय चलन कमावत आहे.
रॉयटर्सनं या बातमीवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे अधिकारी, चीनमधील दूतावास आणि दान्दोंग येथील वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला. पण आजपर्यंत संस्थेला कुठूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने चीन आणि उत्तर कोरियाचं वर्णन ‘चांगले शेजारी’ असं केलं आहे.
त्यांनी म्हटलंय, “या दोन देशांमध्ये सामान्यपूर्ण आणि सहकार्याचे संबंध आहेत, जे पूर्णपणे कायदेशीर आहेत. त्याबाबत अतिशयोक्ती करू नये."
बातमीत काय म्हटलंय?
या बातमीदरम्यान, जवळपास 20 लोकांशी चर्चा केली आणि त्यापैकी किमान 15 पापण्यांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, असं रॉयटर्सचं म्हणणं आहे.
उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या व्यावसायिक वकील आणि तज्ज्ञांशीही त्यांनी चर्चा केली आहे.
या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, चिनी कंपन्या बनावट पापण्यांचा कच्चा माल उत्तर कोरियातून आयात करतात, त्यावर प्रक्रिया करून चीनमध्ये पॅकेज करतात, त्यावर 'मेड इन चायना'चा टॅग लावतात आणि पुढे निर्यात करतात. गेल्या काही वर्षांत, या अशा प्रक्रियेमुळे हे दोन्ही देश नफा कमावत आहेत.
बातमीनुसार, ही उत्पादनं पाश्चात्य देशांमधील सौंदर्य दुकानांमध्ये तसेच दक्षिण कोरिया आणि जपानच्या बाजारपेठांमध्ये विकली जातात.
व्हॉईस ऑफ अमेरिका (VOA) ने सप्टेंबर 2023 मध्ये दिलेल्या एका अहवालात म्हटलं होतं की, मेड इन चायना टॅग असलेले विग आणि बनावट पापण्या अमेरिकन स्टोअरमध्ये विकल्या जात आहेत आणि हे उत्तर कोरियावर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन असू शकतं. कारण यांचं उत्पादन प्रत्यक्षात उत्तर कोरियामध्येच केलं जातं.
VOA च्या कोरियन सेवेनं, चायना कस्टम्स ॲडमिनिस्ट्रेशनच्या डेटाचा हवाला देत म्हटलं होतं, चीननं एप्रिल 2023 मध्ये उत्तर कोरियाकडून 227 लाख डॉलरहून जास्त किमतीचे जवळपास 30 टन विग आणि बनावट पापण्या आयात केल्या होत्या.
उत्तर कोरिया आणि चीनमधील व्यापार
चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे.
काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सनुसार, 1950 ते 1953 दरम्यानच्या कोरियन युद्धात चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले. चीनने आपल्या या मित्राला मदत करण्यासाठी आपले सैन्य पाठवले.
पुढे उत्तर आणि दक्षिण कोरिया वेगळे झाल्यानंतरही चीन हा उत्तर कोरियाचा महत्त्वाचा मित्र राहिला.
पण 2006 मध्ये उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचणीनंतर चीनसोबतचे संबंध ताणले जाऊ लागले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाला चीनने सहमती दर्शवली.
दोन्ही देशांमधील तणाव वाढला आणि 2017 मध्ये, चीनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी उत्तर कोरियाला कोरियन द्वीपकल्पातील वाढता तणाव लक्षात घेऊन त्यांचे आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम स्थगित करण्यास सांगितलं.
पण, वांग यी यांनी केवळ उत्तर कोरियावरच टीका केली असं नाही. तर त्यांनी दक्षिण कोरियाला अमेरिकेकडून देशात क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसवून चूक केल्याचंही म्हटलं.
चीननं दक्षिण कोरियातून काही सौंदर्यप्रसाधनांची आयातही बंद केली होती.
व्यापार मात्र थांबला नाही
या सगळ्यात उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात कोणताही अडथळा आला नाही.
स्टाटिस्टाच्या आकडेवारीनुसार, 2000 ते 2021 दरम्यान उत्तर कोरियाचा चीनसोबतचा व्यापार सातत्याने वाढत आहे.
2000 मध्ये उत्तर कोरियाचा चीनसोबतचा परकीय व्यापार केवळ 24.4 % होता, 2018 मध्ये तो वाढून 95.8 % झाला.
कोरोनाच्या साथीमुळे उत्तर कोरियाने आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आणि 2020 मध्ये त्यात थोडीशी घट झाली. तरीही ते प्रमाण 88.2 टक्क्यांपर्यंत होतं.
दरम्यान 2023 मध्ये, पुन्हा एकदा दोघांमधील व्यापार वेगानं वाढू लागला आणि या वर्षी जानेवारीमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये 2.295 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता.
उत्तर कोरिया चीनला काय विकतो?
अमेरिकेच्या कोरिया इकॉनॉमिक इन्स्टिट्यूटचे फेलो ट्रॉय स्टॅनगरोन यांनी द डिप्लोमॅटवर प्रकाशित केलेल्या एका अहवालात लिहिलंय की, 2017 पूर्वी उत्तर कोरिया चीनला घड्याळ बनवणारी यंत्रं विकत नव्हता. पण 2018 मध्ये, त्याच्या निर्यातीतील सर्वात मोठा भाग हा घड्याळ बनवणाऱ्या यंत्रांचा समावेश होता.
याशिवाय त्याच्या निर्यातीत मोलिब्डेनम, फेरोसिलिकल, कपडे, बनावट विग आणि बनावट पापण्यांचा समावेश होता. पण 2019 पासून घड्याळ बनवणाऱ्या यंत्रांची निर्यात कमी होऊ लागली आहे, पण इतर घटकांची निर्यात सुरूच आहे.
2021 मध्ये, चीन सौंदर्य उत्पादनांचा जगातील सर्वात मोठा आयातदार ($13.2 अब्ज) होता, तर निर्यातीच्या बाबतीत, तो जगातील 7वा सर्वात मोठा निर्यातदार ($2.87 अब्ज) होता.
OEC ने नोव्हेंबर 2023 वर्षासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियामधून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सौंदर्य उत्पादनांमध्ये एकe वर्षापूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत 404 % वाढ दिसून आली आहे.
चीनच्या निर्यातीचा आलेख पाहिला तर नोव्हेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार, चीननं अमेरिका, जपान, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये सर्वाधिक सौंदर्य उत्पादनं निर्यात केली आहेत.
उत्तर कोरियावर निर्बंध
किम जोंग-उन यांना त्यांच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळू नये म्हणून अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना आपापल्या स्तरावर कायदे करून निर्बंध लागू करावे लागतात.
यामध्ये आर्थिक निर्बंध, मालमत्ता गोठवणे तसंच उत्तर कोरियाला तेल, कोळसा यासारख्या गोष्टींच्या निर्यातीवर आणि धातू, कोळसा, लोखंड इत्यादी गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आहेत.
उत्तर कोरियाच्या गरजा आणि प्रयत्न
2000 च्या दशकात, जेव्हा दक्षिण कोरियामध्ये सौंदर्य उत्पादनांचे उत्पादन आणि मागणी दोन्ही वाढत होते, तेव्हा किम जोंग-उन यांनी उत्तर कोरियामध्ये सौंदर्य उत्पादनांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिलं आणि देशात अनेक कंपन्या स्थापन केल्या.
2018 मध्ये उत्तर कोरियानं पहिल्यांदा चीनच्या सरकारी मीडिया द ग्लोबल टाईम्सला देशातील कॉस्मेटिक उद्योग पाहण्यासाठी आमंत्रित केलं. परदेशी मीडियाला त्यांनी आपल्या उद्योगाची ओळख करून देण्याची ही पहिलीच वेळ होती.
यातून उत्तर कोरिया आपल्या आर्थिक विकासात प्योंगयांग कॉस्मेटिक्स फॅक्टरी नावाच्या कंपनीला महत्त्वाचे स्थान देत आहे हे जगासमोर आणणे हाच उद्देश होता, असं उत्तर कोरियावर लक्ष ठेवणाऱ्यांनी सांगितलं.
कदाचित याच कारणामुळे 2015 आणि 2017 मध्ये किम जोंग-उन यांनी स्वतः या कंपनीला भेट दिली आणि तिच्या आधुनिकीकरणावर भर दिला.
ही कंपनी आंतरराष्ट्रीय ब्रँडशी स्पर्धा करू शकेल, अशी जागतिक दर्जाची उत्पादने बनवेल, असा दावा त्यांनी केला.
द स्ट्रेट टाईम्सच्या अहवालात म्हटलंय की, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सौंदर्य उत्पादनांच्या निर्यात मूल्यात मोठी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, नायगाटा विद्यापीठाचे प्राध्यापक मिमुरा मित्सुहिरो म्हणतात की, परकीय चलनाचा ओघ सुरू ठेवण्यासाठी आणि बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी उत्तर कोरियाकडे इतर वस्तूंच्या तुलनेत बनावट पापण्या आणि विगसारख्या वस्तूंची निर्यात वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसेल.
उत्तर कोरियावर लादलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे ज्यांच्या निर्यातीत अडथळा येणार नाही, अशा गोष्टींमध्ये पापण्या आणि विग यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्यातीत वाढ होण्याचे एक कारण हेही आहे, असंही ते सांगतात.
याच धर्तीवर 2019 मध्ये चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला होता.
त्यात म्हटलं होतं की, स्वत:वर लादलेल्या निर्बंधांमुळे उत्तर कोरिया अनेक वस्तू (रसायनं) आयात करू शकत नाहीये. म्हणून तो अशा सौंदर्य उत्पादनांची निर्मिती करत आहे ज्यामध्ये या रसायनांचा वापर टाळता येऊ शकतो.