जश्न -ए- रेख्ता : इस्मत चुगताई, उर्दू शायरी आणि ‘जय श्रीराम’ नामाचा गजर

@JashneRekhta

फोटो स्रोत, @JashneRekhta

फोटो कॅप्शन, शिंजिनी कुलकर्णी
    • Author, अंजुम शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, दिल्ली

दिल्लीतल्या गुलाबी थंडीत जश्न-ए-रेख्ताचा माहौल रंगला होता. हजारो कान आपल्या आवडत्या कवींना ऐकायला आसुसले होते.

बसायला जागा मिळत नाही म्हणून काय झालं, लोक मैदानातल्या तंबूबाहेर लावलेल्या एलईडी स्क्रीनसमोर उभे राहिले. त्यांच्या पायांना आज दुखण्याची तमा नव्हती कारण त्यांनी तहजीब हाफीचा शेर वाचला होता...

यूँ नहीं है कि फकत मैं ही उसे चाहता हूँ,

जो भी उस पेड की छाँव में गया, बैठ गया

ज्यांच्याकडे मफलर होते, त्यांनी मफलर अंथरले, काहींनी आपल्या अंगाला लपेटलेल्या शाली अंथरल्या आणि बसून घेतलं.

या तंबूबाहेरील मैदानावर सुद्धा आणखीन एक जश्न-ए-रेख्ताचा माहौल रंगायला सुरुवात झाली होती. काहीजण उभं राहण्यासाठी दोन पावलांची जागा शोधत होते, तर काहीजण एकमेकांना खेटून बसले होते.

सभोवार माणसांची अलोट गर्दी लोटली होती, आणि कानावर दाद दिलेले आवाज पडत होते. सगळं कसं रेख्ताच्या नावावर सुरू होतं. उर्दू भाषेचं जुनं नाव म्हणजे रेख्ता. 2015 सालापासून दरवर्षी रेख्ता फाउंडेशनतर्फे रेख्ताचा महोत्सव भरतो.

उर्दू भाषेशी संबंधित असलेल्या प्रत्येक शैलीचा उत्सव या तीन दिवसांत चालतो.

यावर्षी ते 2 ते 4 डिसेंबर दरम्यान रेख्ताचं आयोजन करण्यात आलं होतं. इथली गर्दी पाहिली की काही लोक याला सणाचा दर्जा देतील, पण रेख्ता एकप्रकारचं अनुष्ठान आहे. प्रत्येकाला या अनुष्ठानात सहभागी व्हायचंय.

'काश ऐसा कोई मंजर होता'

जश्न ए रेख्ता

फोटो स्रोत, @JashneRekhta

रात्रीचे 9 वाजले होते. गायक हरिहरन यांचा आवाज टिपेला पोहोचला होता. पण गाणं मध्येच थांबवत त्यांनी जमलेल्या गर्दीला विचारलं, तुमच्यातले किती जण गातात? यावर हजारोंच्या गर्दीतल्या निम्म्यांनी हात वर केले.

हरिहरन म्हणाले आता माझ्या मागून तुम्हीही गायला सुरुवात करा. हात वर केलेल्यांपैकी बरेच जण गाणं म्हणू लागले, पण शेवटी गाडी अडखळलीच. कारण हरिहरन यांनी एव्हाना खर्जात गायला सुरुवात केली होती. (खर्जात म्हणजे खालच्या पट्टीतले सूर) तिथल्या बऱ्याच जणांना तो सूर पकडता आलाच नाही.

माहौल अगदी ऐन रंगात आला होता, इतक्यात हरिहरन यांनी तू ही रे.......! गायला सुरुवात केली. गाण्याचे बोल ऐकून घराकडे निघालेली पावलं कार्यक्रमाच्या दिशेने माघारी वळली, जणू त्यांना 'तेरे बिना मैं कैसे जियूं' हे सांगायचं होतं.

रेख्तामध्येही रामाचं अस्तित्व...

जश्न ए रेख्ता

फोटो स्रोत, Jashn e Rekhta

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जश्न-ए-रेख्ताच्या महोत्सवात 'दास्तान-ए-राम' हे उर्दूमध्ये अनुवादित केलेलं नव्या शैलीतलं नाटक दाखवण्यात आलं.

दानिश इक्बाल आपल्याचच रेकॉर्डेड आवाजाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे राम आणि रावण सुद्धा लिपसिंगशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते.

पण दूरवर बसलेल्या प्रेक्षकांना सगळं काही लाईव्ह घडतंय हे दाखवून देण्यात रामलीलेतले हे कलाकार यशस्वी ठरले.

रामाच्या जयघोषाने कार्यक्रम राममय झाला होता. या घोषणा ऐकून एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे की काय असंच वाटत होतं.

पुढं रावणाचा वध झाला, अयोध्या दिव्यांनी उजळली, नाचगाणी झाली. अहो, एवढंच काय तर दिवाळी आहे असं म्हणत पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या पाहुण्यांना मिठाईचं वाटप सुद्धा झालं.

सरतेशेवटी कलाकारांची ओळख करून देण्यात आली. ही कथा एका मुस्लिम व्यक्तीने दिग्दर्शित केलीय असं जेव्हा पुकारलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

लोकांनी खुल्या मनाने कार्यक्रमाला दाद दिली होती. म्हणजे आपल्याला जे दाखवलं जातं ते खरंच असलं पाहिजे हे गरजेचं नसतं आणि यावर आता पक्का विश्वास बसला.

आपण आपल्याच डोळ्यांनी खात्री करावी. तिथल्या रामसाठी, रावणासाठी, हनुमानासाठी, तिथल्या प्रत्येक एका व्यक्तीरेखाला लोकांनी टाळ्यांच्या रुपात दाद दिली होती. शेवटी गर्दीतून आवाज आला... जय श्री राम. या घोषणांनी पूर्ण परिसर दुमदुमत होता.

जश्न ए रेख्ता

फोटो स्रोत, Anjum Sharma/BBC

...आणि ते म्हटले 'गालिब' कौन है?

गालिबच्या विषयावर शायर जावेद अख्तर आणि मुलाखतकार परवेज आलम यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. या मुलाखतीतून समोर आलेली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आजवर गालिबच्या नावावर बरेचसे शेर खपवण्यात आलेत.

साहजिकच हे ऐकून श्रोतेही हैराण झाले, कारण आजवर त्यांना जे गालिबचे शेर वाटायचे, ते गालिबचे कधी नव्हतेच. यांचा शायर कोणी वेगळाच असल्याचं त्यांना आत्ता कळत होतं.

बरं हा विषय निघाला कसा ? तर त्याचं झालं असं की परवेज आलम यांनी एका शायरीचा मिसरा (पहिली ओळ) वाचून दाखवला आणि समोर बसलेल्या जावेद अख्तरांना विचारलं, जावेद साब याच्या पुढची ओळ सांगू शकाल का?

यावर जावेद अख्तर पण आपल्या स्टाईलमध्ये म्हटले की, "मी या चुकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवत !"

आता जावेद अख्तर यांना किस्से सांगायची भारीच आवड. इथं पण काही वेगळं घडलं नाही. त्यांनी गालिब बद्दलची एक आठवण सांगितली. ते सांगत होते की, एकदा एक बाई त्यांना भेटल्या आणि विचारू लागल्या की, जावेद साब तुमचे दिवान ए गालिब कधी येणार आहेत ?"

यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

'पद्म विभूषित हुए जा रहे कोरस में गाने वाले'

जावेद अख्तर

फोटो स्रोत, Jashn e Rekhta

फोटो कॅप्शन, जावेद अख्तर

कुमार विश्वास यांची लोकप्रियता किती आहे हे सुद्धा याच कार्यक्रमात अनुभवायला मिळालं.

कुमार विश्वास स्टेजवरून म्हणाले देखील की, मी लोकप्रिय आहेच पण कवी म्हणून कसा आहे हे आज नाही तर दोनशे वर्षांनी कळेल.

नेहमीप्रमाणे या व्यासपीठावर देखील त्यांनी स्वतःला पद्मश्री मिळाला नसल्याची खिल्ली उडवली. सोबतच लोक कसे आत्ममग्न असतात हे सांगितलं. शेवटी जेव्हा त्यांनी त्यांच्या कविता ऐकवायला सुरवात केली तेव्हा मात्र त्यांच्यातील प्रतिभासंपन्न कवी दिसू लागला.

त्यांनी जेव्हा 'पद्म विभूषित हुए जा रहे कोरस में गाने वाले' ही ओळ म्हटली तेव्हा लोक आपल्या खुर्चीतून उभे राहिले आणि तब्बल 45 सेकंद टाळ्यांचा कडकडाट आसमंतात घुमत राहिला.

एखादा कवी किती अप्रतिम रचना करू शकतो याची कल्पना याची देही याची डोळा आली.

आज जाने की जिद ना करो...

कुमार विश्वास

फोटो स्रोत, Jashn E rekhta

प्रतिभासिंह बघेल म्हटलं की नव्या पिढीच्या अत्यंत तयारीच्या गायिका असंच चित्र समोर येत. यावेळी त्यांनी बऱ्याच चांगल्या गझला ऐकवल्या मात्र त्यांना लोकांची नस काही केल्या पकडता आली नाही.

नाही म्हणायला त्यांनी 'आज जाने की ज़िद न करो' ही गझल गायली पण लोकांना वेगळंच अपेक्षित होतं.

प्रेक्षक समोरून गालिब गालिब अशी ओरड करत होते, पण यावेळेसच्या त्यांच्या यादीत गालिब काही नव्हता. त्यामुळे त्यांनी पुढच्या वर्षी गालिबच्या गझल ऐकवते असं म्हणत वेळ मारून नेली.

आता रेख्ताच्या महोत्सवात नसीरुद्दीन शाह येणार म्हटल्यावर भली मोठी गर्दी जमा झाली होती. बरोबर पाचच्या दरम्यान एक लांब असा कोट घातलेल्या नसीरुद्दीन शाहांची एन्ट्री झाली. त्यांनी तिन्ही बाजूंना

कमरेत लवून उपस्थितांना अभिवादन केलं.

नसीरुद्दीन शाह जेव्हा स्टेजवर चढत होते तेव्हा लोकांनी एकच कल्ला सुरू केला. यासाठी नसीरुद्दीन सुद्धा धन्यवाद म्हटले. थोड्याच वेळात त्यांच्या मागोमाग रत्ना पाठक शहा सुद्धा आल्या.

नसीरुद्दीन शाह यांनी आता बोलायला सुरुवात केली होती, मात्र मध्येच जो गोगांट सुरू होता त्यामुळे त्यांना तीनदा आपलं बोलणं मध्येच सोडावं लागलं. शेवटी ते म्हणालेच, तुम्ही जरा को-ऑपरेट करा.

त्यानंतर ते गालिबच्या सहवासात कसे आले याचा किस्सा सांगू लागले. दरम्यान रत्ना पाठक त्यांच्याकडे एकटक बघत होत्या.

नसीरुद्दीन शाह यांचं बोलून झाल्यावर रत्ना पाठक सांगू लागल्या की, त्यांच्या आई भारतीय जननाट्य मंच (IPTA) शी संबंधित होत्या.

त्यांच्या आईमुळेच त्या थोडंफार उर्दू शिकल्या. पण नसरुद्दीन शाह जेव्हा इस्मत चुगताईंच्या गोष्टींवर नाटकांचं सादरीकरण करायला लागले तेव्हा त्यांचा उर्दूकडचा ओढा वाढला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)