लहान मुलाच्या नाकात 2 वर्षं अडकल्या 3 बॅटरी, दुर्गंधी आणि पू झाल्यावर असे केले उपचार

फोटो स्रोत, UGC
तब्बल दोन वर्षं राजेश नावाच्या एका मुलाच्या नाकात खेळण्यातील 3 बॅटरी अडकल्या होत्या.
राजेशला त्याच्या मित्रांनी त्यांच्या घोळक्यातून बाजूला काढलेलं. त्याला अशी वागणूक मिळण्याचं कारण म्हणजे त्याच्या नाकात अडकलेल्या बॅटरी.
अशाप्रकारे बाजूला काढलं की मुलांच्या मनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.
पण आता त्याच्या नाकात अडकलेल्या या बॅटरी काढल्यामुळे तो त्याच्या इतर मित्रांसोबत खेळू शकतो. कल्लाकुरीच्या सरकारी डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून या बॅटरी काढून टाकल्या.
तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यातील काचीमैलुर गावात विश्वनाथन आणि सूर्या या दाम्पत्याला राजेश नावाचा मुलगा असून तो इयत्ता दुसरीत शिकतो.
राजेशची आई सूर्या सांगते, आम्ही मजूर म्हणून काम करतो. माझा मुलगा तीन वर्षं या त्रासाशी झुंजत होता, त्याचा हा त्रास अखेर संपला आहे.
दोन वर्षांपासून श्वास घेताना व्हायचा त्रास
राजेशची आई सूर्या सांगते, "माझा मुलगा नेहमी त्याच्या वयाच्या मुलांशी खेळतो. गेल्या दोन वर्षांपासून नाकातून रक्त येत असल्याची तो तक्रार करत होता. म्हणून आम्ही त्याला जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी त्याला नाकात टाकण्याचं औषध आणि गोळ्या लिहून दिल्या."
पण त्याचा त्रास काही केल्या कमी व्हायचा नाही. विशेषतः पावसाळ्यात त्याचा त्रास आणखीन वाढून त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा.
"परिस्थिती नसल्यामुळे मोठ्या रुग्णालयात जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे थोड्या दिवसांत त्याचं दुखणं बरं होईल असं म्हणत आम्हीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं."
पण आता राजेशचे मित्र त्याच्याबरोबर खेळायचे बंद झाले. त्याच्या शाळेतील मित्र त्याच्या बाजूला बसायला नकार देऊ लागले.
सूर्या म्हणाल्या, "राजेश दररोज आमच्याकडे रडत यायचा आणि आम्हाला याबद्दल सांगायचा. एक दिवस त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला शाळेत बोलावलं."
सूर्या सांगतात की, "शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की, राजेशच्या नाकातून दुर्गंधी येते आणि बऱ्याचदा त्याच्या नाकातून पस येत असल्याचं इतर विद्यार्थी सांगतात."
त्यामुळे त्याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन त्याच्यावर उपचार करा असा सल्ला शिक्षकांनी आम्हाला दिला. नाहीतर त्याच्या भविष्यावर परिणाम होईल असंही सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
त्यानंतर, "लगेच आम्ही आमच्या गावाजवळच्या रुग्णालयात गेलो. पण तिथेही त्यांनी फक्त नाकात टाकायचे औषधाचे थेंब आणि गोळ्या दिल्या."
आमची परिस्थिती बघून आमच्या कल्लाकुरीच्या एका नातेवाईकाने तिथल्या सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
राजेशच्या आईचाही संशय आता बळावला होता. त्यामुळे त्यांनी मुलाला कल्लाकुरीची शासकीय रुग्णालयातील डॉक्टर गणेश राजा यांच्याकडे नेले.
सूर्या सांगतात, डॉ.गणेश राजा यांनी राजेशच्या आयुष्यातील घटनांबाबत सविस्तर माहिती घेतली.
दोन वर्षांपूर्वीच नाकात दुखापत
दोन वर्षांपूर्वी राजेशने खेळताना नाकात काडी घातल्याचं पालकांना सांगितलं आणि औषधाने त्याला बरं वाटेल म्हणून त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं.
त्यानंतर त्यांनी वेगवेगळे डॉक्टर गाठले आणि मुलाच्या नाकात दुखत असल्याची माहिती दिली. त्याच्या पालकांनी सांगितलं की त्याला आता श्वास घेण्यास त्रास होतो आणि तो फक्त एका नाकपुडीतून श्वास घेतोय.
राजेशची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी कल्लाकुरीची शासकीय रुग्णालयात दाखल करायला सांगितलं.
"आम्ही डॉक्टरांचा सल्ला ऐकला आणि मुलाला तिथे दाखल केलं."
सीटी स्कॅनमध्ये एक गूढ वस्तू नाकात अडकल्याचं दिसलं

राजेशविषयी बीबीसी तमिळशी बोलताना कल्लाकुरीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वासवी सांगतात की, त्यांनी आणि वैद्यकीय पथकाने राजेशच्या नाकाची तपासणी केली तेव्हा एन्डोस्कोपीमध्ये नाकाच्या आत एक काळी वस्तू दिसून आली.
"पण तो लहान असल्यामुळे एंडोस्कोप पूर्णपणे वापरता आला नाही. आम्ही लगेच सीटी स्कॅन करून त्याची तपासणी केली. मग नाकात काही गूढ पदार्थ असल्याची खात्री पटली "
यावर कल्लाकुरिच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, नाकात काहीतरी असल्याचा उलगडा झाल्याबरोबर आम्ही लगेच भूलतज्ज्ञ, कान, नाक, घसातज्ज्ञ आणि सर्जिकल टीमने एकत्रितपणे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला."
प्राचार्या उषा म्हणाल्या, "मुलाच्या नाकातून दुर्गंधी कशी येते यावर प्रथम लक्ष केंद्रित करून सर्दी पूर्णपणे घालवता येईल यासाठी उपचार करायचं ठरवलं "
मुलाच्या नाकात तीन बॅटरी अडकल्या होत्या
या उपचारानंतर, मुलाच्या नाकात अडकलेलली वस्तू शस्त्रक्रियेद्वारे काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सहाय्यक प्राध्यापक डॉ. वासवी सांगतात, "आम्ही शस्त्रक्रिया केली तेव्हा रहस्यमय काळा पदार्थ बाहेर आला. ती खेळण्यांमध्ये वापरली जाणारी छोटी बॅटरी असल्याचं उघड झालं होतं."
"शस्त्रक्रिया होईपर्यंत आम्हाला फक्त नाकात काहीतरी गूढ वस्तू अडकल्याचं माहिती होतं."
पण जेव्हा ती बाहेर काढली तेव्हा त्या खेळण्यांमध्ये वापरल्या जाणार्या तीन अत्यंत लहान बॅटरी असल्याचं उघड झाल्याचं डॉ उषा यांनी सांगितलं.
खेळण्यातील बॅटरी मुलाच्या नाकात अडकल्या आहेत हे पालकांना माहीत नव्हतं. कारण मुलाने एवढंच सांगितलं होतं की खेळताना त्याच्या नाकात काडी लागली होती.

शस्त्रक्रिया करून बॅटरी काढून टाकल्यानंतर राजेशला आवश्यक ते उपचार देण्यात आले आणि 3 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कल्लाकुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता उषा यांनी दिली.
राजेश सांगतो, "एकदा मी खेळत असताना खेळण्यातील बॅटरी काढली होती. ती मी नाकात काही घातली असं मला आठवत नाही पण ती काढण्यासाठी मी नाकात काडी घातल्याचं मला आठवतं."
मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक
पालकांनी सावधगिरी बाळगली तरच अशा घटना टाळता येतील, असं सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर वासवी सांगतात.
राजेशवर शस्त्रक्रिया करणार्या टीमचा भाग असलेले बालरोगतज्ज्ञङ सेंथिल राजा सांगतात की, सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांमध्ये लहान वस्तू गिळण्याचं प्रमाण जास्त आहे.
विशेषतः, शर्टची बटणे, सुया, खेळण्यांमधील लहान बॅटरी, गळ्यात घातलेले मणी आणि दगड या गोष्टी मुलांच्या हाताला सहज लागतात.
लहान मुलांना एखादी वस्तू तोंडात, कानात आणि नाकात घालायची सवय असते. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं असं सेंथिल राजा सांगतात.
सध्याच्या घडीला मूल पाच वर्षांचं होईपर्यंत त्यांच्यावर देखरेख करणं आवश्यक आहे. कारण मुलांना खेळणी खेळण्यांपेक्षा तोडण्यात जास्त रस असतो.

फोटो स्रोत, UGC
त्यामुळे या वयातील मुलांना इलेक्ट्रॉनिक खेळणी देणं टाळलेलंच बरं असाही सल्ला ते देतात.
"मुलांनी त्यांच्या कानात किंवा नाकात एखादी लहान वस्तू घातली तर ते अनेकदा वेदनांमुळे रडतात. त्यावेळी त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांची तपासणी केली पाहिजे."
एखादी वस्तू नाकात घातल्यास सर्दी होते, श्वास घेण्यास त्रास होतो. एखादी वस्तू तोंडात घातली तर ती श्वसननलिकेत जाऊ शकते. यामुळे न्यूमोनिया, वारंवार खोकला, सर्दी आणि ताप येतो.
अशी लक्षण आढळल्यास लहान मुलांना लगेचच बालरोगतज्ज्ञांकडे तपासणी व उपचारासाठी न्यायला हवं असं बालरोगतज्ज्ञ सेंथिल राजा सांगतात.
पालकांनी मुलांच्या वेदनांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे
मुलं चांगल्या पद्धतीने खेळत असताना अचानक रडू लागतात, त्यांना ताप येतो किंवा दुसरा काही त्रास झाल्यास पालकांनी मुलांच्या वेदनांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं डॉ. सेंथिल राजा सांगतात.
कारण, खेळताना अनावश्यक गोष्टी गिळल्यामुळे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लहान मुलांना लाकडी खेळणी खेळायला देणं उत्तम असल्याचं ते सांगतात.
दरम्यान पूर्णपणे बरा झालेल्या राजेशला रुग्णालयातून लवकर घरी जायचं होतं. त्यासाठी तो त्याच्या आई-वडिलांना विनवणी करत होता.
दोन वर्षांपासून इतर मुलांसोबत खेळू न शकलेल्या राजेशला आता मनसोक्त खेळायचं होतं. त्याचा हा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








