You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मे महिन्यात महाराष्ट्रात पाऊस, उत्तर भारतात थंडी, हवामान चक्र बिघडण्याची 'ही' आहेत कारणं
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हवामान शास्त्रज्ञांच्या मते 10 मे पर्यंत देशातल्या कोणत्याही राज्यात उष्णतेची लाट येणं अपेक्षित नाही. सर्वसाधारणपणे मे महिना हा प्रचंड उकाड्याचा म्हणून ओळखला जातो. अनेक राज्यांमध्ये पारा पन्नाशी ओलांडतो.
याची सुरुवात मार्च महिन्यापासून होते. एप्रिल ते मे आणि जूनमध्येही प्रचंड उकाडा जाणवतो. पण यंदा उष्णतेची लाट 11 ते 20 मे या कालावधीपुरतीच मर्यादित राहणार आहे. हवामान विभागाचे आकडे तसं सूचित करतात. हे सगळं उत्तर भारतापुरतं मर्यादित नाहीये. दक्षिण, पश्चिम, मध्य तसंच पूर्व भारतात साधारण अशीच परिस्थिती आहे.
दक्षिण भारतापासून पूर्व, मध्य आणि उत्तर भारतात 29 एप्रिलपासून 2 मे पर्यंत या काळात बहुतांश राज्यांमध्ये किमान तापमान 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी झाली. मैदानी भागात, मध्य आणि पूर्व भारतात धुळीचं वादळ आणि गाराही पडल्या.
बदलत्या वातावरणाने अनेक वेगवेगळे विक्रम होत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्स मे महिन्यातल्या थंडीचा अनुभवाबाबत लिहित आहेत. यंदा उन्हाळ्याचा हंगाम येणार की नाही असा प्रश्नही लोक विचारत आहेत.
बदलणारं हवामान
मैदानी भागांमध्ये मे महिन्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं.
देशातल्या काही भागांमध्ये मे महिन्यात चक्क थंडी जाणवते आहे. काही भागांमध्ये दाट धुकंही पाहायला मिळत आहे.
वातावरणातल्या या बदलामागे समुद्रातल्या हालचाली कारणीभूत आहेत.
अशा घटना यापुढेही घडत राहतील. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल अनुभवायला मिळतील.
युरोपमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. अनेक वर्षांचे तापमानाचे विक्रम मोडत आहेत.
संपूर्ण पृथ्वीचं तापमान वाढत आहे. तापमान वाढत असल्याचं जाणवत आहे.
तापमानाचे बदलते विक्रम
हवामान शास्त्रज्ञ नवदीप दहिया यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "उन्हाळा सुरू होण्याऐवजी थंडीचा हंगाम परतला आहे".
उत्तर भारतातल्या डोंगराळ भागात कमाल तापमान किती ते त्यांनी सांगितलं. धरमशाला इथे कमाल तापमान 8.9 डिग्री सेल्सिअस एवढंच होतं.
राजधानी दिल्लीत सरासरी तापमान 26.1 इतकंच होतं. मे महिन्यात दिल्लीतल्या सरासरी तापमानाच्या हे 13ने कमी आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात सर्वाधिक तापमान 10 ते 17 डिग्री सेल्सिअस पर्यंतच पोहोचलं आहे. मे महिन्यात असं तापमान हा एक विक्रमच आहे.
दक्षिणेत मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे वातावरणातली उष्णता एकदम कमी झाली आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडतो आहे.
हवामान विभागानुसार तामिळनाडूच्या विविध भागांमध्ये 90 मिलीमीटर पाऊस झाला. मध्य भारत, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा इथेही पाऊस आहे.
पाकिस्तानातून दबाव
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कुलदीप श्रीवास्तव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "देशातल्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होतो आहे.
हे नंतरही सुरुच राहील. पूर्व भारतात मेघालय आणि आजूबाजूच्या प्रदेशातही मुसळधार पाऊस पडतो आहे".
हवामानाची माहिती देणारं ट्वीटर हँडल cloudmetweather ने उपग्रहाच्या फोटोंच्या माध्यमातून सांगितलं की पाकिस्तानच्या बाजूने हवामानाचा दबाव उत्तर भारत, उत्तर-पश्चिम राजस्थान, पंजाबच्या दिशेने वाढतो आहे. यामुळे वादळाच्या बरोबरीने जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे.
असं अनेक वर्षात झालं नाही
लाईव्ह वेदर ऑफ इंडियाचे मुख्य संचालक अधिकारी शुभम यांच्या मते या महिन्यात नोंदलं गेलेल्या तापमानाने सगळे विक्रम मोडले आहेत.
उत्तराखंड आणि हिमाचलमधल्या तापमानाचं उदाहरण त्यांनी दिलं. तिथे एवढं कमी तापमान या काळात कधीच नसतं. सोमवारी उत्तर प्रदेशात नजीबाबाद इथे सर्वाधिक तापमान 20.5 सेल्सिअस इतकंच होतं.
हवामानातल्या बदलामुळे हवामान शास्त्रज्ञ अधिकाअधिक संशोधनात गुंतले आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने सगळे विक्रम मोडले होते. 1901 पासून यंदाचा फेब्रुवारी महिना सगळ्यात उष्ण स्वरुपाचा होता.
हवामान विभागाने जारी केलेल्या उपग्रहांनी टिपलेल्या फोटोनुसार देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो आहे.
10 मे पर्यंत उष्णतेची लाट नाही
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र कुमार जेनामनी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "देशातल्या कोणत्याही भागात 10 मे पर्यंत उष्णतेची लाट येणार नाही. पश्चिमी विक्षोभ (वातावरणातील हा चक्रावात पश्चिमेकडून होतो). वारंवार निर्माण होतो आहे, ज्याचा परिणाम देशातल्या अनेक राज्यांमध्ये दिसतो आहे.
त्यांनी सांगितलं, 2020 मध्येही अशीच परिस्थिती होती. एप्रिल आणि मे महिन्यात तेवढी उष्णता नव्हती. 5वेळा 'पश्चिम विक्षोभ' ( पश्चिमेकडून वाहणारे वारे थंड आणि शुष्क असतात) निर्माण झाल्यामुळे तापमान कमी झालं आहे, पाऊसही पडत आहे".
भारतीय हवामान विभागाच्या अनुमानानुसार येत्या काही दिवसात मे महिन्याच्या मध्यापर्यंत 'पश्चिमी विक्षोभ' (इंग्रजीत याला western disturbances असं म्हणतात) नऊ वेळा वाहतील.
पृथ्वीचं तापमान वाढतंय
भारतातल्या मान्सूनच्या प्रक्रियेत सातत्याने बदल होतो आहे. पर्यावरणात होत असलेले बदल यासाठी कारणीभूत आहेत. एकूणच पृथ्वीच्या तापमानात 2 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. भारतात सध्या तापमानात घट होत असताना उत्तर आशिया, युरोप आणि कॅनडात तापमानात वाढ होते आहे.
मान्सूचच्या चक्रात बदल झाल्याने अचानक पूर, दुष्काळ यासारख्या घटना वाढत आहेत. याचा परिणाम हिमालयावरही होत आहे. हिमनद्या वितळू लागल्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)