You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुक्ती मिळावी यासाठी त्या दोघांनी मान कापून घेत दिला स्वत:चा बळी
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजराती
टळटळीत दुपारच्या उन्हात ती मुलगी शेतात गेली. शेतातल्या कोपऱ्यात असलेल्या देवळात तिने प्रवेश केला आणि तिने किंकाळी फोडली.
या बातमीतले तपशील आणि वर्णन तुम्हाला अस्वस्थ करू शकतात.
देवळात एका हवनकुंडाशेजारी दोन मृतदेह पडले होते. हवनकुंडात एक शीर जळत होतं तर दुसरं शीर बाजूलाच पडलेलं होतं.
हे मृतदेह इतर कुणाचे नव्हते तर मुलीच्या आई-वडिलांचेच होते. राजकोटजवळच्या विंचिया गावात या भयावह घटनेनंतर शांतता आहे.
अंधश्रद्धेविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की असे अघोरी प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाय आवश्यक आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी कायद्याची वेसण अत्यावश्यक आहे.
देवळात भजन कीर्तन होतं. मंगलमयी सूर ऐकू येतात. त्याच देवळाच्या प्रांगणात जीपमधून येणाऱ्या लोकांच्या बॅगांमध्ये शीर आणि धड आहे हे कळल्यावर गावकरी हादरुन गेले आहेत.
अतिशय धार्मिक वृत्तीच्या जोडप्याने मुक्ती मिळवण्याच्या उद्देशाने कमळ पूजा केली. बळी म्हणून त्यांनी स्वत:लाच अर्पण केलं. हे का घडलं आणि कसं हे प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
पूजेत स्वत:ला अर्पण केलेल्या मृत जोडप्याच्या कुटुंबीयांशी आणि पोलिसांशी आम्ही बोललो.
दुसरं देऊळ बांधलं जात होतं
हेमू मकवाना हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह मोधूका इथे विंचिया गावात राहत होते. त्यांचा भाऊ राजूभाई हे या घटनेने इतके भेदरले आहेत की ते एकच गोष्ट पुन्हा सांगत राहतात. असं काही त्यांच्या डोक्यात आहे हे कळलं असतं, मी त्यांना तसं करू दिलं नसतं.
हेमू यांचे वडील भोजाभाई सांगतात, "माझ्या चार मुलांपैकी हेमू अतिशय धार्मिक. तो लहानपणापासूनच कर्मकांड करत असे. आताही तो दिवसभर काम करतो. पण जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा तो आणि त्याची बायको भक्ती-श्रद्धेय गोष्टीत दंग होतात.
हेमूला पैशाची काही समस्या नव्हती. जेव्हाहा भाऊ मुलांसाठी काही आणतात तेव्हा तो वाट्टेल तसं खर्च करु देत नाही. त्याने घरी रामदेपीर मंदिर बांधलं. तिथे तो आणि त्याची बायको हंसा पूजाअर्चा करत असत."
घरात मंदिराच्या बरोबरीने त्याने शेतातही एक मंदिर बांधलं. राजूभाईंनी सांगितलं की, "घरातल्या मंदिरामुळे मुलांना अभ्यासात अडथळा होत आहे. त्यामुळे शेतात शांत वातावरणात मंदिर बांधायचं आहे असं त्यांनी सांगितलं. राजूभाई तसंच हेमू यांच्या तीन भावांना याला आक्षेप नव्हता. त्यामुळे हेमू यांनी शेतात मंदिर बांधलं आणि तिथे पूजाअर्चा सुरू केली.
त्याने तिथे हवनकुंड बांधलं. त्या मंदिरात ते दोघं पूजाअर्चा करत असत. आम्हीही त्या दुसऱ्या मंदिरात जायचो. तिथे हाताने तयार केलेली मूर्ती होती. आम्ही तिथे पूजा करायचो".
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं?
कमळ पूजेसंदर्भात विचारलं असता राजूभाई म्हणाले, "रविवारी भावाला हेमूने सांगितलं की तो मेव्हण्याला भेटायला जात आहे. त्याने मुलांना तिथे सोडलं. दुपारी घरी परतले. ते दोघं नेहमीप्रमाणे दुपारी शेतातल्या मंदिरात गेले".
दुसऱ्या दिवशी मुलं मेव्हण्याच्या घरून घरी परतली तेव्हा ते आईबाबांना शोधू लागले. जेव्हा त्यांची मुलगी शेतातल्या देवळात पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य पाहून ती किंचाळली.
तिने जे दिसलं ते घरच्यांना येऊन सांगितलं. प्रकरण पोलिसांकडे गेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पूजा करण्यापूर्वी एक पत्रही लिहून ठेवलं. त्या पत्रावर हेमूभाई आणि त्यांची पत्नी हंसा यांची स्वाक्षरीही आहे.
पत्रात लिहिलं आहे, "आम्ही दोघं स्वेच्छेने आमचा जीव अर्पण करत आहोत. हंसा हिला यात काही वावगं वाटत नाही. माझे भाऊ, बहिणी, बापूजी यांनी आम्हाला यातलं काहीही करायला सांगितलेलं नाही. त्यांची चौकशी करु नका. माझ्या सासूनेही यापैकी काही आम्हाला करायला सांगितलेलं नाही. कुणीच काही सांगितलेलं नाही. आम्ही स्वत:हूनच हे कृत्य करत आहोत. कोणाचीही चौकशी करु नका".
दुसऱ्या पानावर हेमू यांनी भावांना उद्देशून लिहिलं आहे, "तुम्ही तिघे एकत्र राहा. आईवडिलांची आणि बहिणीची काळजी घ्या. तुम्ही तिघे आमच्या मुलांचीही काळजी घ्या. मला तुम्ही तिघांवर पूर्ण विश्वास आहे".
त्यांनी आपला जीव कसा घेतला
तुम्ही फ्रेंच डॉक्टर जोसेफ इग्नेस गिलोटिनचं नाव ऐकलं आहे का. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्याने एक पद्धत शोधली होती. त्याला गिलोटिन असंच म्हटलं जाऊ लागलं. गिलोटिन हे एक असं यंत्र असतं की उंचावर तलवारीच्या पात्यासारखी तीक्ष्ण ब्लेड असते, ती दोरीने धरून ठेवलेली असते. गुन्हेगारीची मान त्या ब्लेडच्या खाली ठेवली जाते आणि उंचावरून ते पातं खाली पाडलं जातं.
या पद्धतीने शेकडो जणांना मृत्युदंड देण्यात आला होता.
हेमूभाईने अशाच प्रकारचं यंत्र तयार करून आपली आहुती यज्ञात दिली. विंचिया पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी. जाडेजा सांगतात की हेमूभाईने 30 फूट उंचीचं गिलोटिन तयार केलं होतं. तीस फूट उंचीवर पातं ठेवण्यात आलं होतं.
गिलोटिनचा वापर करुन मृत्युदंड देण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असते पण या प्रकरणात पती आणि पत्नी यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचा हात असल्याचे अद्याप तरी समजले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.
मग प्रश्न हा पडतो की पात्याची दोरी कुणी सोडली. जाडेजा सांगतात की हेमूभाईने दोरी हवनकुंडाच्या वर बांधली आणि दोरीखाली दिवा लावला. दिव्यामुळे तो दोर हळूहळू जळत होता. त्यानंतर त्या दोघांनी आपल्या माना त्या ब्लेडखाली येतील अशा रीतीने ठेवल्या. त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ते पातं पडलं तर ३० फूट उंचीवरून मानेवरच पडेल. जेव्हा दोर जळाला तेव्हा ते पाते पडले आणि नंतर त्यांचे डोके हे त्या पात्याखाली आले, शीर धडावेगळे झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की हंसाबेन यांचे शीर हे हवनकुंडात पडले तर हेमूभाईचे शीर हवनकुंडापासून काही अंतरावर पडले होते.
या कृत्यामागे कुणी मांत्रिक असू शकतो का
या घटनेबद्दल समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवले आणि कुटुंबीयांची चौकशी केली. गावकऱ्यांकडूनही माहिती घेतली.
पोलिसांनी सांगितले की कुटुंबीयांकडून तसेच इतरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. भावा-भावातील संबंधही चांगले होते. हेमूभाईंची गावातील प्रतिमा चांगली होती आणि नवरा-बायकोमध्ये देखील कुठलाही ताण-तणाव नव्हता.
असं असलं तरी या प्रकारात कुणी बुवा-बाबा किंवा मांत्रिक तर नाही ना असा तपास देखील पोलीस करत आहेत.
याबद्दल राजकोट येथील डीवाय एसपी प्रतीपाल सिंह झाला यांनी सांगितलं की आम्ही हेमूभाईच्या कॉल डिटेल्स तपासत आहोत. त्यावरुन हे लक्षात येईल की ते कुणा मांत्रिकाच्या संपर्कात तर नव्हते. त्याचप्रमाणे या दाम्पत्याने जे लिहून ठेवलं आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत.
2021 मध्ये जादूटोणासंबंधीत दोन हत्यांची नोंद गुजरातमध्ये झाल्याचे NCRB ने म्हटले आहे.
अशा प्रकारच्या घटना अंधश्रद्धेतून होऊ नये म्हणून गावात सामाजिक जागृतीचे अभियान सुरू केले जाईल असं समाजसेवक विनूभाई वाला यांनी सांगितलं.
जयंत पांडा हे विग्यान जथा या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी या घटनेबाबत म्हटलं आहे की एका दाम्पत्याने आपला जीव इतक्या निर्घृणपणे घेणं ही शरमेची बाब आहे. नेमकं आपण कोणत्या शतकाकडे वाटचाल करत आहोत. अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून समाजात जागृती करण्याचे अत्यंत आवश्यक आहे.
"तांत्रिक विद्येत मानवी बळी दिला जाण्याची उदाहरणं आहेत. बळीच्या बदल्यात काहीतरी मिळवण्याचा उद्देश असतो. या देशात अनेक जण आहेत ज्यांचा तंत्रविद्येवर विश्वास आहे. सरकारने या विरोधात कठोर पावलं उचलायला हवीत," असं पांडा सांगतात.
सामाजिक कार्यकर्ते जे एम मेहता यांनी बीबीसीला म्हटलं की गुजरातमध्ये महाराष्ट्र किंवा कर्नाटक सारखा जादूटोणाविरोधी कायदा हवा.
ते म्हणाले, "जसं गुजरातमध्ये प्राणी बळी देण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर कोंबडा किंवा बकऱ्याचा बळी देणं बंद झालं. त्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा तयार व्हावा. जे लोक अंधश्रद्धा पसरवतात त्यांना अटक करण्यात यावी. त्यानंतर हे असे कमळ पूजन किंवा बुवाबाजी, हे प्रकार नियंत्रणात येतील."
1995 मध्ये कमल पूजनाचा एक प्रकार घडला होता त्यात लालजी नावाच्या एका युवकाने आपले शीर जमजोधपूर येथील शिव मंदिराजवळ अर्पण केले होते.
ऑक्टोबर 2022 मध्ये गीर सोमनाथ येथील धावपीर या गावात पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा बळी दिला होता.
असं काही लोक का वागतात याचे विश्लेषण करताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गोपाल भाटिया सांगतात, शिक्षणाचा अभाव हे सर्व प्रश्नांचे मूळ आहे. चमत्कार आणि अंधश्रद्धा या अल्पशिक्षित लोकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. मानवीय इच्छांना काहीच मर्यादा नसते, त्या पूर्ण करण्यासाठी या गोष्टींचा आधार घेतला जातो.
"अशा स्थितीत धार्मिक विधींमुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात असं त्यांच्या मनात लहानपणापासून कुठेतरी उमटलेलं असतं. त्यांना वाटायला लागतं की हे सत्य आहे आणि त्या प्रमाणे ते वागत जातात. ही एक प्रकारची विकृती आहे. यामुळे काही लोक आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसतात," असं, डॉ. भाटिया सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)