निखिल वागळेंवर हल्ला : 'जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार'

शुक्रवारी (9 फेब्रुवारी) ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला.

यावेळी कारमध्ये वागळेंसोबत अॅड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरीही होते.

हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेकही करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा 'निर्भय बनो'च्या समर्थकांचं म्हणणं आहे.

निखिल वागळे पुण्यात 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला..

पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.

या हल्ल्यानंतरही निखिल वागळे 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमात पोहोचले.

'लढा लोकशाहीचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा' असं म्हणत डॉ. विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे हे महाराष्ट्रभर 'निर्भय बनो'च्या सभा घेत आहेत. याच सभेसाठी पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आले होते.

पुण्यातील साने गुरूजी स्मारकातील निळू फुले सभागृहात ही सभा पार पडली.

पुणे पोलिसांनी काय माहिती दिली?

पुणे पोलिसांनी ANI शी बोलताना सांगितलं की, "कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही ते (निखिल वागळे) येऊ इच्छित होते, म्हणून आम्ही इथे बंदोबस्त केला होता. इथे येताना कुणीतरी दगडफेक केली. आरोपींना शोधून कारवाई करू."

डेक्कन पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात हल्ल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलीस म्हणाले.

राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 42 इतर भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पर्वती पोलीस ठाण्यात आंदोलनादरम्यान तोडफोड केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार - वागळे

या सभेला उपस्थित राहिल्यानंतर भाषणात निखिल वागळे म्हणाले की, "आमचा वाहनचालक वैभव आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अंगावर घेतलं, म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. कारण हल्लेखोरांचा गट आमच्या वाहनावर अक्षरश: चढला होता आणि वाहनाची फोडाफोडी केली."

"जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार. या भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होऊ देणार नाही. ही साधी लढाई नाही, ही फॅसिझमविरोधातली लढाई आहे," असंही वागळे म्हणाले.

"जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोवर तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही," असं वागळे म्हणाले.

पोलिसांनी पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? - अंधारे

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनीही निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय.

विजय वडेट्टीवर म्हणाले, "निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे."

"नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.पण भाजपने इतका काय धसका घेतला आहे की आज थेट हल्लाच केला? सत्ताधारी कायदा हातात घेत आहे हेच आम्ही सांगत आहोत यातून राज्यात तणाव वाढत आहे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे," असंही वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

'या' ट्वीटवरून वाद

निखिल वागळेंनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लालकृष्ण आडवणींसंबंधी ट्वीट केले होते. आडवाणींना 'भारतरत्न' पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर हे ट्वीट केले होते.

या ट्वीटमध्ये निखिल वागळे म्हणतात की, "आडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाब्बासकी!"