सापाच्या शरीरात आढळणारा किडा महिलेच्या मेंदूत कसा पोहोचला?

या महिलेच्या मेंदूत आढळलेली अळी

फोटो स्रोत, ANU

फोटो कॅप्शन, या महिलेच्या मेंदूत आढळलेली अळी
    • Author, फिल मर्सर
    • Role, बीबीसी न्यूज, सिडनी

एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मेंदूमध्ये तब्बल 8 सेमी (3 इंच) लांबीची अळी सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

गेल्या वर्षी कॅनबेरा येथे झालेल्या एका शास्त्रक्रियेदरम्यान, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या महिलेच्या मेंदूच्या फ्रंटल लोब टिश्यूमधून एक दोऱ्यासारखी गोष्ट डॉक्टरांनी बाहेर काढली होती.

लाल रंगाची ही अळी किमान दोन महिन्यांपासून त्या महिलेच्या मेंदूत असल्याची शक्यता आहे.

प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरत असलेल्या रोग आणि संक्रमणाचा वाढता धोका, या प्रकरणावरून दिसून येत असल्याचं संशोधकांचं मत आहे.

कॅनबेरा रुग्णालयातील संसर्गजन्य रोगांचे डॉक्टर संजय सेनानायके म्हणतात की, "त्या ऑपरेशन थिएटरमधल्या डॉक्टरांना या महिलेच्या मेंदूतून 8 सेमी लांबीची ही अळी काढल्यावर प्रचंड धक्का बसला होता.

ही गोष्ट ऐकताना जरी किळस वाटत असली तरीही हा एक नवीन प्रकारचा आणि याआधी माणसामध्ये कधीही न आढळून आलेला संसर्ग आहे, हे नाकारता येणार नाही."

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या एका बिनविषारी अजगरांमध्ये अशा प्रकारच्या अळ्या आढळून येतात. या अळ्यांचं शास्त्रीय नाव 'ओफिडास्कॅरिस रॉबर्टसी राउंडवर्म' असं आहे.

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, या महिलेला ती ज्या तलावाजवळ राहते त्या तलावाशेजारी गवत गोळा करायला गेल्यावर या अळीचा संसर्ग झाला असावा.

इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच 'उदयोन्मुख संसर्गजन्य रोग' या विषयावर लिहिणारे आणि परजीवशास्त्रातील तज्ज्ञ मेहताब हुसेन म्हणतात की, अजगराची विष्ठा आणि परजीवी अंडी यामुळे दूषित झालेल्या चारायुक्त वनस्पती स्वयंपाकासाठी वापरल्यामुळे, अपघाताने या महिलेला या अळीचा संसर्ग झाला असावा.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हा संसर्ग झाल्यानंतरच या महिलेच्या शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू लागली. पोटदुखी, खोकला, रात्री घाम येणे आणि अतिसार अशी सगळी लक्षणं निर्माण झाली.

अशा प्रकारच्या लक्षणांमुळे, संसर्ग झालेल्या व्यक्तीचे विस्मरण वाढणे आणि तो रुग्ण नैराश्यात ढकलला जातो.

जानेवारी 2021 च्या शेवटी या रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं होतं. नंतर केलेल्या स्कॅनमध्ये रुग्णाच्या 'मेंदूच्या उजव्या पुढच्या भागामध्ये एक असामान्य जखम' झालेली आढळून आली.

जून 2022 मध्ये बायोप्सीच्या वेळी एका सर्जनने केलेल्या शस्त्रक्रियेत ही अळी सापडली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात इतिहास रचणाऱ्या संसर्गाची शिकार झाल्यानंतरही ही महिला लवकर बरी होत आहे.

डॉ. हुसेन यांनी लिहिलं की, "ओफिडास्कॅरिस लार्व्हा नावाच्या या अळीने माणसाच्या मेंदूवर आक्रमण केल्याची नोंद यापूर्वी करण्यात आलेली नाही.

मानवी शरीरामध्ये तिसऱ्या टप्प्यातील अशा अळ्यांची वाढ लक्षणीय आहे, कारण याआधी झालेल्या प्रायोगिक अभ्यासात मेंढ्या, कुत्रे आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांमध्ये अशा [पद्धतीने अळ्यांची वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही."

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी (एएनयू) मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारे डॉ सेनानायके यांनी बीबीसीला सांगितलं की हे प्रकरण एकप्रकारची धोक्याची घंटा असू शकते.

या विद्यापीठाच्या टीमने दिलेल्या एका अहवालानुसार मागच्या 30 वर्षांमध्ये 30 नवीन प्रकारची संक्रमणे दिसून आलेली आहेत. यापैकी एक तृतीयांश प्रकरणं ही प्राण्यांमधून माणसाला लागण झालेल्या संसर्गजन्य आजारांची आहेत.

"प्राण्यांच्या अधिवासावर माणसाचं वेगाने होणारं अतिक्रमण हे अशा संसर्गांमागे असणारं एक प्रमुख कारण असू शकतं. प्राण्यांमधून माणसांमध्ये होणाऱ्या अशा संसर्गाची प्रकरणं रोज वाढतांना दिसून येत आहेत.

निपाह व्हायरसचा प्रवासही असाच झालेला होता, हा विषाणू आधी जंगली वटवाघुळांपासून पाळीव डुकरांमध्ये आणि नंतर माणसांच्या शरीरामध्ये आला होता.

कोरोनाचा विषाणूदेखील आधी वटवाघळांमधून पाळीव प्राण्यांमध्ये आणि नंतर माणसांमध्ये आला होता."

"कोरोनाची महामारी आता हळूहळू कमी होत असली तरीदेखील जगभरातील साथीच्या रोगांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांसाठी आणि वेगवेगळ्या देशांमधील सरकारांसाठी साथीच्या रोगांबाबत दक्षण असणं अतिशय महत्वाचं आहे."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)