म्यानमारच्या कोको बेटांमुळे भारताच्या अडचणी वाढणार?

    • Author, नितिन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2005 साली भारताचे तत्कालीन नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्यावर होते.

पोर्ट ब्लेअरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, "म्यानमार सरकारने सांगितल्याप्रमणे कोको बेटांवर चीनचं अस्तित्व दिसून येत नाही. त्यामुळे आमचा म्यानमार सरकारवर विश्वास आहे."

नौदल प्रमुखांच्या अधिकृत दौऱ्याआधी काही महिने म्यानमारचे नौदल प्रमुख सो थेन दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अॅडमिरल प्रकाश यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती.

1948 साली म्यानमारला स्वातंत्र्य मिळालं. त्यापूर्वी, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने कोको बेटाचा नौदल तळ म्हणून वापर केला होता. हे बेट म्यानमारचा भाग झाल्यानंतर 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत या बेटावर रडार स्टेशन होतं.

आणि यात विशेष बाब म्हणजे 'ग्रेट कोको आयलंड' (बेट) भारताच्या अंदमान-निकोबारपासून उत्तरेस अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

भारताच्या नव्या चिंता

ब्रिटनची प्रसिद्ध पॉलिसी इन्स्टिट्यूट चॅटम हाऊसने एक नवा अहवाल सादर केलाय. या अहवालानंतर कोको बेट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आहे.

या अहवालानुसार, "या बेटांचे सॅटेलाईट फोटो घेण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हालचाली वाढल्याचं दिसत आहे. आणि ही भारतासाठी चांगली बातमी नाही."

म्यानमार या बेटावरून गुप्त सागरी टेहाळणी करण्याची शक्यता असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, म्यानमारचा सर्वांत बलाढय शेजारी चीन, या बेटावर स्वत:साठी सामरिक-आर्थिक आशा बाळगून आहे.

सॅटेलाइट इमेजरीमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या 'मॅक्सर टेक्नॉलॉजीज'ने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी असणाऱ्या कोको बेटावर काहीतरी बांधकाम सुरू असल्याचं या फोटोतून स्पष्टपणे दिसून येतंय.

डेमियन सायमन आणि जॉन पोलॉक यांनी तयार केलेल्या चॅटम हाऊसच्या अहवालानुसार, "विमानाला सुरक्षित ठेवणारे दोन हँगर, लिव्हिंग क्वार्टर आणि आधीच तयार केलेली 1,300-मीटर-लांब धावपट्टी अंदाजे 2,300 मीटर लांबीपर्यंत वाढविण्यात आली आहे."

संरक्षण विषयाशी निगडित प्रसिद्ध मासिक 'जेन्स डिफेन्स वीकली' नुसार, "फायटर जेटस आणि मोठ्या मालवाहू लष्करी विमानांना लँड आणि टेक ऑफ करण्यासाठी 1,800 मीटर ते 2,400 मीटर पर्यंतच्या लांब धावपट्टीची गरज असते."

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "भारताच्या सुरक्षेशी संबंधित अशा सर्व कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत".

तेच दुसऱ्या बाजूला म्यानमारच्या लष्करी सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल जाव मिन तुन यांनी हे आरोप निराधार असल्याचं म्हटलंय.

ते म्हणतात की, "म्यानमार कोणत्याही परकीय देशाला आपल्या भूमीवर लष्करी तळ उभारू देणार नाही. या बेटावर फक्त म्यानमारचं सुरक्षा दल तैनात आहे जे देशाचं रक्षण करत आहे. आणि भारताला याची पूर्ण कल्पना आहे."

चीनचा वाढता दबदबा

म्यानमारमध्ये लष्करी सत्तापालट झाल्यापासून देशात परकीय हस्तक्षेप वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव वाढतोय हेच यातून समजतं.

आपली आयात-निर्यात आणि ऊर्जेची गरज भागवण्यासाठी चीनला सागरी व्यापार गरजेचा झाला आहे. आणि त्यामुळे मागच्या अनेक दशकांपासून चीनची नजर 'मलक्का स्ट्रेट'वर आहे.

जवळपास 800 किलोमीटर लांबीचा हा सागरी मार्ग इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर मधून जातो. या मार्गाद्वारे चिनी जहाजं हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातून पश्चिमेकडे जाऊ शकतात

आर्थिक निर्बंध आणि अंतर्गत राजकीय संकटाने त्रस्त असलेला म्यानमार चीनसाठी एक उपयुक्त सहकारी म्हणून सिद्ध होऊ शकतो. शिवाय चीन म्यानमारचा सर्वांत मोठा संरक्षण पुरवठादार आणि दुसरा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूकदार आहे.

युद्ध विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर ब्रम्हा चेलानी यांच्या मते, "मागच्या काही दशकांमध्ये पाश्चात्य राष्ट्रांनी म्यानमारची चोहोबाजूंनी नाकेबंदी केली आहे. त्यामुळे म्यानमार आणि चीन आणखीन जवळ आलेत. म्यानमारचं लष्कर चीनच्या महत्त्वाकांक्षेशी परिचित आहे, पण आंतरराष्ट्रीय मंचावर एकटं पडल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायही शिल्लक नाहीये."

आणि राहता राहिली गोष्ट भारताची, तर दक्षिण-पूर्व आशियातील जवळपास सर्वच देशांमध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम मध्ये निरंकुश सरकारं सत्तेवर आहेत. यामुळे भारताची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

यातले कंबोडियासारखे देश वेगळ्या प्रकारच्या आर्थिक निर्बंधांमुळे किंवा आंतरराष्ट्रीय एकाकीपणामुळे त्रस्त असल्याचं दिसतं.

उदाहरण म्हणून बघायचं झालं तर 2021 मध्ये फ्युचर ऑफ एशिया या परिषदेला संबोधित करताना कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन म्हणाले होते की, "चीन सोडला तर आम्ही इतर कोणावर विश्वास ठेवायचा? चीन व्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या कोणाकडे काय मागणार?

त्यामुळे म्यानमारच्या लष्करी सरकारकडूनही अशीच विधानं येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि ती भारतासाठी वाईट बातमी ठरू शकते.

म्यानमारची एक सीमारेषा भारताला लागून आहे तर दुसऱ्या बाजूला थायलंड आहे. म्यानमारमध्ये स्थायिक असलेल्या काही जाती भारताच्या ईशान्य भागातही आढळतात.

"मेकिंग एनिमीज: वॉर अँड स्टेटबिल्डिंग इन बर्मा" च्या लेखिका आणि वॉशिंग्टन विद्यापीठात ग्लोबल फॉरेन पॉलिसी शिकविणाऱ्या मेरी कॅलाहान यांच्या मते, "म्यानमारची मूळ समस्या त्यांच्या लष्करी राजवटीत आहे."

त्यांच्या म्हणण्यानुसार, "लष्कराने निवडणुका घेतल्या तरी त्यांना बाह्य सहकार्याची गरज भासेल. यामध्ये त्यांना चीन आणि रशियाची मदत मिळू शकते. शस्त्रास्त्र पुरवण्यासोबतच हे दोन्ही देश त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही मदत करतात. दुसऱ्या गटात भारत आणि थायलंड आहे. दोघांचाही आपला आपला अजेंडा आहे.

त्यामुळे म्यानमारमध्ये लष्करी प्रभाव आणि गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत आणि इतर देशांमध्ये स्पर्धा होणं स्वाभाविक आहे."

कोको बेटावर सुरू असणाऱ्या हालचालींमागे चीन आहे का? असे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेत.

असं म्हटलं जातंय की, भविष्य डोळ्यासमोर ठेवून चीन आपल्या 'मित्राला' दुरून मदत करत असेल. भविष्यात हिंदी महासागरात प्रवेश करण्यासाठी चीनला कोको बेटांचा उपयोग होईल.

आणि यातून म्यानमारला बंगालच्या उपसागरात लष्करी टेहाळणी वाढवणं सोपं जाईल यात शंका नाही.

म्यानमारच्या यंगून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक सॉन विन यांच्या मते, "परराष्ट्र धोरण असो वा देशांतर्गत धोरण, प्रत्येक देशाला स्वतःच्या हितासाठी काम करावं लागतं. आणि म्यानमारने देखील तेच करायला हवं."

त्यांच्या मते, "म्यानमारची भौगोलिक स्थिती विशेष आहे. म्यानमारच्या उत्तरेला चीन आणि भारतासारखे बलाढ्य देश आहेत तर दक्षिण आणि पूर्वेला आशिया आणि पॅसिफिक आहे. म्यानमारच्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी शेजारील देशांमध्ये स्पर्धा लागली आहे यात कोणतीच शंका नाही. पुढे जाऊनही यात काही बदल घडणार नाहीये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)