'वसतिगृहावर हल्ला झाला, खिडक्या तोडल्या, दगडफेक झाली', किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत

फोटो स्रोत, ARRANGED
- Author, दिलनवाज़ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्लीहून
अलीकडील काही दिवसांमध्ये किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमधील स्थानिक लोक आणि बाहेरील लोक यांच्यात संघर्ष उद्भवल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिंसाचारप्रकरणी सोमवारी (20 मे) किर्गिझस्तानमध्ये दहा जणांना अटक करण्यात आली.
किर्गिझस्तानच्या शिक्षणमंत्र्यांनी बीबीसीला सांगितलं की, या हल्ल्यात ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना सरकारी मदत मिळेल. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा किर्गिझस्तान सरकारने केला आहे.
किर्गिझस्तानमध्ये राहणारे भारतीय विद्यार्थीही घाबरले असून ते भारतात परतण्याचा विचार करत आहेत.
दुसरीकडे, किर्गिझस्तानमधील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, बिश्केकमधील परिस्थिती सामान्य आहे आणि सर्व भारतीय विद्यार्थी सुरक्षित आहेत.
बीबीसीशी बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि किर्गिझस्तान सरकारच्या संपर्कात आहे.
रणधीर जयस्वाल म्हणाले, "तिथली परिस्थिती आता पूर्णपणे सामान्य आहे. आम्ही किर्गिझस्तान सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोललो आहोत आणि त्यांनी आम्हाला सर्व भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे."
ते म्हणाले, "किर्गिझस्तानमधील भारतीय दूतावास भारतीय विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात आहे. ज्या विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ किंवा इतर कशाचीही गरज असेल त्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
रणधीर जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, "सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या निराधार बातम्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर वास्तविक परिस्थितीत पूर्णपणे वेगळी आहे."
बिश्केकहून काही विद्यार्थ्यांचं फोनवर बोलणं झालं. या विद्यार्थ्यांनी बीबीसीला सांगितलं की, ते घाबरले असून भारतात परतण्याचा विचार करत आहेत.
बिश्केकमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांचा भारतीय विद्यार्थ्यांशी थेट संबंध नसून वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
बीबीसीने बिश्केकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठ परिसराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुसरीकडे विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, कॅम्पसबाहेर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून सध्या वातावरण शांत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
किर्गिझस्तानच्या सरकारने बीबीसीला काय सांगितले?
किर्गिझस्तानचे शिक्षण मंत्री दोग्दुर्गुल केंदिरबायेवा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "देशातील परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे. 18 मे च्या रात्री झालेला हिंसाचार ही एक वेगळी घटना होती. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झालं.
"या गोष्टी आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत नाही. आपल्या देशात परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्यांचं शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू आहे. या घटनेचा विद्यार्थ्यांशी संबंध नव्हता. फेक न्यूजमुळे हा प्रकार घडला.”
शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, या हिंसाचारात सहभागी असलेल्या आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या दहा जणांना सोमवारी ताब्यात घेण्यात आलेलं आहे.
ते म्हणाले, "आम्ही या कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊ."
शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचाराला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांनाही सरकार नुकसान भरपाई देणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत.
भारतीय विद्यार्थी काय म्हणतात?
रशिया-युक्रेन युद्धामुळे तिथे शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले.
पण भारतीय विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मध्य आशियात जाण्याबाबत सरकारला आवाहन केलं होतं. सरकारच्या मान्यतेनंतर हजारो विद्यार्थी किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तानसह मध्य आशियाई देशांमध्ये गेले. त्यांनी तेथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला.

फोटो स्रोत, ARRANGED
दिल्लीतील रहिवासी असलेल्या आलमगीरने किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.
बीबीसीशी बोलताना आलमगीरने सांगितलं की, "18 मे च्या रात्री त्यांच्या वसतिगृहावर काही बाहेरील लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक लोकांनी मध्यस्थी केल्यावर ते पळून गेले.
"मी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठापासून दीड किलोमीटर अंतरावर राहतो. पहिल्या रात्री हिंसाचारानंतर आम्हाला सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं. खोलीतील दिवे बंद ठेवा असं आम्हाला सांगण्यात आलं. काल (20 मे) रात्री बाहेरच्या लोकांनी आमच्या वसतिगृहावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला."
आलमगीरचा दावा आहे की, "सर्वात आधी त्यांनी आमच्या खिडक्यांवर प्रकाशझोत टाकले, खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळेत आम्ही पूर्णपणे शांत बसलो. त्यांनी दगडफेकही केली."
त्याने पुढे सांगितलं की, "दरम्यान, इथे राहत असताना ज्या स्थानिक लोकांशी आमचा संबंध आला, त्यांनी येऊन हल्लेखोरांचा पाठलाग केला. या हल्ल्यावेळी मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या गटाला आम्ही मदतीसाठी आवाहन केलं, पण मदत मिळाली नाही."

फोटो स्रोत, ARRANGED
इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात राहणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी अवनी बीबीसीशी बोलताना म्हणाली, "विद्यापीठ कॅम्पसचं वातावरण शांत आहे. बाहेरही सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि अनेक पोलिसांची वाहनंही उभी आहेत."
ती सांगते, "विद्यापीठ प्रशासनानेही आम्हाला सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला शांत राहण्यास सांगण्यात आलंय. तसेच खोल्यांमधले दिवे बंद ठेवा असंही सांगितलं गेलंय."
अवनीच्या कॅम्पसभोवती सुरक्षा आहे. पण तिला तिच्या बाहेर राहणाऱ्या मैत्रिणींची काळजी आहे.
अवनी सांगते, "बाहेर राहणारे माझे मित्र खूप घाबरले आहेत. येथील स्थानिक लोक बाहेरील विद्यार्थ्यांच्या विरोधात गेले आहेत."
बिश्केकमध्ये परिस्थिती बिघडली तेव्हा अवनीच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता.

फोटो स्रोत, ARRANGED
अवनी म्हणते, "दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या तब्येतीची विचारपूस केली. आम्हाला दूतावासाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आलंय, पण भारतातील माझ्या कुटुंबीयांना चिंता लागून राहिली आहे. मी 10 जूनला परतीचे तिकीट काढलं आहे. माझ्या कुटुंबाला वाटतंय की मी इथून लवकरात लवकर घरी परतावं."
दुसरीकडे आलमगीर सांगतो की, प्रशासनाने कॅम्पसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवली आहे, मात्र कॅम्पसबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
आलमगीर सांगतो, "जे विद्यार्थी कॅम्पसच्या बाहेर राहतात त्यांना जास्त धोका आहे. भारतीय दूतावासाने अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याने आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, त्याने परतीचे तिकीट काढलं आहे. 6 जून रोजी कझाकस्तानहून भारतात परतणार आहे.
बीबीसीशी बोलताना, नाव न सांगू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की, सुरक्षा वाढवण्यासाठी भारत सरकारने किर्गिझस्तान सरकारवर दबाव आणला पाहिजे.
दूतावासाची मदत विद्यापीठ कॅम्पसबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं
विद्यार्थ्यांसोबत राहणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचं काय म्हणणं आहे?

फोटो स्रोत, SANDEEP
भारतीय विद्यार्थ्यांना किर्गिझस्तानमध्ये पाठवण्यात मदत करणाऱ्या आणि तिथे राहून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरशी बीबीसीने चर्चा केली.
बीबीसीशी बोलताना संदीप नावाच्या या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की, "इथली परिस्थिती आता सामान्य होत आहे. स्थानिक सरकार परदेशी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करत आहे."
त्यांनी सांगितलं की, "सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत जे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरवत आहेत. मात्र, हे व्हिडिओ बनावटही असू शकतात."
संदीपच्या म्हणण्यानुसार, "आम्ही भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. यावेळी आम्हाला पूर्ण सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलंय. अनेक बनावट व्हिडिओ आणि मॅसेज विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीती पसरवत आहेत."
ते म्हणतात, "आम्ही सरकारला सांगितलं आहे की, अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या मॅसेजचा प्रसार थांबवावा. इथे राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना धमकीचे काही मॅसेज पाठवले गेलेत."

फोटो स्रोत, SHAHRUKH
संदीपचा दावा आहे की बिश्केकमधील पोलीस, स्थानिक किर्गिझस्तानी लोकांच्या मदतीने परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कॅम्पसबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आणलं जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा मुलांना कॅम्पसच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
भारत सरकारचं काय म्हणणं आहे ?

फोटो स्रोत, MEAINDIA
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने किर्गिझस्तान सरकारशी उच्च पातळीवर संपर्क साधला असून भारत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रणधीर जयस्वाल सांगतात की, आता परिस्थिती सामान्य होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बिश्केकमध्ये अनेक पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं असून पाकिस्तान सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तान सरकार विशेष विमानांद्वारे विद्यार्थ्यांना परत बोलावत असून सुमारे 500 विद्यार्थ्यांना परत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रणधीर जयस्वाल म्हणतात की, सध्या भारत सरकार या दिशेने काम करत नाहीये.
रणधीर म्हणतात, "स्थानिक परिस्थिती सुधारावी आणि भारतीय विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा देता यावी याकडे आमचं लक्ष आहे. आमचा दूतावास चोवीस तास कार्यरत आहे आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला मदत देण्याचा प्रयत्न केला जातोय."
किर्गिझस्तान सरकारचं म्हणणं आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या स्थानिक आणि बाहेरील लोकांना ताब्यात घेण्यात आलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एका निवेदनात किर्गिझस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, 18 मे रोजी रात्री घडलेल्या घटनांची माहिती मिळाल्यापासून किर्गिझस्तानचे सैन्य सक्रिय झाले आहे आणि परिस्थिती पूर्णपणे सुरक्षा दलांच्या नियंत्रणात आहे.
निवेदनानुसार, हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नसून, सुमारे पंधरा जणांवर उपचार सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात दावा केलाय की, कोणताही परदेशी नागरिक जखमी झाल्याची माहिती मंत्रालयाला मिळालेली नाही.
मंत्रालयाने माध्यमं आणि परदेशी दूतावासांना दिशाभूल करणारी माहिती शेअर करू नये, असं आवाहनही केलंय.
हिंसेला सुरुवात कशी झाली?
बीबीसीशी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, 13 मे रोजी स्थानिक लोक आणि एका इजिप्शियन विद्यार्थ्यांमध्ये हिंसाचार झाला होता.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक व्यक्ती इजिप्शियन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून चोरी करताना पकडला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गटाने त्याला बेदम मारहाण केली.
या मारहाणीचा व्हिडिओ पुढील तीन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत राहिला आणि बाहेरील विद्यार्थ्यांबद्दल स्थानिक लोकांचा राग वाढला.
किर्गिझस्तानमधील अनेक सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्सने देखील परदेशी विद्यार्थ्यांविरुद्ध पोस्ट केली, ज्यामुळे संताप आणखी वाढला.

फोटो स्रोत, SHAHRUKH
आलमगीरच्या म्हणण्यानुसार, "येथील स्थानिक लोकांनी तीन दिवस बाहेरील विद्यार्थ्यांवर नजर ठेवली. ते कुठे राहतात ते पाहिलं आणि त्यानंतर 16 मे च्या रात्री एका मोठ्या जमावाने बाहेरील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांवर आणि भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटवर एकत्रितपणे हल्ला केला."
त्याने पुढे सांगितलं की, "बाहेरील विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्या आपत्कालीन परिस्थितीत आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क साधला, पण आम्हाला सांगण्यात आलं की दिवस उजाडल्यावर मदत केली जाईल."
किर्गिझस्तानमध्ये वर्णद्वेष

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेन युद्धानंतर भारतीय आणि इतर अनेक देशांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने किर्गिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. यात पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि इतर अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
देशाच्या आर्थिक स्थितीमुळे किर्गिझस्तानमधील तरुणांना रशियात जाऊन नोकरी करावी लागली आहे. स्थानिक आर्थिक परिस्थितीमुळे परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरितांविरुद्ध लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
एका भारतीय विद्यार्थ्याने रविवारी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ बीबीसीला पाठवला आहे, ज्यामध्ये काही स्थानिक मुलं त्याच्या अपार्टमेंटबाहेर बाहेरील विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करताना, अपशब्द बोलताना ऐकू येत आहेत.
या विद्यार्थ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "इथे पूर्वीपासून वंशवाद सुरू आहे. पण 13 मेच्या घटनांनंतर त्यात खूप वाढ झाली आहे. बाहेरच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत."
भारतीय विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, विद्यार्थ्यांच्या परतण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि बिश्केकमध्ये अधिक सुरक्षेसाठी स्थानिक सरकारवर दबाव टाकला जावा.











