‘मी साधा प्रश्न विचारला होता, त्यांनी थेट धमकी द्यायला नको होती,’ दीपक केसरकरांच्या व्हायरल व्हीडिओतील शिक्षिकेनं म्हटलं...

फोटो स्रोत, Social Media
"मला खूप वाईट वाटलं. मंत्री असून त्यांनी अशी धमकी द्यायला नको होती. मी सरळ, साधा प्रश्न विचारला होता. त्यांनी अंदाजे तरी तारीख सांगायची की जाहिरात कधीपर्यंत निघेल. पण ते चिडले."
28 वर्षीय कोमल रामपुरकर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात राहतात.
फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी शिक्षक भरतीसाठीची पात्रता परीक्षा ((TAIT)) दिली. परंतु 9 महिने उलटले तरी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होत नाही म्हणून त्यांनी शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारले.
रविवारी (26 नोव्हेंबर) बीड जिल्ह्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर एका कार्यक्रमासाठी हजर होते. त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना कोमल रामपुरकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.
त्यावर मंत्र्यांनी त्यांना उत्तरही दिले परंतु शेवटी प्रश्न-उत्तरांदरम्यान केसरकर यांनी कोमल यांना ‘मी तुमचं नाव लिहून घेईन आणि तुम्हाला अपात्र करेन,’ असा इशारा दिला.
नेमकं काय घडलं? आणि शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची नेमकी मागणी काय आहे? जाणून घेऊया.
'... नाहीतर मी तुम्हाला अपात्र करायला लावेन'
26 नोव्हेंबर (रविवारी) बीडमध्ये एका कार्यक्रमानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी कोमल रामपुरकर त्याठिकाणी उपस्थित होत्या.
यावेळी कोमल रामपुरकर मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे आल्या.
"आम्ही भरतीची वाट पाहतोय. साईट ओपन आहे, नोंदणी केलीय पण पुढे प्रक्रिया होत नाही, " असं म्हणत त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
यावर मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं की, नोंदणी सुरू झालेली आहे. तुम्ही तुमचा चाॅईस दिला पाहिजे.
कोमल रामपुरकर या म्हणतात, “जाहिरातच आली नाही मग चाॅईस कशी देणार?”
दीपक केसरकर यांनी म्हटलं की, “प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेलं आहे.”
कोमल रामपुरकरांनी म्हटलं की, कधीपर्यंत येईल?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दीपक केसरकर म्हणतात की, तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्ही सरकारी नोकरी करू शकत नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार? साईट ओपन झाली आहे ना?
कोमल रामपुरकर यांनी त्यावर म्हटलं की, नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण जाहिरात निघालेली नाही.
दीपक केसरकरांनी म्हटलं की, माझी महत्त्वाची मुलाखत सुरू असताना तुम्ही येता. मी जेवढा प्रेमळ आहे, तेवढाच कडक आहे. माझ्या दृष्टीने मुलं महत्त्वाची आहे. उद्या तुम्ही मुलांना ही बेशिस्ती शिकवणार असाल तर मला अजिबात मान्य नाही. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षक हवेत. माझ्यादृष्टीने विद्यार्थी हा महाराष्ट्राचं भविष्य आहे. ही मुलं चांगली झाली की महाराष्ट्र घडणार आहे यावर माझा विश्वास आहे.
अजिबात मध्ये बोलायचं नाही. नाहीतर मी तुमचं नाव घेवून तुम्हाला अपात्र करायला लावेन.
हे संभाषण इथेच संपलं परंतु हा व्हीडिओ कॅमे-यात कैद झाला आणि समाज माध्यमांवरती व्हायरल झाला.
'मला अशी धमकी देणं चुकीचं'

फोटो स्रोत, Sandeep Kambale
महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी शिक्षक भरती पात्रता परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी 2022 रोजी त्यासाठीची ‘टेट’ ही परीक्षा पार पडली.
या परीक्षेचा निकाल मार्च 2022 रोजी जाहीर झाला. परंतु पात्र उमेदवार आजही प्रत्यक्षात नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. कारण परीक्षा आणि निकाल जाहीर झाला असला तरी किती जागांसाठी भरती होणार आहे त्याची जाहिरातच प्रसिद्ध झालेली नाही असं उमेदवारांचं म्हणणं आहे.
या मागणीसाठी पुण्यात शिक्षण आयुक्तालय कार्यालयासमोर काही पात्र उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे. यापैकीच एक पात्र उमेदवार कोमल रामपुरकर यांनी याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला.
कोमल रामपुरकर या मुळच्या हिंगोली जिल्ह्याच्या असून गेल्या 9 महिन्यांपासून त्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मला जर सरकारी शाळेत शिक्षक व्हायचं असेल तर माझ्याकडे हा एकमेव पर्याय आहे. मी आता 28 वर्षांची आहे. माझ्या जिल्ह्यात शिक्षक पदासाठी किती जागा निघणार याचीही मला कल्पना नाही. नोकरीबाबत अनिश्चितता असल्याने किंवा आम्हाला नेमकं वेळापत्रकही माहिती नसल्याने आम्ही प्रश्न विचारले."
" माझा प्रश्न होता की, अपात्र शिक्षकांना तुम्ही पदोन्नती दिली पण मग जाहिरात का काढत नाहीत. परंतु त्यांनी मला प्रश्नच विचारू दिला नाही. शिक्षक भरतीचं नाव काढल्यावर त्यांची मुलाखत सुरू होती त्यात ते भडकले. त्यांना वाटलं की हा प्रश्न का विचारला," असंही कोमल सांगतात.

फोटो स्रोत, Sandeep Kambale
कोमल रामपुरकर यांचं शिक्षण एमएससी बीएडपर्यंत झालेलं असून त्यांनी राज्य आणि केंद्रीय स्तरावरील शिक्षक पात्रता परीक्षा पास केली आहे.
मंत्र्यांनी अपात्र करणार असल्याची 'धमकी' दिली याचं वाईट वाटतं असंही त्या सांगतात.
"अपात्र कसं करणार? आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? भरती कधी करणार एवढच त्यांना सांगायचं होतं. त्यांनी चिडायचं काही कारण नव्हतं. मी साधा, सरळ प्रश्न विचारला होता. नोव्हेंबरपर्यंत भरती पूर्ण होणार हे त्यांनीच सांगितलं होतं, रोड मॅप दिला होता. त्याचं काय झालं?" असा प्रश्न कोमल उपस्थित करतात.
"नोकरीला विलंब होत असल्याने आमच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो. ग्रामीण भागात राहतो. जिल्हा कोणता मिळणार, कोणत्या जिल्ह्यात किती जागा निघणार हे सुद्धा कळत नाहीय. या कारणांमुळे लग्नही बाकी आहे," अशीही प्रतिक्रिया कोमल यांनी दिली.

फोटो स्रोत, Sandeep Kambale
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी पात्र अभियोग्यता धारकांचं आंदोलन सुरू आहे.
आंदोलनकर्ते संदीप कांबळे म्हणतात, "ही एकमेव अशी परीक्षा आहे जिथे परीक्षा, निकाल आधी जाहीर होतो त्यानंतर नोकरीच्या जागा आणि जाहिरात प्रसिद्ध होते. तब्बल 2 लाख 39 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 65 हजार पात्र ठरले.
सरकार स्वतः सांगतं की 65 हजार 111 जागा रिक्त आहेत. वित्त विभागाने मंजुरीही दिली आहे मग भरती का होत नाही?"
'शिक्षकांचा अपमान सहन करणार नाही'

फोटो स्रोत, Getty Images
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या या वर्तनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,"हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात होत असेल तर ह्यांना सत्तेची आणि पैश्यांची मस्ती आली आहे. शिक्षकांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. कोणी शिक्षकांचा अपमान करत असेल आम्ही त्याच्या मागे उभं राहू. ती महिला शिक्षक होती. भारतीय जूमला पार्टीसोबत राहून मित्र पक्षांनाही हे गुण लागलेत."
दरम्यान, या संदर्भात आम्ही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर या बातमीत अपडेट केलं जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








