ग्राहकांना फसवणाऱ्या 'क्रिप्टो किंग' सॅम बँकमन यांना 25 वर्षांचा तुरुंगवास

सॅम बँकमन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सॅम बँकमन

सॅम बॅंकमन-फ्राईड (एफटीएक्स या अपयशी ठरलेल्या क्रिप्टो एक्सचेंजचा सह-संस्थापक) यांना ग्राहकांची आणि गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्या कंपनीचं दिवाळं निघालं आहे.

तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे या अब्जाधीशाच्या अधोगतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 2022 मध्ये त्यांची कंपनी नाट्यमयरित्या कोसळली होती.

सॅम बॅंकमन-फ्राईड यांना झालेल्या शिक्षेविरोधात त्याचे वकील अपील करणार आहेत.

एका प्रतिनिधीच्या माध्यमातून त्याच्या पालकांनी बीबीसीला या सर्व प्रकरणाबाबत त्यांच्या भावना कळवल्या आहेत. ते म्हणाले, ''आम्हाला धक्का बसला आहे. मुलासाठी आम्ही लढतच राहणार आहोत.''

सॅम बॅंकमन 32 वर्षांचे आहेत. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होत असताना सॅम म्हणाले होते की ''त्यांना याची जाणीव आहे की असंख्य लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचे वाटते आहे.''

सॅम यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी अतिशय शांतपणे आणि स्पष्टपणे झालेल्या प्रकाराबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ''मी यासाठी सर्वांची माफी मागतो. प्रत्येक टप्प्यावर जे काही झाले त्याबद्दल मला माफ करा.''

सिलिकॉन व्हॅलीतील 'वंडर किड' म्हणून ओळख मिळवलेल्या सॅम बँकमन यांच्या यश आणि पतनाची कहाणी ही कालातीत आहे. एके काळी सॅम बँकमन प्रसिद्ध व्यक्ती आणि बड्या हस्तींबरोबर फिरायचे.

7 नोव्हेंबर 2022 ला सॅम बँकमन यांची कंपनी अशा अडचणीत सापडली की त्यांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. अशा परिस्थितीती जे नेहमी करायचे तेच त्यांनी केलं, यावर काय पर्याय आहेत, त्याचा विचार केला.

त्याच्या एका दिवसापूर्वीच सॅम यांच्या एका प्रतिस्पर्ध्यानं सोशल मीडियावर एफटीएक्सच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळं ग्राहकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळं त्यांनी एफटीएक्समधून गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली.

क्रिप्टोकरन्सी

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, ऑफिसमधला एक सीन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सॅम बँकमन यांनी ऑनलाइन चॅटद्वारे त्यांच्या कंपनीतील दोन उच्चपदस्थ सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. तुम्हाला ही माहिती पूर्णपणे चुकीची वाटते का? असा प्रश्न त्यांनी केला.

संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते का? असं सॅम यांना विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी, 'हे अशक्य वाटतं' असं उत्तर पोस्ट केलं.

सॅम बँकमन अनेक वर्षांपासून अशाप्रकारच्या दृष्टीकोनानंच काम करत होते.

त्यांनी जवळपास प्रत्येक परिस्थितीला एकाच पद्धतीनं सांभाळलं, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. कधी-कधी त्यांना मार्ग सापडतो, पण नेहमी तसं होत नाही. एक तरुण म्हणून सॅम यांनी एवढ्या वेगानं यशाची शिखरं चढली की, इतिहासात तसं दुसरं कोणतंही उदाहरण नाही.

पण सॅम बँकमन यांच्या प्रतिस्पर्ध्यानं केलेल्या ट्विटनंतर अवघ्या पाच दिवसांत त्यांच्या एक्सचेंजमधून अब्जावधी डॉलरची रक्कम कमी झाली. जेव्हा हे सर्व संपलं तेव्हा ग्राहकांचे तब्बल आठ अब्ज डॉलर गायब झाले होते आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली होती.

पाच आठवड्यांनंतर मॅनहट्टनमधील याचिकाकर्त्यांनी सॅम बँकमन यांच्यावर फसवणूक आणि मनी लाँडरिंगसह अनेक आरोप केले.

चार आठवड्यांच्या सुनावणीत याप्रकरणी दोन परस्परविरोधी कथा समोर आल्या. एक म्हणजे, ते स्वतः बुद्धीमान पण दुर्दैवी व्यक्ती होते. कारण त्यांना त्यांच्या डोळ्यादेखत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यात अपयश आलं.

दूसरी म्हणजे, कंपनीच्या माजी सदस्यांचा पाठिंबा असलेल्या बँकमन यांनी ते कधीही पकडले जाणार नाही, असं समजून लोकांना अब्जावधी डॉलरचा चुना लावला.

या दोन्ही गोष्टींवरून हे लक्षात येतं की, FTX चं नशीब त्याच्या संस्थापकांच्या व्यक्तिमत्त्वाशी कशाप्रकारे जोडलेलं होतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या करिश्म्यानं माजी राष्ट्राध्यक्ष, प्रसिद्ध हस्ती, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज सर्वांनाच आकर्षित केलं होतं.

क्रिप्टोकरन्सी

फोटो स्रोत, Trustnodes

सॅम बँकमन यांना त्यांच्या संपत्तीबाबत काहीही वेगळं वाटत नव्हतं, कारण त्यांची प्रचंड श्रीमंत व्हायची इच्छा होतीच.

अत्यंत कुशल अशा पालकांनी सॅम आणि त्यांच्या लहान भावाला लहानपणापासूनच उपयोगितावादाचं तत्वज्ञान शिकवलं होतं. या सिद्धांतानुसार ज्यामुळं सर्वाधिक लोकांचा फायदा होतो, तेच सर्वात चांगलं आणि नैतिक कार्य असतं.

एमआयटीचे विद्यार्थी असलेले सॅम बँकमन एकदा उपयोगितावादाच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक विल मॅककस्किल यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले होते. एखादी व्यक्ती त्यांच्या चांगल्या कामांच्या प्रभावांचं मोजमाप करण्यासाठी गणिताचा वापर करू शकतात. तसंच इतरही बरंच काही करू शकतात, असा विचार त्यांनी मांडलेला होता.

मॅकस्किलक यांनी बँकमन यांना सल्ला दिला की, ते त्यांचं कौशल्य आकर्षक वॉल स्ट्रीटमध्ये वापरून त्यांची संपत्ती परोपकारी कामांसाठी देऊ शकतात.

बँकमन यांना त्यांचा सल्ला आवडला. त्यांनी 2014 मध्ये शिक्षण सोडलं आणि एका मोठ्या ट्रेडिंग फर्मबरोबर कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कमाईचा जवळपास अर्धा भाग दान करायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं.

तीन वर्षांनी सॅम बँकमन यांना असा एक उद्योग सापडला ज्यामुळं त्यांना सामान्य ट्रेडिंगपेक्षा जास्त श्रीमंत बनता येणार होतं. ते होतं क्रिप्टो ट्रेडिंग.

25 वर्षांचे असताना त्यांनी एक क्रिप्टो इनव्हेस्टमेंट फर्म अल्मेडा रिसर्चची स्थापना केली. बिटकॉइनचे दर वेगवेगळ्या देशांत खूप वेगवेगळे असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी अवघ्या तीन आठवड्यांत 20 दशलक्ष (2 कोटी) डॉलरची कमाई केली.

क्रिप्टोकरन्सी

फोटो स्रोत, Getty Images

2019 मध्ये त्यांनी हाँगकाँगमध्ये जागतिक गुंतवणूकदारांसाठी FTX ची स्थापना केली. काही महिन्यांतच FTX मध्ये दैनंदिन ट्रेडिंग 300 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचलं होतं.

आघाडीच्या किंवा मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राजी करण्यात त्यांना यश येत होतं. 2021 पर्यंत ते 22.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्स 400 च्या सर्वात श्रीमंत अमेरिकन्सच्या वार्षिक यादीतही होते.

काही लोकांच्या मते, त्यांना मिळालेल्या प्रचंड यशाचं कारण त्यांची धोका पत्करण्याची इच्छा हे होतं.

त्यांची पूर्वीची प्रेयसी आणि अल्मेडा रिसर्चच्या माजी सीईओ कॅरोलिन एलिसन यांनी सुनावणीदरम्यान म्हटलं की, "जग नष्ट झालं तरी चालेल, पण ते जिंकत असतील तर त्यांना टॉस करायला नक्की आवडेल. कारण ते जिंकले तर, जग खूप चांगलं आहे.''

एफटीएक्समधील अंतर्गत माहितीचा विचार करता, एफटीएक्समधील जीवन हे कधी-कधी गणिताच्या मोठ्या शिबिरांसारखं असायचं. ते स्मार्ट होतं पण बरंच काही वेगळं असायचं. सगळं सॅम यांच्या नेतृत्वात होतं.

एफटीएक्सच्या एका माजी कर्मचाऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'त्यांच्यात नीटनेटकेपणा नव्हता. ते कायम कार्गो शॉर्ट्स परिधान करून ऑफिसमध्ये अनवानी पायांनी फिरत असायचे.'

त्यांनी सांगितलं की, कंपनीत वरिष्ठांचा असा एक मजबूत गट होता, जे सॅम सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे.

नताली टीएन यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ एफटीएक्समध्ये जनसंपर्क आणि सॅम यांच्या कामचं नियोजन सांभाळलं. त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, त्यांचं व्यक्तिमत्त्वं जादूई होतं, "आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला.

फक्त कंपनीमधले कर्मचारीतच या जादूई व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होते असं नाही.

शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये बिल क्लिंटन, टोनी ब्लेयर आणि कॅटी पेरीबरोबर झळकल्यानंर सॅम एकप्रकारे संपूर्ण क्रिप्टो उद्योगाचे राजदूत बनले होते.

सॅम बँकमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे, ते कमावलेली संपत्ती चैनीवर खर्च करत नसायचे. खटल्यादरम्यान त्यांच्या वकिलांनी म्हटलं की, त्यांची स्वतःची बोटही नाही. ते फक्त एक जुनी टोयोटा कोरोला वापरायचे.

याचदरम्यान ते काँग्रेससमोर हजर झाले आणि क्रिप्टो बाजारावर अधिक नियम असावे असा तर्क मांडला. त्यामुळं त्यांचे सहकारी त्यांच्यापासून दुरावले गेले.

"विचित्र प्रकारे पण क्रिप्टोच्या जगात ते समजदार व्यक्ती वाटत होते. त्यांचं अंतिम लक्ष्य ठरलेलं होतं. ते त्यांची संपूर्ण संपत्ती दान करणार होते," असं शोध पत्रकार जॅक फॉक्स म्हणाले.

फॉक्स म्हणाले की, 'ही एक महान कथा होती. सर्वांनाच ती आवडली. काँग्रेस, व्हाइस चान्सरल, बँकर सर्वांनाच ती आवडली होती.'

"पण त्यांच्या कथेची अडचण म्हणजे, ती खरी नव्हती," असं ते म्हणाले.

क्रिप्टोकरन्सी

फोटो स्रोत, Getty Images

सप्टेंबर 2022 मध्ये व्हेंचर कॅपिटल फर्म सिकोइया कॅपिटलनं त्यांच्या मासिकात सॅम बँकमन यांचं प्रोफाइल प्रकाशित केलं. त्यावेळी FTX चं मूल्य 32 अब्ज डॉलर होतं.

या लेखात लेखक अॅडम फिशर यांनी जगावर सर्वात मोठा परिणाम निर्माण करण्यासाठी स्वतःची संपत्ती अधिकाधिक वाढावी यासाठी बँकमन यांनी केलेल्या प्रयत्नांचं वर्णन केलं आहे. "त्यात प्रचंड धोका होता," असं फिशर लिहितात.

"जगासाठी सर्वाच चांगलं काहीतरी करण्यासाठी, विनाशापासून वाचण्याचा एक मार्ग शोधणं गरजेचं आहे," असं ते म्हणाले.

दीड महिन्यानंतर साइट कॉइनडेस्कनं एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्यात अल्मेडाकडे एफटीटीमध्ये 15 अब्ज डॉलरच्या पोर्टफोलियोचा अर्ध्यापेक्षा अधिक वाटा होता. तो एफटीएक्स द्वारे क्रिप्टो-माइन्ड क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे, असा उल्लेख होता.

ही बाब समोर आल्यानंतर अल्मेडाच्या शेअरचे खरे दर आणि अल्मेडा तसंच एफटीएक्स यांच्यातील संबंध आणि होणाऱ्या संघर्षावर प्रश्न उपस्थित झाले.

नंतर 6 नोव्हेंबरला त्यांचे प्रतिस्पर्धी बाय नॅन्सचे सीईओ चांग पेंग झाओ यांनी त्यांचे प्रमुख एफटीटी स्टोर्स बंद करण्याची घोषणा केली.

11 नोव्हेंबरला FTX बंद झालं. पण क्रिप्टो बूमचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सॅम बँकमन यांची प्रगती आणि नंतर पतन हे अनपेक्षित नव्हतं.

हेही वाचलंत का?