Pak vs NZ: पाकिस्तान ट्ववेन्टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या दमदार सलामीच्या बळावर पाकिस्तानने न्यूझीलंडला 7 विकेट्सनी नमवत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमी फायनलचा दुसरा मुकाबला होणार आहे. या दोन संघांमधील विजेत्याशी पाकिस्तान रविवारी मेलबर्न इथे खेळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान मेलबर्न इथेच आमनेसामने आले होते. त्या लढतीत भारताने थरारक विजय मिळवला होता.
2007 मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानचा मिसबाह उल हक त्यांना जेतेपद मिळवून देणार अशी चिन्हं होती. मात्र जोगिंदर शर्माच्या बॉलिंगवर मिसबाहचा स्कूप श्रीसंतच्या हातात जाऊन विसावला आणि भारताने जेतेपदाची कमाई केली.
2009 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर पाकिस्तान ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदापासून दूरच राहिलं आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या 153 रन्सच्या छोटेखानी पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने 105 रन्सची सलामी देत विजयाचा पाया रचला. रिझवानने 57 तर बाबरने 53 रन्स केल्या. हे दोघं आऊट होताच पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरवरचं दडपण वाढलं. पण मोहम्मद हॅरिसने 30 रन्सची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रिझवानला मॅन ऑफ मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार अशी चिन्हं होती मात्र पाकिस्तानने हार मानली नाही. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमवल्याने पाकिस्तानला आशेचा किरण निर्माण झाला.
न्यूझीलंडच्या सर्वच बॉलर्सवर तुफान आक्रमण करत त्यांना निष्प्रभ केलं. संपूर्ण स्पर्धेत रन्ससाठी झगडणाऱ्या बाबर आझमने सेमी फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत अर्धशतकी खेळी केली.
रिझवान-बाबर या बिनीच्या जोडीला स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यासाठी त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी खणखणीत सलामी देत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान डॅरेल मिचेलच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 152 रन्सची मजल मारली.
मिचेलने 35 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी करत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. केन विल्यमसनने 46 रन्स करत मिचेलला चांगली साथ दिली.
पाकिस्तानतर्फे शाहीन शहा आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.
अडखळत सुरुवातीनंतर न्यूझीलंडने केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेलच्या भागीदारीच्या बळावर शंभरीचा टप्पा ओलांडला. शाहीन शहा आफ्रिदीने केन विल्यमसनला आऊट करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमनची संधी निर्माण केली. केनने 42 बॉलमध्ये 46 रन्सची खेळी केली. वर्ल्डकपच्या पहिल्या सेमी फायनल लढतीत न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला पण पाकिस्तानने शिस्तबद्ध बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बळावर पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडला रोखलं. फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉनवे हे दोघेही तंबूत परतले आहेत. शाहीन शहा आफ्रिदीने अॅलनला एलबीडब्ल्यू केलं तर चोरटी रन घेण्याच्या प्रयत्नात कॉनवे रनआऊट झाला. पॉवरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 44 रन्स केल्या पण त्यांनी 2 विकेट्स गमावल्या. दोन्ही संघांनी अंतिम अकरात कोणताही बदल केलेला नाही. बॅटिंगला अनुकूल पिचवर न्यूझीलंडने बॅटिंगचा निर्णय घेत मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे.
पाकिस्तानचा संघ- बाबर आझम, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाझ, शदाब खान, हॅरिस रौफ, मोहम्मद वासिम, नसीम शहा, शाहीन शहा आफ्रिदी.
न्यूझीलंडचा संघ- डेव्हॉन कॉनवे, फिन अॅलन, केन विल्यमसन, ग्लेन फिलीप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, इश सोधी, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध हार आणि त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाचा नामुष्की झेललेल्या पाकिस्तानने पुनरागमन करत दिमाखात सेमी फायनलचा टप्पा गाठला. आज त्यांच्यासमोर किवी अर्थात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.
पाकिस्तानची बॉलिंग स्पर्धेतल्या सर्वोत्तम बॉलिंग चमू असणाऱ्या संघांपैकी एक आहे. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वासिम, मोहम्मद हसनैन, नसीम शाह हे पंचक उत्तम फॉर्मात आहे.
पिचचं स्वरुप आणि वातावरण पाहून कोणाला वगळायचं यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दुखापतीमुळे काही महिने खेळापासून दूर राहिलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला आता सूर गवसला आहे. हॅरिस रौफ ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत खेळतो.
त्यामुळे इथल्या खेळपट्ट्यांचा, मैदानाच्या आकारांचा त्याला अनुभव आहे. वेग आणि अचूकता या दोन्ही आघाड्यांवर हॅरिसने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
युवा ऊर्जेसह बॉलिंग करणारा नसीम शाह प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणतो. मोहम्मद वासिम आणि मोहम्मद हसनैन दोघांनीही जेव्हाही संधी मिळाली आहे तेव्हा चांगली कामगिरी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही पाकिस्तानची बिनीची जोडी. गेल्या वर्षीही पाकिस्तानने ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचं श्रेय बाबर-रिझवान जोडीला जातं. यंदा मात्र या दोघांची बॅट तळपलेली नाही. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर बाबर-रिझवान जोडीच्या सर्वसाधारण कामगिरीवर जोरदार टीका झाली होती. बाबरच्या नेतृत्वावर सातत्याने टीका होते आहे.
बाबरने मधल्या फळीत खेळावं असा माजी खेळाडूंचा आग्रह आहे. अंतिम संघ निवडतानाही बाबरच्या हातून चुका होतात असं त्यांचं म्हणणं आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यामुळे पाकिस्तानसाठी आशेचा किरण निर्माण झाला. बांगलादेशला नमवून त्यांनी सेमी फायनल गाठली.
बाबरला बॅट्समन आणि कर्णधार म्हणून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याची संधी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेल्या मोहम्मद रिझवानला त्याचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी उत्तम संधी आहे. बाबर-रिझवान जोडी यशस्वी ठरली तर पाकिस्तानची कामगिरी चांगली होते.
गेल्या वर्ल्डकपपासून पाकिस्तानच्या मिडल ऑर्डर अर्थात मधल्या फळीवर प्रचंड टीका होते आहे. इफ्तिकार अहमद आणि मोहम्मद हॅरिस यांनी तूर्तास ही टीका परतावून लावली आहे. फखर झमान दुखापतग्रस्त झाल्याने हॅरिसला संधी मिळाली आहे.
तडाखेबंद बॅटिंग करणाऱ्या हॅरिसच्या आगमनाने पाकिस्तानचा संघाला बळकटी मिळाली आहे. इफ्तिकारने संघाला अडचणीच्या स्थितीतून तारलं आहे. या दोघांच्या बरोबरीने शान मसूदला सूर गवसला आहे. मोहम्मद नवाझ आणि शदाब खान दोघंही बॉलिंगच्या बरोबरीने बॅटिंगही करत असल्याने पाकिस्तानला स्थैर्य मिळालं आहे.
आतापर्यंत पाकिस्तानची कशी कामगिरी
पाकिस्तानची न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी20 वर्ल्डकपमधली कामगिरीही चांगली नाही. ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांदरम्यान 6 लढती झाल्या आहेत. त्यापैकी 4 पाकिस्तानने जिंकल्या आहेत तर 2मध्ये न्यूझीलंडने सरशी साधली आहे. आकडेवारी पाकिस्तानच्या बाजूने आहे. पाकिस्तानचं आक्रमण दर्जेदार आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. तब्बल 11 वर्षानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर नमवण्याची किमया केली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची आधुनिक काळातल्या सर्वोत्तम बॅट्समनमध्ये गणना होते पण त्याचा स्ट्राईकरेट ही काळजीची बाजू आहे.
कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करणं हे केनसाठी आव्हानात्मक राहिलं आहे. ग्लेन फिलीप्सने स्पर्धेत दिमाखदार शतक साकारलं आहे. फिन अलनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादळी खेळी केली होती. पारंपरिक पद्धतीला छेद देत हे दोघं बॅटिंग करतात. या दोघांना फिरकीच्या जाळ्यात अडकावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. डेव्हॉन कॉनवे हा न्यूझीलंडचा हुकमी एक्का ठरू शकतो. कारण फास्ट आणि स्पिन अ दोन्ही आक्रमणं तो उत्तम खेळतो.
न्यूझीलंडविरुद्धची अफगाणिस्तानची लढत पावसामुळे रद्द झाली होती. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी दमदार विजय मिळवला. इंग्लंडविरुद्ध मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन हे भन्नाट त्रिकुट आहे. इश सोधी आणि मिचेल सँटनर या स्पिनर द्वयीने उत्तम कामगिरी केली आहे. या दोघांच्या आक्रमणाविरुद्ध जोरदार फटकेबाजी करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा असू शकतो. न्यूझीलंडसाठी फिल्डिंग ही जमेची बाजू आहे. केवळ फिल्डिंगच्या बळावर न्यूझीलंड रन्स वाचवतं. अफलातून कॅचेस घेण्यासाठी त्यांच्या संघातले खेळाडू प्रसिद्ध आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








