चुकीच्या पद्धतीने स्पर्श, नंबर मागणे, जवळ बोलावणे, बृजभूषणविरोधातील तक्रारीत महिला खेळाडूंचे गंभीर आरोप

बृजभूषण शरण सिंह

फोटो स्रोत, ani

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

यासंदर्भात महिला खेळाडूंनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर उघड झाला आहे. यामध्ये बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप असल्याचं दिसून येतं.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या सात महिला खेळाडूंपैकी दोन खेळाडूंनी त्यांचं अनेक वेळा लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार, ही तक्रार 21 एप्रिल रोजी दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल झाली. यामध्ये किमान आठ घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

बृजभूषण सिंह यांनी त्यांचा श्वासोच्छवास तपासण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि लैंगिक शोषण केलं, असा दावा दोन तक्रारदारांनी केला.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा असलेला प्रभाव आणि आपल्या करिअरचं नुकसान टाळण्यासाठी याबाबत कुठे उल्लेख केला नव्हता, असंही महिला खेळाडूंनी म्हटलं.

पण बृजभूषण यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

जंतर-मंतरवर पैलवानांना धक्काबुक्की केल्याचा पोलिसांवर आरोप, 2 जण जखमी

ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि कॉमनवेल्थ पदक विजेती विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनास बसलेल्या पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी इतर अनेक पैलवान याठिकाणी ठाण मांडून आहेत.

जंतर मंतर

फोटो स्रोत, Chandan Singh Rajput/BBC

मात्र, येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन पैलवान जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

दुष्यंत फोगाट आणि राहुल असं जखमी पैलवानांचं नाव आहे.

महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांखाली भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून पैलवान आंदोलनास बसले आहेत.

मात्र, सिंह यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

बुधवारी रात्री विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप केला. आंदोलनास बसलेल्या पैलवानांसोबत झटापट झाल्याचं दिल्ली पोलिसांनी मान्य केलं. दिल्ली पोलिसांमधील अधिकारी प्रणव तायल यांच्या माहितीनुसार, या दरम्यान काही पोलीस कर्मचारी आणि पैलवान हे जखमी झाले आहेत.

पैलवानांनी दिल्ली पोलिसांना लेखी स्वरुपात तक्रारही दिली. दिल्लीचे पोलीस उपायुक्त रविकांत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, “सीसीटीव्ही फुटेज पाहून पैलवानांच्या आरोपांबाबत तपास केला जात आहे.”

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती कोणत्याही परवानगीशिवाय धरणे आंदोलनावर फोल्डिंग बेड आणण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवलं. याच गोष्टीवरून वाद सुरू झाला, अशी माहिती समोर येत आहे.

स्वाती मालीवाल

फोटो स्रोत, Chandan Singh Rajput/BBC

रात्री सुमारे साडेबारा वाजता जंतर-मंतरवर पैलवानांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती माध्यमांना दिली. यानंतर रात्रीच्या वेळी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

स्वाती मालीवाल यांनाही रोखलं

पैलवानांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेल्या लोकांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल या जंतर-मंतरवर पोहोचल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सच्या आत जाऊ दिलं नाही. पोलिसांनी त्यांना एका गाडीत घालून मंदिर मार्ग पोलीस ठाण्याकडे पाठवून दिलं.

किसान युनियनचे काही नेतेही जंतर-मंतरवर पोहोचले. त्यांनी बॅरिकेड्सवर उभे राहून घोषणाबाजी केली. दरम्यान, काही जणांना आत पाठवण्यात आलं मात्र काहींना बाहेरच थांबवण्यात आलं.

कुस्तीपटूंनी तीन महिन्यांपूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती- योगेश्वर दत्त

कुस्तीपटूंनी तीन महिन्यांपूर्वीच पोलिसात तक्रार दाखल करायला हवी होती असं भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या समिती सदस्य आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटलं आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या कथित लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत योगेश्वरचा समावेश आहे.

योगेश्वर दत्त, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योगेश्वर दत्त

2012 ऑलिम्पिक स्पर्धेत योगेश्वरने कांस्यपदकाची कमाई केली होती. तीन महिन्यांपूर्वीच पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता असं योगेश्वरने सांगितलं. पोलीस त्यांना सूचना मिळाल्यावरच कारवाई करतात असं योगेश्वर म्हणाला. कोणी घरी बसून राहिलं तर पोलीस कसे कारवाई करणार असा सवाल त्याने केला.

"खेळ मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या आरोपांसंदर्भात समिती गठित केली. पण या दोन्ही समित्या कोणालाही दोषी ठरवू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढे अधिकारच नाहीत. तो अधिकार न्यायालयाकडे आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन अहवाल देणं एवढंच समिती करु शकते", असं योगेश्वरने सांगितलं.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आरोपांची शहानिशा करण्यासाठी नेमलेल्या समितीचा योगेश्वर भाग होता.

रॉबर्ट वाड्रा-चंद्रशेखर जंतरमंतरवर

रॉबर्ट वाड्रा आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर हे दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले.

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा तेथे पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांना पाठिंबा दिला.

वाड्रा म्हणाले, “मी येथे सर्व खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठिशी आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सर्वजण त्यांना नक्कीच मदत करू.

भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांचे वक्तव्याविषयी ते म्हणाले, “ या खेळाडूंची मेहनत त्यांना समजत नाही आणि असे केल्याने त्यांचे मनोधैर्य खचेल.”

शनिवारी रॉबर्ट यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही जंतरमंतरवर पोहोचल्या होत्या.

काय म्हणाले भीम आर्मीचे प्रमुख?

जंतर मंतर आदोलन

फोटो स्रोत, ani

भीम आर्मीचे प्रमुखचंद्रशेखर म्हणाले की, कोणी आपल्या हक्कांसाठी लढत असेल तर माझ्यासारखे अनेक लोक त्याला साथ देतील.

ते म्हणाले, "या लढ्याला ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. हा लढा कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा नाही, हा लढा न्यायासाठी आहे. ज्यांच्यामध्ये विवेक आहे, त्यांनी या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी निमंत्रण पाठवण्याची गरज नाही.

"गेल्या वेळी म्हणजे जानेवारीतही आम्ही त्यांच्यासोबत होतो, पण तेव्हा त्यांनी कोणालाही येण्यास मनाई केली होती."

'केंद्र सरकारने निर्दयी होऊ नये', अरविंद केजरीवाल यांचं आवाहन

दिल्लीत जंतरमंतर इथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पोहोचले. ‘हे खेळाडू ही लढाई स्वत:साठी लढत नाहीयेत. ही संपूर्ण क्रीडाविश्वाचीच लढाई आहे’, असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन करताना म्हटलं की, “तुम्ही निर्दयी बनू नका. या खेळाडूंना येणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला. या खेळाडूंच्या बसण्याची जी सोय करण्यात आली त्यांना रोखण्यात आलं. या भागाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला”.

सर्वसामान्य नागरिकांनी या कुस्तीपटूंना पाठिंबा द्यावा, असंही केजरीवाल म्हणाले.

“जे लोक भारतमातेवर प्रेम करतात, त्यांना आवाहन आहे की सुट्टी घेऊन तुम्ही या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी या. तुमच्या समर्थनाची त्यांना गरज आहे.

"जी माणसं भारतावर प्रेम करतात- मग तो काँग्रेसचा असो, भाजपचा असो, आम आदमी पक्षाचा. कोणत्याही पक्षाचा असो. या खेळाडूंना साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने या”.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

केजरीवाल पुढे म्हणाले, “तुम्ही विचार करा की तो माणूस इतका शक्तिशाली आहे की त्याच्याविरुद्ध पोलिसांमध्ये एफआयआर दाखल व्हायला सात दिवस लागले. खेळाडूंना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.

"या खेळाडूंनी भूमिका घेतली नसती तर मुलींबरोबर गैरवर्तन होतच राहिलं असतं. हे खेळाडू आपले आहेत, त्यांनी देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली आहे.”

एकूण 7 खेळाडूंची बृजभूषणविरोधात तक्रार, त्यापैकी 1 अल्पवयीन

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या तक्रारीनुसर, बृजभूषण यांच्याविरोधात एकूण 7 महिला खेळाडूंनी तक्रार दाखल केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन खेळाडूचाही समावेश आहे.

या प्रकरणात लवकरच पीडितांचा जबाब घेणार आहोत, असं पोलिसांनी म्हटलं.

बृजभूषण सिंह यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशात आयोजित स्पर्धांदरम्यानही महिला खेळाडूंचं शोषण केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत, असं पोलिसांनी म्हटलं.

या एफआयआरची प्रत देण्यावरूनही वाद निर्माण झाला होता. मात्र, पैलवानांना त्याची एक प्रत देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तर, पोस्कोअंतर्गत (अल्पवयीनसंदर्भात) दाखल गुन्ह्याची प्रत पैलवानांना देण्यात येणार नाही, नियमानुसार त्याची प्रत केवळ पीडित कुटुंबालाच देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

राजीनाम्याच्या मागणीवर बृजभूषण सिंह काय म्हणाले?

बृजभूषण सिंह यांनी आपल्यावरील आरोपांवर तसंच राजीनाम्याच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली आहे.

आज (29 एप्रिल, शनिवार) माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राजीनामा ही काय फार मोठी गोष्ट नाही. पण गुन्हेगार बनून मी राजीनामा देणार नाही. मी कुणी अपराधी नाही."

पैलवान हे सातत्याने त्यांच्या मागण्या बदलत आहेत, असं ते म्हणाले.

ब्रिजभूषण सिंह

फोटो स्रोत, ANI

बृजभूषण यांनी म्हटलं, "त्यांची मागणी सतत बदलत चालली आहे. तुम्ही त्यांची जुनी वक्तव्ये ऐकलात तर सुरुवातीला पदाचा राजीनामा मागितला होता. मी त्यावेळी म्हटलं होतं की पदाचा राजीनामा देणं म्हणजे त्यांचे आरोप स्वीकारणं, असा त्याचा अर्थ होतो."

"माझा कार्यकाळ जवळपास पूर्ण झाला आहे. जोपर्यंत नवीन निवडी होतील, त्या कालावधीत भारतीय ऑलंपिक संघाने गठित केलेली समिती 45 दिवसांच्या आत निवडणुका घेणार आहे. ती निवडणूक झाली की माझा कार्यकाळ आपोआप संपून जाईल."

दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरबाबत बृजभूषण सिंह म्हणाले, "अजून तरी माझ्याकडे एफआयआरची प्रत आलेली नाही. ती मिळाल्यानंतर मी त्यावर बोलेन."

कुस्तीपटू आंदोलन

'बृजभूषण सिंहांना नरेंद्र मोदी पाठीशी का घालतायेत?'

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलनाला बसलेल्या पैलवानांची भेट घेतली.

जंतर-मंतरवर विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे तिघेही गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलनास बसले आहेत.

प्रियांका गांधी यांनी तिघांची भेट घेऊन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सिंह यांना हटवण्यात यावं, ते पदावर असेपर्यंत या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

प्रियांका गांधी म्हणाल्या, “देशाच्या लेकी मेडल जिंकून येतात. तेव्हा आम्हालाही अभिमान वाटतो. पण आज त्याच मुली न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसल्या आहेत. त्यांचं कुणी ऐकून घेत नाही. अशा स्थितीत आरोपीला पदावरून हटवणं हेच योग्य ठरतं.”

तिन्ही पैलवानांना अजूनपर्यंत त्यांच्या एफआयआरची एकही कॉपी देण्यात आली नाही, असंही गांधी यांनी म्हटलं.

त्या पुढे म्हणाल्या, सरकार बृजभूषण शरण सिंह यांना का पाठिशी घालत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती. कमिटी करून काय होतं, सर्वांना माहीत आहे. हे सगळं प्रकरण टाळण्यासाठी असतं. या प्रकरणात राजकारण करण्यात येऊ नये.”

प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Twitter

क्रीडा जगतातून प्रतिक्रिया

भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झानं याविषयी ट्वीट केलं आहे.

तिनं म्हटलंय, "एक खेळाडू, पण त्यापेक्षा अधिक एक महिला म्हणून खेळाडूंना आंदोलन करताना पाहणं खूप अवघड आहे. या खेळाडूंनी आपल्या देशाला गौरव मिळवून दिला आहे आणि आपण सर्वांनी त्यांचा आनंदही साजरा केला आहे. त्यामुळे या कठीण काळात त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे.

"ही अत्यंत संवेदनशील बाब आहे आणि खेळाडूंनी गंभीर आरोप केले आहेत. मला आशा आहे की त्यांना लवकर न्याय मिळेल."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

“भारतीय क्रीडापटू जेव्हा देशासाठी पदकं मिळवतात तेव्हाच नाही तर नेहमीच आपल्यासाठी अभिमानास्पद असतात,” असं ट्विट माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यानं पत्रक काढून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केलंय.

खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद - नीरज चोप्रा

नीरज चोप्रानं म्हटलंय की, "खेळाडूंना न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय, हे पाहून दु:ख होतंय. आपल्या देशाला अभिमान वाटेल असं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. देश म्हणून आपण प्रत्येक खेळाडूच्या प्रामाणिकतेचं आणि प्रतिष्ठेचं संरक्षण केलं पाहिजे."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 4

नीरज चोप्रा पुढे म्हणाला की, "जे काही घडतंय, ते कधीच घडायला नको होतं. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. याकडे अत्यंत निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पाहायला हवं. संबंधित प्राधिकारणाने यावर ताततडीनं कारवाई करत, न्याय देण्याचा विश्वास दिला पाहिजे."

कुस्तीपटू आंदोलन

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचं समर्थन केलं आहे.

त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर आंदोलक कुस्तीपटूंचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “यांना न्याय मिळेल का?”

हा फोटो शेअर करताना त्यांनी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियालाही टॅग केलं आहे.

रस्त्यावर आंदोलन केल्यानं देशाची प्रतिमा मलिन होतेय - पीटी उषा

राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत म्हटलं की, "पैलवानांनी रस्त्यावर आंदोलन करणं अनुशासनहीनता आहे आणि यामुळे देशाची प्रतिमा मलिन होतेय."

पीटी उषा
फोटो कॅप्शन, पीटी उषा

पीटी उषा यांना पैलवान बजरंग पुनिय यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "त्या स्वत: महिला आहेत. हे ऐकून दु:ख झालं. आम्ही तीन महिने वाट पाहिली. आम्ही त्यांच्याकडेही गेलो. मात्र, आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे आम्ही इथे यावं लागलं."

तर पैलवान साक्षी मलिक म्हणाली की, "महिला खेळाडू असूनही त्या अशा बोलत आहेत. हे ऐकून खरंच दु:ख झालं. आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. आम्ही कुठे अनुशासनहीनता केली? आम्ही शांततेत आंदोलन करतोय. आम्हाला हे अपरिहार्यपणे करावं लागतंय."

कुस्तीपटू जंतर-मंतरवर

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून महिला पैलवानांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. बृजभूषण यांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप या महिला खेळाडूंनी केले आहेत.

बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून विनेश फोगाट, साक्षी मलिक या महिला खेळाडू दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत. अनेक पुरुष पैलवानांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

कुस्तीपटू

जानेवारी महिन्यात या खेळाडूंनी बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं पण मध्ये बराच काळ जाऊनही बृजभूषण यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

रविवार दुपारपासून हे खेळाडू आंदोलन करत आहेत. बृजभूषण यांच्याविषयी तक्रार करून तीन महिने लोटले तरी देखील अद्याप आम्हाला न्या मिळाला नाही असं खेळाडूंचं म्हणणं आहे.

जानेवारी महिन्यात जेव्हा हे आरोप झाले होते तेव्हा बृजभूषण यांनी हे आरोप फेटाळले होते.

जानेवारी महिन्यात काय घडलं होतं?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर आज (18 जानेवारी) धरणे आंदोलनास बसल्या होत्या.

यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”

कुस्तीपटू आंदोलन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.

विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.

विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”

“मला काही झालं, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं, याची जबाबदारी कुणी घेतली असती? आपल्या कोणत्याही खेळाडूला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी कुस्ती महासंघाची असेल. आमचा इतका मानसिक छळ होतो. वरून मला म्हटलं जातं की मीच मानसिकरित्या कमकुवत आहे.”

यादरम्यान विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रूही तरळल्याचं दिसून आलं.

कुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्ती महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”

बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?”

ते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”

बृज भूषण शरण सिंह

फोटो स्रोत, ani

फोटो कॅप्शन, बृज भूषण सिंह

बृजभूषण सिंह कोण आहेत?

बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.

1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.

एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.

बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.

राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दोऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.

ब्रिजभूषण सिंह

राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.

अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.

"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.

मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.

भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)