त्वचेच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मेंदूच्या कर्करोगातून 'असं' केलं स्वतःला बरं

    • Author, टिफ्फनी टर्नबूल
    • Role, बीबीसी न्यूज, सिडनी

ग्लिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) या आजारावर एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियातील डॉक्टर रिचर्ड स्कॉयलियर कॅन्सरमुक्त झाले आहेत. जगात पहिल्यांदाच या पद्धतीनं उपचार करण्यात आले होते.

प्रोफेसर स्कॉयलियर यांनी स्वतः त्वचेचा कर्करोग म्हणजे मेलानोमावर संशोधन केलं होतं.

त्याच आधारावर ग्लिओब्लास्टोमासाठी उपचार पद्धती विकसित करण्यात आली. त्याच उपचारपद्धतीचा प्रोफेसर स्कॉयलियर यांच्यावर प्रयोग करण्यात आला.

स्कॉयलियर यांना झालेला ग्लिओब्लास्टोमा इतका घातक होता की, या कर्करोगाच्या अनेक रुग्णांचा एका वर्षांच्या आतच मृत्यू होतो.

मात्र, स्कॉयलियर यांनी मंगळवारी, 14 मे रोजी एमआयआर केलं. यामध्ये त्यांच्या मेंदूत एकही गाठ नसल्याचं दिसून आलं. याचा अर्थ, ते कर्गरोगमुक्त झाले आहेत.

बीबीसीशी बोलताना रिचर्ड स्कॉयलियर म्हणाले, "खरं सांगतो, आधी एमआयआर करताना मला इतकी भीती वाटायची नाही. हे एमआयआर स्कॅन करताना मात्र मी प्रचंड घाबरलो होतो. पण आता मी खूप आनंदी आहे."

प्राध्यापक रिचर्ड स्कॉयलियर हे ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधक आहेत. मेलानोमा म्हणजे त्वचेच्या कर्करोगावरील संशोधनासाठी त्यांना आणि त्यांची मैत्रिण तथा सहकारी जॉर्जिना लाँग यांच्यासह ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

इम्युनोथेरपी म्हणजे कर्करोगाच्या पेशींवर शरीरातील रोगप्रतिक्रारशक्ती वापरून हल्ला करण्याची उपचारपद्धतीवर ऑस्ट्रेलियातील मेलानोमा इन्स्टिट्यूटच्या या सहकारी डॉक्टरांच्या जोडीनं गेल्या दहा वर्षांत काम केलं.

त्याचा फायदा मेलानोमाची तीव्रता जास्त असलेल्या रुग्णांना झाला. अर्धे रुग्ण जवळपास बरे झाले आहेत.

हे तेच संशोधन आहे, ज्याचा वापर करून प्राध्यापक लाँग त्यांच्या सहकारी डॉक्टरांसोबत मिळून प्राध्यापक स्कॉलियर यांच्यावर उपचार करत होते.

प्राध्यापक स्कॉलियर यांना असलेला मेंदूचा कॅन्सर बरा व्हावा या उद्देशानं हा उपचार सुरू होता.

औषधांचा वापर केल्यानंतर इम्युनोथेरपी ही उपचार पद्धती प्रभावी ठरते.

पण ही औषधं कॅन्सरची गाठ काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेपूर्वी दिल्यास अधिक प्रभावी ठरतात, असं मेलानोमावर संशोधन करताना प्रसिद्ध ऑनकॉलॉजिस्ट प्राध्यापक लाँग आणि त्यांच्या टीमनं शोधून काढलं.

याच उपचारपद्धतीचा वापर प्राध्यापक स्कॉयलियर यांच्यावर गेल्या वर्षी करण्यात आला होता. मेंदूमधील गाठ काढण्यापूर्वी त्यांना औषधं देण्यात आली होती. त्यांच्या कॅन्सरच्या वैशिष्ट्यांनुसार लसीकरण करणारे स्कॉयलियर पहिले रुग्ण होते.

स्कॉयलियर म्हणतात, "उपचार सुरू झाले, तेव्हा सुरुवातीचे काही महिने कठीण गेले. या काळात मेंदूचा दौरा, यकृताचे आजार, न्युमोनिया असा त्रास सुरू झाला होता. पण आता निरोगी वाटत आहे. इतक्या दिवसानंतर मला चांगलं वाटत आहे."

प्रोफेसर स्कॉयलियर आधीसारखा दररोज व्यायाम करतात. ते दररोज 15 किलोमीटर जॉगिंग करतात. ते आनंद व्यक्त करत म्हणाले, "माझ्या मेंदूत झालेला कॅन्सर फक्त बरा झाला नाहीतर तो आता पुन्हा होणार नाही हे जाणून मला खूप आनंद झाला. आता मी माझी पत्नी केटी आणि माझ्या तीन मुलांसोबत आनंदानं आयुष्य जगू शकतो."

जगभरात एक वर्षात मेंदूच्या कॅन्सरचे जवळपास 3 लाख रुग्ण सापडतात. या सगळ्या रुग्णांना बरं होण्यासाठी हे संशोधन एक दिवस नक्की फायदेशीर ठरेल. कारण आतापर्यंत या संशोधनाचे परिणाम सकारात्मक आहेत.

प्रोफेसर स्कॉयलियर आणि प्रोफेसर लाँग यांनी याआधी सांगितलं होतं की, या प्रायोगिक उपचारपद्धतीमुळे बरं होण्याची शक्यता फारच कमी आहे.

पण यामुळे प्रोफसर स्कॉयलियर ज्यांना मेंदूचा कॅन्सर झाला त्यांचं आयुष्य वाढण्याची आशा त्यांना होती. तसंच, या उपचारपद्धतीच्या कॅन्सर रुग्णावर लवकरच क्लिनिकल ट्रायल केल्या जातील असंही ते म्हणाले होते.

त्यांच्याकडे सध्या वैज्ञानिक संशोधन पेपर आहे ज्याचं पुनरावलोकन सुरू आहे. यामध्ये प्रोफेसर स्कायलियर यांच्यावरील उपचारानंतर झालेल्या सकारात्मक परिणामांचा उल्लेख आहे. पण, प्रोफसर लाँग यांनी सांगितलं की, मान्यताप्राप्त उपचारपद्धती विकसित करण्यासाठी त्यांना अजून काम करावं लागणार आहे.

"आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना मदत करू शकू यासाठी पुढच्या टप्प्याचं काम सुरू आहे. त्यासाठी आम्ही डेटा तयार केलेला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणारी इम्युनोथेरपी ही उपचारपद्धती अधिक रुग्णांना फायदेशीर ठरते का? याचा अभ्यास करण्यावर अधिक भर द्यायचा आहे," असं प्रोफेसर लाँग म्हणाल्या.

ग्लिओब्लास्टोमाच्या (मेंदूचा कर्करोग) उपचारांसाठी सध्याचा प्रोटोकॉल नावावर असणारे डॉक्टर रॉजर स्तूप यांनी या वर्षाच्या सुरुवातीला बीबीसीसोबत बोलताना म्हटलं होतं की, प्रोफेसर स्कॉयलियर यांचा आजार अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार काम करतील का हे सध्या सांगू शकत नाही.

आता प्रोफेसर स्कॉयलियर बरे झाल्यानंतर डॉक्टर रॉजर स्तूप अधिक उत्साही नाहीत.

ते म्हणतात, "अधिक आनंदी होण्यापेक्षा पुढच्या 12-18 महिन्यात स्कॉयलियर यांच्या मेंदूत पुन्हा गाठी येऊ नये यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे."

माझ्यावरील उपचारानंतर तयार झालेला डेटा पाहून अभिमान वाटत असल्याचं प्रोफेसर स्कॉयलियर सांगतात. तसेच या प्रायोगिक उपचार पद्धतीसाठी मेहनत घेणाऱ्या मेडीकल टीमसह स्वतःच्या कुटुंबीयांचेही आभार मानायलाही ते विसरले नाहीत.

ते म्हणतात, "मी ज्या टीमसोबत काम करतो त्याचा मला अभिमान आहे. या मार्गावर जाण्यासाठी त्यांनी पत्करलेली जोखीम पाहून मला अभिमान वाटतो."

अधिक औपचारिकपणे संशोधन करण्यासाठी कदाचित ही एक दिशा ठरू शकते, अशीही आशा ते व्यक्त करतात.