हात धुणं का आवश्यक आहे? सतत डोळे येत असतील तर हे नक्की वाचा

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

स्वच्छतेचे धडे आपण लहानपणापासून घेत असलो तरी कालांतराने अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि सवयी हळूहळू विस्मरणात जातात. लहानपणापासून आपल्याला शाळेत, घरात स्वच्छ अंघोळ, हातपाय धुणे, नखं कापणे अशा सवयींबद्दल सांगितलं जातं मात्र अनेक वर्षांच्या टप्प्यानंतर त्यातील मूळ उद्देश विसरला जाऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटना 5 मे रोजी ‘वर्ल्ड हँड हायजिन डे’ साजरा करते. फक्त हात धुतल्यामुळे आपण अनेक आजारांना कसं रोखू शकतो याबद्दल जागरुकता पसरवण्याचा उद्देश यामागे आहे.

लहान मुलांच्या बाबतीत स्वच्छतेसाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

लहान मुलांना अनेक आजार अस्वच्छता किंवा स्वच्छतेबद्दल नीट माहिती नसल्यामुळे होऊ शकतात. पोट बिघडणे, डोळे येणे असे अनेक आजार आपण योग्य माहिती आणि शिक्षणाच्या आधारे टाळू शकतो.

त्यासाठी या बातमीत आपण वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व आणि काही आवश्यक सवयी मुलांना कशा लावायच्या याची माहिती घेऊ.

हात धुणे- आपल्या हातांची स्वच्छता ही एकूण आरोग्यासाठी अग्रक्रमावर असलेली बाब आहे. हात स्वच्छ धुतल्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग थांबवता येतात. पोट बिघडणे, अतिसार तसेच अनेक श्वसनासंदर्भातील आजारही यामुळे रोखता येतात.

त्यामुळे साबण आणि पाण्याने हात नीट धुवावेत आणि मुलांनाही त्याची सवय लावावी. जेवणापूर्वी, जेवण झाल्यावर हात धुणं आवश्यक आहे. बाहेरुन आल्यावर तसेच शाळेतून आल्यावर, खेळून आल्यावर मुलांनी हात नीट धुतले पाहिजेत. पाळीव किंवा कोणत्याही प्राण्याला हाताळणाऱ्या लोकांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

शौचाला जाऊन आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवावेत, कपडे स्वच्छ असावेत याचं शिक्षण मुलांना देता येईल. यामुळे संभाव्य आजार टाळण्यासाठी आणि एकूणच शारीरिक स्वच्छतेला मोठा हातभार लागतो.

तोंडाचे आरोग्य- कोणताही पदार्थ खाल्ल्यावर तसेच जेवल्यावर चूळ भरणे, पुरेसे पाणी पिणं आवश्यक आहे. मुलांनी तसेच सर्वांनीच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपी जाताना दात घासणं आवश्यक आहे.

जीभ तसेच तोंडातील इतर भागाची स्वच्छता अत्यंत आवश्यक असते. दातांची तपासणी वेळोवेळी करणं आवश्यक आहे.

अंघोळ- मुलांना दररोज स्वच्छ अंघोळ करण्याची सवय लावणं ही पालकांची जबाबदारी आहे. बाहेरुन आल्यावरही अंघोळ करणं शक्य आहे, कारण बाहेरुन घरी आल्यावर आपण अनेक रोगजंतूंच्या संपर्कात आलेलो असतो. अंघोळीबरोबरच नखं कापणे, नखांमधील स्वच्छता याचे धडे मुलांना देणं गरजेचं आहे.

नखांमध्ये असलेले जंतू सहज डोळे किंवा तोंडाच्या संपर्कात येऊन संसर्ग होऊ शकतो.

केसांची स्वच्छताही यामध्येच येते. मुलांच्या केसांच्या स्थितीनुसार शांपू किंवा तत्सम गोष्टीचा वापर केस धुण्यासाठी करता येतेो. काही मुलांना अंघोळीचा कंटाळा असू शकतो. अशा मुलांना अंघोळ घालण्य़ासाठी काही मजेशीर क्लृप्त्यांचा वापर करुन ही सवय लावता येईल.

त्वचेची काळजी- लहान मुलांना अनेकवेळा त्वचेवर फोड येणे, पुरळ उठणे अशा गोष्टी दिसून येतात. तसेच पौगंडावस्थेतील मुलांची त्वचा अधिक तेलकट झाल्यामुळे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

चेहरा आणि शरीर याची योग्य स्वच्छता करण्यासाठी साबणाचा वापर करता येईल. घामामुळे शरीराला दुर्गंधी येते त्यामुळे शरीराला घड्या पडतात अशा जागांची स्वच्छता करणं आणि त्या जागा कोरड्या ठेवणं याचं ज्ञान मुलांना देणं गरजेचं आहे.

पाळीविषयक ज्ञान- साधारणतः आठ ते 13 वयोगटातील मुलींना पाळी येणं सुरू होते. अशा मुलींना पाळीच्या काळात कशी स्वच्छता ठेवायची याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच या काळात वापरायच्या उत्पादनांची माहितीही दिली पाहिजे.

डोळे येणं कसं थांबवायचं?

संसर्गाचा विचार केल्यास लहान मुलांमध्ये डोळ्यांना होणारा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो. विविध प्रकारचा संसर्ग आणि अॅलर्जीमुळे डोळ्यांचा दाह होतो. यामुळे डोळे लाल होतात आणि त्रास सुरू होतो.

डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे, डोळे सुजणं, डोळ्यांतून पाणी येणं, तसेच पापण्यांजवळ दुखणं अशी अनेक लक्षणं यामध्ये दिसून येतात.

डोळ्यांचा संसर्ग थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल कल्याण येथील डॉ. सुजाता टी. यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

त्या म्हणाल्या, "सतत हात धुणे आणि शरीराची स्वच्छता नीट ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यांना होणारा संसर्ग टाळण्य़ासाठी डोळ्यांना विनाकारण स्पर्श आणि डोळे चोळणं टाळलं पाहिजे.

तसेच दुसऱ्यांनी वापरलेल्या वस्तू वापरणं टाळलं पाहिजे. यामध्ये डोळ्यांच्या मेकअपचे साहित्य, आय ड्रॉप्स. टॉवेल्स, कॉन्टॅक्ट लेन्सेस, संसर्ग झालेल्या व्यक्तीचं पांघरुण, चष्मे, गॉगल वापरणं टाळावं.

लहान मुलांना डोळे येण्याची शक्यता जास्त असते कारण शाळेत किंवा ते ज्या ठिकाणी खेळतात अशा जागी, पाळणाघरात योग्य स्वच्छता पाळली जात असेलच असे नाही. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी अशा जागा स्वच्छ असाव्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांनी वारंवार हात नीट धुतल्यास संसर्ग टाळता येईल."

डोळे आल्यास पालकांनी घरच्याघरी उपचार करू नयेत, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी. मुलांची रोगप्रतिकारकक्षमता वाढीस लागावी यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. तसेच व्हीटॅमिन ए,सी, आणि ई युक्त फळांचा समावेश खाण्यात करावा.

लाल ढबू मिरची, गाजर, संत्री, किवी, टोमॅटो, जर्दाळू, आंबे अशा पदार्थांचा समावेश खाण्यात केल्यास त्यांची प्रतिकारक्षमताही वाढीला लागेल. याबरोबर योग्य प्रमाणात झोप व पुरेशी विश्रांतीही गरजेची आहे.