You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तराखंडप्रमाणेच थायलंडमध्ये जेव्हा 12 मुलं 18 दिवस गुहेत अडकून पडली होती
उत्तरकाशी मध्ये सिलक्याला बोगद्यात 41 मजूर अडकलेले आहेत. त्यांचा बचाव करण्याचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
अशाच पद्धतीने थायलंडमध्ये 23 जून 2018 ला गुहेमध्ये अडकलेल्या 13 मुलांना कसं सोडवण्यात आलं आहोत याचा घेतलेला हा आढावा.
नेमकं काय घडलं होतं?
थायलंडच्या चियांग राय भागातील थाम लुआंग नांग नोव ही गुहा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेली ही गुहा अनेक किमी खोल आहे.
23 जून 2018 रोजी 11 ते 16 या वयोगटातील 12 मुलांनी आपल्या 25 वर्षांच्या प्रशिक्षकाबरोबर या गुहेत प्रवेश केला.
त्यांच्या सायकली गुहेच्या प्रवेशाजवळ सापडल्या, मात्र त्यांचा काही ठावठिकाणा लागला नाही. संपूर्ण टीम बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर रात्रीपासून शोधमोहीम सुरू झाली.
गुहेत शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तब्बल 9 दिवसांनी गुहेत जवळपास 4 किलोमीटर आत शोध घेतल्यानंतर ही मुलं आणि प्रशिक्षक एका कोरड्या ठिकाणी एका कपारीत बसल्याचं दिसून आलं.
बाहेर जोरदार पाऊस सुरू झाल्यानं त्यांना बाहेर पडणं मुश्कील झालं होतं. पाणी गुहेत शिरल्यानं हे बचावकार्य अजूनच अवघड झालं होतं.
बचावासाठी नौदलाच्या डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं. सैन्य, पोलीस आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ही शोधमोहीम सुरू झाली.
बचावकार्य आणि त्यातल्या अनेक अडचणी
खायला प्यायला काहीही नाही तसंच प्रकाशाची तिरीप नाही अशा अवस्थेत ही मुलं गुहेत अडकली होती. शोध कार्यासाठी सैनिकांच्या अनेक तुकड्या या ठिकाणी पोहोचल्या. गुहेच्या वरच्या भागात टेकडीतून तिथे जायला मिळतंय का, याची चाचपणी केली गेली.
जून ते ऑक्टोबर या काळात थायलंडमध्ये पाऊस पडतो. अशा वातावरणात या गुहेत 16 फुटापर्यंत पाणी साठतं. पाणी आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत होते.
मुलं नेमकी कुठे आहेत, त्या जागेचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यात येत आला. पाण्याची पातळी आणि गुहेतील वातावरण समजण्यासाठी अंडरवॉटर रोबोटही तैनात केले गेले.
हरवलेल्या मुलांच्या कपड्यांचा वास घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून घटनास्थळी श्वानपथक तैनात करण्यात आलं.
सुरुवातीला या मुलांना बाहेर काढण्यासाठी कसलाही धोका पत्करणार नाही, असं लष्कराने सांगितलं होतं.
दरम्यान, थायलंडमध्ये मोठा पाऊस सुरू झाल्याने गुहेतलं पाणी वाढण्याची भीती होती. शिवाय या मुलांना डायव्हिंग येत नसल्याने त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न होता. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत मुलांना तिथं थांबाव लागेल, अशी भीती ही व्यक्त केली गेली.
अखेरीस गुहेतील पाणी मोटरींच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.
गुहेतील पाणी कमी झाल्यानंतर मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मुलाच्या मागे 1 डायव्हर आणि पुढे 1 डायव्हर असं नियोजन करून एकेक मुलाला बाहेर काढण्याचं काम सुरू झालं.
मुलासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर पहिल्या डायव्हरकडे देण्यात आला होता. अशा पद्धतीने मुलांना बाहेर काढण्यात आलं.
सोशल मीडियावर प्रार्थनेचा ओघ
या सर्व मोहिमेदरम्यान, बेपत्ता मुलांचे काळजीनं काळवंडलेले नातेवाईक गुहेच्या जवळ ठाण मांडून बसले होते. त्यांनी सुरक्षितपणे परत यावं म्हणून प्रार्थना केल्या जात होत्या.
"मी तुला घरी न्यायला आले आहे," असं एक पालक रडत म्हणाल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं होतं.
केवळ मुलांचे पालकच नाहीत तर या फुटबॉल टीमसाठी संपूर्ण देशातून प्रार्थनांचा ओघ सुरू झाला. अनेक नागरिकांनी ट्विटरवरून या खेळाडूंसाठी प्रार्थना केली.
"या अनोळखी लोकांना आम्हाला नक्की भेटायचंय" अशा आशयाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
"हिंमत सोडू नका," "मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे," अशा आशयाचे ट्वीट केले जाऊ लागले.
मुलांची पालकांना पत्र
गुहेच्या बाहेरून मुलांसाठी प्रार्थना सुरू असताना या मुलांनी आपापल्या पालकांना गुहेतून पत्र लिहिली होती. "Don't worry... आम्ही सर्वजण स्ट्राँग आहोत," असं त्यांनी या पत्रांतून म्हटलं.
गुहेबाहेर आल्यावर आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर तुटून पडू, असंही या मुलांनी लिहिलं होतं.
एका मुलाने "बाहेर आल्यावर आम्हाला खूप सारा अभ्यास देऊ नका," अशी विनंती आपल्या शिक्षकाला केली. तर दुसऱ्या पत्रात त्या मुलांच्या प्रशिक्षकाने पालकांची माफी मागितली.
पाँग: आई बाबा, मी तुमच्यावर प्रेम करतो. मी इथं सुरक्षित आहे.
Love you guys.
निक: आई, बाबा, माझं तुमच्यावर प्रेम आहे. बाहेर आल्यावर मला मूकाथा (बार्बेक्यूचा एक प्रकार) खायचा आहे.
आई, बाबा, दादा, खूप खूप प्रेम ❤
मिक: आई बाबा, माझी काळजी करू नका. माझी इथं योग्य काळजी घेतली जात आहे. माझं सर्वांवर प्रेम आहे.
अखेर मुलं बाहेर आली...
सलग अठरा दिवस गुहेत अडकून पडलेल्या या मुलांची अखेरीस सुखरूप सुटका झाली.
पहिल्या दिवशी चार, दुसऱ्या दिवशी चार आणि तिसऱ्या दिवशी चार मुलांना बाहेर काढलं गेलं. त्यांच्या प्रशिक्षकाचीही सुखरूप सुटका करण्यात आली.
गुहेच्या बाहेर हेलिकॉप्टर आणि अँब्युलन्स सज्ज होती. मुलांना बाहेर काढल्यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात हलवण्यात आलं.
सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी काहींनी हॉस्पिटलमध्ये खाण्यासाठी ब्रेड आणि चॉकलेट मागितलं होतं, ते त्यांना देण्यात आला. तर रविवारी काही मुलांनी फ्राईड राईस मागितला होता.
सूत्रांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी लोकांच्या आणि डायव्हर्सच्या हवाल्याने बीबीसीला माहिती दिली की, मुलांना गुहेतून बाहेर काढण्याआधी त्यांना गुंगीचं औषध (सिडेटिव्ह) देण्यात आलं होतं. जेणेकरून अंधारलेल्या अरुंद गुहेतून पाण्याखालून बाहेर येताना ते भयभीत होऊ नये.
बचाव मोहीम यशस्वी झाल्यानंतर काही तासांमध्ये काही कथित रिपोर्ट बाहेर आले ज्यावरून वाद सुरू झाला. यात मुलांना बाहेर काढतेवेळी अतिरिक्त प्रमाणात गुंगीचं औषध देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
थायलंडच्या पंतप्रधानांनी मुलांना बेशुद्ध करून बाहेर काढण्यात आल्याचा दावा धुडकावून लावला होता. बाहेर येताना मुलांनी घाबरू नये यासाठी सैनिकांना देण्यात येणाऱ्या औषधांसारखीच औषधं मुलांना देण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.
अनेकांचा हातभार
या मोहिमेला युनायटेड किंगडम, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान आणि इतर विविध देशांनी सहकार्य केलं.
या गुहेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी मोहिमेत सहभागी लोकांसाठी जेवण बनवणे, त्यांचे कपडे धुणे, वाहतूक सुविधा देणं अशा प्रकारे मदत केली.
जगभरातील तज्ज्ञ डायव्हरनी या मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. थायलंडच्या नौदलातील माजी डायव्हर असलेले गुनाम यांनी या मोहिमेत जीव गमावला.
या मोहिमेत 90 डायव्हरनी भाग घेतला होता. यातील 40 थायलंडमधील होते. ही मोहीम कठीण होती कारण गुहेत चालणं, पोहणं, क्लाईंब या सगळ्या कसरती करत मुलांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांना घेऊन परत बाहेर यायचं होतं.
मोहीम प्रमुख आणि या प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी या मोहिमेचं वर्णन युनायटेड नेशन्स टीम असंच केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)